खंबीर आणि कार्यतत्पर सुमित्राताई भांडारी

विवेक मराठी    14-Jan-2023
Total Views |
राष्ट्रीय विचारांच्या संस्कारामुळे सामाजिक-शैक्षणिक कामात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या सुमित्रा भांडारी यांचे नुकतेच  दीर्घ आजाराने निधन झाले. वेणुबाई वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून सुमित्राताईंनी केलेले काम, त्यांची निर्णयक्षमता, कार्यतत्परता यावर प्रकाश टाकणारा श्रद्धांजली लेख.
  
rss

    @विद्या देशपांडे । 9422322998

मित्राताई भांडारींच्या मृत्यूची बातमी अनपेक्षित होती असे नाही, कारण काही महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांच्याकडे पाहून मनावर एक चरा उठलाच होता. त्यांनी आयोजित केलेल्या ‘छांदसी’च्या दुसर्‍या प्रदर्शनामध्ये भेट झाली, तेव्हा त्यांची पिवळी जर्द (शब्दश:) त्वचा पाहून काही गंभीर आहे का, असे वाटले खरे, पण असा अंदाज आला नाही. थकवा असला, तरी आपल्या सगळ्या माणसांच्या स्वागताला आपण असणारच हा त्यांचा विचार मला परिचितच होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या आजाराचे स्वरूप कळले.
 
 
 
काही काळ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही देवाणघेवाण होत होती. ऑक्टोबर 2021अखेरच्या सर्जरीनंतर मधूनमधून संवाद चालला होता. त्यात कुठेही नैराश्य डोकावले नव्हते, त्यामुळे असे सातत्याने वाटायचे की या सार्‍यातून त्या नक्की बाहेर पडतील. मात्र 13 जून 2022च्या भेटीनंतर मात्र मनात एक अस्वस्थता घर करून होती. खूप वेळ बोललो, नेहमीप्रमाणे अनेक विषयांना स्पर्श झाला, पण त्यांचा थकवा मात्र लपत नव्हता.
 
 
 
2015 ते 2020पर्यंतचा काळ जवळजवळ रोज आमची भेट ठरलेली असायची. प्रारंभीचा काळ रमासदनच्या व वेणूबाई वसतिगृहाच्या कामाचा आवाका समजून घेण्यासाठी सातत्याने भेट व्हायची. महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या शालेय वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून सुमित्राताईंकडे जबाबदारी होती व संस्थेची व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून माझ्याकडे दायित्व होते. पुण्यात शालेय विद्यार्थिनींसाठी एवढी मोठी सुविधा फार कमी संस्थांमध्ये आहे. 1320 ते प्रसंगी 1350 विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था रमासदन वसतिगृहात होऊ शकते. वेणूबाई वसतिगृहात 150 ते 200 मुली बालकल्याण मंडळामार्फत येतात. या सार्‍या कामाचा आवाका फारच मोठा होता. दोन्ही वसतिगृहांच्या गरजा व आवश्यकता काही प्रमाणात भिन्न होत्या. सुरुवातीला झालेल्या दीर्घ चर्चांमधून सुमित्राताईंकडून कामाचा विस्तार समजून घेता आला व नंतर सुरू झाले प्रत्यक्ष काम आणि मग एका वेगळ्या मैत्रिपर्वालाही सुरुवात झाली. त्यांचा स्वभाव मूळत: कार्यकर्त्याचा असल्यामुळे अनेक बाबींवर दृष्टी समान असल्याचे लक्षात आले. मतभेद तर नव्हतेच, मुद्दा एकच असे - गुणवत्ता सुधार. कोणकोणत्या विभागात काय काय करता येईल? सुमित्राताईंकडे माहिती तर असेच, तसेच त्या काही कल्पनाही मांडत. त्यावर मोकळी चर्चा व्हायची, अनेक नवनवीन मुद्द्यांवर विचार व्हायचा. एकदा निर्णय झाला की त्या अतिशय वेगाने व बारीक बारीक मुद्दे विचारात घेऊन तो प्रत्यक्षात आणायच्या.
 
