सामाजिक परिवर्तनाची चळवळसमता वारी

विवेक मराठी    20-Jan-2023
Total Views |
@अरुण कराड। 7744907983
  
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व ‘चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची’ मध्यवर्ती संयोजन समिती आयोजित समता वारीचे हे पाचवे वर्ष होते. रविवार 1 जानेवारी 2023 रोजी श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून बुधवार 12 जानेवारी 2023 रोजी जगद्गुरू संत तुकोबाराय जन्मभूमी, देहूगाव येथे या वारीचा समारोप झाला. या वारीने महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नाशिक, नगर, पुणे या 9 जिल्ह्यांतून 1700 किलोमीटर प्रवास केला. या वारीमध्ये संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हभप शिवाजीराव महाराज मोरे, ज्येष्ठ विचारवंत रमेश पांडव, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वाल्मिक निकाळजे यांच्यासह 25 समता वारकरी पूर्णवेळ होते.
 
vivek
 
मंगळवेढा येथे ज्या ठिकाणी संत चोखामेळा महाराजांचे देहावसान झाले, त्या ठिकाणाहून दि. 1 जानेवारी 2023 रोजी समता वारीचे प्रस्थान झाले. संत चोखोबांना जिवंतपणी सामाजिक विषमतेचे चटके सहन करावे लागले. पण मृत्यूनंतरही चोखोबा महाराजांची अवहेलना सुरू आहे. त्यांची समाधी आजही रस्त्याच्या मध्यभागी चार ु चार फुटाच्या जागेत आहे. पण यापुढे चोखोबांचे चांगले स्मारक उभे राहील, असा लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे या लोकप्रतिनिधींनी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी शब्द दिला. चोखोबांना आणि अस्पृश्यतेचे असमानतेचे चटके बसलेल्यांना परत सन्मान मिळवून द्यायचा, असा संकल्प करून वारीचे प्रस्थान झाले.
 
 
 
संतांच्या वारीतील समतेच्या आणि समानतेच्या विचाराचा समाजात प्रसार करण्यासाठी समता वारीचे आयोजन करण्यात आले. संतांनी वारीच्या माध्यमातून सर्व जातीपातीचे वारकरी एकत्रित करून सामाजिक बंधुभावाची भावना निर्माण केली. यातून सकल समाज वारकरी संप्रदायाच्या ध्वजाखाली एकत्रित झाला. तशाच प्रकारे समाजाला एकत्र आणण्यासाठी समता वारीच्या माध्यमातून पंढरीच्या वाळवंटातील समानतेचा संदेश पंढरीकडून समाजाकडे घेऊन जाण्यात समता वारी यशस्वी झाली आहे. वारीत प्रवास करताना त्याचा प्रत्यय आला.
 

vivek 
 
पंढरपूरला विठ्ठल मंदिर दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद आणि सहन्याहारी झाली. तोपर्यंत शेजारी राहत असलेल्या गुजराती मेहतर समाजाच्या प्रतिनिधींनी समता वारी आमच्या वस्तीत यावी अशी इच्छा व्यक्त केली. (पंढरपूरला वारीमुळे निर्माण होणारी मानवी विष्ठा उचलण्यासाठी गुजरातहून हा मेहतर समाज महाराष्ट्रात आणला होता. अठराव्या शतकापासून ही मंडळी येथेच राहत आहेत. पण त्यांना हक्काचे घर नाही. मानवी विष्ठा उचलण्यासारखा त्रास आता बंद झाला. पण अवहेलना चालू आहे.) मेहतर समाजाच्या मंडळींनी आपली समस्या मांडली. समता वारीच्या माध्यमातून आम्हालाही सामान्य पंढरपूरकराप्रमाणे आम्ही ज्या भूमीवर राहत आलो आहोत तीच जमीन मिळावी, हीच समता वारीकडून अपेक्षा आहे.
 
 
समता वारीसारखा सामाजिक उपक्रम राबवणार्‍या लोकांकडून अपेक्षा ठेवणे किती रास्त आहे हे ठरवणे अवघड आहे. पण ही चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करणारी माणसे आहेत. आपल्यासाठी चांगले प्रयत्न नक्की करतील, हा विश्वास समता वारीचे फलित आहे असे मी मानतो.
 
 
समस्या ऐकून घेऊन वारीने अरण (संत सावता महाराज यांची जन्मभूमी) येथे प्रस्थान केले. येथील सिंहगड इंजीनिअरिंग महाविद्यालयात बोलताना प्रमुख वक्ते आमदार राम सातपुते म्हणाले, “हा समाज माझा आहे आणि हा देश माझा आहे हा भाव मनात ठेवून समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. समता वारी म्हणजे अठरापगड जातींना एकत्रित करणे. सर्वांना समान संधी व अधिकार मिळालेच पाहिजेत अशी वारीमागची भूमिका आहे.”
 

vivek 
 
सोलापूर शहरातील बाळीवेस येथे वडार समाज व ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे समाधी मंदिरात रांगोळी काढून, टाळमृदुंगाच्या गजरात समता वारीचे स्वागत करण्यात आले. ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे समाधी मंदिरातील समता सभेत बोलताना लातूरचे माजी प्रा. सुनील गायकवाड म्हणाले की “आपले समाजवास्तव बदलणे, सामाजिक समतायुक्त वातावरण निर्माण करणे आणि सामाजिक सौहार्द निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आपण आपला सहभाग नोंदविला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही ’चोखोबा ते तुकोबा समता वारी’ आयोजित करत आहोत.”
 
