संशोधनात्मक कार्याची आत्मनिर्भरता

विवेक मराठी    24-Jan-2023
Total Views |
प्रवर देशपांडे। 9028614014
 ‘आत्मनिर्भर भारत’ हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने भरघोस प्रयत्न केले जात आहेत. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर असावा, यासाठी कार्य करणार्‍या नाशिकस्थित भोर केमिकल्स अँड प्लास्टिक्स प्रा.लि. या कंपनीच्या कार्यासंबंधी माहिती देणारा लेख.
 
bhor
आपण किनार्‍यावर उभे राहून पाण्याकडे पाहत बसलो, तर नदी पार करता येणार नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागेलच. आजच्या जागतिक व्यासपीठावरील विविध क्षेत्रांत हे सूत्र तंतोतंत लागू होते. विशेषत: संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयोग, जोखीम घेण्याची तयारी आणि विचारशील कृती यांची नक्कीच आवश्यकता असते.
 
 
नाशिकस्थित भोर केमिकल्स अँड प्लास्टिक्स प्रा.लि. ही कंपनी याच ध्येयाने कार्यरत असून भारताला संरक्षण क्षेत्रात आपल्या विविध संशोधनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यात ‘भोर’चा वाटा नक्कीच महत्त्वाचा आहे.
 
 
प्रत्येकात काही अंगभूत कौशल्ये असतात, त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले कौशल्य कसे ओळखावे याबाबत कर्मचारिवर्गाला प्रशिक्षण देणे व तसे वातावरणदेखील उपलब्ध करून देणे या तत्त्वास अनुसरून ‘भोर’मध्ये कार्य केले जाते.
बुद्धी व मन यात कायमच द्वंद्व सुरू असते. भावनेने काम करताना अनेकदा बुद्धीचा वापर कमी होताना दिसतो. शिक्षण पद्धती ही ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असते. बुद्धीची देणगी केवळ मानवाला मिळाली आहे. त्यांचा विकास होण्यासाठीचे वातावरण ‘भोर’मध्ये उपलब्ध असल्याचे येथे सहज जाणवते.
 
 
bhor
 
 ‘भोर’चे संचालक डॉ. मिलिंद खांदवे

 
भोर केमिकल्स अँड प्लास्टिक्स प्रा.लि. ही कंपनी 2011मध्ये सुरू झाली. फॅब्रिक्स, इंटरमीडिएट, हाय परफॉर्मन्स मटेरियल आदी संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची असणारी उत्पादने येथे बनविली जातात. संरक्षण क्षेत्राला नेमक्या कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबत ‘भोर’मध्ये सातत्याने अभ्यास केला जात असतो. भारताच्या विविध क्षेपणास्त्रांमध्ये वापरण्यात येणार्‍या विविध भागांच्या निर्मितीसाठीचा कच्चा माल येथे बनविला जातो.
 
 
 
रॉकेटमध्ये व सॅटेलाइटमध्ये वापरण्यात येणार्‍या मटेरियलसाठीचे ‘प्री प्रेग’ हे विशेष उत्पादन भारतात केवळ ‘भोर’मध्येच निर्मित होत आहे. मुख्यत: ‘एरोस्पेस’मध्ये याचा वापर होत असतो.
 
 
रुस्तम, स्विफ्ट, घातक या भारतीय ड्रोनच्या जडघडणीसाठीचा कच्चा माल ‘भोर’तर्फे बनविला गेला आहे.
 
 
bhor
 
आगामी ‘अंमका’ (advance medium combact aircraft) या भारतीय बनावटीच्या विमानासाठी रडारमध्ये दिसणार नाही अशा प्रकारचे मटेरियल बनविण्यासाठी भारतातील विविध संरक्षण संशोधन संस्थांत सध्या अभ्यास सुरू आहे. त्या अभ्यासासाठी आवश्यक असणार्‍या विविध घटकांची पूर्तता ‘भोर’मार्फत करण्यात येत आहे.
 
 
‘भोर’ हा केवळ एक व्यवसाय नसून संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी या क्षेत्रात आपण कार्यरत असल्याची भावना ‘भोर’चे संचालक डॉ. मिलिंद खांदवे व्यक्त करतात.
 

bhor 
 
सध्या भारताला कार्बन फायबर कंपोझिटमध्ये वापरले जाणारे बेसिक मॉलेक्यूल आयात करावे लागत आहेत. ते मटेरियल भारतात तयार व्हावे यासाठीचे संशोधन येथे सुरू आहे. भविष्यात भारताला या उत्पादनाचा पुरवठा बंद झाल्यास कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी हे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत दोन मॉलेक्यूल बनविले गेले आहेत.
 
