काँग्रेसमध्ये ज्येष्ठांची मांदियाळी, तरुणांची फरफट

विवेक मराठी    17-Jan-2023   
Total Views |
@अभय पालवणकर 
 
 
vivek
आपल्या पक्षाच्या वयाप्रमाणेच काँग्रेस पक्षाचे विचारही जुने होत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच 2014पासून अनेक तरुणांनी काँग्रेसपासून फरकत घेतली आहे, तर काहींना काँग्रेसच्या धोरणांमुळे बाहेर पडावे लागले आहे. महाराष्ट्रात नाशिक पदवीधर निवडणुकीत नुकताच याचा अनुभव आला आहे. युवानेते सत्यजित तांबे यांना संधी न देता त्यांच्या वडिलांना संधी देऊन काँग्रेस आपली हक्काची जागा गमावत आहे. यानिमित्ताने काँग्रेसने मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून काहीच धडा घेतला नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
एकेकाळी मजबूत आणि देशातील सर्वव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसचा नावलौकिक होता. राजकारणात येणार्या नवोदित तरुणांचा राजकीय श्रीगणेशा काँग्रेसमधूनच होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये युवा नेतृत्वाची मोठी फळी होती. राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसचे काम हाती घेतले. युवक काँग्रेस आणखी मजबूत करण्यासाठी अनेक प्रयत्नसुद्धा केले. काँग्रेसमधील घराणेशाही संपवण्यासाठी युवक काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. पण घराणेशाहीची कीड लागलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठांनी त्या निवडणुकांमध्येही आपले पुत्र, आप्तजन अशी युवा पिढी उतरवली, त्यांनी निवडणुका लढवल्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना बाजूला केले. महाराष्ट्रात त्या वेळी पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे पक्षात नवे नेतृत्वच उभे राहिले नाही. याचा परिणाम म्हणजे आज युवक काँग्रेसची अवस्था बिकट आहे. युवा कार्यकर्ते शोधून सापडत नाहीत. हे ग्राउंडवरील कार्यकत्याच्या बाबत झाले. मात्र केंद्रिय स्तरावरही काँग्रेसची अवस्था वेगळी आहे असे नाही. राहुल गांधी यांनी केंद्रात ’टीम राहुल’ अशी युवक नेत्यांची फळी निर्माण केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजीव सातव, जतिन प्रसाद, मिलिंद देवरा अशी तरुणांची टीम तयार केली. यामध्ये सुद्धा घराणेशाहीच होती. या टीममधील यूपीए-2च्या सरकारमध्ये देवरा, जतिन प्रसाद यांना स्थानही मिळाले. काँग्रेसचे एक बर्यापैकी युवा संघटन निर्माणही झाले.
 

vivek
 
2014मध्ये मोदी त्सुनामी आली. काँग्रेसचे पानिपत झाले. पण युवक काँग्रेस तरीही तग धरून राहिली. राहुल गांधी यांचे सुमार नेतृत्व मान्य करीत आपला पक्ष वाढवण्यासाठी निष्ठेने काम केले. त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात याचे फळ मिळाले. पण याची उचित दखल केंद्रस्तरावर घेतली गेली नाही. केंद्रीय स्तरावर सोनिया गांधींचे पक्षातील नियमित कामकाजातील लक्ष कमी होताच राहुल गांधी यांचेे पक्षातील वजन वाढले. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांनी या युवा कार्यकर्त्यांना बढती द्यायला हवी होती. आपले युवा कार्यकर्ते पक्षाचे भविष्य आहेत हेच त्यांना समजले नाही. कायम त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत गेले. वरिष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळताना मात्र पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या सूचना, त्यांचे पद, प्रतिष्ठा, पक्षातील मान, सन्मान यापासून त्यांना वंचितच ठेवले गेले. याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सरकारची. आपल्या पक्षाच्या भविष्याचा विचार न करता फक्त ज्येष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी दोन्हीकडे सरकार येताच ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांना डावलून मध्य प्रदेशात कमालनाथ आणि राज्यस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना संधी देण्यात आली. याचा कालावधी वर्ष ते दोन वर्षांसाठी असायला हवा होता. पण तसे झाले नाही. अखेर ज्योतिरादित्य सिंधिया पक्षाला रामराम करीत ते भाजपात समील झाले. यामुळे एक तरुण तर पक्षातून बाहेर पडलाच, त्याचबरोबर मध्य प्रदेशसारखे एक मोठे राज्य काँग्रेसच्या हातून निसटले. राज्यस्थानमध्ये सत्तांतर घडवण्यात सचिन पायलट यांचे कष्ट आहेत. पण राज्यस्थानात सत्ता येताच अशोक गेहलोतसारख्या ज्येष्ठ नेत्याला संधी दिली. अगदी मंत्रीमंडळातही पायलट समर्थकांना फारशी संधी मिळत नव्हती. अखेर सचिन पायलट यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. नाहीतर सत्ताही गेली असती आणि तरुण नेताही पक्षातून गेला असता.
 
