संघगंगेचे भगीरथ

कर्तव्यभूमीचे पुजारी

विवेक मराठी    08-Sep-2022
Total Views |
@डॉ. प्रशांत धर्माधिकारी । 9422495094
  सा. विवेक प्रकाशित ‘कर्तव्यभूमीचे पुजारी’ या मालिकेच्या दुसर्‍या संचात रवींद्र पवार, मोहनराव गवंडी, भाऊसाहेब जहागिरदार, बापूसाहेब लाखनीकर आणि गोविंद उपाख्य नाना आहेर या पाच स्वयंसेवकांच्या चरित्रांचा समावेश आहे. स्वार्थलोलुप समाजामध्ये अशा स्वयंसेवकांच्या रूपाने तार्‍यांचे बेट पाहिले, म्हणजे चांगुलपणा शिल्लक आहे असे वाटते. अंधार होत असलेल्या भवताली कुठेतरी आशेचा किरण दिसतो व या देशाला ऊर्जस्वल भविष्य आहे याची खात्री पटते. अशा दिवंगत स्वयंसेवकांनी आपल्या लोकोत्तर आयुष्यामधून संघाची गंगा आपल्या आचरणातून सर्वदूर पोहोचवली, हे या पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते.
 
rss
 
राष्ट्रसंत समर्थ रामदासांनी म्हटले आहे की
काया बहुत कष्टवावी।
उत्कट कीर्ति उरवावी।
चटक लाउनी सोडावी।
कांहीं येक॥
 
 
अर्थात परोपकारासाठी आपला देह कष्टवावा आणि त्यातून उत्कट कीर्ती मिळवावी; समोरच्या व्यक्तीला आपली चटक लागली पाहिजे. समाजकार्याची चटक लागणारे व लावणारे असे असंख्य स्वयंसेवक हेच खरे संघाचे वैभव होय. हा समाज माझा आहे, या समाजाची सुखदु:खेदेखील माझी आहेत हा भाव अविरत मनात ठेवून ऊर्जस्वलाच्या वाटेवर चालत राहणे हा स्वयंसेवकांचा व्यवच्छेदक गुण म्हटला पाहिजे.
 
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
फक्त २५०/- रुपयांत
https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल शताब्दीकडे सुरू असून महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्वरूपात संघकाम करणार्‍या दिवंगत संघस्वयंसेवकांच्या कामाचा परिचय करून देणार्‍या, दर चार महिन्यांनी पाच अशा क्रमाने साप्ताहिक विवेकमार्फत प्रकाशित होणार्‍या पुस्तिका म्हणजे मराठी साहित्यात पडणारी मोलाची भर होय. मराठी साहित्याला जसे संतवाङ्मय, शाहिरी वाङ्मय, दलित वाङ्मय, अभिजात नागरी वाङ्मय यांनी समृद्ध केले, अगदी त्याचप्रमाणे किंबहुना काकणभर अधिक संघवाङ्मयानेदेखील समृद्ध केले आहे. मातृभूमीचा हुंकार व्यक्त करणारी व अस्सल मराठीची स्पंदने टिपणारी हजारो संघगीते लक्षावधी मराठीजनांच्या जिभेवर रुंजी घालत असतात. विशेष म्हणजे या गीतांचा लेखक कोणालाच माहीत नसतो. ही सर्व गीते एकत्र करून त्याचा साकल्याने अभ्यास करणे हा एका वेगळ्या प्रबंधाचा विषय होईल. मात्र या संघगीतामध्ये अनेक स्वयंसेवकांचे ऊर्जस्वल हुंकार दृग्गोचर होतात. अशाच निवडक पाच स्वयंसेवकांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या पुस्तिका ’कर्तव्यभूमीचे पुजारी’ या उपक्रमांतर्गत साप्ताहिक विवेकने नुकत्याच प्रकाशित केल्या, त्या पुढीलप्रमाणे - रमेश पतंगे लिखित रवींद्र पवार, सुनील भंडगे लिखित मोहनराव गवंडी, प्रा. श्रीकांत काशीकर लिखित भाऊसाहेब जहागिरदार, विवेक कवठेकर लिखित बापूसाहेब लाखनीकर आणि गंगाधर पगार लिखित गोविंद उपाख्य नाना आहेर. या पाचही दिवंगत स्वयंसेवकांचा एक सामान्य गुणधर्म म्हणजे त्यांनी एका ध्येयासाठी आयुष्य वेचले. यातील तीन स्वयंसेवकांना तर आणीबाणीच्या काळात तुरुंगवासदेखील घडला. मात्र ध्येयनिष्ठा तसूभरदेखील ढळू न देता ते मार्गक्रमण करत राहिले. या पाचही पुस्तिकांच्या मुखपृष्ठावर रेखाटलेली सुंदर व्यक्तिचित्रे पाहिली म्हणजे जणू काही ते दिवंगत स्वयंसेवक आपल्यासमोर उभं राहून आपली गोष्ट वाचकाला सांगतात असा भास होतो. मुखपृष्ठावर स्वयंसेवकांचे फोटो न देता त्यांची चित्रे रेखाटून घेणे ही कल्पनाच खूप सुंदर आहे. यामुळे या पुस्तिका सजीव झालेल्या आहेत.
 
