अद्वयानंद यात्री ः डॉ. रामचंद्र देखणे

विवेक मराठी    30-Sep-2022   
Total Views |
पंढरीचा निष्ठावान वारकरी, संतसाहित्याचा अभ्यासू प्रवक्ता, बहुरूपी भारुडाचे सादरकर्ते, भक्तिनिरूपणकार, साक्षेपी ग्रंथ लेखक-स्तंभकार डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अकाली निधनाने भागवत धर्माची पताका अभिमाने, आनंदाने खांद्यावर मिरवणारा अद्वयानंद यात्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. देखणेंचे स्नेही विद्याधर ताठे यांनी वाहिलेली श्रद्धासुमनांजली.. एका वारकर्‍याचे दुसर्‍या वारकर्‍याच्या स्मृतीला शब्दाभिवादन..
 
dekhane
 

तैसा वाग्विलास विस्तारू। गीतार्थे विश्व भरू।
आनंदाचे आवारू। मांडू जगा॥ - (ज्ञानेश्वरी)
 
 
विश्व गीतार्थाच्या आनंदाने भरून टाकण्याचा ध्यास हाच ज्यांचा श्वास होता, असा पंढरीचा निष्ठावान वारकरी म्हणजे रामचंद्र अनंत देखणे! भागवत धर्माच्या सामाजिक समरस भक्तीची धवल पताका अभिमानाने व आनंदाने खांद्यावर मिरवणारा, अद्वयानंद अनुभूती घेतलेला आनंदयात्री म्हणजे ह.भ.प. रामचंद्र देखणे! संतसाहित्याचा प्रभावी प्रवक्ता म्हणजे डॉ. रामचंद्र देखणे! असे रामभाऊ देखणे यांचे सांगावेत तेवढे गुणपैलू कमी आहेत. एक बहुआयामी, लाघवी, भजनानंदी रंगलेले व्यक्तिमत्त्व आपला इहलोकीचा प्रवास संपवून अनंताच्या महायात्रेला गेले.
 
 
 
पंढरीची वारी करणारे वारकरी लाखो आहेत, पण वारीचा पारमार्थिक बोध व सामाजिक अभिसरणात्मक आशय समजून पंढरीची पायी वारी करणारे फारच दुर्मीळ. अशा दुर्मीळ अंतरंंग अनुभवींपैकी डॉ. देखणे एक होते. त्यांनी स्वत: अनेक वर्षे पंढरीची पायी वारी केलीच, त्याचबरोबर ‘संत विचार प्रबोधन’ दिंडी काढून अनेकांना आनंदवारी घडविली. अनेकांना वारीची गोडी लावली. अनेक देशी, विदेशी शहरी अभ्यासकांना त्यांनी आपल्या दिंडीतून पंढरीची वारी घडविण्याची जी सेवा केली, ती सदैव संस्मरणीय आहे. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. पंढरीची वारी हे भक्तीचे दिव्य दर्शन आहे. वारी हा आध्यात्मिक आनंदाचा आविष्कार आहे, वारी ही सामाजिक परिवर्तनाची पाठशाळा आहे. तसेच पंढरीची वारी ही एक साधना आहे आणि त्यायोगे घडणारे जनताजनार्दनामधील परमात्म्याचे दर्शन हा या वारीचा प्रसाद आहे, अशी डॉ. देखणे यांची वारीकडे पाहण्याची व्यापक दृष्टी होती. त्यांच्या या दृष्टीमुळे व साधनेमुळे त्यांना पंढरीनाथाचा कृपाप्रसाद लाभलेला होता. हा ईश्वरी प्रसाद हेच त्यांच्या चैतन्य जीवनाचे अधिष्ठान होते.
 
 
डॉ. देखणे स्वत:ला संतविचाराचा पाईक मानत होते. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी। बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया।’ अशा आत्मविलोपी भक्तिभावाने संतांनी आपल्या साहित्यातून जो ऋषिविचार सहजसुलभ लोकभाषेतून समस्त समाजाला दिला, त्या विचाराला शिरोधार्य मानून त्या संतबोधाचा प्रचार-प्रसार करणे हे डॉ. देखणे यांचे अंगीकृत जीवनकार्य होते. संतसाहित्याचे प्रभावी प्रवक्ते म्हणून त्यांनी केलेले कार्य केवळ स्तुत्यच नव्हे, तर अनुकरणीय आहे.
 
