त्रस्त शेजारी

विवेक मराठी    19-Jan-2023
Total Views |
भारत हिंदुबहुल असला आणि सरकारी पातळीवरूनही अनेक कृतियोजनांमधून हिंदू धर्माचा डोळस अभिमान व्यक्त होत असला, तरी राज्यकारभारासाठी सांविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा केलेला अंगीकार हे या देशाचे बलस्थान आहे आणि तेच सर्व प्रकारच्या स्थैैर्यामागचे कारणही. यातून हे त्रस्त शेजारी काही धडा घेतील का? भारताबद्दल असलेले पूर्वग्रह आणि कलुषित मते दूर ठेवून भारताच्या प्रगतीमागची कारणे अभ्यासतील का?
 
vivek
 
 
‘एका दिवसाच्या फरकाने स्वतंत्र झालेल्या दोन देशांच्या सर्व क्षेत्रांतील प्रगतीमध्ये इतके अंतर पडलेले आहे की ते कोणत्याही प्रयत्नाने पाकिस्तान भरून काढू शकत नाही’ असे मत व्यक्त केले आहे 1971च्या युद्धात सहभागी झालेले पाकिस्तानच्या हवाई दलातील निवृत्त अधिकारी शहजाद चौधरी यांनी. त्यांनी हे विधान हवेत केलेले नाही, तर त्याच्या पुष्ट्यर्थ भारताच्या अलीकडच्या प्रगतीतील काही ठळक घटनाही आपल्या लेखात नोंदल्या आहेत. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि पाकिस्तानच्या दुर्दशेस जबाबदार असलेल्या अन्य घटकांना ही स्पष्टोक्ती बोचरी वाटली, तरी ती वस्तुस्थितीला धरून आहे. हे सांगणार्‍या व्यक्तीने देशासाठी सर्वोच्च योगदान दिलेले आहे, तिच्या मनात आपल्या देशाविषयी आदर आहे, तरी त्यांच्यावर पाकिस्तानात टीका झालीच. एखाद्या देशाची सर्व बाजूंनी किती दैन्यावस्था होते, याचे आजच्या काळातले एकमेव उदाहरण म्हणजे हा आपला शेजारी देश. मुळात केवळ धर्माच्या, त्यातही केवळ मूलतत्त्ववादी विचारांच्या हट्टाग्रहातून मूळ भारत देशाची फाळणी करून निर्माण झालेला हा देश. जेवढे पराकाष्ठेचे प्रयत्न स्वतंत्र देश मिळवण्यासाठी केले, तितकेच प्रयत्न या देशाला आकार देण्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी केले असते, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मात्र तसे धोरणी, भविष्यवेधी नेतृत्वही या देशाला आजतागायत लाभले नाही. त्यातून या देशाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत गेली. लष्कर आणि राज्यकर्ते यांच्या रस्सीखेचीत पहिल्यापासून अडकलेला हा देश हळूहळू जिहादी दहशतवाद्यांच्या, आयएसआयच्याही तावडीत सापडला. आणि त्यातूनच कोणत्याही प्रगतीचे वारे वाहणे कायमचे थांबले. देशवासीयांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवताना त्यांच्या मनात भारतद्वेषाची आग मात्र धगधगती राहील याची काळजी या सगळ्यांनी घेतली. भारतद्वेष हे जगण्याचे एकमेव कारण असावे, अशा पद्धतीने नागरिकांच्या मनात विषवल्ली रुजवली गेली. त्याची नशा इतकी जबरदस्त होती की लोकांना स्वत:च्या कंगालपणाचाही विसर पडावा.
 
 
अखंड भारताचा एक भाग असताना, तिथे असलेल्या अनेक दर्जेदार हिंदू शैक्षणिक केंद्रांमुळे जगभरात प्रतिष्ठा होती, मान होता. आज तिथले हे विद्यावैभव लयाला गेले आहे. हा देश फक्त इस्लामी धर्मांधांच्या हातचे बाहुले बनला आहे. कोणत्याही धर्माचे अस्तित्व संस्कृतीच्या आणि मूल्यांच्या जपणुकीवर अवलंबून असते, याकडे पाकिस्तानात झालेले साफ दुर्लक्ष आता त्या देशाच्या मुळावर उठले आहे.
 
