गोर बंजारा समाजाचा संस्कृती कुंभ

विवेक मराठी    20-Jan-2023
Total Views |
तांड्यांमध्ये राहणार्‍या हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजात राष्ट्रविघातक शक्तींनी आपले जाळे फेकले आहे. या समाजाची मंडळी काही प्रमाणात याला बळी पडलेली असल्याचे समाजातील जागरूक मंडळींच्या लक्षात आले आहे. हा कुटिल डाव मोडून काढण्यासाठी धर्माभिमानी संतमंडळींनी हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाच्या जागृतीची आवश्यकता हिंदुप्रेमी मंडळींच्या लक्षात आणून दिली. त्यावर चर्चा होऊन समाजातील सर्व संतांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय जागरण समन्वयाच्या सहकार्याने आपल्या समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी एक कुंभमेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या वर्षीच्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्या निमित्ताने या कुंभमेळ्याच्या उद्देशावर प्रकाश टाकणारा लेख.

vivek
देशभरातील हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाचा या वर्षीचा कुंभमेळा जळगाव जिल्ह्यातील गोद्री (ता.जामनेर) येथे 25 ते 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाचे आराध्य दैवत श्री पोहरादेवी म्हणजेच बंजारा समाजाची काशी समजल्या जाणार्‍या पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरू परमपूज्य श्री बाबूसिंगजी महाराज व हिंदू गोर बंजारा लबाना-नायकडा समाजातील अन्य परमपूज्य संत सदर कुंभमेळ्याचे निमंत्रक आहेत.
 
 
 
पाच दिवस चालणार्‍या या कुंभमेळ्यात पल्ला-मूर्तिस्थापना- कृष्णलीला-अरदास-भोग लावणे व संत सेवालाल अमृतलीला यांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील प्रख्यात संत महापुरुषांचे आशीर्वाद, प्रबोधन व प्रवचन, तसेच अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लबाना-नायकडा समाजाच्या परंपरा, रितीरिवाजांचे, पारंपरिक चालीरितींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. भजन, नगारा खेळ, पारंपरिक पेहरावात पुरुष व महिला पट खेळणे, साहसी खेळ व तलवार उचलणे या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
 
 
 
देशभरातील प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व पंजाब या राज्यांमधील सहा लाखांपेक्षा अधिक हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजबांधव यात सहभागी होणार आहे. यात देशभरातून शेकडो संत, हजारो नाईक कारभारी उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
मागील काही वर्षांत राष्ट्रविघातक शक्तींनी जनजाती समूहातील मंडळींच्या मनात ‘आपला वेगळा धर्म आहे’ असे बिंबविण्यास सुरुवात केली आहे. हा एका षड्यंत्रकारी योजनेचा भाग आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी केलेल्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचाच हा भाग आहे.
 
 
 
ब्रिटिशांनी कुदृष्टीने विचार करून हिंदूंचे खच्चीकरण करण्याकरता अनेक मार्गांचा अवलंब केला. त्याकरिता शैक्षणिक, पारंपरिक व्यवसायांत व संपन्न शेती व्यवसायात हस्तक्षेप करून हिंदूंची मूळ संस्कृती संपविण्याचा डाव शिताफीने खेळला. त्यांनी वनवासी व भटक्या जाती-जमातींवर लक्ष केंद्रित केले आणि तुम्ही हिंदूंपासून कसे वेगळे आहात, हे त्यांच्या मनात ठसविण्यासाठी जनगणना हे एक आयुध म्हणून वापरले गेले. 1931नंतर जनगणनेत अनेक धर्मकोड निर्माण केले गेले. त्या वेळी हे कोणाच्या लक्षात आले नाही, पण त्याची फळे आज आपण भोगत आहोत. सर्व छोट्या छोट्या जाती-जमातींमध्ये वेगळा धर्मकोड लिहिण्यासाठी उद्युक्त करणे हा राष्ट्रविघातक शक्तींचा कुटिल डाव आहे.
 
 
vivek
 
ब्रिटिशांनी प्रथम चलाखीने हिंदूंपासून शीख, बौद्ध आणि जैन या समाजांना वेगळे केले. 5249 विविध संस्कृती दाखवून त्यांना आपापसात लढवत ठेवण्याचाही त्यांचा डाव होता. 1931 साली जनजातींना हिंदूंपेक्षा जनगणनेत वेगळे दाखविले गेले. तेव्हापासून जनगणना 8 श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. या श्रेणी म्हणजेच धर्मकोड. 1) हिंदू, 2) मुस्लीम, 3) ख्रिश्चन, 4) जैन, 5) बौद्ध, 6) शीख, 7) अन्य धर्मावलंबी (Other Religions Persuasions - ORPs) 8) धर्म नाही सांगितला (Religion Not Stated - RNS ) असे हे धर्म कोड आहेत.
 