 
 
गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे॥ असा भागवत धर्माचा संपन्न वारसा रामचंद्र अनंतराव देखणे यांना लाभलेला होता. इ.स. 1956 साली पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळच्या कारेगाव येथे एप्रिल महिन्यात त्यांचा जन्म झाला व येथेच त्यांचे बालपण गेले. 1972च्या भीषण दुष्काळाने सार्‍या महाराष्ट्रातील जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. अशा बिकट संकटकाळात ते पुण्यात आले आणि कायमस्वरूपी पुणेकर झाले. त्यांनी प्राप्त परिस्थितीशी दोन हात करीत आपले शिक्षण पूर्ण केले. ते बी.एस्सी. पदवीधर झाले. पण संतसाहित्याच्या ओढीने, संतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी संतसाहित्याचे उपासक असलेले रामभाऊ देखणे एम.ए. (मराठी) झाले आणि पुढे त्यांनी संतसाहित्यावर पीएच.डी. केली व आपले इप्सित ध्येय गाठले. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी 34 वर्षे इमानेइतबारे शासकीय सेवा केली. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या धर्मपत्नीचा सहभाग होता. त्यांचा मुलगा ‘भावार्थ’ हा उच्चशिक्षित आहे आणि भारूड सादरीकरणात रामभाऊंना त्याचीही सुंदर साथ मिळत होती, याचा रामभाऊंना मनस्वी आनंद व अभिमान होता. नव्या पिढीशी सख्यत्व हा डॉ. देखणे यांच्या स्नेहल स्वभावाचा सुंदर पैलू होता.
 
 
 
प्राधिकरणात जनसंपर्क अधिकारी असल्याने अनेक वर्षे अनेक संपादकांशी, पत्रकारांशी त्यांचा जवळून संबंध आला. तो त्यांनी आपल्या लाघवी स्वभावाने अधिक सुदृढ केला आणि संतबोधाचा प्रसार करण्यास त्यांनी या संबंधाचा सदुपयोग करून घेतला. विविध दैनिकांमध्ये, नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केले आणि ‘अभ्यासोनि प्रकट व्हावे।’ तसे ते त्यांच्या व्यासंगी लेखनाने सुपरिचित झाले. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी ‘वारी’ निमित्ताने सलग 20-25 दिवस स्तंभलेखन केले आणि पंढरीची वारी वाचकांच्या मनमंदिरात सुस्थापित केली. त्यांनी वारीचे विविधांगी शब्ददर्शन घडविले. या स्तंभलेखनास अपूर्व वाचकप्रियता लाभली व त्या लेखनाची पुस्तकेही प्रकाशित झाली.
 
 
 
डॉ. देखणे यांच्या नावावर 50पेक्षा अधिक पुस्तके आहेत. ही पुस्तके त्यांच्या व्यासंगातून-चिंतनातून फुललेली अक्षरपुष्पे आहेत. तसेच त्यांचे ‘भारूड’ सादरीकरण म्हणजे कलेचा पूर्णावतारच होते. देहभान हरपून ते भारुडे सादर करीत. संतांचा बोध आणि लोककलेचा बाज याचा तो संगम पाहून श्रोते-दर्शक थक्क होऊन जात होते. ‘भारुडा’वरील त्यांचे निरूपण, संतांचा सांगावा सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचवत होता. संत एकनाथांच्या भारुडावरच त्यांनी पीएच.डी. केलेली होती. पण तो केवळ विद्यापीठीय अभ्यास नव्हता, तर त्यामागे अनुभूतीची, चिंतनाची एक अनोखी डूब होती. संतांचा प्रबोध जनमानसात पोहोचविण्याची तळमळ होती.
 
 
 
‘भारूड’ हा संतसाहित्यातील एक लोकरंजक तसाच प्रबोधनात्मक काव्यप्रकार आहे. ते रूपक असते आणि लोकजीवनातील रूढ लोककलाकाराच्या माध्यमातून भक्तिज्ञानाचा आशय-बोध त्याद्वारे केला जातो. संतसाहित्यात एकनाथमहाराजांची भारुडे विशेष लोकप्रिय ठरली आहेत. रंजनाद्वारे प्रबोधन हे त्यामागचे सूत्र आहे. तसेच भारूड हा नाट्यसदृश वाङ्मयप्रकार संतांच्या समाजाभिमुखतेचे दर्शन आहे. डॉ. देखणे आणि पंढरपूरच्या चंदाबाई तिवाडी यांनी वारी-दिंंडीतील ‘भारुडा’ला रंगमंचावर प्रतिष्ठा मिळवून दिली.
 
