कर्करोगग्रस्तांसाठी आशेचा किरण कार-टी सेल उपचारपद्धती

विवेक मराठी    14-Jan-2023   
Total Views |
कर्करोगावरील उपचारात सीएआर-टी (कार-टी) सेल ही नवी उपचारपद्धती उपयोगी ठरत आहे. या विषयाची सखोल माहिती मिळवण्यासाठी, तसेच ही उपचारपद्धती भारतात रुजवता येईल का याबद्दल विमर्श करण्यासाठी डॉ. गणपती भट यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांचा एक चमू नुकताच इस्रायल दौरा करून आला. या निमित्ताने ही उपचारपद्धती नेमकी काय आहे? त्याच्या यशापयशाच्या शक्यता किती? आदी जाणून घेण्यासाठी डॉ. भट यांच्याशी संवाद साधला. सदर मुलाखतीचा व्हिडिओ साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.
 
dr.
 
कर्करोग हा शब्द उच्चारला, तरी आपल्या नजरेसमोर ठरावीक शब्द येतात. त्यातला पहिला आणि सर्वसामान्यांना घाबरवणारा शब्द म्हणजे ‘केमो’ उपचारपद्धती. केमो आणि त्याचे दुष्परिणाम याची समाजात कायमच चर्चा होत असते. पण आता कर्करोगाचे उपचार पूर्वीइतके कठोर राहिलेले नाहीत, किंवा त्या परिणामांचे शमन करणारे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत, असेही म्हणता येईल. केमो उपचारपद्धतीपलीकडे रेडिएशन, सर्जरी, हार्मोनल उपचारपद्धती, इम्युनो उपचारपद्धती, बोनमॅरो प्रत्यारोपण अशा अनेक उपचारपद्धतींच्या आधारे कर्करोगावर उपचार केले जातात व त्यातले बव्हंशी उपचार आज यशस्वीदेखील होताना दिसतात. सर्वात क्रिटिकल असे बोनमॅरो प्रत्यारोपणही जिथे अयशस्वी होते, त्या वेळी सीएआर-टी (कार-टी) सेल उपचारपद्धती उपयोगी ठरते.
 
 
 
या विषयाची सखोल माहिती मिळवण्यासाठी, तसेच ही उपचारपद्धती भारतात रुजवता येईल का याबद्दल विमर्श करण्यासाठी डॉ. गणपती भट यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांचा एक चमू नुकताच इस्रायल दौरा करून आला. डॉ. भट हे जसलोक रुग्णालयाचे ऑन्कॉलॉजिस्ट, स्टेम स्टेल तसेच बोनमॅरो ट्रान्स्प्लांट तज्ज्ञ व टार्गेटेड उपचारतज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह पाच तज्ज्ञांचे पथक इस्रायल दौर्‍यावर जाऊन आले. या निमित्ताने डॉ. भट यांच्याशी संवाद साधला. कार-टी सेल उपचारपद्धती नेमकी आहे तरी काय? ती यशस्वी होण्याची शक्याशक्यता किती आहे? याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले.
 
 
 
कार-टी सेल उपचारपद्धतीबद्दल माहिती देताना डॉ. भट म्हणाले की, “आपल्याला कर्करोगाच्या साधारण सहा प्रकारच्या पारंपरिक उपचारपद्धती माहीत आहेत - सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, गेल्या दोन दशकांपासून अस्तित्वात असलेली टार्गेटेड थेरपी, 2010पासून कार्यरत असलेली इम्युनोथेरपी हे कर्करोग उपचाराचे पाच स्तंभ मानले जातात. सहावा स्तंभ आहे बोनमॅरो प्रत्यारोपण. आता नव्याने उदयास आलेली कार-टी सेल थेरपी हा यातला नवा, सातवा स्तंभ ठरू शकतो. कार-टी सेल थेरपी ही पेशींशी संबंधित म्हणजेच सेल्युलर प्रकारची उपचारपद्धती आहे. कारण यात आपण रुग्णाच्या शरीरातील कर्करोगग्रस्त पेशी काढून घेऊन त्यावर काम करतो, त्यांच्यावर उपचार करतो आणि त्या पेशी बर्‍या झाल्या की पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडतो.
 
