‘नुक्कड’च्या निमित्ताने साहित्यरंगी झाले मोठे आणि छोटेही...

विवेक मराठी    14-Jan-2023
Total Views |
@संजीवनी शिंत्रे 

vivek 
’विवेक साहित्य मंच’ आणि ’नुक्कड कथाविश्व’ गेल्या काही वर्षांपासून दर्जेदार साहित्य संमेलन भरवत आहेत. या वर्षीही 7, 8 जानेवारीला ’विवेक साहित्य मंच’ने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नुक्कड साहित्य संमेलन आणि बालसाहित्य संमेलन भरवले होते, त्याचे सविस्तर वृत्तान्त....
‘मराठी भाषा मरू घातली आहे’, ‘मराठी भाषेचे भविष्य धोक्यात’ अशी हाकाटी आपण गेली अनेक दशके ऐकतो आहोत. पण हा धोका टाळण्यासाठी काही ठोस पावले उचलायला मात्र कोणी नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि जिथे जिथे मराठी भाषक आहेत तिथे तिथे दिसून येते. अशा निराशाजनक वातावरणात गेली पाच वर्षे सातत्याने ’विवेक साहित्य मंच’ आणि ’नुक्कड कथाविश्व’ या फेसबुक समूहाच्या साहाय्याने दर्जेदार साहित्य संमेलन भरवत आहे. या वर्षीही 7, 8 जानेवारीला ’विवेक साहित्य मंच’ने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नुक्कड साहित्य संमेलन आणि बालसाहित्य संमेलन भरवले होते.
  
 
7 जानेवारीला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अ‍ॅम्फीथिएटरमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले, तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी बीजभाषण केले. जी.ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, शांताराम म्हणजेच के.ज. पुरोहित आणि शांताबाई कांबळे या लेखकांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे या लेखकांच्या साहित्यावर चर्चा, परिसंवाद आणि नवोदित साहित्यिकांच्या साहित्याला संधी असे पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्र होते.
 
vivek
 
डॉ. सदानंद मोरे यांनी उद्घाटनप्रसंगी कोणतीही भाषा टिकण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांबरोबरच सर्वसामान्य माणसाची इच्छाशक्तीही महत्त्वाची आहे, हे अनेक उदाहरणांतून पटवून दिले. त्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात स्वभाषेचा वापर केला, साहित्यनिर्मितीबरोबरच व्यावहारिक कारणांसाठीही स्वभाषेचा वापर केला, तरच भाषा टिकेल हे त्यांचे मत कोणालाही पटण्याजोगेच होते.
 
 
 
जी.ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, शांताराम, शांताबाई कांबळे यांच्या साहित्याचा आढावा घेणारे बीजभाषण करताना भारत सासणे यांनी या साहित्यिकांचे वाङ्मयीन इतिहासातील महत्त्व, त्यांची बलस्थाने या मुद्द्यांबरोबरच साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, लेखकाची भूमिका अशा निखळ साहित्यिक घटकांचीही चर्चा केली. समकालीन बालसाहित्यातून हरवत चाललेल्या अद्भुत रसामुळे समाजातली असंवेदनशीलता कशी वाढत चालली आहे, याचे त्यांनी नेमके विश्लेषणही केले.
  

vivek
 
’कोरीव लेणे’ या जी.ए. कुलकर्णी यांच्या साहित्यावरील परिसंवादात संजीव कुलकर्णी यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या कथासाहित्याचा आढावा घेतला, तर महेश आफळे यांनी ‘जी.ए. कुलकर्णी यांचे पत्रलेखन’ या विषयाची चर्चा केली. या सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. आनंद काटीकर यांनी जी.एं.च्या लेखनातील नियतीशरणता आणि मानवी अस्तित्वाचा त्यांनी घेतलेला शोध यांची अनेक उदाहरणे देऊन जी.ए.प्रेमींच्या मनातील अनेक कथांच्या संदर्भांना उजाळा दिला.
 
