ते तीन शब्द

विवेक मराठी    16-Jan-2023   
Total Views |
जर एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसात संपर्क नसल्याने काय बोलावे प्रश्न पडला असेल, एखादा मित्र/मैत्रीण/जोडीदार नाराज असेल, तर हे तीन शब्द त्यांना पाठवा आणि जादू बघा - ते शब्द म्हणजे अर्थातच ‘डीपी छान आहे’.
  
vivek

माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते, ते आपल्याला माहीत आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले, तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात. पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.
 
 
समाजाच्या विचारात, माणसाच्या स्वभावात होणारे बदल फार संथ गतीने होत असले, तरी त्याचा डीपी (डिस्प्ले किंवा प्रोफाइल पिक्चर) सतत बदलत असतो. (अपवादांनी स्वत:ला वगळून घ्यावे.) लिंक्ड-इनसारख्या समाजमाध्यमावर ती व्यक्ती फारच यशस्वी आहे असे भासवणारा औपचारिक डीपी वापरला जातो. डीपी डीपी खेळण्याची खरी मजा लोकांना व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांवर लुटता येते. हा दर्शनी बदल असला, तरी त्यातून काय दाखवायचे हा हेतू मात्र अढळ असतो.
 
 
याबाबत पाश्चात्त्य समाजमाध्यम अभ्यासकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. उदा., आशियाई लोकांना आपला डीपी प्रेक्षणीय स्थळाच्या पार्श्वभूमीवर असणे आवडते, तर अमेरिकन लोकांना डीपीतून चेहरा दाखवायला आवडतो. पेन्सिल्वानिया विद्यापीठाने मध्यंतरी साठ हजार प्रोफाइल्सची पाहणी केली. यूजरच्या म्हणजेच माध्यम वापरणार्‍या माणसाच्या स्वभावाचे व विचारपद्धतीचे प्रतिबिंब त्याच्या डीपीमध्ये आढळून येते, असा त्या पाहणीचा सारांश सहज पटण्यासारखा.
 
 
यूजरचे सामान्यत: पाच प्रकार असतात. ते काय पोस्ट करतात किंवा काय लाइक करतात यावरून हे प्रकार ओळखू येतात - साधेसरळ, नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, सावध भूमिका घेणारे आणि बिनधास्त हे ते पाच प्रकार.
सकारात्मक मंडळींना रंगीबेरंगी फोटो, ग्रूप फोटो डीपी म्हणून आवडतात.
 
 
नकारात्मक मंडळी डीपीमध्ये शक्यतो आपला चेहरा दाखवत नाहीत. मॉडर्न आर्टसारखे काहीतरी अतर्क्य डीपी ते निवडतात.
स्वत:च्या प्रतिमेबद्दल दक्ष असलेल्या लोकांचा डीपी नेहमी नीटनेटका असतो. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा त्यातून पत्ता लागत नाही.
 
 
 
साधे आणि स्वकोषातले लोक मुलाबाळांचे, देवादिकांचे, फुलांचे फोटो डीपी म्हणून वापरतात.
 
 
ही मंडळी नकळतपणे, तर बिनधास्त लोक ठरवून त्यांच्या त्या त्या वेळच्या भावस्थितीनुसार डीपी बदलत असतात.
याशिवाय स्वप्रेमात बुडालेले - म्हणजेच ‘नार्सिसिस्ट’ लोक नाटकी वाटावेत असे अतिआकर्षक, खास काढून घेतलेले डीपी वापरतात. त्याकडे लोकांचे लक्ष जात नसल्यास ते बैचैन होऊन डीपी बदलत राहतात.
 
 
यापलीकडे जाऊन एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक घटनेशी आपले नाते दर्शवण्यासाठी काही जण डीपीचा वापर करतात. उदा., स्वातंत्र्यदिनाला डीपी म्हणून आपला राष्ट्रध्वज लावणे, आवडत्या नेत्याचा फोटो लावणे, सामना जिंकल्यास त्या खेळाडूचा फोटो लावणे अनेकांना आवडते. एखाद्या गंभीर घटनेची प्रतिक्रिया म्हणून काळा रंग दर्शवणारा डीपी ठेवणे किंवा ’मी कर भरला’, ’मी लस घेतली’ किंवा ’बेटी बचाओ’ यांसारख्या बॅनरचा वापर प्रो-पिकसह करणे हा आपली सामाजिक संवेदनशीलता प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग मानला जातो.
 
 
 
आपल्या भारतीय नजरेतून डीपीकडे बघितले, तर आणखी काही वेगळे आणि गमतीदार निष्कर्ष काढता येतात.
 
 
भारतीय पुरुषांना - विशेषत: तरुणांना डीपीमधून आपले सामाजिक स्थान दाखवायला, म्हणजेच आपण कुणीतरी खास असल्याचे दाखवायला आवडते. भारतीय स्त्रियांना आपल्याइतके खूश जगात कोणी नाही, असे दाखवायला आवडते. पुरुषांना हसणे थोडे कमीपणाचे वाटते. काही मॉडेलच्या चेहर्‍यावर असतात तसे निर्विकार सुतकी भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतात. त्यांनी लावलेल्या गॉगलकडे किंवा भारी घड्याळाकडे, ते टेकून उभे असलेल्या कारकडे लोकांनी पाहावे अशी त्यांची इच्छा असते. ते सूर्याकडे, डोंगराकडे, इमारतीकडे.. एकंदरीत भलतीकडेच पाहताना दिसतात. याउलट बहुतेक स्त्रिया कॅमेर्‍याकडे रोखून बघतात. डीपी हसरा आहे ना, निदान आपण मजेत आणि चांगल्या दिसत आहोत ना, याची त्यांनी खात्री केलेली असते.
 