 
 
भारुडातून दिसणारी ‘वासुदेव’, ‘गोंधळी’, ‘भुत्या’, ‘पोतराज’ ही पात्रे पूर्वीच्या ग्रामजीवनातील ‘जागले’ (समाजात धर्मजागृती करणारे) होते. ही सारी पात्रे डॉ. देखणे यांनी रंगमंचावर अत्यंत प्रभावीपणे सादर करून संतसाहित्याची व लोककलेची व्रतस्थपणे सेवा केली. भोग सोडून त्यागाचे दान मागणारा ‘वासुदेव’, ‘बये दार उघड आता दार उघड’ म्हणत विकारावर संतबोधाचे चाबूक फटके मारणारा ‘पोतराज’, विठ्ठलरूप जगदंबेसाठी भावभक्तीचा गोंधळ घालणारा ‘गोंधळी’ ही डॉ. देखणे यांनी सादर केलेली पात्रे कोणी विसरूच शकत नाही. या दृष्टीने डॉ. देखणे हे संतसाहित्याच्या इतर पांडित्यपूर्ण अभ्यासकांपेक्षा वेगळे, विशेष आणि विरळा होते.
 
 
संतसाहित्य व लोकसाहित्य यावर त्यांचे केवळ लेखनच नव्हते, तर स्वतंत्र, विशेेष असे चिंतन होते. कथा, कादंबरी, वैचारिक, ग्रामीण असे विविध साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांच्या या लेखनासही वाचकांचा-रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या रसिकांनीच त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविले, तसेच अनेक छोट्या-मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचे भाग्य त्यांना लाभले. डॉ. देखणेंना ‘ग्रामजागर साहित्य संमेलन’, राळेगण (2006), 12वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, जुन्नर (2011), पर्यावरण साहित्य संमेलन (2013), 8वे आचार्य अत्रे साहित्य संमेलन, सासवड अशा महाराष्ट्र राज्यात झालेल्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला होता. तसेच राज्याबाहेर इंदूर (म.प्र.), बडोदा (गुजरात) येथील साहित्य संस्थांच्या संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले होते. एवढेच नव्हे, तर अमेरिकेत झालेल्या ‘विश्व साहित्य संमेलना’तील ‘संतसाहित्यावरील परिसंवादाचे अध्यक्षपद’ हा त्यांच्या जीवनातील सर्वोच्च बहुमान मानला जातो. काही वर्षांतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना लाभणार होता. थोर विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी कालच्या शोकसंदेशात अशीच भावना व्यक्त केलेली आहे. ‘डॉ. देखणे यांना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचे पाहायचे होते’ असे डॉ. मोरे म्हणाले. ही अनेकांची इच्छा होती. अशा डॉ. देखणे यांची सर्वमान्य प्रेममूर्ती दृष्टिआड गेली, हे अजूनही मनाला खरे वाटत नाही. कालाय तस्मै नम:।
 
 
 
पंढरीच्या पायी वारीत ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीत डॉ. देखणे यांची-माझी वार्षिक भेट ठरलेली असे. त्यांच्या ‘संत विचार प्रबोधन’ दिंडीचा आषाढी वारीत श्रीक्षेत्र पंढरीतील द.ह. कवठेकर प्रशालेत मुक्काम असे. त्या काळात ते एक मित्र, पंढरीचे पाटील म्हणून माझी आवर्जून भेट घेत व वा.ना. उत्पात, विवेकानंद वासकर यांच्याकडे आम्ही उभयता जात असू. या काळात गप्पागोष्टी, संवाद होई तो फक्त संतसाहित्याचाच. ‘भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतर न करण्यात।’ हे संत एकनाथांचे वचन त्यांचा जणू स्थायिभावच झालेले होते. डॉ. देखणेंशी निधनापूर्वी 2-3 दिवस आधी दूरध्वनीवर माझे सविस्तर संभाषण झाले होते. फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजश्री देशपांडे लिखित ‘संत जनाबाईंचे विचारविश्व’ या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमिताने ते संभाषण होते. त्यानंतर नवरात्रीच्या प्रथम दिनी सायंकाळी ते देवी उपासना करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावल्याचे धक्कादायक वृत्त आले. उपासना हेच त्यांचे जीवन होते आणि उपासना करीत असतानाच त्या जीवनाची सांगता झाली.
 
 
म्हणोनी भाग्य योगे बहुते। तुम्हा संतांचे मी पाये।
 
पातलो आता कै लाहे। उणे जगी॥
 
 
असे त्यांचे प्रार्थनामय सेवाजीवन संतकृपेने, ईशप्रसादाने धन्य होते, कृतार्थ होते. अशा स्वनामधन्य कृतार्थ वारकरी जीवनाला विनम्र वंदन आणि विवेक साप्ताहिक परिवाराची भावपूर्ण शब्दांजली!
 
 

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.