चकदा एक्स्प्रेसची निवृत्ती

विवेक मराठी    29-Sep-2022
Total Views |
अनुजा देवस्थळी । 8097824592
 झुलन गोस्वामीची कारकिर्द केवळ आकड्यांमध्ये तोलून चालणार नाही. अनेक विक्रम आणि पुरस्कार तिच्या नावावर जमा आहेत, पण तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही अमूल्य असं योगदान दिलं आहे. 5 फूट 11 इंच उंचीची झुलन ह्या नैसर्गिक उंचीबरोबरच तिच्या कर्तृत्वाच्या उंचीनेही कायम स्मरणात राहील. तिच्या निवृत्तीने एका यशस्वी आणि संस्मरणीय कारकिर्दीची सांगता झाली. पुढील आयुष्यासाठी झुलनला मनापासून शुभेच्छा.

Jhulan Goswami Retirement
 
 
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 ह्या दिवशी भारताची अष्टपैलू खेळाडू झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आणि जणू क्रिकेटमधील एक युग समाप्त झालं. 20 वर्षांहून दीर्घ चाललेल्या एका यशस्वी कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा..
 
 
महिला क्रिकेट आणि भारत
 
भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. क्रिकेटबद्दल चर्चा करणे हा तर इथे प्रत्येकाचा आवडता छंद आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या फक्त पुरुष क्रिकेटच्या बाबतीत. भारतात महिला क्रिकेट वर्षानुवर्षं दुर्लक्षितच राहिलं. आपला मुलगा कपिल, गावस्कर, तेंडुलकर व्हावा असं बर्‍याच पालकांना वाटायचं, पण आपल्या मुलीने क्रिकेट खेळावं असं वाटणारे पालक पूर्वी शोधूनही सापडले नसते. भारताचा महिला क्रिकेट संघ आहे हेही बहुतेकांना फार उशिराच कळलं. महिला क्रिकेट असोसिएशन 2006-07च्या दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCIमध्ये) विलीन करण्यात आलं, मात्र कमी प्रमाणात खेळले जाणारे सामने आणि संथ खेळ ह्यामुळे महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटइतकी लोकप्रियता मिळत नव्हती.
 
 
Jhulan Goswami Retirement
 
 
ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे, अशा प्रतिकूल परिस्थितीतही महिला क्रिकेट जिवंत ठेवण्यात मोठा वाटा उचलणारी झुलन गोस्वामी नुकतीच निवृत्त झाली. झुलनची ही शेवटची मालिका बर्‍याच कारणांनी संस्मरणीय ठरली."
 
  
भारताने इंग्लंडला त्यांच्याच देशात 3-0 फरकाने हरवलं. शेवटचा सामना लॉर्ड्सवर पार पडला आणि त्यात भारताची गोलंदाज दीप्ती शर्माने नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या खेळाडूला धावचित केलं. ही कृती निश्चितच चुकीची नव्हती. जे झालं ते आयसीसीच्या नियमानुसारच झालं, पण चर्चा मात्र सर्वत्र झाली. नव्या पिढीच्या ह्या महिला खेळाडूंचा आक्रमक खेळ, जशास तसं उत्तर देण्याची प्रवृत्ती ह्यामुळे आता त्यांचाही चाहता वर्ग आपल्या देशात निर्माण होत आहे. पण इथपर्यंतचा प्रवास मात्र सोपा नव्हता. आणि म्हणूनच अंजुम चोप्रा, मिथाली राज, झुलन ह्या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करावं तितकं कमीच होईल. ह्या खेळाडूंनी संघर्ष केला, अपुर्‍या मानधनातही खेळ सुरू ठेवला आणि आता त्याचीच गोड फळं आत्ताची पिढी चाखत आहे. मिथाली आणि झुलन दोघींचीही कारकिर्द दोन दशकांची आहे, त्यामुळे आधी अडचणींचा काळ आणि आता वाढत चाललेली महिला क्रिकेटची लोकप्रियता ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी अगदी जवळून अनुभवल्या आहेत.
 
