भरड धान्य विषयात काम करणारे पुण्यातील उरुळी कांचन येथील तरुण उद्योजक, अॅग्रोझी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, कृषी पदवीधर महेश लोंढे यांची भरड धान्य संशोधनासाठी बर्लिन (जर्मनी) येथे निवड झाली आहे. या निमित्ताने त्यांच्या भरड धान्य प्रक्रिया उद्योगाच्या यशाची कहाणी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ या.
@महेश लोंढे
माझी गोष्ट तशी साधी आहे. मी मूळचा पंढरपूरचा. सध्या पुण्यातील उरुळी कांचन येथे स्थायिक आहे. माझं कुटुंब शिक्षण क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे घरात शेतीचा कोणताही वारसा नाही. कृषी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर MBA (Rural Management and Project Management) पदवीनंतर शेती, विशेषत: पारंपरिक भरड धान्यांवर काम करायचं ठरवलं. खरं तर, भरडधान्यांवर काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली ती माझ्या आईकडूनच. माझ्या आईला मधुमेह होता. दर महिन्याला उपचारासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च होत होता. मधुमेह नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल? याच्यावर माझा अभ्यास सुरू झाला. मधुमेह आटोक्यात आणायचा असेल तर व्यायामाला व पथ्याला जेवढं महत्त्व दिलं जातं, तेवढंच महत्त्व पौष्टिक आहारालाही दिलं पाहिजं, असं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर असा आहार लोकांसमोर कशा पद्धतीने आणता येईल याचा अभ्यास केला. त्यासाठी भारतीय भरड धान्य संशोधन केंद्र (IIMR) येथे प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षित झाल्यावर मी राहत्या घरीच भरड धान्यांवर प्रक्रिया करून त्यापासून नाचणीचे लाडू, बिस्किटं, ज्वारी-बाजरीची बिस्किटं, पोहे, नूडल्स, रवा शेवया, उपमा रवा, इडली रवा, चिवडा, पीठ इ. उत्पादनं तयार केली. यामुळे आईला पौष्टिक आहार मिळालाच, शिवाय पुढे चालून माझ्या भरड धान्य प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
उद्योगाची उभारणी
‘अॅग्रोझी’च्या स्थापनेची संकल्पना उदयास आली. ’अॅग्रोझी’ भरड धान्य आधारित उत्पादन संपूर्ण प्रक्रिया आणि वितरण संबंधित काम करणारी एक स्टार्टअप कंपनी आहे. स्टार्टअप सुरू करण्यामागची संकल्पना माणसांच्या आजच्या अतिशय मूलभूत अशा समस्येशी आणि गरजेची संबंधित अशी आहे.
’अॅग्रोझी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड’ या उद्योग प्रक्रियेत समाविष्ट असणार्या कंपनीचा संस्थापक होण्यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांबरोबर काम करण्याचा अनुभव गाठीशी बांधलेला होता. आदिवासी पाड्यात काम करत असताना तिथे घेण्यात येणार्या नाचणी, भगर, सावा या सर्व पारंपरिक धान्यांबद्दल कुतूहल निर्माण होत गेलं. प्रशिक्षणकाळात अधिकारी आणि भरड धान्य यामध्ये पूर्वीपासून कार्यरत असलेल्या व्यक्तींशी संपर्क वाढवला. हा व्यवसाय उभा करण्यासाठी पाच लाखांपर्यंत गुंतवणूक केली होती, दोन लाखांपर्यंत खर्च मशीनरीसाठी झाला. अथक प्रयत्नांनी या व्यवसायाची उलाढाल आता 55 लाखांपर्यंत पोहोचली आहे.
अशी होते कच्च्या मालाची खरेदी
भरड धान्य प्रक्रियेसाठी लागणारा कच्चा माल नंदुरबार, नाशिक, अहमदनगर व पालघर या जिल्ह्यांतून खरेदी केला जातो. शेतकरी गट व महिला बचत गट यांच्याकडून वरई, भगर, राळे ही भरड धान्यं खरेदी केली जातात व ज्वारी, बाजरी अहमदनगर व औरंगाबाद येथून खरेदी केली जाते. नाचणी कोल्हापूर येथून शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून खरेदी केली जाते. सावा आणि कोद्रा ही धान्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक या बाहेरील राज्यांतील शेतकरी गटामार्फत खरेदी केली जातात.
