तळजाईच्या पठारावर दुमदुमला ‘हिंदू सारा एक’चा जयघोष

विवेक मराठी    13-Jan-2023
Total Views |
@डॉ. शरद कुंटे। 9423011899 
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे 14, 15 आणि 16 जानेवारी 1983 असे तीन दिवस पुण्यातील तळजाई येथे प्रांतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला यंदा चाळीस वर्षे पूर्ण झाली. या शिबिराने ’हिंदू सारा एक’ हा मंत्र महाराष्ट्राला दिला. या शिबिराच्या अनेकविध पैलूंची माहिती देणारा आणि या शिबिराने काय साध्य झाले, याचे विवेचन करणारा हा लेख.
 
rss

हिंदू ऐक्याचा विचार हा संघस्वयंसेवकांच्या विचारामध्ये व कृतीमध्ये असतोच. त्यासाठी शिबिरासारख्या वेगळ्या कार्यक्रमाचे निमित्त असावे लागत नाही. पण जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम येतो, त्या वेळी आपल्या विचारांनुसार आपण केलेली कृती ही खरोखरच योग्य प्रकारे झाली आहे की नाही, याची समाजाकडून पावती मिळते. संपूर्ण पुणेकर जनतेकडून तळजाई शिबिराच्या वेळी अशी पावती मिळाली व ‘हिंदू सारा एक’ या महामंत्रावर संपूर्ण समाजाचे शिक्कामोर्तब झाले. ते दिवस होते 13, 14 व 15 जानेवारी 1983. आज 40 वर्षांनंतरही शिबिराचा तो भव्य सोहळा व सुधीर फडके तसेच बाळासाहेब देवरस यांनी घुमवलेला ‘हिंदू सारा एक’ असा नारा जसाच्या तसा आठवतो आहे.
 

rss

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच ) : फक्त २५०/- रुपयांत- https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/
 
 
 
2023ची संक्रांत आली आणि 40 वर्षांपूर्वीचा तो अद्भुत प्रसंग पुन: डोळ्यांसमोर तरळू लागला. पुण्याच्या दक्षिण भागातील तुळजाभवानी मंदिराचा परिसर म्हणजे तळजाईचे पठार गणवेषधारी संघस्वयंसेवकांनी फुलून गेले होते. तळजाई मातेच्या परिसरातील त्या भव्य व्यासपीठासमोर गणवेषधारी, शिस्तबद्ध रितीने आखून दिलेल्या गटांतून 35000 स्वयंसेवक बसलेले होते व शिबिर पाहण्यासाठी आलेल्या सुमारे लाखभर नागरिकांनी तळजाई पठारावर कुठे उभे राहायलादेखील मोकळी जागा शिल्लक ठेवली नव्हती. संघाचे अगदी बालपणापासूनचे स्वयंसेवक व स्वरांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार सुधीर फडके हे व्यासपीठावरून गीताच्या ओळी सांगत होते - ‘हिंदू सारा एक मंत्र हा। दाही दिशांना घुमवू या। धरती नभ पाताळही भारू। प्राण पणाला लावू या।’ या गीताचे स्वर खरोखर अस्मान भेदून पलीकडे जात होते. हिंदू सारा एक या भावनेने तो सारा परिसर भारावून गेलेला होता.
 
 
rss
 
संघस्वयंसेवकांच्या सद्गुणाचा गैरफायदा घेऊन संघाची यथेच्छ बदनामी करण्याचे काम समाजातील कितीतरी संस्था-संघटना वर्षानुवर्षे करत आल्या आहेत. संघ केवळ ब्राह्मण समाजाचा आहे, संघ चातुर्वर्ण्य पाळतो, संघामध्ये जातिव्यवस्थेला स्थान आहे, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजसेवकांना संघामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, कनिष्ठ जातीच्या नागरिकांना संघशाखेत प्रवेश मिळत नाही, संघ महिलांचा द्वेष करतो, संघामध्ये मुसलमान किंवा ख्रिश्चन समाजाचा द्वेष शिकवला जातो.. असे शेकडो खोटेनाटे आरोप संघावर वर्षानुवर्षे केली जात होते. संघाची बदनामी करून वातावरण गढूळ करून टाकले होते. हे गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा मार्ग संघस्वयंसेवकांनी हाताळला, तो म्हणजे तळजाईचे शिबिर.
 