 
 
1991 ते 2001 या कालावधीत ‘अन्य धर्मावलंबी’ या धर्मकोडमध्ये वाढ झालेली आढळून येते. ही वाढ होण्यासाठी ब्रिटिश काळापासून जनगणनेत हेतुपुरस्सर घुसडण्यात आलेले धर्मकोड कारणीभूत आहेत. त्याची फळे आता दिसू लागली आहेत. याच धर्मकोडचा वापर करण्यासाठी आताच्या राष्ट्रविघातक शक्ती जनजाती आणि भटक्या जमातींना उद्युक्त करत आहेत.
 
 
 
वनवासी क्षेत्रातील आणि गावगाड्याबाहेरच्या जाती-जमातींमध्ये राष्ट्रविघातक शक्तींना आता अधिक सुपीक जमीन दिसू लागली. भारताचा ईशान्य भाग हा तसा मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित भाग. त्यांनी आता तिकडे नजर वळविली आणि सर्व जनजातींना एकमेकांपासून वेगळे पाडून आपापसात लढवीत ठेवले. भारतविरोधी मानसिकताही तयार करण्यात त्यांना बर्‍याच प्रमाणात यश आले. त्यातूनच बोडोलँड, नागालँड, गोरखालँड यासारखी देश तोडणारी आंदोलने उभी राहिली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील गोंडवनाची मागणी असो की भिल्लस्तानची मागणी, तसेच बिहार-ओेदिशामध्ये सरना धर्माची मागणी जोर धरू लागली आहे. हिंदूंपासून वेगळे पाडलेल्या शिखांनी, खलिस्तानसाठी भारताला अनेक वर्षे वेठीस धरले होते. डावे, साम्यवादी, विशिष्ट विचारधारा असलेले पत्रकार यांनी तर ब्रिटिश गेल्यावर त्यांची मूलनिवासी संकल्पना घेऊन युनोपर्यंत मजल मारली. बाह्य राष्ट्रांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. हिंदूंचे आणि पर्यायाने भारताचे खच्चीकरण करण्याकरिता फोडा आणि राज्य करा ही नीती आजही वापरात आहे.
बंजारा कुंभ ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न.........


vivek

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाज कुंभाचा ध्वजारोहण सोहळा 8 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. या वेळी प्रमुख साधुसंतांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे आणि पांढर्‍या ध्वजाचे पूजन करून ध्वज उभारण्यात आला. कुंभाचा हा कार्यक्रम फक्त धार्मिक नसून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी असल्याचे प्रतिपादन प.पू. बाबूसिंग महाराज (पोहरागड) यांनी केले.
ध्वजारोहणा प्रसंगी संत गोपाल चैतन्यजी बाबा, संत सुरेश बाबा, संत रामसिंगजी महाराज, संत यशवंतजी महाराज, महंत जितेंद्र महाराज, संत रायसिंगजी महाराज, संत शामचैतन्यजी महाराज, महामंडलेश्वर जनार्धन हरी महाराज, प.पू. हिम्मतजी महाराज, वे.शा.सं. साहेबरावजी शास्त्री, प.पू. विशुद्धानंदजी महाराज, संत सर्वचैतन्य महाराज, प.पू. दिव्य चैतन्य महाराज, प.पू. शांती चैतन्य महाराज, अ.भा. धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, क्रीडा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन उपस्थित होते.
या वेळी संत जितेंद्र महाराज यांनी आपल्या मनोगतात वर्तमान स्थितीत मोठ्या प्रमाणात धर्माची हानी होत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच धर्मरक्षणासाठी हा कार्यक्रम असून यात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
संत कबीरदास महाराज यांनी आपल्या प्रतिपादनात गोर बंजारा समाजाने देशाला जागृत करण्याचे काम केले असल्याचे सांगितले. संत गोपाल चैतन्य महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज आणि संत बाबूसिंग महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात गोर बंजारा समाजाला या कुंभाच्या निमित्ताने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
शरदराव ढोले यांनी समारोपीय भाषणात “जहाँ हिंदू घटा, वहा भूभाग फटा..धर्माचे रक्षण कराल तर देशाचे रक्षण होईल, आपल्या विविध जाती-जमातीमधून हिंदुत्व निघून गेले, तर देश निघून जाईल” असे सांगितले. हिंदुत्व हाच आपल्या राष्ट्राचा आधार आहे आणि आपल्याला वेळोवेळी त्याचा जागर करावा लागणार असल्याचे सांगितले. नंदकुमार गिरजे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
  