 
 
मध्यमवर्गीय तरुणींना सुरक्षिततेची भीती किंवा फेसबुकवरच्या आत्या-मामा-काकूंची आपल्यावर एक गुप्त नजर असल्याचे जाणवत असते, त्यामुळे त्या डीपीतून संस्कारी दिसण्याचा प्रयत्न करतात.
 
 
 
हा ताण नकोसा वाटला, तर तरुण मंडळी इन्स्टाग्रामवर पळतात. तिकडे जाऊन नेमके काय करायचे हे अद्याप फेसबुकी आत्या-मामा-काकूंना फारसे माहीत नसल्याने, त्या तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे तिकडे कॉलेजमधल्या ’ऑफ’ तासाला असते तसे मुक्त वातावरण असते. तिकडे डीपीवर एक तरी ओळ लिहावी लागते. त्या ओळीचा आणि फोटोचा सहसा संबंध नसतो. एकाच्या फोटोवर लिहिले होते, ’मै नही तो कौन बे’ (हे सध्याचे प्रसिद्ध रॅप गाणे आहे). दुसरीच्या फोटोवर लिहिले होते, ’लव्ह द लाइफ यू लिव्ह, लिव्ह द लाइफ यू लव्ह.’ म्हणजे नेमके काय? असले निरर्थक प्रश्न तिकडे विचारायचे नसतात. वाक्यासह हॅशटॅग वापरायचे असतात. त्यात पार्टी, फ्रेंड्स, धमाल, न्यू इयर, बेस्टी वगैरे लिहायचे असते. मुले मात्र एकमेकांना बेस्टू बिस्टू म्हणत नाहीत. इन्स्टाग्रामवर मैत्रिणीला बेस्टी न म्हणणे हा दंडनीय अपराध असतो. असे सगळे केल्याने आपण ’कूल’ असल्याचे सिद्ध होते. म्हणजे काय, ते विचारू नये.
 
 
पुरुष एकमेकांच्या डीपीकडे पाहतात, त्यापेक्षा कितीतरी बारकाईने स्त्रिया एकमेकींच्या डीपीचे निरीक्षण करतात. एकमेकींना बदाम वगैरे देऊन वॉव, सुंदर वगैरे म्हणतात. त्या डीपी बदलतात तेव्हा हे प्रतिसाद परत आहेरात आले नाहीत, तर पुढच्या वेळी फक्त ’नाइस पिक’ अशी बोथट प्रतिक्रिया देतात. जवळच्या मैत्रिणी एकमेकींना ’परवाच्या डीपीमधलं कानातलं कुठून घेतलं गं?’ असे प्रश्न विचारू शकतात. जिला विचारणा झाली, तिचे तो डीपी लावण्याचे सार्थक झालेले असते. निरीक्षणात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या काही स्त्रिया तर ’तुझ्या कालच्या डीपीमध्ये मागे उभ्या असलेल्या तुझ्या मैत्रिणीच्या ब्लाउजचे डिझाइन छान होते, कुठे शिवले तिने?’ असेही बिनदिक्कत विचारू शकतात. असे केल्यास आपण रिकामटेकडे ठरू की काय, या शंकेने पुरुष डीपीसारख्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष नसल्याचे दाखवतात. मित्राच्या डीपीमधल्या कारच्या मॉडेलची नोंद मात्र त्यांच्या मनात झालेली असते. प्रतिक्रिया दिलीच तर ते मैत्रिणीला गोड आणि मित्राला खडूस शब्दात देतात.
 
 
एकूण काय, जगाने आपल्याकडे ज्या नजरेने पाहावे असे आपल्याला वाटते, तसा डीपी आपण सगळे वापरतो. त्यासाठी काही जण फोटो फिल्टर वापरतात, कुणी सोबतीला प्रसिद्ध व्यक्ती घेतात. पण त्यात ’आपण’ खरे असतो का! तेव्हा डीपीला एखाद्या पाकिटावर चिकटवलेल्या तिकिटापेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. ते तिकीट आणि पाकिटात जे काय असते याचा एकमेकाशी जितका संबंध असतो, तितकाच डीपीतून दिसणारी व्यक्ती आणि मूळ खरी व्यक्ती यांचा आपसात संबंध असतो. लोक डीपीच्या आहारी जातील म्हणूनच कदाचित.. संत चोखोबांनी ‘का रे भुललासी वरलिया रंगा’ म्हणून ठेवले असावे.
 
 
 
तरीही जर एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसात संपर्क नसल्याने काय बोलावे प्रश्न पडला असेल, एखादा मित्र/मैत्रीण/जोडीदार नाराज असेल, तर हे तीन शब्द त्यांना पाठवा आणि जादू बघा - ते शब्द म्हणजे अर्थातच ’डीपी छान आहे’.

मोहिनी महेश मोडक

 वेब सर्व्हिसेस पुरवणाऱ्या अकोलास्थित कंपनीच्या संचालिका आहेत. नेटवर्क इंजीनिअरिंग कोर्सेसची प्रशिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. सध्या त्या ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखे विविध कोर्सेस ऑनलाइन पद्धतीने शिकवतात.
त्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात द्विपदवीधर
असून त्यांनी वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन व दिवाळी अंकांसाठी लेखन केले आहे.
त्या समाजमाध्यमांच्या अभ्यासक व ब्लॉगर आहेत, तसेच
विविध सामाजिक, साहित्यिक व व्यावसायिक संघटनांमध्ये त्या सक्रिय आहेत.