उत्पादनांची निर्मिती व व्यवस्थापन
सध्या ’मिलेट नाऊ’ या ब्रँडअंतर्गत विविध भरड उत्पादनांची निर्मिती केली जाते. या ठिकाणी बेकरी उत्पादनापासून ते पिठापर्यंत सर्व उत्पादनं तयार केली जातात. यामध्ये तीन प्रकारची प्रक्रिया केली जाते. या तिन्ही प्रक्रिया उरुळी कांचन येथील युनिटमध्ये केल्या जातात. ही उत्पादनं ग्राहकांपर्यंत दोनशे ग्रॅमपासून ते एक किलोपर्यंत पोहोचवली जातात. या उत्पादनांचं पॅकेजिंग व्हॅक्युमाइज्ड असल्याने त्यांची टिकवण क्षमता सहा महिने ते एक वर्षापर्यंत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता तीनशेहून अधिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उद्योगातून सतरा लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाचं नीट व्यवस्थापन केलं जातं.
बाजारपेठेत मागणी
बाजारपेठांमध्ये ज्वारी, सावा, बाजरी, नाचणी, भगर, राळ, वरई, कोडो, सामा या धान्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये आमच्या उत्पादनांना पसंती मिळत आहे. पुणे, बारामती, हडपसर, फलटण अशा अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरवली. तसंच फेसबुक, इन्स्टाग्राम व्हॉट्सअॅप, वेब पोर्टल या माध्यमांतून मार्केटिंग करून ग्राहकवर्गापर्यंत पोहोचता आलं आहे.
शेतकरी व महिला बचत गटांना प्रशिक्षण
भरड धान्यांचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही शेतकर्यांना भरड धान्यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचं प्रशिक्षण देतो. याशिवाय बचत गटातील महिलांच्या, अंगणवाडीमध्ये मुलांच्या आहारात हे कशा पद्धतीने आणता येईल यावरदेखील आम्ही काम करत आहोत. महिला बचत गटांना लाडू, बिस्किटं तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे. येत्या काळात उमेद (एमएसआरएलएम) यांच्याबरोबर महाराष्ट्रातील महिलांना प्रशिक्षण देणार आहोत. सध्या ओडिशा राज्यात महिलांसाठी इन्क्युबेशन सेंटरसाठी मदत करत आहे. अशा प्रकारचं सेंटर महाराष्ट्रात उभं राहावं, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे.
शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
सध्या मी ’वर्किंग ग्रूप ऑन मिलेट’ (प्रक्रिया आणि विपणन) या कोअर टीमचा सदस्य आहे. या अंतर्गत फेब्रुवारी 2023मध्ये दिल्ली येथे धोरणात्मक सुधारणा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 2028पर्यंत भरड धान्य शेतकर्यांचं उत्पन्न कसं दुप्पट करता येईल? असा तो अजेंडा आहे. या कामासाठी ’वर्किंग ग्रूप ऑन मिलेट’ कोअर कमिटी आणि ऑग्रोझी एकत्रित येऊन त्यासाठी प्रभावी पावलं उचलत आहे. माझ्या कामाची दखल घेऊन भरड धान्य संशोधनासाठी बर्लिन (जर्मनी) येथे माझी निवड झाली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारतातील भरड धान्यांची माहिती पोहोचवण्याची संधी मिळाली आहे.
- महेश लोंढे, भरड धान्य प्रक्रिया उद्योजक
उरुळी कांचन, पुणे
। 87999 96254
------------------------------------------------------
भरड धान्य पाककृती
राळ्याचा शिरा
साहित्य - राळ अर्धी वाटी, चण्याची डाळ पाव वाटी, दूध आवश्यकतेनुसार, तूप 2 चमचे, सुकामेवा आवश्यकतेनुसार, गूळ पाऊण वाटी, वेलदोडा पावडर अर्धा चमचा, पाणी 2 ग्लास.
कृती -
एका कढईमध्ये चणाडाळ घेऊन त्यामध्ये पाणी घालावं व ते झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्यावं. त्यामध्ये धुतलेलं राळ टाकावं आणि ते मऊ होईपर्यंत शिजू द्यावं. दुसर्या एका वाटीमध्ये गूळ घेऊन त्यामध्ये पाणी घालावं व ते मध्यम गॅसवर पाच मिनिटं गरम करून घ्यावं. नंतर त्यामध्ये गरम केलेला गुळाचा पाक, वेलदोडा पावडर व दूध घालून ते शिजू द्यावं. दुसर्या एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून सर्व ड्रायफ्रूट्स तळून घ्यावी व ती शिर्यामध्ये घालावी.