 
rss
रमेश पतंगे लिखित रवींद्र पवार हे पुस्तक म्हणजे एका तत्त्वचिंतकाच्या त्रयस्थ दृष्टीकोनातून ध्येयनिष्ठ स्वयंसेवकाचे केलेले वस्तुनिष्ठ चित्रण होय. रमेश पतंगे यांना रवींद्र पवार पहिल्यांदा कसे भेटले येथपासून हा चरित्रपट सुरू होतो ते त्यांच्या कुटुंबीयांच्या व त्यांच्या परीसस्पर्शाने पावन झालेल्या अनेक स्वयंसेवकांच्या आठवणींना उजाळा देत त्याला आकार येतो. मुंबईमध्ये संघाचे ’यशवंत भवन’ नावाचे कार्यालय ज्या व्यक्तीमुळे दिमाखात उभे आहे, त्यांचे नाव रवींद्र पवार. रवींद्र पवारांचा एका वाक्यात परिचय करून देताना रमेश पतंगे यांनी प्रख्यात संस्कृत नाटककार भास याच्या ’वेणीसंहार’ नाटकातील कर्णाच्या तोंडी असलेले ’दैवायत्तम् कुले जन्म, मदायत्तम् तू पौरुषम्।’ वाक्य वापरले आहे. रवींद्र तुकाराम पवार हे गिरणी कामगाराचे पुत्र होते. शिवडीत राहत असताना कलेश्वर सायंशाखेत जाऊ लागले व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये यशवंतराव केळकरांच्या तालमीमध्ये तयार झाले. संस्था उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. कीर्ती कॉलेजला आकार देण्याचे व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. नवीनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल या दोन संस्थांच्या उभारणीचे श्रेयदेखील रवींद्र पवार यांना द्यायला हवे. सामाजिक समरसता मंचाच्या कामात त्यांनी दिलेले योगदान लोकोत्तर होते. यामध्ये दलित क्षेत्रात सेवाभावाने रचनात्मक काम करणार्‍या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार असो, पुण्यातल्या सामाजिक समरसता परिषदेचा कार्यक्रम असो, संघाचे ब्रह्मदेशातील प्रचारक रामप्रकाश सुधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या गौतम बुद्धांच्या जीवनप्रसंगावरील प्रदर्शनाचे मुंबईमध्ये यशस्वी आयोजन असो, सगळीकडे मोलाचा सहभाग नोंदवला. रवींद्र पवार यांनी सामान्य कार्यकर्ता, टास्क मास्टर ते अनेक संस्थांचा जन्मदाता असा मोठा पल्ला गाठला होता. ’विठ्ठल निवास, तळमजला, जुना प्रभादेवी रोड’ असा पत्ता लिहिणार्‍या रवींद्र पवार यांच्या दोन खोल्यांच्या घरात सर्व सुखे नांदत होती. त्यांची कार्यशैली धडाडीची होती. अंडरवर्ल्डच्या लोकांपासून ते अब्जाधीश व्यावसायिकांपर्यंत सहजपणे भेटून येणार ही त्यांची खासियत. परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण, राजकारणाची योग्य जाणीव, जनतेची नाडी समजण्याचे कसब हे लोकोत्तर गुण त्यांच्यामध्ये होते. फोमन हायस्कूलचे यशवंत भवन होण्याचा इतिहास हा रवींद्र पवार यांच्या जीवनातील महत्त्वाचा पल्ला. ’कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती’ या ओळीप्रमाणे जीवनाच्या शेवटच्या काळातदेखील त्यांना यशवंत भवनच्या बांधकामाचा व जडणघडणीचा ध्यास लागला होता. रमेश पतंगे यांच्या सर्जक लेखणीतून रवींद्र पवार यांचे जीवन अत्यंत तेजस्वीपणे रेखाटले गेले आहे. या पुस्तिकेचा आवाका जर वाढवला, तर मराठी सारस्वतांना एक चांगली कादंबरी वाचावयास मिळेल असे वाटते.
 