  
यानंतरच्या सत्रात ’नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ’ आणि ’कथा शांतारामांच्या, विषय वैविध्याचा’ या दोन विषयांवरचा परिसंवाद झाला. या परिसंवादात डॉ. निर्मोही फडके यांनी गाडगीळांचे कथालेखन, तर डॉ. रुपाली शिंदे यांनी गाडगीळांच्या कादंबर्‍या या विषयांची चर्चा केली. शांतारामांच्या लेखनाचा आढावा घेताना डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी शांतारामांचे कथालेखन, तर डॉ. सुजाता शेणई यांनी शांतारामांचे ललितलेखन यावर मते मांडली.
  

vivek 
 
जी.ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, शांताराम यांच्या साहित्यावरच्या तिन्ही परिसंवादातल्या वक्त्यांची अभ्यासपूर्ण मते ऐकणे ही श्रोत्यांसाठी बौद्धिक मेजवानीच होती.
 
 
यानंतरच्या नुक्कड कथा अभिवाचनाच्या सत्रात अभय नवाथे, नेहा लिमये, ईशा महल्ले, उमेश पटवर्धन, श्रीया बर्वे यांचा सहभाग होता. ’कविता, सादरीकरण आणि बरंच काही’ या सत्रात ’कवितेतील सामाजिकता’ या विषयावर रमेश वाकनीस आणि ’कवितेतील विषयवैविध्य’ या विषयावर एल.बी. पाटील यांनी विचार मांडले. त्यानंतर नवोदित कवींच्या कवितांचे सादरीकरण झाले. या दोन्ही सत्रांचे अध्यक्ष प्रवीण दवणे आणि काव्य-शिल्प संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जोशी होते.
 
 
 
या सर्व गंभीर आणि वैचारिक सत्रांनंतर शांताबाई कांबळे यांच्या ’माज्या जल्माची चित्तरकथा’ या आत्मचरित्रावर ‘चित्तरकथा’ हा दीर्घांक सादर झाला. या दीर्घांकात अतिशय कमी नेपथ्य वापरून दिग्दर्शक योगेश सोमण, साहाय्यक दिग्दर्शक प्रसाद खडके, अभिनेत्री मुक्ता आशा आणि मंजू गौतम यांनी अतिशय परिणामकारक सादरीकरण केले.
 
 
vivek
 
या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात झालेली युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रणव सखदेव यांची मुलाखत हा सर्व कार्यक्रमांचा सर्वोच्च बिंदू होता. डॉ. अर्चना कुडतरकर आणि अभय नवाथे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत सखदेव यांनी लेखनाची निर्मितीप्रक्रिया, संपादकीय संस्कारांची गरज, कथानकात येणारी पात्रे, वातावरण यासारखे साहित्यिक घटक अशा विविध मुद्द्यांवरच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे तर दिलीच, त्याचबरोबर नवोदितांनी या क्षेत्रात येण्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे, मराठी साहित्याच्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत याबाबत मार्गदर्शनही केले.
 
 
 
केवळ साहित्यातच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आवश्यक असणार्‍या संवेदनशील व्यक्तिमत्त्वांच्या निर्मितीसाठी सशक्त बालसाहित्य आवश्यक असते, पण दुर्दैवाने या अत्यावश्यक घटकाकडेच आपल्या समाजात दुर्लक्ष होते. या उणिवेवर मात करण्यासाठी संमेलनाचा दुसरा दिवस पूर्णपणे बालसाहित्याला वाहिलेला होता. बालसाहित्यिक, बालकलाकार आणि बालप्रेक्षक आणि त्यांचे शिक्षक, पालक यांच्या उत्स्फूर्त आणि भरगच्च प्रतिसादाने हा दिवस रंगतदार झाला.
 
