भाजपाकडे रामतत्त्व, अन्यांकडे काय?

विवेक मराठी    13-Jan-2023   
Total Views |

vivek
अयोध्येतील राम मंदिर हा जेवढा वैचारिक विषय आहे, तेवढाच भावनिक विषय आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राम असतो. हे रामतत्त्व जागृत करण्याचे कार्य नरेंद्र मोदी करीत आहेत. निवडणुकीपूर्वी ते अधिक प्रभावीपणे करतील. विचार आणि भावना यांचा सुरेख संगम साधला जाईल. 2024ची निवडणूक ही अनेक चेहरे विरुद्ध एक चेहरा अशी जशी राहणार आहे, तशी टाकाऊ विचारधारा आणि शाश्वत विचारधारा यांच्यातीलदेखील राहणार आहे.
 
 
सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होतील. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या परीने ही निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. निवडणूक सत्ताप्राप्तीसाठी होत असते. सत्तेवर असलेला पक्ष सत्ता राखण्याचा प्रयत्न करतो, सत्तेबाहेर असलेले पक्ष सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. जो सत्तेवर आहे, त्याविरुद्ध सातत्याने प्रचार करणे ही विरोधी पक्षांची अस्तित्वरक्षणाची गरज निर्माण होते.
 
 
 
असा विरोध दोन पातळ्यांवर केला जातो - 1) सैद्धान्तिक पातळीवर आणि 2) सत्ताधारी पक्षाच्या विकासाची धोरणे आणि कार्यक्रम यांच्या संदर्भात. केंद्रात आणि अनेक राज्यांत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे. या पार्टीची विचारधारा काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्षांपेक्षा वेगळी आहे. या विचारधारेला ‘हिंदुत्वाची विचारधारा’ असे म्हणतात. हिंदुत्व म्हणजे विकास, हिंदुत्व म्हणजे सामाजिक समरसता, हिंदुत्व म्हणजे दुर्बळांचे सबलीकरण, हिंदुत्व म्हणजे महिला सक्षमीकरण, हिंदुत्व म्हणजे जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान या विषयांना धरून भारतीय जनता पार्टीने धोरणे आणि कार्यक्रम आखले. त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत.
 
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर
राम मंदिरातून उभे राहणारे आपले राष्ट्र मंदिर म्हणजे ‘रामराज्य’ उभे करण्याचा आपला संकल्प कसा असेल, हे या पुस्तकातून उलगडणार आहे
.

https://www.vivekprakashan.in/books/ram-mandir-to-rashtra-mandir/

 
 
 
सत्ताधारी पक्षाचा विरोध म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विकासनीतीला विरोध, सामाजिक समरसतेच्या धोरणाला विरोध, दुर्बळ आणि वंचित यांच्या सक्षमीकरणाला विरोध असा याचा अर्थ होतो. असा प्रत्यक्ष विरोध करणे अवघड असते, म्हणून अंबानी, अदानी यांची नावे वारंवार घेऊन या दोघांना श्रीमंत केले जात असल्याचेे सांगितले जात आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे असे सांगून मागासवर्गीय, दलित, आदिवासी हे किती बेकार आहेत, याची आकडेवारी दिली जाते. हे सगळे राजकारण असते. आज सत्तेवर भाजपा आहे, उद्या दुसरा कोणता पक्ष सत्तेवर आल्यास हेच विषय घेऊन भाजपा सत्ताधारी पक्षाविरूद्ध आंदोलन करील. म्हणून या विषयात प्रभावी पर्याय देण्याची शक्ती अतिशय मर्यादित असते.
 