rss
 
प्रा. श्रीकांत काशीकर यांनी लिहिलेल्या भाऊसाहेब जहागिरदार यांच्यावरील पुस्तिकेमध्ये एक सामान्य कार्यकर्ता कुठलाही अभिनिवेश न ठेवता असामान्य काम उभे करतो, याचे थक्क करून टाकणारे चित्रण आपल्याला वाचावयास मिळते. मराठवाड्यात नावारूपाला आलेल्या भाऊसाहेब जहागिरदार यांची नोकरी आयकर खात्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून होती. मात्र नोकरीत राहून संघकार्याची जबाबदारी सांभाळणे कठीण असल्यामुळे त्यांनी वकिलीचा पेशा पत्करला व स्वतंत्रपणे वकिली करायला सुरुवात केली. भाऊसाहेब जहागिरदार यांच्याकडे ज्येष्ठ प्रचारक माननीय प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेच्या मराठवाडा विभागाची संघटनात्मक जबाबदारी मिळाली. दत्ताजी भाले या ज्येष्ठ संघप्रचारकाच्या जीवनाचा मोठा प्रभाव भाऊसाहेबांवर होता. वकिलीच्या व्यवसायात भाऊसाहेबांनी कर सल्लागार व विश्वस्त संस्थांना सहकार्य असे आपले क्षेत्र निवडले. महिन्यात साधारण आठ ते दहा दिवस वकिली व उर्वरित काळ संघ व विश्व हिंदू परिषद या कामांसाठी असे स्वत:चे वेळापत्रक बनवून टाकले. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतरचे पहिले हिंदू संमेलन प्रयाग येथे 1966मध्ये झाले. यासाठी मराठवाड्यातील साधारण 28 तालुक्यांचा प्रवास करून आपले कार्यक्षेत्र अक्षरश: पिंजून काढले. आणीबाणीच्या काळामध्ये संघावर बंदी आली आणि भाऊसाहेबांना अटक होऊन नाशिक कारागृहात त्यांची रवानगी झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतदेखील संघविचार माणसाचे जीवन तेजस्वी बनवतो, याचा प्रत्यय भाऊसाहेबांच्या तुरुंगातील व्रतस्थ जगण्यातून आपल्याला पाहावयास मिळतो. मठ, मंदिरे, विश्वस्त संस्था हा भाऊसाहेबांचा आवडता व अभ्यासाचा विषय होता. श्री समर्थ वाग्देवता मंदिराच्या जडणघडणीत त्यांनी मोठे योगदान दिले. अपघातामध्ये पायाला जोरात मार बसून अक्षरश: गुडघ्याच्या खाली पाय लोंबकळत असतानादेखील कार्यरत राहणे हे भाऊसाहेबांचे वेगळेपण. पायाची शस्त्रक्रिया भूल न देऊ देता त्रयस्थपणे आपल्या डोळ्यांनी पाहण्याची कणखर मानसिक शक्ती त्यांना लाभली होती. 1987च्या डिसेंबर महिन्यात आळंदी येथे विशाल हिंदू संमेलन भरले होते. तेव्हा तीन-साडेतीन लाख लोकांनी संमेलनात सहभाग नोंदवला. या कामात प्रत्येक हिंदूला अयोध्या आंदोलनाशी जोडण्याचे काम भाऊसाहेबांनी केले. भाऊसाहेब यांचा मूळ पिंडच धार्मिक व आध्यात्मिक बैठक असलेला. त्यामुळे व्यवसाय करतानाही त्यांनी अनेक व्यक्तींना व सार्वजनिक संस्थांना अगदी मनापासून आणि विनामोबदला मदत केली. प्रासादिक भाषा व ओजोगुण हा श्रीकांत काशीकर यांच्या लेखणीचा गुण म्हटला पाहिजे. भाऊसाहेब जहागिरदार यांच्याबद्दल लिहिताना प्रसंगी त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध या पुस्तिकेमधून प्रकट झाला आहे. एक कार्यकर्ता नकळत अनेक पिढ्यांना प्रभावित करतो, याचा प्रत्यय श्रीकांत काशीकर यांनी चितारलेल्या भाऊसाहेब जहागिरदार यांच्या चरित्राकडे पाहून सामान्य वाचकाला येतो.
 