 
 
वसतिगृहातल्या व्यक्तींची क्षमता माहीत असणे ही त्यांची भक्कम बाजू होती. त्यामुळे कोणाला कोणते काम सोपवावे याबद्दल काही अडचण येत नसे. त्या अगदी तपशिलात सूचना देत, शिवाय स्वत: उभे राहून काम योग्य पद्धतीने होईल याबद्दल ह्या अतिशय जागरूक असत. त्यामुळे रमासदन वसतिगृहाकडे जरी अनेक मोठ्या कार्यक्रमांची व्यवस्था असली, तरी त्यात गडबड होण्याची शक्यता बहुधा नसेच. योग्य असलेल्या मुलींची वेगवेगळ्या उपक्रमांसाठी निवड करणे यावरही त्यांचे बारीक लक्ष होते, शिवाय सगळ्यांना कामात समाविष्ट करून घेण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
 
 
 
आर्थिक मदतीची गरज असलेल्या मोठ्या मुली ‘कमवा व शिका’ योजनेसाठी नाव नोंदवीत असत. पण प्रत्येक मुलीला वसतिगृहात मदत करण्यासाठी वेळ नेमून द्यायला हवा, यासाठी त्या बारकाईने नियोजन करीत. या सार्‍या कामात प्रत्येकीचा लहानसा तरी वाटा असायला हवा, अशी चर्चा नेहमी होत असे. हे टाळणार्‍या किंवा टाळू पाहणार्‍या मुलींशी त्या प्रसंगी सविस्तर बोलत.
 
 
 
अनेक पालकांचे म्हणणे असते की मुलीला काम सांगू नका. पण त्याच वेळी आईची तक्रारही असते, सुट्टीत मुलगी कामाला जराही उभी राहत नाही. अशा वेळी नियमितपणे कामासाठी व मनाला त्याचे वळण लागण्यासाठी सर्वांनी आळीपाळीने काम करण्याचे महत्त्व सांगणे ही सुमित्राताईंची कायमची जबाबदारी होती.
 
 
 
बालकल्याण मंडळाकडून येणार्‍या मुलींवर या मुद्द्यासाठी त्या विशेष प्रयत्न करीत. एकदा ती मुलगी संस्थेत आली की शिक्षण संपवून लहानसे का होईना, काम मिळून किंवा लग्न होऊन बाहेर पडते. अशा वेळी तिच्या मनाला कामाचे वळण संस्थेत लावले गेले नाही, तर त्यांचा भविष्यात निभाव लागणार नाही, याची त्यांना चांगली कल्पना होती. तशा काही प्रतिक्रियाही येत. असे घडू नये यासाठी त्या कायम जागरूक असत. बालकल्याण मंडळातून आलेल्या मुलींची त्यांना नेहमी अधिक काळजी असे व प्रेमही. दर वर्षी या सगळ्यांसाठी त्या घरचे आंबे आवर्जून आणीत व प्रत्येकाला ते मिळतील याची खात्री करीत.
 
 
 
रोजचे जेवण, त्याचा मेनू, त्याची चव, त्यातील गुणवत्ता सातत्य व नावीन्य या सार्‍या गोष्टींकडे त्या कायम बारकाईने लक्ष देत असत. रोज न चुकता चव घेणे, त्यात आवश्यक त्या सूचना करणे, बदल घडवणे ही गोष्ट न कंटाळता करणे हे सुमित्राताईंचे वैशिष्ट्य. त्यासाठी योग्य ते साहित्य कायम कोठीत असले पाहिजे, याचे काटेकोर नियोजन असायचे. रोजचे लागणारे सर्व मसाले उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत करून ठेवावे, यावर चर्चा झाली. लगोलग येणार्‍या सुट्टीत काही महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित झाले. नंतर लहान-लहान गटात अनेकांचे प्रशिक्षण झाले. काळा मसाला तयार होतच असे, त्यात अन्य मसाल्यांची भर पडली. हे सुमित्राताईंनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून यशस्वी केले. उन्हाळ्यातल्या पदार्थांचे नियोजनही त्या करीत. त्यामुळे वसतिगृहात कायम उत्तम प्रतीचे (1500 अधिक पाहुणे) तळण्याचे पदार्थ उपलब्ध असत. गुणवत्तेवरचा कटाक्ष अर्थात सुमित्राताईंचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जाण्याची परवानगी नसलेल्या मुलींसाठी नवीन गोष्टी शिकण्याचेही छान नियोजन असायचे. नवीन नवीन कला व कौशल्ये शिकण्यासाठी खूप विचार करून नियोजन व्हायचे. फार छान जायचा मुलींचा वेळ. वसतिगृहातले जेवण त्यामुळे सर्वांनाच मनापासून आवडते. आजही सर्व भाज्या, आमटी, कोशिंबिरी, चटण्या यांची चव व प्रत कधीही न बिघडण्यामागे त्यांचे सतत असणारे लक्ष व आग्रह याचा निश्चितच मोठा वाटा होता.
 