 
 
त्यानंतर तुळजापूर, धाराशिव येथील प्रमोद महाजन महाविद्यालय, भोसले हायस्कूल, वाघोली ता.जि. धाराशिव, तेर (संत गोरोबा काका समाधी), कसबे तळवडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी महार-मांग वतनदार परिषद घेतली), भूम, जि. धाराशिव, खर्डा, चौंडी (पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी) जामखेड, कुसळंब, सावरगाव घाट (संत भगवान बाबा यांची जन्मभूमी), गहिनीनाथगड (संत वामनभाऊ महाराज कर्मभूमी), चिंचपूर पांगुळ, तारकेश्वरगड, पैठण (संत एकनाथ महाराज मंदिर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नारेगाव, सिंदखेड राजा (राजमाता जिजाऊंची जन्मभूमी), मेहुणा राजा (संत चोखोबा महाराज जन्मभूमी), वैजापूर असा प्रवास करून समता वारी येवला येथे पोहोचली. (तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरणाची शपथ घेतली होती.) येथील समता सभेत निलेश गद्रे म्हणाले, “येवला ही डॉ. बाबासाहेब बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथूनच डॉ. बाबासाहेबांनी समतेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता आणि असमानता याविषयी ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या, त्या सगळ्या गोष्टी समाजातून उचलून फेकण्याचे काम या समता वारीच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे. आपल्या सर्व संतांनी, महापुरुषांनी परिवर्तनाची चळवळी उभी केली. ही समता वारी ती चळवळ पुढे घेऊन जाणारी आहे.”
 
 
 
काळाराम मंदिर, नाशिक येथे बोलताना वाल्मिक निकाळजे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांना पाच वर्षे काळाराम मंदिराबाहेर आंदोलन करून प्रवेश मिळाला नाही. काळाराम मंदिराच्या वेळेच्या व्यवस्थापकाने मंदीर प्रवेश नाकारला. ते अयोग्य होते. पण सध्याच्या व्यवस्थापकांनी आमच्या पूर्वजांनी चूक केली, ती चूक दुरुस्त करत सर्व जातिधर्मातल्या लोकांना बोलावून त्यांच्या हातून श्रीरामाची आरती करून घेतली आणि त्याचबरोबर सहभोजनही केले. सामाजिक समतेसाठी ही एक चांगली सुरुवात आहे.”
यानंतर शिर्डी, टाकळीभान, शेंडी, नगर, सुपा, पिंपळनेर (संत निळोबारायांची जन्मभूमी) या गावांमध्ये वारीचा प्रवास झाला.
 
 
 
राळेगणसिद्धी येथे समता सभा झाली. त्या वेळी अण्णा हजारे म्हणाले, “संतांचे विचारच समाजाला तारू शकतात. तरुण वयात निळोबारायांच्या दिंडीत गेलो. त्यामुळे मला अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याग, समर्पण करण्याची सवय लागली.त्यामुळे देशविदेशात जेवढे पुरस्कार मिळाले, त्यातील सर्व रक्कम समाजाला देऊन टाकली. संतविचारामुळे मोह, माया यांचा त्याग करता येतो. याच संतांची समता समाजात पोहोचवण्याचे आवश्यक काम ही समता वारी करत आहे. अशा वारीला माझ्या खूप खूप शुभेच्छा.”
त्यानंतर शिरूर येथे थिटे महाविद्यालय, वढू बुद्रुक (छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा फुलेवाडा, पुणे येथील संत गाडगेबाबा धर्मशाळा, संगमवाडी (वस्ताद लहुजी साळवे समाधिस्थळ), आळंदी (संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर) असा प्रवास करून देहूगाव (संत तुकाराम महाराज जन्मभूमी) येथे वारीचा समारोप झाला. त्या वेळी आयोजित समता सभेत बोलताना बाळासाहेब चौधरी म्हणाले, “संत तुकाराम महाराजांनी संत चोखोबांचे मंदिर बांधलेले आहे. संत तुकोबा महाराजांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केलेले आहे. या समता वारीचा समारोप देहू गावात होत आहे. ही समता वारी समाजात हजारो किलोमीटर जाऊन जातिभेद, वर्णभेद याविषयी प्रबोधन करून जनजागृती करत आलेली आहे आणि समता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील घटकांना आवाहन करत आहे.”
समता वारीतून 26हून जास्त समता सभा, 7 महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद, 10 शोभायात्रा अशा विविध माध्यमांतून लोकांपर्यंत समतेचा संदेश पोहोचवला.