 
आपल्या ताकदीचा, मर्मस्थानांचा विचार न करता भारताविरुद्ध ओढवून घेतलेली तीन युद्धेही त्यांना शहाणपण देऊ शकलेली नाहीत. ‘युद्धांपासून आम्ही धडा घेतला’ असे जरी त्यांच्या आत्ताच्या पंतप्रधानांनी विधान केले असले, तरी त्यामागे खरोखरीच पश्चात्तापाची, उपरतीची भावना आहे का? याविषयी शंका आहे. कर्जासाठी देशोदेशी हात पसरण्यापलीकडे आपले दारिद्य्र दूर करण्याचा कोणताही ठोस उपाय सापडलेला नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरची मागणी लावून धरणे म्हणजे त्यांच्या अविचारीपणाचे उत्तम उदाहरण.
 
 
निर्मितीपासूनच राजकीय, आर्थिक अस्थैर्य भोगत असलेल्या पाकिस्तानात आता आर्थिक संकटांनी कमाल मर्यादा ओलांडली आहे. कोणे एकेकाळी जगासाठी गव्हाचे कोठार असलेल्या प्रांतातल्या लोकांना आता पिठासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. वीजटंचाई, इंधनतुटवडा, धान्यटंचाई.. एक ना अनेक प्रश्न समोर उभे असताना त्यांच्यावर उपाय शोधण्याची धमक नेतृत्वात नाही. सौदी अरब अमिरात, कतार यासारख्या देशांनाही पाकिस्तानचे भविष्य कळून चुकल्याने चीनशिवाय कोणी वालीही उरलेला नाही. आणि धूर्त चीन तर मदत करण्याच्या नावाखाली आणखीच भिकेला लावण्याचीच शक्यता. आजवर चीनने तेच केले आहे. पाकिस्तानला आर्थिक मदत करत आपला गुलाम करून ठेवले आहे.
 
 
 
मात्र चीनचीही सध्याची अवस्था पाकिस्तानइतकी लाजिरवाणी नसली, तरी त्या देशांतर्गत उभ्या ठाकलेल्या समस्यांचा चीनचे नेतृत्व कसा सामना करते, यावर त्याचे वर्तमान आणि भविष्य अवलंबून आहे. जगातली आर्थिक महासत्ता अशी गेली काही दशके ओळख असलेला चीन लवकरच वृद्धांचा देश म्हणून ओळखला जाईल. सलग सहा वर्षे घटत असलेली लोकसंख्या आता या देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मुळावर येऊ शकते. लोकसंख्येत घट याचाच अर्थ मनुष्यबळाची निर्माण होणारी टंचाई, जी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम करू शकते. त्याच वेळी वृद्धांचा योगक्षेम पाहण्याची जबाबदारी आणि त्यातून आर्थिक बोजा वाढेल ते वेगळेच. अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या मंदावलेल्या दराचा फटकाही चीनच्या अर्थव्यवस्थेला बसतो आहे. या सगळ्यामुळे शी जिनपिंग यांच्यासमोर आणि पर्यायाने देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
 
 
 
सगळ्या जगाला कोविडची लागण देत, कोविडला हद्दपार केल्याचे भासवत जगाची दिशाभूल करणारा आणि आता पुन्हा कोविडच्या तडाख्यात अडकलेला देश. या वेळची लाट तर चीनमधील कोट्यवधी लोकांचा जीव घेऊन गेली. गेल्या तीन वर्षांत कोविडवर प्रभावी लस शोधण्यातही चीनला पूर्ण अपयश आले आहे. त्यामुळे आता भारताकडूनच लस घेण्याची नामुश्की ओढवली आहे.
 
 
 
अशा या दोन शेजारी देशांबरोबर राहत भारताने वेळोवेळी शेजारधर्म तर निभावला आहेच, त्याचबरोबर स्वत:ची जी सर्वांगीण प्रगती करून घेतली आहे, ती कौतुकास्पद आहे. जागतिक स्तरावरील राजकारणात प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध पावले टाकत आणि त्याला देशांतर्गत सुधारणांची जोड देत ही वाटचाल चालू आहे. त्यातूनच भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळली आहे.
 
 
भारत हिंदुबहुल असला आणि सरकारी पातळीवरूनही अनेक कृतियोजनांमधून हिंदू धर्माचा डोळस अभिमान व्यक्त होत असला, तरी राज्यकारभारासाठी सांविधानिक मूल्यांचा आणि लोकशाहीचा केलेला अंगीकार हे या देशाचे बलस्थान आहे आणि तेच सर्व प्रकारच्या स्थैैर्यामागचे कारणही. यातून हे त्रस्त शेजारी काही धडा घेतील का? भारताबद्दल असलेले पूर्वग्रह आणि कलुषित मते दूर ठेवून भारताच्या प्रगतीमागची कारणे अभ्यासतील का?