 
vivek
 
सत्ताधारी पक्षाला पर्याय देण्यासाठी वैचारिक आणि भावनिक यांचे मिश्रण करून आवाहन करावे लागते. राहुल गांधी यांची यात्रा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे, आपण एकत्र आलो तर भाजपाला रोखू शकतो, नरेंद्र मोदी यांना थांबवू शकतो, असा विचार बंगालच्या निवडणुकीनंतर सातत्याने मांडला जातो. काहीतरी निमित्त काढून प्रमुख पक्षांचे राजनेते एका व्यासपीठावर येतात आणि मग हातात हात घातलेले एकजुटीचे त्यांचे फोटो वर्तमानपत्रात पाहतो. याला राजकीय ड्रामाबाजी म्हणतात. अशाने विरोधी पक्षांचे ऐक्य होत नाही. त्यासाठीदेखील भक्कम विचारमिश्र भावनिक आवाहन असावे लागते.
 

तळजाईच्या पठारावर दुमदुमला ‘हिंदू सारा एक’चा जयघोष

https://www.evivek.com/Encyc/2023/1/13/Remember-Taljai-Provincial-Camp-1983-Year.html

 
या देशाची संमिश्र संस्कृती आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, शीख, जैन, बौद्ध अशा सर्व धर्मीयांचा हा देश आहे. आक्रमक मुसलमानांचेदेखील भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत योगदान आहे. या सर्वांना सामावून घेणारा शब्द ‘सेक्युलॅरिझम’ आहे. ही सेक्युलर विचारधारा देशाची तारणहार आहे. तिचा अंगीकार केल्यानेच देशाचे ऐक्य टिकून राहील, एकजूट राहील, अन्यथा देशाचे तुकडे होतील, असा वैचारिक आणि भावनिक विषय विरोधी पक्षांतील सर्वच राजकीय नेते मांडीत असतात. या विचाराच्या रक्षणासाठी, देशाच्या ऐक्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट केली पाहिजे, असे सर्वांचे म्हणणे असते.
 
 
vivek
 
राहुल गांधी यांची यात्रा कुरुक्षेत्रात गेली असता त्यांनी महाभारताचा दाखला देऊन ‘संघस्वयंसेवक म्हणजे कौरव सेना आहे‘ असे म्हटले. कौरव म्हणजे अधर्माचे आचरण करणारे, असा त्याचा अर्थ झाला. 2024ची निवडणूक राहुल गांधी एकट्याने लढणार की विरोधी पक्षांना बरोबर घेऊन लढणार, हे स्पष्ट झाले नाही, तसेच राहुल गांधी वगळून सगळे विरोधी पक्ष एकत्र, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही आघाड्यांत एक मुद्दा समान राहणार आहे, तो म्हणजे संघाला आणि संघ विचारधारेला तीव्र विरोध. या विचारधारेबद्दल जेवढा अपसमज निर्माण करता येईल, तेवढा करण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला जाणार आहे.
 
 
 
