‘पद्मश्री’ रमेश पतंगे !

समरसतेच्या अग्रदुताचा सन्मान

विवेक मराठी    25-Jan-2023
Total Views |
नवी दिल्ली : सामाजिक समरसतेचे ‘अग्रदूत’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
केंद्र सरकारतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस परंपरेप्रमाणे ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक समरसतेसाठी अखंड कार्यरत, भटके आणि विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भरीव कार्य करणारे आणि हिंदुत्व चळवळीमध्ये मोलाचे वैचारिक योगदान देणारे ज्येष्ठ विचारक रमेश पतंगे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
 
पद्मश्री रमेश पतंगे 
 
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष असणारे रमेश पतंगे हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करताना त्यांनी प्रामुख्याने सामाजिक समरसतेची संकल्पना विकसित करून हिंदुत्व चळवळीस बळकट करण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यांच्या सक्रीय सहभागातूनच सामाजिक समरसता मंच आणि भटके – विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. या दोन्हींचे ते संस्थापक सदस्य आहेत. सामाजिक समरसतेच्या माध्यमातून त्यांनी हिंदू सारा एक ही भावना जोरकसपणे समाजापुढे मांडली. त्याचप्रमाणे समरसता साहित्य परिषदेच्या स्थापनेमध्येही त्यांचा प्रमुख वाटा आहे.
हिंदुत्ववादी विचारक म्हणून रमेश पतंगे यांनी आपली भूमिका मांडताना कोठेही तडजोड अथवा भय बाळगले नाही. हिंदुत्व चळवळीसाठी जे जे आवश्यक, ते ते करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी साप्ताहिक विवेकच्या संपादकपदावरून महाराष्ट्रातील वैचारिक आणि सामाजिक अवकाशामध्ये भरीव योगदान दिले आहे. विचारांची केवळ मांडणी करून न थांबता ते विचार यशस्वीपणे प्रत्यक्षात आणण्यासाठी सिंहाचा वाटा देणारे संपादक, अशी त्यांची विशेष ओळख. असे उदाहरण महाराष्ट्रात काय, संपूर्ण भारत देशातही विरळेच असेल. महाराष्ट्रात अस्तंगत होत असलेली प्रबोधन चळवळ पुन्हा उर्जितावस्थेत आणणाऱ्या मध्ये रमेश पतंगे यांचा मोठा वाटा असून विचाराला कृतीची जोड देणाऱ्या शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांचे वैचारिक भरण पोषण रमेश पतंगे याच्या लेखनातून झाले आहे.
 
‘मी, मनू आणि संघ’ या आपल्या पुस्तकाद्वारे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जाणीवपूर्वक पसरविण्यात येणाऱ्या अपप्रचारास आपल्या विशेष शैलीद्वारे उत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे आणिबाणीचा विरोध केल्यामुळे त्यांनी १४ महिन्यांचा तुरूंगवासदेखील भोगला आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून साप्ताहिक हिंदी आणि मराठीमध्ये लिखाण करत आहेत. मराठीमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये भारतीय राज्यघटना नेमकेपणाने समजावून सांगणारे त्यांचे लिखाण विशेष ठरले आहे.
 
 
 
28 January, 2023 | 13:2
 
 https://www.vivekprakashan.in/book/
 
बहुभाषिक
 
1. मी, मनु आणि संघ (हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलगू आदी भाषांमध्ये अनुवादित)
2. संघर्ष महामानवाचा (हिंदी आणि मराठी)
3. सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहब आंबेडकर (मराठी आणि हिंदी)
4. डॉ. आंबेडकर आणि राष्ट्रबांधणी (मराठी आणि हिंदी)
मराठी पुस्तके
1. महामानव अब्राहम लिंकन
2. सामाजिक न्यायाचा योद्धा - मार्टिन ल्यूथर किंग
3. बुकर टी वॉशिंग्टन... जेव्हा गुलाम माणूस होतो
4. समरसता
5. संघभाव
6. रक्तरंजित मध्यपूर्व - इतिहास आणि वर्तमान
7. पाकिस्तान सेक्युलर राज्य ते धर्मांध राज्य
8. गांधी समजून घेताना
9. बहुस्पर्शी आंबेडकर
10. बहुस्पर्शी विवेकानंद
11. समरसतेचा वाटसरू
12. अंगुस्तान ते लेखणी
13. जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत
14. युक्रेन आणि पुतीन
15. कथामृत
16. कथा लोकप्रज्ञेच्या
17. सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा
18. अखंड भारत - का आणि कसा?
19. स्मरण, समन्वय आणि संवाद
20. डॉक्टर आणि श्रीगुरुजी
21. संघ, समाज आणि मोदी
संविधान
 