 
 
त्याचबरोबर प्रमुख म्हणून वसतिगृहातील कर्मचार्‍यांच्या कामाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर होतीच. त्यांच्यासाठी प्रशिक्षण, बढती, निवृत्तीनंतरचे अर्थकारण यावरही चर्चा घडे. या संबंधित असलेले मुद्दे योग्य त्या माहितीसह मांडण्यासाठी सुमित्राताई नेहमी काटेकोर. बैठकीत नवीन मुद्द्यांचे आकलन - विशेषत: अर्थकारणाशी संबंधित - त्यासाठी समजून घेणे व त्यासाठीचा मनाचा खुलेपणा हेही एक वैशिष्ट्यच. यामुळे अनेक मुद्दे संस्थेच्या व्यवस्थापनापुढे स्पष्टपणे मांडले गेले. ज्या मुलींना मदत द्यायची, त्याची माहिती मिळण्यासाठी एक फॉर्मही फारच कल्पकतेने तयार केला होता.
 
 
 
पौगंडावस्थेतील मुलींचे प्रश्न हा महत्त्वाचा व काळजीपूर्वक हाताळावा लागणारा एक मुद्दा आहे. यावर आम्हा दोघींची नेहमी दीर्घ चर्चा घडे. या संबंधित प्रश्न आला नाही असा दिवस बहुधा नसेच. यासाठी कायमस्वरूपी व्यापक व्यवस्था काळानुरूप विकसित होईल. कोरोना काळाचाही अडसर अचानक आला. त्याचबरोबर वसतिगृहातील मुलींसाठी ई-लायब्ररी व दालन व अभ्यासिका हाही राहिलेला एक मुद्दा निकटच्या काळात पूर्ण होईलच.
 
 
 
काही प्रसंगी रात्री-अपरात्रीही या मुद्द्यांवर हॉस्पिटलमध्ये जाणे वा अन्य ठिकाणी जावे लागणे हाही एक कामाचा भाग होताच. पण जराही गडबडून न जाता विचार करण्याची कला सुमित्राताईंकडे होती. त्यामुळे योग्य प्रकारे त्यांच्याबरोबर उभे राहून प्रश्न सोडविणे अवघड वाटायचे नाही. वसतिगृहातून अस्वस्थतेने बाहेर पडलेली मुलगी उशिरा रात्री जवळच सापडली, तेव्हा जमलेले नागरिक, मुलीची नातेवाईक व महिला पोलीस या सगळ्यांशी संवाद साधत, दोघींनी अलगद नीरगाठ सोडविताना मलाही व्यक्तिश: ताण आला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण होते मोकळा संवाद व महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत. संस्थेतील शुल्क संबंधात मोठ्या प्रमाणावर पालकांनी निदर्शन केले, तेही रमासदनसमोर. तेव्हाही त्या खंबीरपणे सर्वांबरोबर उभ्या होत्याच. अनेक मुद्द्यांवर राज्य-सरकारी पातळीवरही पाठपुरावा करावा लागतो, यासाठी त्यांचे पती माधवजी भांडारींनीही कायम भक्कम पाठबळ दिले. त्यांनाही सुमित्राताईंची कामामधली गुंतवणूक माहीतच होती व मान्यही होती, त्यामुळे त्यांचेही मार्गदर्शन कायम होते. सुमित्राताईंच्या कर्तृत्वामध्ये माधवजींचा वाटाही तेवढाच महत्त्वाचा होता. अनेक वेळा कामाला अधिक प्राधान्य दिल्यामुळे कुटुंबासाठी कमी वेळ उरत असावा. पण त्यांनी जबाबदारी मात्र कधीही टाळल्याचे स्मरत नाही.
 
 
 
अशा ज्या जागेवर व्यक्ती काम करते, त्या पदावर नेहमी अपेक्षांचे ओझे असतेच. टीकाही होते, योग्य ते श्रेय कधीकधी मिळत नाही, हे सगळे वास्तव सुमित्राताईंनी निरपेक्षपणे स्वीकारले. मातेच्या काळजीने त्यांनी जबाबदारी स्वीकारली. अनावश्यक भावनाविवशतेने निर्णय चुकू शकतात, हे त्यांना माहीत होते. वयाच्या त्या मानाने उशिराच्या टप्प्यावर नोकरीचा निर्णय घेऊनही सर्व बाजू समजून घेऊन त्यांनी कार्यक्षमतेने पदभार सांभाळला. कदाचित अधिक काळ मिळाला असता, तर भारतीय वस्त्रविश्वात त्यांना अधिक काम करायला आवडले असते. पण नियतीवर आपले नियंत्रण कुठे असते?
 
 
 
 
सुमित्राताईंबरोबरचा हा संपूर्ण वर्षाचा काळ कामाच्या दृष्टीने अपार समाधान देणारा होता. समदृष्टी असलेल्या कार्यकर्त्याबरोबर काम करण्याची, विशेषत: सामाजिक क्षेत्रात संधी तशी नेहमी लाभत नाही. ती सुदैवाने लाभली. त्यांच्याबरोबरचा संवाद थांबला, पण समाधानाने माझी ओंजळ भरलेली राहील.
 
 
सुमित्राताईंना मन:पूर्वक श्रद्धांजली.