भटके विमुक्त समाजात 40-42 जाती आहेत. त्यातील बारा जाती गुन्हेगारी जमाती म्हणून ब्रिटिशांनी आधीच वेगळ्या पाडल्या व समाजापासून त्यांना तोडण्यात आले. भटक्या जमातींनी आपला हिंदू धर्म प्राणप्रतिष्ठेने जपण्यासाठीच, आपल्या मूळ स्थानापासून भटकत ते देशाच्या अनेक भागांत राहिले. आज जो काही धर्म शिल्लक राहिला आहे, तो यांच्यामुळेच. पण ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे त्यांचे खच्चीकरण केले व हिंदूंच्या मुख्य प्रवाहातून ते वेगळे पडत गेले. डावे, लिबरल, साम्यवादी यात कशी फूट पाडता येईल यासाठी नक्षलवादी, अर्बन नक्षलवादी यांच्यामार्फत समाजात भ्रम पसरवत आले आहेत. वनवासी, भटके व दलित समाजाला मुख्य प्रवाहापासून वेगळे करण्यासाठी ते कार्यरत असतात.
 
 
 
तांड्यांमध्ये राहणार्‍या हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजात राष्ट्रविघातक शक्तींनी आपले जाळे फेकले आहे. या समाजाची मंडळी काही प्रमाणात याला बळी पडलेली असल्याचे समाजातील जागरूक मंडळींच्या लक्षात आले आहे. जनगणनेत आपला वेगळा धर्मकोड असावा व हिंदूंमध्ये आपली गणना होऊ नये, असे त्यांना सांगण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. हा कुटिल डाव मोडून काढण्यासाठी धर्माभिमानी संतमंडळींनी हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाच्या जागृतीची आवश्यकता हिंदुप्रेमी मंडळींच्या लक्षात आणून दिली. त्यावर चर्चा होऊन समाजातील सर्व संतांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय जागरण समन्वयाच्या सहकार्याने आपल्या समाजाला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी एक कुंभमेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे.
 
 
 
या समाजाला संतांचे आवाहन आहे की, आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, आपल्या परंपरा, चालीरिती यांचे योग्य प्रकारे पालन करून हिंदू समाजाबरोबर हिंदू म्हणूनच पिढ्यानपिढ्या आपण राहत आहोत. त्यामुळे कोणाच्याही थोतांडाला बळी न पडता, आपण येणार्‍या 2023च्या जनगणनेमध्ये आपला धर्म हिंदूच सांगणे गरजेचे आहे. कारण धर्मांतर हेच राष्ट्रांतर आणि आपले पूर्वज धर्म वाचविण्यासाठीच जिवावर उदार होऊन लढले. आपणही त्यासाठीच आपले देव घेऊन परागंदा होऊन रानोमाळ भटकत राहिलो, पण धर्म सोडला नाही. त्यामुळे हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाला कोणताही वेगळा धर्मकोड मागण्याची आवश्यकता नाही. हिंदू म्हणून आम्ही गुण्यागोविंदाने नांदत राहू यासाठीच कुंभ 2023मध्ये सर्व समाजबांधवांना आपल्या पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यात येणार आहे.
 
 
- श्यामचैतन्य महाराज
अध्यक्ष, संचलन समिती,
अखिल भारतीय गोर बंजारा व लभाना-नायकडा समाज कुंभ 2023