दोन शून्यांची शंभर होण्याची धडपड

विवेक मराठी    25-Jan-2023   
Total Views |
@देविदास देशपांडे 
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या दोघांच्या एकत्र येण्याने राजकारणात काडीमात्रही फरक पडणार नाही. सुषमा अंधारेंच्या येण्यामुळे जसे शिवसेनेचे जमिनीवरील बळ न वाढता उलट कमीच झाले, कार्यकर्त्यांची पळापळ आधीपेक्षा जास्त झाली, तोच प्रकार याही वेळेस होणार आहे.
 

vivek 
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घटनेची केवळ चर्चा सुरू होती, ती अखेर मंगळवारी (23 जानेवारी) रोजी घडली. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार, मात्र शेंडी-जानव्याचा तिरस्कार करणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि असदुद्दीन ओवेसीसह सर्व हिंदुद्वेष्ट्यांना जवळ करणारी वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. खरे तर अधिकृतरित्या युती झाली, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण बाजारात कितीही गप्पा झाल्या, तरी या दोन्ही पक्षांकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तर या युतीच्या चर्चेला थेट छपरी पातळीवर आणून सोडले होते. “शिवसेनेशी युतीबाबत आमचे काहीही ठरलेले नाही, सध्या आमचे केवळ लाइन मारणे चालू आहे” या भाषेत त्यांनी अधिकृत घोषणेच्या केवळ दोन दिवस आधी वक्तव्य केले होते. त्या बातमीचे संदेश फॉरवर्ड होण्याचे सत्र सुरू असतानाच त्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करून टाकली.
 
 
 
मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात करणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांची ऐतिहासिक युती झाली. नायगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या भरगच्च संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. देशाला सध्याच्या वैचारिक प्रदूषणातून मोकळा श्वास घेण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधानाचे पावित्र्य टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही युती म्हणजे ‘नये रास्ते, नये रिश्ते’ असल्याचे ते म्हणाले, असे वृत्त या संबंधात सामनाने दिले आहे. त्यातली गंमत बारकाईने वाचणार्‍यालाच कळेल.
 
 
 
संपूर्ण देशाच्या राजकारणात या युतीमुळे नवे पर्व सुरू होणार असेल, तर त्यात मुंबई आणि महाराष्ट्र हे ओघाने आलेच. पण ठाकरे यांच्या शिवसेनेच्या घरच्या वृत्तपत्राला मुंबई आणि महाराष्ट्र यांचा वेगळा उल्लेख का करावा लागला असेल बरे?
 

vivek 
 
याला कारण सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे नावाच्या कर्तृत्ववान नेत्याने ठाकरे यांच्या पायाखालून खेचलेले जाजम होय. त्या जाजम खेचण्यामुळे उद्धव ठाकरे जे तोंडावर आपटले, ते आजपर्यंत सावरलेले नाहीत. उलट दलदलीत फसलेल्या माणसाने बाहेर येण्यासाठी धडपड करावी आणि त्यामुळे दलदलीत आणखी रुतत जावे, अशी ठाकरे यांची अवस्था झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी शरद पवार नावाच्या दलदलीत ठाकरे अडकले आणि त्यात वरचेवर फसत चालले आहेत. या फसलेपणातूनच आपली शेवटची पुंजी म्हणजे मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे यांनी आता आंबेडकर यांना गळ घातल्याचे दिसत आहे.
 
 
 
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्यातून महाशक्तीचे सूतोवाच होण्याऐवजी घराणेशाहीचे केविलवाणेपण तेवढे समोर आले. कारण या दोन्ही नेत्यांकडे ‘सांगे वडिलांची कीर्ती’ या उक्तीप्रमाणे दुसरे काहीही नाही. आपापल्या पातळीवर अपयशाचे धनी बनलेल्या या दोघांमध्येही ना संघर्षाची धग, ना समंजसपणाचा साठा. ठाकरे यांनी निव्वळ मोदीद्वेषापायी पवारांच्या ताटाखालचे मांजर होणे स्वीकारले आणि प्रकाश आंबेडकरांनी हिंदुद्वेषापायी नको त्यांच्याशी संग केला. या कर्मदरिद्रीपणातून दोघांच्याही पदरात पडले काय? तर भले मोठे शून्य. एकेकाळी मुंबईवर अधिराज्य गाजवणारे आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा वाटा मिळालेले ठाकरे घराणे अर्थहीन झाले आहे, तर साक्षात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेले अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर एका समाजापुरते मर्यादित झाले आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांकडे आज एकमेव अकोला जिल्हा परिषद आहे, तीसुद्धा भाजपाने (शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी) दिलेल्या पाठिंब्यामुळे! या दोन शून्यांनी मिळून आता शंभर होण्याची धडपड सुरू केली आहे आणि त्यांच्यातील ’एक’नाथाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या एकत्र येण्याची गरज बोलून दाखवली होती, हे खरे. त्यासाठी त्यांनी हातही पुढे केला होता, हेही खरे. मात्र ती भीमशक्ती कुठली? हिंदू धर्म सोडण्यासाठी नाना आमिषे दाखविली जात असतानाही “माझ्या देशाचा घात होईल असा कोणताही धर्म मी स्वीकारणार नाही” हे करारीपणे सांगणार्‍या बाबासाहेबांची भीमशक्ती! त्यांचा नातू मात्र ’नारा-ए-तदबीर अल्ला हू अकबर’ची घोषणा उर्मटपणे देणार्‍या ओवेसीशी जुळवून घेतो, त्याची पाठराखण करतो, देशाच्या मुळावर उठलेल्या नक्षलवाद्यांची तरफदारी करतो आणि त्यांच्याशी उद्धव ठाकरे सूत जमवतात.
 
 
बरे, या सूत जमवण्यात तरी ताळमेळ असावा की नाही? तर तेही नाही. कारण भाजपाला दगा देण्यासाठी ठाकरे यांनी 2019मध्ये ज्यांच्याशी सोयर जमवले होते, त्यांचे ते सोयर त्यांनी अजूनही तोडलेले नाही. तोवरच त्यांचे हे गुटर-गूं सुरू झाले आहे. त्यामुळे त्या आधीच्या सोयर्‍यांना आपली नाराजी व्यक्त करावी लागली.
 
 
 
ठाकरे व आंबेडकर यांनी घोषणा करण्याच्या एक दिवस आधीच आंबेडकर यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या नाराजीचे बिंग फोडले. शिवसेना व आमची युतीबाबत बोलणी झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. मात्र आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी सध्या चर्चा करत आहे. सर्वांनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असे उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. याचा अर्थ ठाकरे यांना एक प्रकारे महायुतीचीच घोषणा करायची होती, मात्र या दोन पक्षांच्या घुश्शामुळे त्यांना ते करता आले नाही. प्रत्यक्ष घोषणेच्या वेळीही या दोन पक्षांपैकी कोणी तिथे उपस्थित नव्हते.
 
 
 
आंबेडकर तर या वक्तव्याच्याही एक पाऊल पुढे गेले. “काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेले होते. परंतु आम्ही त्यांना नाकारलेले नाही, आम्ही केवळ दलितांपुरते मर्यादित राहावे अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे. ती आम्हाला मान्य नाही” असे ते म्हणाले. “शरद पवार यांच्याशी आमचे जुने मतभेद आहेत आणि ते दूर झाल्याशिवाय आम्ही त्यांच्याशी युती करू शकत नाही” असेही ते म्हणाले. आता हे जुने मतभेद कोणते, याबाबत मात्र काही सांगितलेले नाही.
 
 
 
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत 14 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे नुकसान झाले. आता आंबेडकरांनी मार्ग बदलल्यामुळे यापुढे मतविभागणी टाळता येईल व लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करता येईल, असे मनातले मांडे सामनाने अग्रलेखातून मांडले. मातोश्रीच्या ताटाखालचे मांजर असलेल्या माइकबहाद्दरांनीही तोच कित्ता गिरवला. परंतु समजा, उद्या निवडणुकीत ही सगळी मंडळी एकत्रपणे उतरली, तर उमेदवारी वाटपाच्या वेळेस वंचितला त्या प्रमाणात जागा द्याव्या लागतील. याला राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची तयारी आहे का? या संदर्भात अजित पवार यांनी केलेले भाष्य मोठे मार्मिक आहे.
 
 
 
“अशी काही युती झाल्याचे माध्यमातून कळाले आहे. मी (अजित पवार) आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. या भेटीत स्पष्टपणे चर्चा करू आणि नंतर आमची भूमिका मांडू” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी कोणाला मित्रपक्ष म्हणून घ्यावे आणि त्यांच्या कोट्यातून घ्यावे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले. याचाच अर्थ उद्या आंबेडकर यांना सोबत घ्यायला राष्ट्रवादीने व काँग्रेसने रुकार दिला, तरी तो ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या जिवावर देणार आणि त्याची किंमतही ठाकरे यांना मोजावी लागणार. म्हणजे जो पक्ष शून्य झालाय, तो महाशून्य होणार!
 
 
 
त्यामुळेच या दोघांच्या एकत्र येण्याने राजकारणात काडीमात्रही फरक पडणार नाही. सुषमा अंधारेंच्या येण्यामुळे जसे शिवसेनेचे जमिनीवरील बळ न वाढता उलट कमीच झाले, कार्यकर्त्यांची पळापळ आधीपेक्षा जास्त झाली, तोच प्रकार याही वेळेस होणार आहे. बेडूक कितीही फुगला तरी बैल होणार नाही आणि शून्य कितीही एकत्र आले, तरी शंभर होणार नाहीत!

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक