पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत 'विश्वगुरू' होणारच : डॉ. भागवत कराड

विवेक मराठी    28-Sep-2022
Total Views |
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचे स्थान उंचावले आहे. जगभरातील राष्ट्रे त्यांच्या मतांना महत्व देतात, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भारत 'विश्वगुरू' होणारच; असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी व्यक्त केला. 'साप्ताहिक विवेक' निर्मित 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाच्या प्रकाशनवेळी ते बोलत होते.
 
 
modi
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे, बडवे उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक, विवेक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाठारे, कृष्णात कदम, ग्रंथाचे संपादक निमेश वहाळकर आणि दीपक जेवणे उपस्थित होते.
 
 
केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलण्यासारखे असंख्य मुद्दे आहेत, यातून त्यांच्या नेतृत्वाची उंची लक्षात येते. पंतप्रधान मोदी यांची जवळपास सर्वच क्षेत्रांत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. अर्थव्यवस्था, खेळ, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रात ते काम करत आहेत. भारत आता "डोळ्यात डोळे घालून काम करेल" असा नवा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे रशिया - युक्रेन संघर्षामध्ये त्यांनी भारताची मुत्सद्देगिरी सिद्ध केली. जगातील महासत्ता म्हणवणाऱ्या देशांनी आपल्या नागरिकांना युद्धस्थितीत सोडून दिले, मात्र पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकास मायदेशी परत आणले. त्यामुळे जागतिक शांतता आणि जागतिक राजकारणास पंतप्रधानांनी नवी दिशा दिली असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत 'विश्वगुरू' होणारच, असा विश्वास डॉ. कराड यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कलम ३७० संपुष्टात आणून शामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले, संरक्षण क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद आता अडीच लाख कोटी रुपये आहे. संरक्षण उपकरणांमध्ये मेक इन इंडियास प्राधान्य दिले जात आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे जगाला योग्य तो संदेशही दिला आहे. त्यामुळे जगाला दिशा देणारे नेतृव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असेही डॉ. कराड यांनी यावेळी नमूद केले.
 
 
vivek
 
डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथात अतिशय ओघवत्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण विशद केले आहे. पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली मला जवळून अनुभवण्यास मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे व्यक्तिमत्व हे संघर्षातून निर्माण झाले आहे. त्यांच्या आजच्या व्यक्तिमत्वामागे मोठी तपस्या आहे. 'लोकनेता' असल्याशिवाय कोणी 'विश्वनेता' होऊ शकत नाही. सततच्या विरोधातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वास आकार दिला आहे. मात्र, विरोध आणि संकटे यांचा त्यांनी लीलया सामना केला आहे. 'विश्वनेता' या शब्दाचा विचार करता; त्यासाठी मूलभूत लोकप्रियता जगभरात असावी, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अशीच जगभरात पसरली आहे. त्याचप्रमाणे वैश्विक दृष्टीही हवी, पंतप्रधान मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' यामध्ये ते सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले.
 
 
vivek
 
रशिया - युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतीन यांना 'ही युद्धाची वेळ नव्हे' असा सल्ला देऊन त्यांनी धैर्य सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका आता आत्मविश्वासपूर्ण झाली आहे, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या कार्यातून स्पष्ट होतो. अबुधाबीसारख्या देशात हिंदू मंदिराची उभारणी होणे, यामागेही पंतप्रधान मोदी यांची मुत्सद्देगिरी सिद्ध झाली आहे. देशासाठी ते अतिशय महत्वाकांक्षी आहेत, देशाला 'विश्वगुरु' बनविणे, नवनव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत राहणे, वाटाघाटी करताना देशाचे सामर्थ्य सिद्ध करणे, प्रवासी भारतीयांच्या क्षमता वाढविणे याद्वारे पंतप्रधानांनी देशाच्या परराष्ट्र धोरणास नवी दिशा दिली असल्याचेही डॉ. मुळे यांनी सांगितले.
 
 
श्रीकांत बडवे म्हणाले की, 'लोकनेता ते विश्वनेता' हा ग्रंथ म्हणजे भारतीयांचा गौरव आहे. परदेशात गेल्यावर आज भारताची उंचावलेली पत जाणवते, याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासामध्ये होत आहे. पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्री असल्यापासूनच संवाद साधण्यास सर्वाधिक महत्व देतात. त्यामुळे कोणताही विषय झपाट्याने समजून घेऊन निर्णय घेण्यात मदत होते; गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे सिद्ध केले होते. कोणत्याही योजना राबविण्यासाठी ते अशाचप्रकारची नीती राबवितात, त्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणावरही त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला आहे. करोना संकटाच्या काळात पंतप्रधानांनी भारतीय लसनिर्मात्यांना आत्मविश्वास दिला, त्यांना येणाऱ्या सर्व अडचणी स्वतः पुढाकार घेऊन सोडविल्या. त्यामुळे करोना संकट जगात अनेक देशात अद्यापही आहे, भारतात मात्र आज परिस्थिती सर्वसामान्य होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे जगातील अनेक देशांना लसपुरवठा करून त्यांनी भारताची क्षमताही सिद्ध केली. त्याचप्रमाणे आज देशात निर्माण झालेल्या तब्बल १०० युनिकॉर्नने देशाची औद्योगिक क्षमता सिद्ध केली असून जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारत प्रस्थापित झाला आहे.
 
 
प्रफुल्ल पाठक म्हणाले की, साप्ताहिक विवेकसारख्या विचारधारेचे माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. साप्ताहिक विवेक, तरुण भारत वाचूनच आमच्या पिढीची वैचारिक जडणघडण झाली आहे. आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स या महत्त्वाच्या विषयावर प्रस्तुत ग्रंथात लिखाण करण्याची संधी मला मिळाली. सोलार एनर्जी या विषयावर मी २००० सालापासून कार्यरत आहे. प्रारंभी लोक आमची खिल्लीही उडवायचे, मात्र आता या विषयाचे महत्व देशाच्या लक्षात आले असून आज या विषयावर भारत अतिशय भरीव योगदान देत आहे. भारताने आज १०० गिगावॅट सोलार एनर्जीचे लक्ष्य ठेवले आहे, ते लक्ष्य आता दृष्टिपथात आले असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय मोलाची भूमिका आहे. पॅरिस करारामध्ये सोलार अलायन्सची कल्पना भारताने मांडली, त्यामध्ये भारत आज नेतृत्वाच्या भूमिकेत असून १२० देश आज भारतासोबत काम करत आहेत. याअंतर्गत सदस्य देशांचे ग्रीड तयार केले जाणार असून त्याद्वारे ऊर्जेचा प्रश्न निकाली निघणार आहे. महत्वाचे म्हणजे मध्य आशियातील तेलावरील भारताचे अवलंबित्व संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. भारताची 'वसुधैव कुटुंबकम' ही भूमिका पंतप्रधानांनी जगासमोर ठामपणे मांडली आहे. अवघ्या २० वर्षांपूर्वी भारत जगाकडे मागायला जात आहे, आज मात्र ते दात्याच्या रुपात समर्थपणे उभा आहे, असेही ते म्हणाले.
  
 
- mahamtb