 
">
 
झुलनची जडणघडण
 
पश्चिम बंगाल राज्यातील नाडिया जिल्ह्यातल्या चकदा ह्या छोट्या गावात झुलनचा जन्म झाला. बंगालमध्ये फुटबॉल खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे, त्यामुळे साहजिकच झुलनही लहानपणापासून फुटबॉलप्रेमी होती. पुढे जाऊन हीच झुलन 20पेक्षा जास्त वर्षं भारतीय महिला क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग ठरेल अशी भविष्यवाणी जर कुणी त्या वेळी केली असती, तर तिच्यासह सर्वांनीच त्या व्यक्तीला वेड्यात काढलं असतं. क्रिकेटच काय, इतर कुठल्याही खेळाशी अजिबातच संबंध नसलेल्या मध्यमवर्गीय घरात झुलन जन्मली होती. 1992मध्ये पहिल्यांदाच तिने विश्वचषकाचे सामने टीव्हीवर पाहिले आणि ती ह्या खेळाच्या प्रेमात पडली. 1997मध्ये तिने महिला विश्वचषकाची अंतिम फेरी मैदानात प्रत्यक्ष अनुभवली. त्या सामन्यात तिने बॉलगर्लचं काम केलं होतं. ऑस्ट्रेलियन खेळाडू बेलिंदा क्लार्कचा खेळ पाहिल्यावर तिचं क्रिकेटप्रेम आणखी वाढीला लागलं. ती स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि त्यानंतर विश्वचषक हातात घेऊन मैदानाला फेरी मारणारा संघ पाहिल्यावर ‘मीही क्रिकेट खेळणार आणि एक दिवस आपला संघही विश्वचषक जिंकणार’ ह्या स्वप्नांची तिच्या मनात पेरणी झाली. 15व्या वर्षी झुलनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आईवडील तिच्या ह्या निर्णयाने फारसे खूश नव्हते, मात्र तिची आजी ठामपणे तिच्या मागे ठामपणे उभी राहिली. त्या वेळी चकदामध्ये क्रिकेट प्रशिक्षणाची सोय नव्हती, त्यामुळे अडीच तासांचा ट्रेनचा प्रवास करून ती कोलकात्याला प्रशिक्षणासाठी जात असे. दिवसभरात 5 तास प्रवास, क्रिकेट आणि त्यानंतर वेळ उरला तर अभ्यासही, असा तिचा दिनक्रम होता. तिचे प्रशिक्षक वेळ पाळण्याच्या बाबतीत अगदी कठोर शिस्तीचे होते, शिवाय एक ट्रेन चुकली तर त्यानंतर लगेचच दुसरी ट्रेन मिळणं हेही दुरापास्त होतं, पण ह्यामुळेच वक्तशीरपणा हा गुण आपोआपच तिच्यामध्ये आला. सुरुवातीला मुलांबरोबर खेळताना झुलन संथ गोलंदाजीमुळे मस्करीचा विषय ठरली होती. ‘तुला फास्ट बॉलिंग येत नाही, तू फक्त बॅटिंग कर जा’ अशा वाक्यांनी निराश न होता तिने ‘मला फास्ट बॉलरच व्हायचंय’ हे मनोमन ठरवून टाकलं.
 

Jhulan Goswami Retirement 
 
आंतरराष्ट्रीय पदार्पण, मैदानातली कामगिरी आणि मानसन्मान
 
कोलकात्यातील प्रशिक्षण संपल्यावर बंगालच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली. 2002मध्ये वयाच्या 19व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्याच वर्षी त्याच संघविरुद्ध ती तिचा पहिला कसोटी सामना खेळली.
 
 
मिथाली राजच्या साथीने 2006-07मध्ये पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात तिने महत्त्वाचा वाटा उचलला.
ह्या सिरीजच्या पहिल्या सामन्यात नाइटवॉचमन म्हणून मैदानात उतरलेल्या झुलनने अर्धशतक साजरं केलं, शिवाय त्यानंतर दुसर्‍या सामन्यात दोन डावांत मिळून तिने 10 विकेट्स घेतल्या होत्या.
 