यावर भाष्य करताना एबीपी लाइव्ह चॅनेलवर नरेंद्र भल्ला यांचा एक लेख आला आहे. त्यात ते म्हणतात, “ही गोष्ट खरी आहे की, भाजपाचा भाग्यविधाता संघच आहे. संघाच्या करोडो स्वयंसेवकांच्या नि:स्वार्थी परिश्रमाशिवाय भाजपाची शक्ती नगण्य आहे... संघ या देशातील एकमेव असे संघटन आहे, जे नुसतेच व्यवस्थित नसून शेवटच्या स्तरापर्यंत ते पूर्णपणे संघटित आहे. सांगायला ते सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रवादाचा डंका पिटणारे संघटन आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीच्या वेळी भाजपासाठी ते संजिवनी बुटीचे काम करते. म्हणून आरएसएसवर राहुल गांधींचा सरळ हल्ला मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारण्यासारखा आहे. त्यात फरक फक्त एवढाच आहे की, पोळे फुटल्यानंतर मधमाश्या उडून जातात आणि परिसरातील लोकांना डंख करतात. संघाचा इतिहास हे सांगतो की, अशा हल्ल्यानंतर संघ पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान आणि एकजूट होऊन जातो.” नरेंद्र भल्ला यांचा संघाचा अभ्यास चांगला दिसतो. त्यांचे शेवटचे वाक्य - ‘संघावरील हल्ल्यानंतर संघाची शक्ती वाढते आणि स्वयंसेवक अधिक एकजूट होतात’ हे सत्यच सांगते. हे सत्य ज्यांना समजत नाही, त्या राजनेत्याला राहुल गांधी म्हणतात. संघाविषयी अपप्रचार करून लोकभावना चेतविण्याचा कालखंड आता इतिहासजमा झालेला आहे. आणीबाणीपूर्वी पं. नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, त्यांना साथ देणारे डावे पक्ष, डावे विचारवंत, साहित्यिक या सर्वांनी हे काम अत्यंत यशस्वीपणे केले. असत्याचा बोलबाला होण्याचा कालखंड कधीही अमर्याद असू शकत नाही. असत्यवादी आपल्या असत्य वर्तणुकीमुळे नामशेष होतात. तसे काँग्रेसचे झाले. संघाविरुद्ध अपप्रचार करणारी माणसे राजकीय कर्तृत्वाने चुकीच्या का होईना, विचारधारेने मोठी माणसे होती. लोकमानसावर त्यांचा प्रभाव होता. राहुल गांधी आणि आजचे सर्व प्रादेशिक नेते यांची तुलना 75 सालापूर्वीच्या राजनेत्यांशी करता येणार नाही. आज संघाविरुद्ध अपप्रचार करणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे आहे. ज्यांनी ते करायचे ठरविले आहे, त्यांना आपण काही रोखू शकत नाही. अयोध्येत निर्माण होणारे भव्य राम मंदिर हा येणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. पुढल्या वर्षी त्याचे उद्घाटन होईल. अयोध्येतील राम मंदिर हा केवळ मंदिर बांधण्याचा विषय नाही. देशात रामाची हजारो मंदिरे आहेत. अयोध्येतील राम मंदिर हे सर्वांपेक्षा पुढील तीन कारणांसाठी वेगळे आहे - 1) हे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. 2) हे मंदिर देशातील कर्तव्यधर्माचे प्रतीक आहे. प्रभू रामचंद्र हे मर्यादापुरुषोत्तम होते. कर्तव्यधर्माचे पालन म्हणजे राम असे समीकरण आहे. 3) हे मंदिर, राष्ट्र मंदिर निर्माणाचे प्रतीक आहे. हे सनातन राष्ट्र आहे. त्याची संस्कृती सनातन आहे, ती संमिश्र संस्कृती नव्हे. ती सर्वसमावेशक आहे आणि ती जीवनमूल्यांवर आधारित आहे.
 
 
 
अयोध्येतील राम मंदिर हा जेवढा वैचारिक विषय आहे, तेवढाच भावनिक विषय आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राम असतो. जे बाटून ख्रिश्चन आणि मुसलमान झाले, त्यांच्याही हृदयाच्या कोपर्‍यात सुप्त राम असतोच. हे रामतत्त्व जागृत करण्याचे कार्य नरेंद्र मोदी करीत आहेत. निवडणुकीपूर्वी ते अधिक प्रभावीपणे करतील. विचार आणि भावना यांचा सुरेख संगम साधला जाईल. 2024ची निवडणूक ही अनेक चेहरे विरुद्ध एक चेहरा अशी जशी राहणार आहे, तशी टाकाऊ विचारधारा आणि शाश्वत विचारधारा यांच्यातीलदेखील राहणार आहे. चेहर्‍यांची लढाई सामान्य माणसाला चटकन समजते, विचारधारधारेची लढाई लोकांपुढे प्रतीकांतून न्यावी लागते. भाजपाकडे रामाचे प्रतीक आहे, राहुल गांधी आणि अन्य सगळे विरोधी नेते हे कुणाचे प्रतीक घेऊन उभे राहणार आहेत? या प्रश्नाचे उत्तर मला तरी माहीत नाही.
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.