 
vivek
 
ज्येष्ठ लेखिका डॉ. मंगला नारळीकर, बालसाहित्य अकादमी पारितोषिक मिळालेल्या संगीता बर्वे, बालसाहित्यकार राजीव तांबे, चित्रकार रवींद्र देव या सर्वांनी सरस्वतीपूजन करून या संमेलनाचे उद्घाटन केले. विवेक साहित्य मंचच्या संयोजक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात बालसाहित्य संमेलन घेण्यामागची विवेक साहित्य मंचाची भूमिका स्पष्ट करून साहित्याबरोबर चित्रकला, हस्तकला या मुलांमधल्या कलागुणांनाही या संमेलनात कसा वाव दिला आहे, याबाबतची माहिती दिली. उद्घाटनाच्या या सत्रात डॉ. रवींद्र देव यांनी मुलांची चित्रकलेतली अभिव्यक्ती, संवेदनशील वयातले संस्कारांचे महत्त्व यांची अनेक उदाहरणे देऊन मुलांच्या मनोविश्वाचे दर्शन घडवले. बालसाहित्यकार राजीव तांबे मुलांमध्ये चांगलेच लोकप्रिय असल्यामुळे मुलांशी गप्पा मारत त्यांनी संमेलनातल्या सत्रांविषयीची माहिती दिली. डॉ. संगीता बर्वे यांनी मुलांशी संवाद साधत, ’झाडआजोबा’ ही त्यांची कविता वाचून दाखवली आणि वातावरणात उत्साह निर्माण केला. त्यानंतर डॉ. मंगला नारळीकर यांनी बालसाहित्याच्या निर्मितीसाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत याची चर्चा केली.
 
 
 
उद्घाटनाच्या या सत्रानंतर ’ऐकताय ना माझी कविता?’ हा मुलांच्या कवितांच्या सादरीकरणाचा आणि ’मी सादर करणार आहे’ हा नाट्यछटांचा अतिशय रंगतदार कार्यक्रम सादर झाला. विविध वयोगटांतल्या मुलांच्या या कवितांमधले विषयवैविध्य आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण चकित करणारे होते. यात सहभागी असणारी बहुसंख्य मुले ही ’शिक्षणविवेक’ची वाचक होती. त्यामुळे या दर्जेदार सादरीकरणात ’शिक्षणविवेक’चाही अप्रत्यक्ष सहभाग आहे, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.
 
 
 
यानंतर जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या पुस्तकावर आधारित रंगभाषा आणि टीमने केलेल्या सादरीकरणामुळे बालप्रेक्षकांना बिम्मच्या आगळ्यावेगळ्या कल्पनाविश्वाची सफर करता आली, तर प्रौढ प्रेक्षकांना त्यातल्या प्रतीकात्मकतेमुळे आणि मुलांच्या मनोविश्वाच्या दर्शनामुळे अंतर्मुख केले. ’बोलू चित्रांशी-रंगांशी’ या सत्रात चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांच्या चित्रांच्या सादरीकरणाला आणि राजीव तांबेंनी त्यांच्याशी चित्रांविषयी मारलेल्या गप्पांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ’ऐकू या छान छान गोष्टी’ या नीलिमा गुंडी आणि धनंजय गुडसुरकर यांनी सादर केलेल्या गोष्टींच्या सादरीकरणाने आणि ’निसर्गातले सखेसोबती’या दृक्श्राव्य कार्यक्रमामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
 
 
योगेश सोमण दिग्दर्शित ’द प्लॅन’ या नाटकाने या संमेलनाची सांगता झाली. या नाटकातील परिणामकारक संवाद आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे उपस्थितांची मने देशप्रेमाने भारून गेली. दिवसभरच्या या भरगच्च कार्यक्रमांमुळे, तसेच दिवसाच्या शेवटी नुक्कड कथास्पर्धेतील आणि विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमधील पारितोषिक विजेत्यांच्या बक्षीस समारंभामुळे या संमेलनाच्या आठवणी उपस्थितांच्या मनात कायम रेंगाळत राहतीलच, तसेच दोन दिवस झालेले हे दर्जेदार संमेलन मराठी साहित्य क्षेत्रात नक्कीच उत्साह निर्माण करेल, याची खात्री वाटते.