@रवींद्र प्रभुदेसाई
ऊस हे महाराष्ट्राचे मुख्य नगदी पीक समजले जाते. काळ्या मातीची शान असलेला ऊस कोकणच्या लाल मातीत पिकत नाही, असे मानले जाते. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मातीतून सोनेही पिकवता येते आणि त्याचे मूल्यवर्धन करता येते, याची प्रचिती उद्योजक, शेतकरी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या यशस्वी ऊस शेती प्रयोगातून येते.
पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊस पीक, साखर उद्योग यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, त्याप्रमाणे कोकणातही उसाची लागवड करता येईल का? यासाठी मी अनेक वर्षे अभ्यास करत होतो. कोकणात भरपूर पाणी आहे, पण उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही, कारण पाण्याचे योग्य नियोजन नाही. ऊस शेतीचे कसे? आपल्याकडे ऊस पिकाबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यामुळे कोकणात उसाची लागवड करणे योग्य आहे का? असेही अनेकांनी मत व्यक्त केले. योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास उसातून आर्थिक उन्नती साधता येते, असाही एकाने सल्ला दिला. ठिंबक सिंचनातून उसाचे किफायतशीर उत्पन्न घेता येते, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी ऊस शेतीकडे वळलो.

2015 सालची गोष्ट असावी. तळवड्याच्या अडीच एकर जमिनीवर ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी जमिनीची पूर्वमशागत केली. त्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर केला. नांगरणीपूर्वी जमिनीत शेणखत टाकले. लागवडीसाठी अधिक उत्पन्न देणार्या ’86032’ या सुधारित ऊस वाणाचा वापर केला. उसाचे बेणे वारणानगर (कोल्हापूर) येथून आणले. लागवडीसाठी दोन सरीतील अंतर 2 फूट ठेवले. लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याला ठिंबक सिंचनाद्वारे नत्रयुक्त खतांची व सेंद्रिय व जैविक खातांची मात्रा दिली. पीक चार महिन्यांचे होईपर्यंत दोन वेळा खुरपणी केली. प्रारंभी बाळबांधणी व तीन महिन्यानंतर मोठी बांधणी केली. पाचव्या महिन्यात उस नऊ फुटांपर्यंत वाढला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऊस सतरा ते अठरा फूट झाला.
फेब्रुवारीत उसाची तोडणीची वेळ आली, तेव्हा कोकणात ना साखर कारखाने आहेत, ना उसाची गुर्हाळे. त्यामुळे उसाचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा देशावर करंजेपण येथील गुर्हाळात ऊस नेण्यात आला. उसाचे उत्पादन एकूण 85 टन निघाले. त्यातून 10 टन गूळ तयार झाला.
जमिनीचा पोत, उसाचे एकरी उत्पादनाचे गणित लक्षात घेता आम्हाला पहिल्याच प्रयोगात उसाचे लक्षणीय उत्पादन घेता आले. कोकणाच्या लाल मातीत उसाचे समाधानकारक उत्पादन घेता येते, हे आम्ही सिद्ध करून दाखविले. त्यानंतर 2019मध्ये सौंदळे (ता. राजापूर) गावी 55 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यात प्रारंभी ’92005’ जातीच्या उसाची लागवड केली. 2021साली याच जमिनीत पुन्हा ’86032’ ऊस वाणाची लागवड केली.

उपलब्ध उसाचा उपयोग करीत 2017 साली पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.ने तळवडे येथे सेंद्रिय गुळाचे उत्पादन करणारे गुर्हाळ सुरू केले. यापासून आरोग्यपूर्ण, शुद्ध सेंद्रिय गुळाचे उत्पादन घेतले. उसाचा रस तापवताना तयार होणारी मळी दूर करण्यासाठी रानभेंडीसारख्या पूर्णत: नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे गुळाचा स्वाद अतिशय उत्तम आहे. उसाचा रस गरम करण्यासाठी न गंजणार्या स्टेनलेस स्टीलची सोय करण्यात आली आहे. 2022 साली या पारंपरिक पद्धतीलाच आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देण्यात आली. नवीन क्रशरमार्फत डबल क्रशिंग होत असल्याने अधिकाधिक रस गाळला जातो. पूर्वी उरलेली चिपाडे उन्हात वाळवून नंतर ती गूळ तयार करण्यासाठी जळण म्हणून वापरली जायची. यामध्ये वेळ व मनुष्यबळ दोन्हीही अधिक लागत असे. आता नवीन पद्धतीत क्रशरमधून निघालेली चिपाडे लगेचच जळणासाठी वापरता येतात. कन्व्हेयर बेल्ट, प्रीहीटिंग टँक आणि ड्रायर अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री इथे बसविण्यात आली आहेत. यामुळे दररोजच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे.
_202301201813539014_H@@IGHT_316_W@@IDTH_600.jpg)
सध्या लोकप्रिय होत असलेल्या ’पितांबरी रुचियाना’ या गूळ पावडरच्या ब्रँडला गृहिणींची पसंती मिळत आहे. ’पितांबरी रुचियाना’ गूळ पावडर पाचशे ग्रॅमच्या पाकिटाद्वारे आशिया खंडासह युरोप, आखाती देशात पोहोचली आहे. पितांबरीच्या या ऊस प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळले आहेत. कोकणातही ऊस लागवड केली जाते ही माहिती अनेकांकरिता नवीन असली तरी तळवडे, पाचल, करक या परिसरात अंदाजे 120 एकरांवर उसाचे क्षेत्र आहे. काही शेतकरी पितांबरीबरोबर वार्षिक करार करतात. पितांबरीकडून शेतकर्यांना वाजवी दर दिला जातो. त्यामुळे बहुतांश शेतकरी आपला ऊस पितांबरीकडे देतात. त्यामुळे कोकणातील उसाला पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांऐवजी विक्रीसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याच वेळी स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ऊस पिकाचे हे छोटेसे मॉडेल कोकणाच्या शेती विकासाचे आश्वासक पाऊल आहे.
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून 9867112714/9900058565 या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता.