नवी शिखरे आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची!

विवेक मराठी    09-Sep-2022
Total Views |
@चंद्रशेखर नेने
ब्लूमबर्ग अहवालानुसार इंग्लंडला बाजूला सारून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, ही 140 कोटी देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या राष्ट्राचा आत्मसन्मान आपणच जपायचा असतो, हे आपल्या सर्व नागरिकांच्या हृदयात पक्के करायचे आहे. इथेच आत्मनिर्भरतेचा उद्गम आहे आणि आपण ज्याप्रमाणे ह्यापूर्वी जगातील एक क्रमांकाचे मानाचे राष्ट्र होतो, त्या पदाकडे पुन: आपली पावले वाळू लागतात.
 
india
 
काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग ह्या वित्तसेवाविषयक अमेरिकन कंपनीने असे जाहीर केले की भारत देश आपल्या ठोकळ राष्ट्रीय उत्पादनाच्या - म्हणजेच जीडीपीच्या मूल्यांकनाच्या जोरावर आता जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला आहे! ह्याआधी भारताचा क्रमांक 6वा होता आणि 5व्या क्रमांकावर इंग्लंड हा देश होता. पण ह्या वर्षी भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे आणि त्यामुळे ज्या इंग्लंड देशाने आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले होते, त्या इंग्लंडची जागा आता भारताला मिळाली आहे. आपल्यापुढे अजून अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी असे चार देश आहेत. ह्याच वेळेस अर्थतज्ज्ञांनी अशी एक पुस्तीदेखील जोडली आहे की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग पाहता (जो वेग सध्या जगातील सर्वात जास्त आहे) भारत येत्या दोन वर्षांत जर्मनीला मागे सारून चौथ्या स्थानावर झेप घेईल! ही बातमी आपल्या सर्व 140 कोटी देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारत जेव्हा 75 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, त्या वेळेस इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की, ‘इतका मोठा आणि इतक्या विविध भाषा, संस्कृती, धर्म ह्यांनी बनलेला हा समाज फार काळ एकत्र नांदू शकणार नाही. लवकरच ह्या देशाची असंख्य शकले उडतील आणि हा देश भिकेला लागेल!’ चर्चिल नामक ह्या कावळ्याच्या शापवाणीने भारतमातेला कुठलाही त्रास झाला नाही, उलट, आता अवघ्या 75 वर्षांत हा देश त्याच चर्चिलच्या इंग्लंडच्याही पुढे गेलेला आहे आणि आणखी पुढे बरीच मजल आपल्या टप्प्यात आलेली आहे. हे पाहायला चर्चिल जिवंत नाही, हे त्याचे सुदैव!
 
 
 