 
rss
 
विवेक कवठेकर यांनी लिहिलेले बापूसाहेब लाखनीकर यांचे चरित्र हे संस्था उभारणी करणार्‍या एका असामान्य स्वयंसेवकांच्या जीवनाचा पट उलगडणारे आहे. या पुस्तिकेची सुरुवातच ’विदर्भ भूमी ही संघ गंगोत्री आहे’ या सुंदर वाक्याने होते. बापूसाहेब उपाख्य परशुराम गोविंद लाखनीकर हे मागच्या शतकातील महत्त्वाचे नाव. ’राष्ट्रीय शिक्षण संस्था’ या संस्थेची स्थापना करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचे काम बापूसाहेबांनी आजन्म केले. नागपूर-रायपूर महामार्गावर भंडार्‍याच्या पलीकडे लाखनी या छोट्याशा गावांमध्ये त्यांचा जन्म झाला व शैक्षणिक संस्था उभी करावी या ध्येयाने ते पेटून उठले. नंतर नागपुरात त्यांचा संघाशी संपर्क आला व इतवारी शाखेत बापूसाहेब नित्यनेमाने जात असताना भूतपूर्व सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस हे त्यांचे गणप्रमुख होते. शिक्षणाची गंगा लाखनी परिसरात अवतरविण्याकरिता सज्ज झालेला आधुनिक भगीरथ म्हणजे बापूसाहेब. त्यांनी 23 जून 1940 रोजी समर्थ विद्यालयाची स्थापना केली. संस्था उभी करण्यासाठी देणगी गोळा करण्यासाठी पूजनीय बाळासाहेब देवरस यांनी त्यांना ’मोठ्या देणग्या गोळा करण्यापेक्षा दहा रुपयांपासून दीडशे रुपयापर्यंतच्या देणग्यांची मागणी करा’ असा त्यांना सल्ला दिला. मध्यमवर्ग हाच आपल्या कामाचा खरा आधार आहे, असे देवरसांनी म्हटल्याचे विवेक कवठेकर यांनी नमूद केले आहे. स्वयंसेवकांचे चरित्र वाचताना त्यांना तत्कालीन पूजनीय सरसंघचालकांनी वेळोवेळी कसे मार्गदर्शन केले होते, हे पाहणे निश्चितच प्रेरणादायक होय. भाऊसाहेबांना 5 सप्टेंबर 1967 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. संघबंदीच्या काळात त्यांना अटकदेखील झाली होती. जून 1976मध्ये काही दिवसांसाठी बापूसाहेब पॅरोलवर तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. मात्र त्या काळातसुद्धा त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनात न गुरफटता संस्थेच्या कारभाराची चौकशी केली. बापूंच्या जीवनात दोन आर.एस.एस. - नाणे एक, बाजू दोन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रीय शिक्षण संस्था. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करणे असो, श्रीराम दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था उभे करणे असो किंवा 1990च्या आसपास घरोघरी जाऊन साप्ताहिक विवेकचे वर्गणीदार बनवणे असो, या प्रत्येक कामात बापूसाहेबांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्यामुळेच त्यांचे राजकीय विरोधकदेखील त्यांना आदराने वागवत असत. महात्मा गांधी स्मृती पुरस्काराकरिता बापूसाहेबांनी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे निधीची मागणी केली, तेव्हा त्यांनी त्यांना कोरा चेक दिला. मात्र बापूंनी अतिलोभ न करता चेकवर पाच हजार रुपये रक्कम नोंदली आणि परत आले. या प्रसंगातून बापूसाहेबांनी सर्व विचारांची माणसे आपल्या कामात जोडून घेतली, असे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळातील एका निष्ठावंत स्वयंसेवकांचे वस्तुनिष्ठ चित्रण विवेक कवठेकर यांनी या पुस्तिकेत केले असून ते मुळातून वाचण्यासारखे झाले आहे.
 