 
कोणत्याही प्रकारच्या विमानात असलेल्या रडारसाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे रेडोम होय. हा एक प्रकारचा रडारचा मॉनिटर असतो. हा बनविण्यासाठी विविध प्रकारच्या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते. त्याचे पाहिले तंत्रज्ञान ‘भोर’मार्फतच बनविले गेले. त्यासाठीची आवश्यक असणारी यंत्रसामग्री ‘भोर’मार्फत बनविली गेली. विविध रसायनेदेखील बनविली. या कामी सुरू असलेले कार्य विनाअडथळा पार पडावे यासाठी आवश्यक असणारे बेसिक मटेरिअलही बनविले गेले आहे.
 
 
आगामी काळात क्रिटिकल कॉम्पोनेन्ट्स संपूर्णत: बनविण्याचा ‘भोर’चा प्रयत्न आहे. तसेच, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कार्बन मटेरियलचा वापर करून रेट्रो फिटिंगचे कार्यदेखील ‘भोर’मार्फत केले जाते.
 
 
सातत्याने बदलणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताच्या संरक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनाला अनेकदा खीळ घालत असतात. त्यामुळे भारत हा स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर असावा, म्हणून ‘भोर’मार्फत सातत्याने कार्य केले जात आहे.
 
 
स्वत:चा विचार व विवेक यांचे रक्षण करण्यासाठी संरक्षण यंत्रणा असणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय यात मोलाचे योगदान देऊ शकतो. यासाठी भारताच्या महान वेदान्ताचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी डॉ. खांदवे व्यक्त करतात.
 
 
संशोधक म्हणून भारतासमोरील आव्हानांकडे बघताना डॉ. खांदवे सांगतात की, भारतीय शिक्षण पद्धतीत अजूनही मूलभूत विचार व पक्की धारणा याबाबतची कमतरता दिसून येते.
 
 
भारतीय वेदान्त हा कोणत्याही धर्माचा विषय नसून त्यात मानवी जीवनपद्धतीचे व्यवस्थापकीय सूत्र आहे. जर मानवी जीवनात व शिक्षण क्षेत्रात त्याचा वापर केला, तर भारताला गतवैभव नक्कीच प्राप्त होईल, याचा प्रत्येक भारतीयाने व विशेषत: तरुणांनी विचार करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. खांदवे व्यक्त करतात.
 
 
स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झालेली असताना भारत आज नेमका कुठे आहे? असा प्रश्न सुजाण नागरिक विविध स्तरांवर विचारताना दिसून येतात. भारताचा जडणघडणीत आणि सध्याच्या भारताच्या असलेल्या स्थितीत अनेकांचा हातभार लागला आहे. भारत आत्मनिर्भर असावा अशी मनोकामना राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचीच आहे.
‘भोर’सारखे उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक हे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या कामी मोलाचे योगदान देत आहेत.
 
 
भारताच्या शेजारी असलेल्या देशांपासून भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करण्याचे मनसुबे कायमच आखले जात असतात. मात्र, भारताची भरभक्कम संरक्षण यंत्रणा कायमच शेजारच्यांचे मनसुबे उधळून लावताना दिसून आली आहे.
 
 
कोणत्याही राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राहण्याठी सुरक्षा हे महत्त्वाचे अंग आहे. सुरक्षा या विषयात आत्मनिर्भर असणे हे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. त्यातही यास भारतीय वेदान्तांच्या विचारसरणीची जोड मिळणार असेल, तर व आत्मनिर्भरता आत्मविश्वासाने प्रेरित झालेली असेल, तर देशाची सुरक्षा साधने नक्कीच परिपूर्ण व भक्कम असतात. ‘भोर’मध्ये संशोधित होणारी सुरक्षा साधने भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी नक्कीच महत्त्वाचे योगदान देणारी आहेत.
नाशिकच्या पवित्र गोदाकाठी अत्यंत पावित्र्याने व शुद्धतेने ‘भोर’चे सुरू असलेले हे कार्य बारमाही प्रवाही असलेल्या गोदेप्रमाणेच अखंड व अविरत सुरू राहावे, हीच शुभेच्छा!