दिव्यांग क्षमता उत्सव संपन्न विद्यार्थी संपन्न

विवेक मराठी    23-Jan-2023
Total Views |
@शुभदा ओक -सातपुते 

दिव्यांगधारा प्रतिष्ठान आणि संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवादसेतू नाट्यस्पर्धा २०२२' दिव्यांग आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा उत्सव स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी ७ जानेवारी रोजी  पारितोषिक वितरण समारोह उत्साहात पार पडला.
 

vivek
 
या कार्यक्रमाचा आधारवड म्हणावयास हवे असे विशेष अतिथी आमदार व भाजपा मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिषजी शेलार उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई घाटकोपर गॅलॅक्सी यांचा या प्रकल्पाला विशेष सहयोग होता. ह्या क्लबच्या श्रीमती पद्मा राममूर्तीजी आणि अन्य सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
 
प्रमुख वक्ते म्हणून योगेशजी सोमण( संचालक, अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस, मुंबई विद्यापीठ) उपस्थित होते आणि त्यांनी दिव्यांग आणि नाटक, नाटक आणि संवाद, नवीन राष्ट्रीय शिक्षण प्रणाली आणि दिव्यांग याबाबत आपले विचार स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे सहकार्यवाह व मुंबई महानगरचे संजयजी माळकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विशेष निमंत्रित म्हणून आशुतोष गोखले हे प्रसिद्ध युवा अभिनेते या वेळी आपले हजेरी लावून आणि मुलांना जीव लावून गेले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा श्रीमती मंजिरी मराठे यांचाही या कार्यक्रमाला आवर्जून सहभाग होता. सर्व परीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून कलावंत, नाट्यात निपुण असे वैभवजी निमकर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शनपर शब्द सांगितले व भविष्यातील काही योजनांविषयी आपले विचार मांडले. दादर, ठाणे , डोंबिवली आणि नाशिक या चार ठिकाणी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात या नाट्यस्पर्धा घेतल्या गेल्या. संस्कार भारतीचे, तसेच काही अन्य कलाकार व विशेष शिक्षक यांच्यातर्फे नाटकांचे परीक्षण झाले व बक्षिसांची निवड झाली. एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.
 
 
vivek
 
८ ते १८ हा वयोगट या स्पर्धेसाठी घोषित केला होता. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित नाट्यकृती, नृत्य-नाट्य,एकपात्री प्रयोग करणे अपेक्षित होते. विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठीही ही स्पर्धा आयोजित केली होती. एकूण २२ शैक्षणिक संस्थांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये दिव्यांगांच्या व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या संस्थांचा अंतर्भाव होता. कर्णबधिर, मतिमंद (शाळा व कार्यशाळा) अंध, अनाथाश्रम व सर्वसामान्य शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी अशा ५ प्रवर्गांनी या स्पर्धेत भाग घेतला.
 
 
संवाद चमत्कार घडवतो किंवा घडवू शकतो. संवादाचे स्वरूप सहज पण हेतुपुरस्सर असावे , विचार करण्यास प्रवृत्त करणारा संवाद असावा. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न नसावेत. उत्तरे, गर्भित अर्थकल्पनेला ताण, उद्गार काही गोष्टींचे संदर्भ, विद्यार्थ्याला काय समजले? याचा अंदाज घेणारे चेहर्‍यावरचे हावभाव आणि देहबोली, धड्यामागील लेखकाचा हेतू काय असेल? कोणत्या काळातली, वातावरणातली ही घटना असेल. थोडक्यात नाट्य आणि संवाद आणि संवाद आणि माणसाचा वैचारिक भावनिक, सामाजिक विकास एकमेकांना पूरक आहे, याचे प्रत्यंतर या नाट्यकृती बसवताना व बघताना आले.
 
 
vivek
 
नाट्यस्पर्धेची वैशिष्ट्ये -
 
* ह्या स्पर्धेत खुणा आणि बोलणार्‍या मुलांना बक्षिसे देताना एकच क्रमांक दोन्ही पद्धतींना देण्यात आला व समान रक्कम देण्यात आली.
 
 
* सहभागी संस्थांचा दिव्यांगधारा प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला.
 
 
* प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
 
* प्रत्येक संस्थेला क्रमांकाप्रमाणे ३००० ते १००० रुपयांपर्यंत रक्कम बक्षीस म्हणूनही देण्यात आली.
 
 
* नृत्य - नाट्य, एकपात्री सादरीकरणालादेखील बक्षिसे देण्यात आली.
 
 
* तसेच अभिनय, स्वतःच्या सादरीकरणाचे निवेदन विद्यार्थ्यांनीच करायचे, त्यालाही वेगळे बक्षीस देण्यात आले.
 
 
* कर्णबधिर विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचेसाठी (बोलण्यासाठी ) खास बक्षिसे देण्यात आली.
 
 
* स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात आले नाही.
 
संवादसेतू नाट्यस्पर्धेत खालील संस्था सहभागी झाल्या -
कर्णबधिर मुलांच्या शाळा
 
१) विकास मंदिर कर्णबधिरांची शाळा, नाशिक
 
२) प्रगती विद्यालय, दादर
 
३) रोटरी स्कूल फॉर द डेफ, डोंबिवली
 
 
४) कमलिनी विद्यालय, ठाणे
 
 
५) पडसाद कर्णबधिर विद्यालय, नाशिक
 
६) साधना विद्यालय, दादर
 
 
७) वैयक्तिक सहभाग (२)
 
 
मतिमंद मुलांच्या शाळा
 
 
८) प्रगती प्रतिष्ठान, मीरा विद्यालय.
 
९) विकास मंदिर
 
१०) जिद्द
 
११) शिरोडकर स्कूल
मतिमंद कार्यशाळा
१२) विकास मंदिर, नाशिक
१३) आव्हान पालक संघ
१४) जागृती
१५) किमकॅन
अनाथाश्रम
१६) जीवनसंवर्धन, ठाणे
१७) जीवनसंवर्धन, टिटवाळा
१८) श्रद्धानंद महिलाश्रम
अंधशाळा
१९) कमला मेहता अंधशाळा.
मुलांच्या शाळा व कनिष्ठ सर्वसामान्य महाविद्यालय
२०) बालमोहन विद्यामंदिर प्राथमिक, माध्यमिक
२१) पीईएस हायस्कूल
२२) कीर्ती कॉलेज, दादर.
सांगण्यास आनंद होतो की पूर्ण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सर्व मिळून ६०च्यावर सादरीकरणे प्रस्तुत केली. अधिक चांगली गोष्ट की दिव्यांगांनी ४७ सादरीकरणे प्रस्तुत केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दर्जेदार स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी तितक्याच दर्जेदार आणि नावाजलेल्या परीक्षकांचा आम्हाला लाभ झाला. यापुढे प्रतिष्ठानच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्याची आणि मार्गदर्शन करण्याची त्यांनी तयारी दर्शविली, ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.