भारतीय राज्यघटनेवर आठ पुस्तकांचे लिखाण
1. आम्ही आणि आमचे संविधान (हिंदी आणि मराठी),
2. आपले मौलिक संविधान (हिंदी आणि मराठी)
3. आपले संविधान - तत्त्वविचार, मूल्य संकल्पना, ध्येयवाद (हिंदी आणि मराठी)
4. अमेरिकन संविधान - ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नाविन्य (मराठी)
5. ब्रिटिश संविधान - उद्गम आणि विकास (मराठी)
6. फ्रेंच संविधान - क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचाल (मराठी)
7. स-संविधानाचा... (मराठी, हिंदी, इंग्रजी),
8. रशिया - एकपक्षीय राज्यघटना (मराठी),
(प्रकाशनाच्या मार्गावर)
संपादित ग्रंथ
संघसरिता या शीर्षकाखाली जिल्हाश: संघ इतिहासाचे ग्रंथ
• ठाणे संघसरिता (दोन खंड)
• मुंबई संघसरिता (दोन खंड)
• पुणे संघसरिता (दोन खंड)
• नाशिक संघसरिता (दोन खंड)
• देवगिरी संघसरिता
• रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघसरिता
• खान्देश संघसरिता
• नगर संघसरिता
• कोल्हापूर-सांगली-सातारा संघसरिता
अन्य ग्रंथ
• राष्ट्ररत्न अटलजी
• राष्ट्रऋषी श्रीगुरुजी
• गो-विज्ञान
• कृतिरूप विवेकानंद
• राममंदिर ते राष्ट्र मंदिर (हिंदी आणि मराठी )
• लोकनेता ते विश्वनेता - नरेंद्र मोदी
(मराठी, हिंदी, इंग्लिश)
• अमृत पथ
• राष्ट्रसाधना
• भाजपा 25
• संघगंगोत्री
• समाजसंघटक मुकुंदराव पणशीकर
 
पुरस्कार
 
 • महाराष्ट्र शासनातर्फे ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार’
• मध्य प्रदेश शासनातर्फे ‘माणिकचंद वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’
• अखिल भारतीय साहित्य सभेतर्फे ‘साहित्य पुरस्कार’
• श्यामा प्रसाद न्यासातर्फे ‘बौद्धिक योद्धा सन्मान’
• ‘शंकरराव खरात पुरस्कार’
• पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ‘नचिकेता पुरस्कार’
• महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट वैचारिक वाङ्मयनिर्मिती पुरस्कार’
 
 
अशी आहे सामाजिक – राजकीय – वैचारिक कारकिर्द
 
आणीबाणीच्या काळात अखिल भारतीय जनसंघर्ष समितीचे सचिव रवींद्र वर्मा यांच्यासह त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मिसबंदीमध्ये चौदा महिने ठाणे कारागृहात.
 
आणीबाणीनंतर 'उद्योग कृषी विकास मंडळ' या सेवा संस्थेच्या संचालकाची जबाबदारी सात वर्षे. ही संस्था उद्योजकता प्रशिक्षण वर्ग, कृषी पर्यटन, लघुउद्योग प्रशिक्षण वर्ग इत्यादी आयोजित करते.
 
1985 ते 2005 पर्यंत साप्ताहिक विवेकचे संपादक
सामाजिक समरसता मंच, वाटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद, प्रबोधन परिषद, समरसता अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य
समरसता साहित्य परिषदेतर्फे 1998 पासून आतापर्यंत 19 साहित्य संमेलनांचे आयोजन. त्यांनी 17 व्या साहित्य संमेलनाची जबाबदारी स्वीकारली.
 
2018 मध्ये ठाणे येथे आयोजित सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे भटक्या जातीच्या विकासासाठी यमगरवाडी (जिल्हा धाराशिव), अन्सारवाडा (जिल्हा लातूर), पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड प्रकल्पांच्या संरक्षकाची जबाबदारी.
 
समरसता मंच मासिकाचे दीर्घकाळ संपादक
सध्या हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष
 
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या वतीने साप्ताहिक विवेक (मराठी), हिंदी मासिक, विभाग, विवेक विचार मंच, शैक्षणिक विवेक येथे कार्यरत.