 
rss
 
स्वप्नवत अनुभव
 
 
या शिबिरात विदर्भ वगळता महाराष्ट्राच्या किमान 22000 गावांचे प्रतिनिधी आले होते. सहसा जगाच्या चर्चेच्या पटलावर नसलेली शेकडो गावे शिबिराच्या निमित्ताने जोडली गेली. आलेल्या शिबिरार्थींमध्ये सर्व जातीपातींचे, हिंदू धर्मातील सर्व पंथ-संप्रदायांचे लोक होते. अतिदरिद्री गटातील व्यक्तींपासून अतिश्रीमंत गटातील व्यक्तींपर्यंत सार्‍या आर्थिक परिस्थितील स्वयंसेवकांचे शिबिरात प्रतिनिधित्व होते. आपापल्या ठिकाणी राजकीय पक्षांची लहान-मोठी पदे भूषवणारे पुढारी, आमदार व खासदारदेखील सर्वसामान्य स्वयंसेवक म्हणून शिबिरात दाखल झालेले होते. शिबिरामध्ये लहान-मोठे अनेक लेखक, कवी व कलाकार सहभागी झालेले होते. नाणावलेले व्यापारी, उद्योजक हेही शिबिरामध्ये हाफपँट घालून सर्व सहकार्‍यांच्या रांगांमध्ये उभे राहून शांतपणे कार्यक्रम करताना दिसत होते. जी अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे म्हणून देशातील सारे पुढारी कानीकपाळी ओरडत असतात, ती अस्पृश्यता या शिबिरामध्ये औषधालासुद्धा आढळून येत नव्हती. सर्व जण एकत्रित राहत होते. भोजनाची व्यवस्था सामूहिक होती. लहान-मोठा सर्वांचा स्तर एक होता. सर्व जण संघस्वयंसेवक होते. ‘हिंदू सारा एक’ हा एक जीवनमंत्र प्रत्यक्ष अनुभव घेणारे व त्या अनुभवातून जगाला परिचय करून देणारे ते कार्यकर्ते होते.
 
 
 