 
dr
 
 
या कार-टी सेल उपचारपद्धतीचे यश, सक्सेस रेट जवळपास 99 टक्के असतो असे डॉ. भट आवर्जून नमूद करतात. ते सांगतात की, “ही उपचारपद्धती सर्व प्रकारच्या कर्करुग्णांना देता येत नाही. कर्करुग्णांच्या शरीरात ठरावीक प्रकारचे अँटिजेन असणार्‍या किंवा टार्गेट असणार्‍या पेशी (टिश्यू) असणे आवश्यक असते. अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया, अ‍ॅक्युट लार्जिसेलिक लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा या तीन प्रकारच्या रक्तकर्करोगात कार-टी सेल उपचारपद्धती अधिक परिणामकारक आहे आणि यास मान्यताही मिळाली आहे. बाकीच्या प्रकारात या पद्धतीला मान्यता मिळालेली नाही. ब्रेन ट्यूमर किंवा अन्य प्रकारच्या सॉलिड ट्यूमर प्रकारात मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पांढर्‍या पेशींमधून टी सेल प्रकारच्या पेशी काढून घेतल्या जातात व त्यावर उपचार केले जातात. शरीरात - म्हणजेच त्या गाठीत वा ट्यूमरमध्ये त्या ठरावीक पेशी असणे आवश्यक आहे.”
 
 
 
या उपचारपद्धतीस भारतात अद्याप परवानगी आहे का, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांसाठी ती कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, याबद्दल डॉ. भट म्हणाले की, “भारतात पहिली कार-टी सेल थेरपी 2010 साली टेक्निकल ट्रायल स्वरूपात पार पडली. 2011मध्ये जसलोक रुग्णालयात पहिल्या रुग्णावर कार-टी सेल उपचारपद्धतीने उपचार करण्यात आले. 2017मध्ये एफडीएची मान्यता मिळालेली कार-टी सेल उपचारपद्धती अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया या एका प्रकारच्या रक्तकर्करोगात दिली गेली होती. 2020मध्ये आणखी एका प्रकारात - म्हणजे मल्टिपल मायलोमा प्रकारात एफडीएची मान्यता मिळाली. आताच्या घडीला या उपचारपद्धतीला एकूण सहा प्रकारात एफडीएची मान्यता आहे. पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि रक्तकर्करोगग्रस्तांची संख्या अधिक असणार्‍या राष्ट्रात कार-टी सेल उपचारपद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. जिथे अन्य उपचारपद्धती अयशस्वी ठरतात, त्या वेळी कार-टी सेल थेरपी रुग्णाला दिलासादायक ठरू शकते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात मुळातच वैद्यकीय सुविधांवर प्रचंड ताण असतो. या उपचारपद्धतीबाबत देशभरात जागृती आणि तिचे ज्ञान दोन्ही असणे अत्यावश्यक आहे. केवळ माहिती किंवा ज्ञान हेदेखील पुरेसे नाही. बाकीच्या उपचारपद्धतींच्या तुलनेत कार-टी सेल थेरपीसाठी मनुष्यबळ जास्त असणे, तंत्रज्ञान अधिकाधिक अद्ययावत असणे अपेक्षित असते. प्रचंड मोठी गुंतवणूकही यासाठी आवश्यक आहे. त्याबरोबरीने हवी असते महत्त्वाकांक्षा. एका उदात्त कार्यासाठी एकत्र आलेल्या टीमचे हे टीमवर्क आहे. एकाच वेळी वैद्यकीय, आयटी, आरोग्य सेवा व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या टीम या वेळी कार्यरत असतात. त्याचबरोबर या उपचारपद्धतीसाठी येणारा खर्च हा आणखी एक मोठा प्रश्न आहे.”
 