vivek
 
पक्षाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या तुलनेत अजूनही तरुण आहेत, तरुणांचे नेतृत्व करीत पुढे आले आहेत, तरीही त्यांना पक्ष नेस्तनाबूत होत असताना पक्षाच्या तरुण ताकदीचा अंदाज येत नाही, याचे आश्चर्य वाटते. कारण काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. काँग्रेसची सध्याची अवस्था बघता काँग्रेस अध्यक्षपदाची माळ कोणत्यातरी तरुण व्यक्तीच्या गळ्यात पडेल, अशीच काँग्रेसच्या अनेक हितचिंतकांची अपेक्षा होती. पण काँग्रेस अध्यक्षपदाची माळ 80 वर्षांच्या खर्गेंच्या गळ्यात पडली, तीही अगदी नियोजनबद्धच.
 
 
काँग्रेस पक्षातील हेच लोण केंद्रीय स्तरातून राज्यस्तरावरही येते. आता महाराष्ट्रातही काँग्रेसची अवस्था स्थानिक संस्थानिकांसारखी आहे. एखादा नेता फक्त आपल्या संस्थानाविषयी (मतदारसंघाविषयी) विचार करतो. पक्ष म्हणून त्याचे काहीच घेणे-देणे नसते. आताच काँग्रेसचे भावी नेतृत्व म्हणून जे चार-पाच लोक सध्या काँग्रेसमध्ये दिसून येतात, त्यामध्ये सत्यजित तांबे यांचे नाव होते. नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांना पक्षाने तिकीट देणे अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून तयारीसुद्धा केली होती. आपल्या वडिलांच्या जागीच त्यांना काँग्रेसने संधी देणे अपेक्षित होते. पण त्यांना संधी न देता पक्षाने सुधीर तांबेंना पुन्हा तिकीट दिले. यामागे बाळासाहेब थोरातांचे बेरीज-वजाबाकीचे काही राजकारण आहे. तो भाग सोडला, तरी पक्षाने तरुणांचा विचार करायला हवा होता. आता जे व्हायचे ते होणार आहे. यामुळे भाजपाला एक चांगला युवा नेता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्याचबरोबर एक आमदारही मिळेल असे दिसते. केंद्रीय स्तरापासून काँग्रेसच्या गल्लीतील नेत्यांपर्यंत नेहमी हाच सावळा गोंधळ असतो. ज्येष्ठांना श्रेष्ठत्व देताना युवकांच्या पदरी निराशा येते, याचे भान नसते.
याउलट भाजपा तरुणांचा विचार करताना दिसून येत आहे. 2014मध्ये महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली. एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटत होते. पण पक्षाने देवेंद्र फडणवीस या युवा नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. भाजपा आज महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष झाला. तसेच उत्तराखंड, आसाम, मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत तरुण मुख्यमंत्री देऊन भाजपाने आपला पक्ष मजूबत केला आहे.