सर्व शिबिरार्थींसाठीच्या निवासी व्यवस्थेव्यतिरिक्त एका तंबूमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा निवास होता. हे अतिथी कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, व्यापार, उद्योग, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांचे मोठे स्थान आहे असे होते. या पेंडॉलमधील व्यवस्थांचे प्रमुख होते डॉ. श्रीपती शास्त्री. आलेल्या बहुतेक निमंत्रित सदस्यांशी त्यांचा व्यक्तिगत स्नेह होता. त्यांच्या संघसंबंधित शंकांचे निवारण करणे, त्यांना शिबिर व शिबिरातील विविध व्यवस्था दाखवण्यासाठी घेऊन जाणे, प्रांत व अखिल भारतीय स्तराच्या पदाधिकार्‍यांच्या ओळखी करून देणे, अशी सर्व कामे श्रीपती शास्त्री करत होते. ज्यांनी यापूर्वी संघाला जातीयवादी ठरवून भरपूर टीका केली होती, असेही अनेक जण तिथेे होते. त्यांना श्रीपती शास्त्रींनी खुले आव्हान दिले की आता व्यापक स्वरूपात संघ तुमच्यासमोर प्रत्यक्ष उभा आहे. या ठिकाणी तुमच्या कल्पनेतील जातीयता, संकुचितता कुठे दिसते ते स्वत: जाऊन पहा. जे संघाचे मूळ स्वरूप आहे ते तुम्ही स्वत: जाऊन पाहिले तर तुमच्या मनातील शंका दूर होतील. या शिबिरासाठी उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक विचारवंत शंकरराव खरात यांना सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे भाषण ऐकून अक्षरश: भरून आले. जो सामाजिक बदल घडवण्यासाठी आम्ही आपले आयुष्य खर्च केले, ते अद्भुत काम संघाने कसे करून दाखवले? असा प्रश्न शंकरराव वारंवार उपस्थित करत होते व त्यांचे समाधान करताना श्रीपती शास्त्री एकच उत्तर वारंवार देत होते, “हे घडवण्याचा संघाचा महामंत्र आहे - ‘हिंदू सारा एक.” नामवंत कलाकार दादा कोंडके हेदेखील या विशेष निमंत्रितांमध्ये होते. शिबिर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये त्यांनी थोडी वेषभूषा बदलून प्रवेश केला. परंतु तिथे त्यांना सामाजिक ऐक्याव्यतिरिक्त कोणत्याही विषयाची चर्चा ऐकायला मिळाली नाही. अल्पावधीतच दादा कोंडके यांना प्रेक्षकांमध्ये अनेकांनी ओळखले व त्यांनी आपले चित्रपटातील अथवा नाटकातील काही संवाद म्हणून दाखवावेत म्हणून काही प्रेक्षक त्यांच्या मागे लागले. परंतु आपण किती गंभीर स्वरूपाच्या कार्यक्रमात उपस्थित आहोत, याचे दादा कोंडके यांना पूर्ण भान होते. त्यामुळे त्यांनी या प्रेक्षकांना नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली व अशा प्रकारची कला दाखवण्याचा हा प्रसंग नाही असे सांगून दादा तिथून निघून गेले. आलेल्या संघाबाहेरच्या अशा व्यक्तींनादेखील संघाने सर्व परिसरात निर्माण केलेले हिंदू सारा एक हे वातावरण इतर काही कृत्य करून बिघडवण्याची इच्छादेखील झाली नाही, एवढा त्या वातावरणाचा प्रभाव होता.
 
  
rss
 
महापालिकेच्या सेवकांमध्ये घडलेला कायापालट
 
 
शिबिरातील अनेक व्यवस्थांसाठी महापालिका व शासकीय सेवांवर अवलंबून राहणे भाग होते. त्यातील एक सेवा होती स्वच्छता विभाग. या विभागात काम करण्यासाठी महापालिकेने आपल्या ठेकेदारांकरवी अनेक कर्मचारी बोलावले होते. हे सगळे पुणे शहराच्या पूर्व भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे होते. या विविध झोपडपट्टयांतील शेकडो युवकांना तळजाई शिबिरातील स्वच्छतेचे काम दिले. त्या कामानिमित्त हे सेवक शिबिरामध्ये मुक्तपणे वावरत होते. परंतु तीन दिवसांच्या शिबिरातील त्यांचा अनुभव असा होता की त्यांना कधीच कुणी हिडीसफिडीस केली नाही. उलट पेंडॉलमध्ये चहा-नाश्त्याची वेळ असेल व आजूबाजूला हे सेवक दिसले, तर आपल्याबरोबर नाश्ता घेण्यासाठी त्यांना आवर्जून बोलवण्यात येत असे. जेवणाची वेळ असेल तर या सेवकांना इतर सर्व स्वयंसेवकांबरोबर जेवायला आवर्जून बोलावत असत. या युवकांनी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आणि वेगवेगळ्या पेंडॉलमध्ये अधिकार्‍यांची चाललेली भाषणे यातून संघ केवळ हिंदू एकतेचीच भाषा बोलतो, तो कधीच जातीपातींचे बोलत नाही हे त्यांना प्रत्यक्ष दिसून आले. शेवटच्या दिवशी प.पू. बाळासाहेब देवरस यांच्या भाषणामध्ये हिंदू सारा एक हा विषय एवढ्या तीव्रतेने व तळमळीने मांडला, की या सेवकवर्गावरदेखील त्या भाषणाचा खूप चांगला प्रभाव पडला. कोणतेही औपचारिक शिक्षण न झालेले, समाजात मानाचे कोणतेही स्थान नसलेले व समाजाच्या दृष्टीने अत्यंत कमीपणाची कामे नाइलाज म्हणून करणारे हे युवक जेव्हा प्रत्यक्ष संपर्कात आले, त्या वेळी त्यांना जो संघ दिसला, तो त्यांच्या पूर्वीच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळा होता. त्यापुढे आयुष्यभरात कधीही ते संघापासून दूर राहिले नाहीत. पुणे शहरावर शिबिराच्या वातावरणाचा हा असा प्रभाव पडला होता.
 