 
 
इस्रायलच्या दौर्‍याबाबत डॉ. भट म्हणाले, “इस्रायल हा देश सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करतो, हे आपण जाणतोच. आमच्या या दौर्‍यात आम्ही तिकडच्या तीन सरकारी वैद्यकीय संस्थांना व एका खासगी कॅन्सर केंद्राला भेटी दिल्या. शेबा, हदासा, तेल अविव मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि डेव्हिडॉफ कॅन्सर सेंटर या त्या संस्था आहेत. यापैकी डेव्हिडॉफ हे खासगी आहे. उपचारांबाबत ही रुग्णालये अद्ययावत आहेतच. त्यापलीकडे त्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वत:चे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ते काहीही बाहेरून मागवत नाहीत. रुग्णाच्या पेशी काढून, त्यावर उपचार करून, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग आणि पुन्हा ते रुग्णांच्या शरीरात सोडणे हे एकाच ठिकाणी केले जाते. त्यामुळे जगभरातील अनेक रुग्ण कार-टी सेल उपचारांसाठी इस्रायलमधील या चार रुग्णालयांत येतात. हदासामध्ये प्रामुख्याने मायलोमा प्रकारच्या कर्करोगावर उपचार केले जातात. त्यांच्याकडे जगभरात सर्वात वेगवान कार-टी सेल थेरपी दिली जाते.
 
 
dr
 
सात ते आठ दिवसांत पेशींची प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास पंधरा दिवसांत हे उपचार पूर्ण होतात. शेबा मेडिकलचे प्रा. अरबॉन नाग्लेर आणि तेल अविव मेडिकल युनिव्हर्सिटीचे संचालक प्रा. इडो व्होल्फ हे जगातील सर्वोत्तम दहा कार-टी सेल थेरपिस्टपैकी आहेत.“
 
 
कर्करोगातील केमोथेरपीचे, तसेच रेडिएशनचे दुष्परिणाम आपण सर्वच जाणतो. त्यासारखेच कार-टी सेल थेरपीचेही दुष्परिणाम आहेत का? असे विचारले असता डॉ. भट यांनी सांगितले की, “आम्ही कर्करोगग्रस्ताच्या शरीरातून कर्करोगाचा प्रादुर्भाव झालेल्या पांढर्‍या पेशी बाहेर काढतो, ज्याला ल्युकोफेरोसिस म्हटले जाते. त्यानंतर त्यातील टी सेल वेगळ्या करून जीएमई अ‍ॅक्रेडिटेड स्वरूपाच्या वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवतो. कारण या पेशी इन्फेक्शनरहित राहणे अत्यावश्यक असते. प्रयोगशाळेत प्रक्रिया करून त्या टी सेल म्हणजेच पेशींना कार (उअठ - उहळाशीळल रपींळसशप ीशलशिीेीं) टी सेलमध्ये रूपांतरित करतो. रुग्णाच्या शरीरात ज्या प्रकारचे अँटिजेन असेल, त्या प्रकारे त्याचे डिझाइन केले जाते. रुग्णाच्या शरीरातून पेशी काढून ही प्रक्रिया पूर्ण करायला चार ते सहा आठवड्यांचा काळ लागतो. केमोमुळे शरीरातील पेशींचे प्रमाण कमी होते. कार-टी सेल तयार होण्याची प्रक्रिया झाल्यावर चार-पाच दिवसांच्या काळात केमोथेरपीचा थोडासा डोस देऊन पेशींचे प्रमाण कमी केले जाते आणि नंतर कार-टी सेल शरीरात सोडल्या जातात. नंतर या कार-टी सेल कर्करोगाच्या पेशींना मारण्याचे काम करतात. यानंतर साधारण दोन आठवड्यांच्या काळात रुग्णाला थोडेसे त्रासही संभवतात. रक्तदाब कमी होणे, फीट्स येणे, हृदयाची धडधड वाढणे, वेगवेगळे संसर्ग होणे अशा एका किंवा अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. पण या काळात तुम्ही डॉक्टरांच्या निगराणीत असता. तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळातही जेव्हा विशिष्ट प्रकारची इंजेक्शन किंवा औषधे रुग्णाला दिली गेली, तेव्हा अनेकांना अशा प्रकारचे त्रास झाले. पेशींमध्ये बदल करणार्‍या उपचारपद्धतीत हे त्रास सामान्यत: होतातच.”
 