 

rss
 
सुनील भंडगे लिखित मोहनराव गवंडी या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत लोकोत्तर काम करणार्‍या मोहनराव उपाख्य आप्पासाहेब गवंडी यांच्या जीवनाचा पट वाचकांसमोर उभा राहतो. या पुस्तिकेच्या पहिल्याच उतार्‍यामध्ये आप्पासाहेबांची योग्य शब्दात ओळख करून दिलेली आहे, ती अशी - ’पुण्याच्या सार्वजनिक जीवनात सुमारे साठ वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्रात रचनात्मक संघटनात्मक चळवळींमध्ये यशस्वीपणे भूमिका पार पाडलेले व भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विधी सभा सदस्य, माजी नगरसेवक व आमदार, सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक अध्यक्ष व गृहकृत्यदक्ष असलेले आप्पासाहेब उर्फ मोहनराव विश्वनाथराव गवंडी’.
 
 
rss
 
जीवनातील प्रसंगांचे चाकोरीबद्ध वर्णन न करता वेगवेगळ्या मथळ्यांचा साहाय्याने मोहनरावांचे योगदान सुनील भंडगे यांनी नेमकेपणाने लिहिले आहे. पुण्याच्या जडणघडणीतील अनेक घटना समजून घेण्यासाठी मोहनराव गवंडी यांचे जीवन अभ्यासलेच पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या गवंडी यांनी शुक्रवार पेठ या पुण्यातील मध्यवस्तीमधून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाऊन मोठे सामाजिक काम केले. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून विधान परिषदेत त्यांनी विधेयक मांडले व त्याला ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर यांनी जोरदार पाठिंबा दिला. हिंदू तरुण मंडळांमधील सहभाग, इस्रायलमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग, पुण्यातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था शिक्षण प्रसारक मंडळीतील भरीव शैक्षणिक कार्य, सामाजिक समरसता मंचाच्या जडणघडणीतील योगदान, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश यात्रेचे आयोजन, महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करून घेण्यासाठीचे योगदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तारातील आग्रही भूमिका आणि आणीबाणीतील तुरुंगवास या प्रसंगांबरोबरच त्यांना माननीय बाळासाहेब देवरस यांचा सहभाग लाभला. गंगाधर पगार लिखित गोविंद आहेर या पुस्तिकेत एका सामान्य घरातील स्वयंसेवक प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नोकरी करत आयुष्यभर संघकामाने अनेकानेक लोकांना आपल्या लोकोत्तर कामाने प्रकाशित केल्याचा माहितीपट उभा केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक म्हणून त्यांनी सेवेमध्ये असताना संघाचे काम अविरतपणे केले. माननीय भैयाजी जोशी सरकार्यवाह झाल्यानंतर वडाळीभोई येथे