 


rss 
 
समाजाकडून मदतीचा महापूर
 
 
तळजाईचे प्रांतिक शिबिर हा इतका भव्य उपक्रम होता की त्यासाठी येणारा खर्च कितीतरी मोठा होता व संघाच्या दैनंदिन गुरुदक्षिणेमधून हा खर्च भागवणे शक्य नव्हते. त्यामुळे संघाने समाजाला मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे संघाचा समाजामध्ये असलेला प्रचंड जनाधार लोकांच्या नजरेत आला. या सर्व सहकार्यामुळे संघाला प्रत्यक्षात शिबिरासाठी करावा लागणारा खर्च खूपच मर्यादित झाला. जर संघ समाजात विद्वेष निर्माण करणारे असे काही कार्य करत असता, तर समाजाकडून संघाला असा व्यापक स्वरूपात पाठिंबा मिळू शकला असता का? ‘हिंदू सारा एक’ या तत्त्वाला अनुसरून हिंदू समाजातील सर्व घटकांशी आत्मीयतेचे संपर्क स्थापन करण्याचे काम स्वयंसेवकांनी वर्षानुवर्षे केले होते, त्याचीच ही फलनिष्पत्ती होती.
 
 


rss 
 
अभूतपूर्व शक्तीचे व अचूक नियोजनकौशल्याचे दर्शन
 
 
तळजाईच्या शिबिरातील प्रत्येक कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असाच होता. परंतु सर्व समाजाचे डोळे विस्फारले ते स्वयंसेवकांच्या अत्यंत शिस्तबद्ध संचलनामुळे. शिबिरामध्ये स्वयंसेवकांची संख्या 35000 एवढी प्रचंड असूनही या संचलनाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या मार्गांनी निघालेल्या संचलनाची लांबी जवळजवळ दहा किलोमीटर एवढी होती. ही संचलने ठरावीक वेगाने प्रवास करत जिथे एकमेकांना मिळणार होती, ती वेळ अतिशय नियोजनपूर्वक साधण्यात आली. एकाच वेळी दोन्ही संचलनांचे घोष समोरासमोर आले व घोष दंड उंच उडवून त्यांनी परस्परांचे स्वागत केले. त्यानंतर चारच्या गटात गेलेले संचलन हे आठ ओळींमध्ये एकत्र होऊन परत आले. हाही एक आश्चर्यकारक प्रयोग म्हणावा लागेल. त्या दिवशी संपूर्ण पुणे शहरातील वाहतूक केवळ संचलन पाहण्यासाठी खोळंबली होती. शिबिरामध्ये उपस्थित झालेला लहान अथवा थोर, गरीब अथवा श्रीमंत, उच्च अथवा कनिष्ठ जातीचा स्वयंसेवक हे सर्व या संचलनात सहभागी झाले. सर्व जण वीस किलोमीटर चालले. अशा प्रकारे रोजच्या चालण्याची सवय नसतानादेखील या कार्यक्रमाच्या वेळी स्वयंसेवकांनी कोणत्याही बेशिस्तीचे दर्शन घडवले नाही. या सर्व गोष्टींची समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली. ‘हिंदू सारा एक’ हा सर्व स्वयंसेवकांचा महामंत्र होता व या संचलनाच्या निमित्ताने त्याच महामंत्राचे दर्शन घडले.