 
 
गेल्या काही वर्षांत देशात, जगभरात कर्करोगग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशा काळात कार-टी सेल उपचारपद्धती ही कर्करोग बरा होण्यासाठी क्रांतिकारक ठरू शकेल असे वाटते का? या प्रश्नावर डॉ. भट यांनी आपले मत मांडले. त्यांच्या मते, आजवर इस्रोचे वेगवेगळे प्रकल्प, रॉकेट लाँचिंग, आयटीतले, संरक्षण क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले वेगवेगळे बदल हे समाजाच्या, देशाच्या विकासात भर घालणारेच ठरले. आरोग्य क्षेत्र त्याला अपवाद कसे असू शकेल? आजपर्यंतच्या कर्करोग निवारणाच्या सगळ्याच उपचारपद्धती आणि त्यांचे वेगवेगळ्या काळातील नवनवे टप्पे हे एका अर्थाने क्रांतिकारकच होते. इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, बोनमॅरो प्रत्यारोपण, कर्करोगावर गोळ्यांच्या आधारे केले जाणारे उपचार हेदेखील क्रांतिकारक होते. याचप्रमाणे कार-टी सेल उपचारपद्धतीदेखील क्रांतिकारकच ठरणार आहे. यापुढील काळात कार-टी सेल उपचारपद्धती ही काँबिनेशन स्वरूपातदेखील साकारली जाऊ शकते. रुग्णाला त्रास कमीत कमी व्हावा या उद्देशाने इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हार्मोनल बोनमॅरो प्रत्यारोपण, कार-टी सेल थेरपी अशा दोन किंवा अधिक उपचारपद्धतीच्या काँबिनेशनच्या आधारेही उपचार केले जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. रक्तकर्करोगाप्रमाणे अन्य प्रकारच्या कर्करोगातही ही उपचारपद्धती अवलंबता येईल का, यावरही संशोधन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्याच्या घडीला कार-टी सेल उपचारपद्धती खर्चीक आहे. पण त्यात रुग्णाच्या आवश्यकतेनुसार कोणत्या प्रकारचे अँटिजेन तयार करायचे आहे, कर्करोगाचा स्तर कोणता आहे, कशा स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे, रुग्णाचा सर्व प्रकारचा टेस्ट्सचा खर्च, त्याला कसे त्रास होतील, त्याचा खर्च यात जोडला गेला आहे का या सगळ्या गोष्टींवर हा खर्च अवलंबून आहे. आजमितीस अमेरिकेत कार-टी सेल उपचारपद्धतीकरिता तीन लाख डॉलर्स इतका खर्च येतो. कार-टी सेल उपचारपद्धतीत सर्वाधिक खर्च हा त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या उभारणीसाठी येतो. अद्ययावत प्रयोगशाळा, आयटी सपोर्ट, त्याआधारे कार-टी सेल तयार करणे हे सारेच खर्चीक असल्यामुळेच या उपचारपद्धतीसाठी एवढा खर्च येतो.
 
 
 
कोणतीही उपचारपद्धती जेव्हा नव्याने उदयास येते, तेव्हा ती खर्चीक असू शकते. पण त्यासाठी शासकीय माध्यमातून योजना तयार केली जाते, सर्वसामान्यांसाठी ती कमी किमतीत उपलब्ध करून दिली जाते, तेव्हा त्याचा सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. क्रांतिकारक अशी कार-टी सेल उपचारपद्धतीदेखील अन्य कर्करोग उपचारपद्धतींप्रमाणे सर्वसामान्यांच्या अवाक्यात आली, तर रुग्णांना नक्कीच दिलासादायक ठरेल हे निश्चित. परदेशात रुजलेली ही थेरपी भारतात रुजवण्याच्या दृष्टीने डॉ. गणपती भट यांच्यासारख्या डॉक्टरांचे यासाठी असणारे योगदान नक्कीच उल्लेखनीय ठरणारे आहे.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.