झालेल्या मोठ्या सत्कार समारंभाच्या नियोजनामध्ये गोविंद आहेर यांचा मोलाचा वाटा होता. गावामध्ये कुणी आजारी पडला, कोणाला काही अडचण असेल, बाळंतपणासाठी एखाद्या महिले दवाखान्यात न्यायचे असेल तर गोविंद उपाख्य नाना हे नेहमीच मदतीला उभे राहत. नानांची हिंदुत्वाची व्याख्या अतिशय स्पष्ट होती. ’आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे हिंदुत्व’ असे नाना नेहमी म्हणत असत. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला हा शिक्षक विद्यार्थ्यांना, पालकांना व आपल्या भवताली आलेल्या सर्वांना संघकार्यात जोडून घेत असे. शिक्षक हा नेहमीच विद्यार्थी असतो, नेहमी नवीन गोष्टी शिकत असतो याचे प्रत्यंतर नानांनी वयाच्या 63व्या वर्षी गाडी शिकून दिले. 2016मध्ये चांदवडला झालेले संघाचे हिवाळी शिबिर असो, 2018मधील मालेगाव जिल्ह्याचे महाविद्यालयीन तरुणांचे शिबिर असो, नानांनी आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली. संघाच्या शिबिराला पैसे देणारा दाता पंचवीस हजार रुपये देऊ इच्छित असतानादेखील आम्हाला फक्त सात हजाराची गरज आहे असे म्हणून तेवढीच रक्कम घेणार्‍या करारी शिक्षक म्हणजे गोविंद आहेर. वरील पाचही स्वयंसेवकांचे जीवन मुळातून वाचण्यासारखे आहे. स्वार्थलोलुप समाजामध्ये अशा स्वयंसेवकांच्या रूपाने तार्‍यांचे बेट पाहिले, म्हणजे चांगुलपणा शिल्लक आहे असे वाटते. अंधार होत असलेल्या भवताली कुठेतरी आशेचा किरण दिसतो व या देशाला ऊर्जस्वल भविष्य आहे याची खात्री पटते. दिवंगत स्वयंसेवकांनी आपल्या लोकोत्तर आयुष्यामधून संघाची गंगा आपल्या आचरणातून सर्वदूर पोहोचवली, हे या पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात ईश्वरनिष्ठ सत्पुरुषांचे वर्णन करताना त्यांना चालत्या-बोलत्या चिंतामणीच्या गावाची, बोलणार्‍या अमृताच्या सरोवराची, तापहीन सूर्याची व कलंकहीन चंद्राची उपमा दिली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ ईश्वरनिष्ठांची मांदियाळी समाजामध्ये मिसळून काम करू लागली, तर हे विश्व केवळ आनंदमय होऊन जाईल यात कुठलीच शंका वाटत नाही.
 
 
संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे -
मिया सद्भावाची अंजुळी।
ओविया फुले मोकळी ।
अर्पिली आंघरीयुगुळी।
विश्वरूपाच्या॥
 
 
आपल्या कर्माची व सद्भावाची ओंजळ या हजारो बाहू व डोळे असलेल्या समाजपुरुषाच्या चरणी अर्पण करून आपले जीवन कृतार्थ करावे, हाच संदेश या स्वयंसेवकांच्या ऊर्जस्वल जीवनातून आपल्याला पाहावयास मिळतो.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )फक्त २५०/- रुपयांत
https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/