अर्थात भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू (जे ब्रिटिश आणि रशिया धार्जिणे होते, असे त्यांनी स्वत:च सांगून ठेवले आहे!) ह्यांची आर्थिक आणि सामाजिक धोरणे जर चालू राहिली असती, तर मात्र चर्चिल ह्यांची भविष्यवाणी खरी ठरण्याचा बराच संभव होता. ढोंगी समाजवाद आणि ढोंगीच असलेला सेक्युलरवाद ह्या दोन्ही जोखडांखाली भारतीय अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थिती अगदी पिचून गेली होती. गरिबी तर ह्या देशाच्या पाचवीलाच पूजली होती की काय, असे वाटावे अशीच परिस्थिती होती. स्वतंत्र झाल्याची आणि नेहरू ह्यांच्या पंतप्रधानपदाची किंमत म्हणून कॉँग्रेस नेतृत्वाने देशाच्या फाळणीला मान्यता दिली व आपण ती स्वीकारली! ह्या फाळणीमुळे आपल्या देशाचा एक मोठा, पाच नद्यांनी आणि अनेक कालव्यांनी जलसिंचित सुपीक असा भूभाग म्हणजेच पश्चिम पंजाब आपल्याला पूर्णत: पारखा झाला. त्यामुळे आपल्या प्रचंड लोकसंख्येला पोटभर जेवू घालणेदेखील अशक्य होऊन बसले. आपण त्यानंतर तातडीने भाकरा-नांगल, हिराकुड इत्यादी नवीन धरणे बांधली. परंतु ही बांधून काढण्यास वेळ लागणे साहजिक होते. तोपर्यंत आपल्या सरकारला अमेरिकेकडे हात पसरण्याची वेळ आली होती आणि अमेरिकेने त्यांच्या देशातील निकृष्ट असा ‘लाल गहू’ आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे देशात त्या काळात भूकबळी पडले नाहीत. तरीदेखील नेहरू ह्यांनी रशियात जाऊन तेथून आणलेली समाजवाद आणि पंचवार्षिक योजना ही दोन खुळे आपल्या माथी मारली. त्यामुळे इथे सर्व अवजड उद्योग सरकारच्या मालकीचे झाले आणि त्यामध्ये प्रचंड गलथान उत्पादन पद्धती आणि भ्रष्टाचार बोकाळला. त्या सर्व उद्योगात आळशी कामगार आणि तसेच आक्रमक कामगार संघटना आणि त्यांचे पुढारी अशी अभद्र युती तयार झाली. हे सर्व कारखाने सदैव तोट्यात चालत असत आणि त्यांचा तोटा भारत सरकार, म्हणजेच पर्यायाने आपण सर्व नागरिक सहन करत होतो. त्यामुळे हा देश झपाट्याने गरिबीकडे वाटचाल करत होता. भारताची अर्थव्यवस्था अतिशय नाजूक बनली होती. गरीब देशात सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले असतात आणि त्यातूनच फुटीरतावादी मनोवृत्ती वाढीला लागतात. दक्षिणेला आणि ईशान्येला अशा प्रवृत्ती वाढत होत्या. चर्चिल ह्यांची भविष्यवाणी खरी ठरेल की काय असे वाटण्याची परिस्थिती काही काळ होती. पण पुढे परिस्थिती थोडी सुसह्य झाली आणि 1991 साली नरसिंह राव पंतप्रधानपदी आल्यानंतर आणि मुख्य म्हणजे नेहरू-गांधी घराण्याची सत्ता संपल्यावर, आपण खुल्या अर्थव्यवस्थेकडे झेप घेतली आणि त्यानंतर भारतीय व्यावसायिकांना, प्रोफेशनल्सना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळू लागली. हळूहळू आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या तज्ज्ञांचा वावर वाढू लागला, विशेषत: संगणक क्षेत्रात, म्हणजेच आयटी व्यवसायात. तरीही राष्ट्राभिमान आणि आत्मनिर्भरता ह्या दोन बाजू अजूनही कच्च्याच होत्या! कारण कॉँग्रेस पक्षाची विचारधारा आधीपासूनच भारतीय संस्कृतीशी फटकून वागत होती. जे जे भारतीय आणि जे जे हिंदू संस्कृतीचे म्हणून होते, त्याला ह्या कॉँग्रेस पक्षाने कायमच वाळीत टाकलेले होते आणि आहे! त्यामुळेच एक राष्ट्र, एक समाज, एक बलशाली आर्थिक साम्राज्य ह्या संस्कारापासून आपला समाज वंचितच होता. यूपीएच्या दहा वर्षांच्या काळात तर अनागोंदी आणि भ्रष्टाचार ह्यांचे इतके पीक आले होते की आपली अर्थव्यवस्था आणि आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय विश्वातील पत हे दोन्ही लयाला गेले होते. मनमोहन सिंग ह्यांना उघडपणे टाकून बोलण्याची हिम्मत पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ ह्याला झाली, ह्यातच आपल्या देशाच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे जगजाहीर झाले.
 
 
india
 
 ‘मेक इन इंडिया सारख्या मोहिमेमुळे भारतीय उद्योजकतेला गती मिळाली.
 