 
29 September, 2022 | 16:41

2007मध्ये अफ्रो-आशिया टूर्नामेंटमध्ये ती आशियाच्या संघात सहभागी होती, त्याच वर्षी तिने ICC Women's Cricketer of the Year  हा पुरस्कारही मिळवला.
 
 
2008मध्ये मिथाली राजकडून झुलनकडे कर्णधारपद आलं. 2011पर्यंत ते कायम होतं. 2010मध्ये तिला अर्जुन पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. 2012मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. पद्मश्री मिळणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. (पहिला मान - डायना एडलजी.)
 
 
2017मध्ये ती तिच्या स्वप्नपूर्तीच्या अगदी जवळ पोहोचली होती, मात्र विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत 9 धावांनी इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला आणि स्वप्न अधुरंच राहिलं.
 
 
त्याआधी 2005मध्येही भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, त्या वेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं.
2020मध्ये तिला ICC Women's ODI Cricketer of the Decade awardसाठी नामांकन मिळालं होतं.
12 मार्च 2022 ह्या दिवशी विश्वचषकात सर्वाधिक विकेट मिळवणारी गोलंदाज होण्याचा बहुमान तिने मिळवला..
 
ह्याच वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा विक्रमही तिच्या नावावर जमा झाला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 250पेक्षा जास्त विकेट्स मिळवणारी ती जगातली एकमेव महिला खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रमही तिच्याच नावावर आहे
 
 
दोन दशकांच्या ह्या कारकिर्दीत झुलन 12 कसोटी सामने, 202 एकदिवसीय सामने आणि 68 टी-ट्वेंटी सामने खेळली
मध्यमगती गोलंदाज ही तिची मुख्य ओळख असली, तरी फलंदाजीतही तिने संघासाठी योगदान दिलं आहे.
 
 
निवृत्ती आणि निवृत्तिपश्चात
 
 
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने झुलनने ऑगस्ट 2018मध्ये T-20 सामन्यांमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता 2022 हे तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं शेवटचं वर्ष ठरलं.
 
 
शेवटच्या एकदिवसीय मालिकेतही पहिल्या आणि तिसर्‍या सामन्यात तिने प्रत्येकी दोन बळी मिळवले. ही मालिका भारताने 3-0 फरकाने जिंकली आणि त्यांच्या लाडक्या ’झू दीदी’ला विजयाची भेट देत आनंदाने निरोप दिला.
 
 
गेली काही वर्षं संघात गोलंदाज म्हणून खेळत असतानाच तिने गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली आहे, निवृत्तीनंतर तिने पूर्णवेळ प्रशिक्षक व्हायला काहीच हरकत नाही. नव्या पिढीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचं काम ती नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकेल.
 
झुलनची क्रिकेट कारकिर्द ही मिथाली राजनंतरची दुसर्‍या क्रमांकाची सर्वात दीर्घ कारकिर्द आहे.
 
’शाबाश मिथू’ ह्या मिथाली राजवर आलेल्या बायोपिकनंतर आता वर्षअखेरीपर्यंत ’चकदा एक्स्प्रेस’ हा झुलनच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येणार आहे. ‘चकदा एक्स्प्रेस’ हे तिचं टोपणनाव आहे.
 
झुलनची कारकिर्द केवळ आकड्यांमध्ये तोलून चालणार नाही. अनेक विक्रम तिच्या आणि पुरस्कार तिच्या नावावर जमा आहेत. 5 फूट 11 इंच उंचीची झुलन ह्या नैसर्गिक उंचीबरोबरच तिच्या कर्तृत्वाच्या उंचीनेही कायम स्मरणात राहील. तिच्या निवृत्तीने एका यशस्वी आणि संस्मरणीय कारकिर्दीची सांगता झाली. पुढील आयुष्यासाठी झुलनला मनापासून शुभेच्छा.