 
आपल्या सर्वांच्या सुदैवाने 2014 साली एक मोठा बदल झाला आणि एक चमत्कारच म्हणावा अशा बहुमताने नरेंद्र मोदी ह्यांचे भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यावर आले. राज्यावर आल्याबरोबर नरेंद्र मोदी ह्यांनी आपल्या सहकार्‍यांबरोबर आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्याचा धाडसी निर्णय घेतला. सर्वप्रथम आपली सुरक्षा व्यवस्था अतिशय त्वरेने मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष दिले आणि आज आपली सैन्यदले ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची शक्ती म्हणून ओळखली जातात! त्यानंतर मोदी ह्यांनी आपल्या देशात संपत्ती निर्माण कशी होईल ह्याकडे लक्ष दिले. त्यासाठी देशात व्यवसायाभिमुख म्हणजे ‘बिझनेस फ्रेंडली’ व्यवस्था राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी जवळजवळ 1500 जुने कायदे रद्द केले. नवीन सुलभ आणि परिणामकारक कायदे आणले. देशात निर्माण होणार्‍या वस्तू आणि सेवा ह्यांना करातून सवलती दिल्या, नवीन तंत्रज्ञान आयात करणे सोपे केले. जुने कामगार कायदे बदलून ते जास्त व्यावसायिक केले. त्यामुळे ह्या देशात परकीय तंत्रज्ञान आणि परकीय भांडवल आले. देशात नवीन उत्पादने आणि सेवा झपाट्याने वाढू लागल्या. जगातील सर्वात जास्त मोबाइल फोन्स बनवण्याचे कारखाने इथे सुरू झाले. सर्वात जास्त इंटरनेट जोडण्या इथे दिल्या जातात. आपला देश हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. ह्या तरुणाईचा उचित उपयोग करून घेण्यासाठी ‘स्टार्टअप्स’साठीची धोरणे आणली गेली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एनसीलटीसारखे कायदेशीर उपक्रम आणले, ज्यामुळे दिवाळखोरी जाहीर करणार्‍या व्यावसायिकांना चाप बसला आणि प्रामाणिक प्रजेला हायसे वाटले. अजूनही ही प्रक्रिया चालूच आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या योगाने आज भारत दिमाखाने विकसित राज्यांच्या फळीत सामील झाला आहे. आपण बनविलेले ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र जगातील सर्वोत्तम मानले जात आहे. आपले तेजस मार्क 2 लढाऊ विमान आता अनेक देशांना हवे आहे. एकेकाळी सर्व शस्त्रास्त्रे आयात करणार देश आज उत्तमोत्तम शस्त्रांची निर्यात करत आहे, हे एक फारच अभिमानास्पद चित्र आहे.
 
 
india

भारताने बनवलेले ब्रह्मोस
क्षेपणस्त्र सर्वोत्तम


india
भारताने गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिली लस विकसित करून यशाचा नवा टप्पा गाठला आहे.
 
कोविडच्या साथीच्या काळात भारतीय राज्यकर्ते, भारतीय प्रजा आणि विशेष म्हणजे भारतीय लस बनविणारे उत्पादक ह्यांचा कस लागला आणि त्या परीक्षेत हे सर्व उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. आज भारताची ओळख हे जगाला रोगप्रतिबंधक लसी पुरवणारा एक नंबरचा देश अशी आहे! आपण नुकतीच गर्भाशयाच्या कॅन्सरवर उपचारासाठी लसदेखील विकसित केली आहे. ही सर्व लक्षणे म्हणजे एक उदयाला आलेल्या महासत्तेची पावले आहेत. त्याचेच पडघम परवा आपण इंग्लंडला मागे टाकण्यात दिसू लागले! ह्या सर्व यशस्वी वाटचालीमुळे समस्त भारतीय नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि हेच होण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे आत्तापर्यंत होत आलेले विकृतीकरण थांबविण्यास कटिबद्ध आहे. आपला देदीप्यमान इतिहास, जो आत्तापर्यंत लुच्च्या आणि दांभिक कॉँग्रेसी डाव्या इतिहासकारांनी लपवून ठेवला होता, त्यावरची धूळ झटकून आता तो अभिमानास्पद इतिहास पुन: आपल्यापुढे आणण्याचे महान कार्य चालू झालेले आहे. जेव्हा आपले नागरिक त्यांच्या शालेय शिक्षणातून असा इतिहास शिकतील, तेव्हाच त्यांच्या हृदयात राष्ट्राभिमानाची प्रखर ज्योत जागृत होईल. त्यानंतर कोणतेही राज्य फुटीर वृत्तीने वागणार नाही. जे राष्ट्र आपला इतिहास विसरते, त्याला भविष्यकाळ असत नाही! त्यासाठीच आपल्या राष्ट्राचा आत्मसन्मान आपणच जपायचा असतो, हे आपल्या सर्व नागरिकांच्या हृदयात पक्के करायचे आहे. इथेच आत्मनिर्भरतेचा उद्गम आहे आणि आपण ज्याप्रमाणे ह्यापूर्वी जगातील एक क्रमांकाचे मानाचे राष्ट्र होतो, त्या पदाकडे पुन: आपली पावले वाळू लागतात. ‘परंवैभवंनेतुमेतत्स्वराष्ट्रम’ ह्या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ आपल्याला प्रत्यक्ष गवसतो. भारताचा उज्ज्वल काळ आपल्या समोर आता आहे आणि आपण सर्व भारतीय नागरिक त्या उज्ज्वल भविष्याचे निर्माते, भोक्ते आणि साक्षीदार होऊ या, ह्या सदिच्छेसह हा लेख आटोपता घेतो. अस्तु लेखनसीमा!