@अपूर्वा फडके-संत
डॉ. प्राजक्ता दांडेकर-जैन ह्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन आणि संशोधनात कार्यरत आहेत, डॉ. प्राजक्ता यांनी नॅनोमेडिसिन लॅबमध्ये संशोधन केले आहे. औषधांच्या टेस्टिंगसाठी लागणारा प्राण्यांचा वापर कमी करता येईल असे संशोधन त्यांनी केले आहे. नुकतेच त्यांना रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
डॉ. प्राजक्ता दांडेकर-जैन ह्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन आणि संशोधनाचं कार्य करतात. बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी, बायोलॉजिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी इन ड्रग डिलिव्हरी अशा क्षेत्रांत त्यांची नॅनोमेडिसिन रिसर्च ग्रूप ही लॅब संशोधन करते. संशोधन कार्यातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना नुकताच जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांताचा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांची इथवरची वाटचाल पाहून,
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे॥
या बोरकरांच्या ओळींचे स्मरण होते.
भारतात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आयसीटी, मुंबई) डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केली. त्यानंतर पती रत्नेश जैन ह्यांच्यासह भारतात परत येऊन आयसीटीमध्ये अध्यापनाचं कार्य सुरू केलं. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांची अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात एकत्र वाटचाल चालू आहे.
एक अत्यंत प्रसन्न, ऊर्जावान आणि ऊर्जादायक तरीही शांत व्यक्तिमत्त्व असं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करता येईल. या पुरस्कारानिमित्त त्यांच्याशी गप्पा मारणं हा एक आनंदानुभव होता. डॉ. प्राजक्ता ह्यांनी त्यांचा आजवरचा प्रवास आणि त्यामागचा कार्यकारणभाव मोकळेपणाने उलगडून सांगितला.
त्यांचा जन्म आणि बालपण दादरमधलं. घरातलं वातावरण सुशिक्षित आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत होतं. कुटुंबात सुसंवाद होता. निर्णयस्वातंत्र्य तर होतंच, पण ते सजग होतं. परिणामांची जबाबदारीची जाणीव करून देणारं! मग ती रोजच्या दिनक्रमातली साधीशी गोष्ट असो की करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यातला मोठा निर्णय. ‘सगळ्या बाजूंचा समग्र विचार करून निर्णय घे, पण तू चुकलास/लीस, तर आम्ही तुझ्या मागे आहोत’ असा सार्थ विश्वास देणारे पालक त्यांना लाभले. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर त्यांना अत्यंत सुरक्षित आणि आनंदी बालपण लाभलं.
दांडेकर कुटुंबात जवळजवळ सगळेच पेशाने डॉक्टर. त्यामुळे अशा घरातल्या मुलीचा ओढा वैद्यकीय क्षेत्राकडे असणं अगदी साहजिक होतं. मात्र डॉक्टरांच्या ह्या कुटुंबात कला, इतिहास, मंदिरांचं स्थापत्यशास्त्र हेदेखील अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. वर्षाकाठी नातेवाइकांबरोबर होणार्या सहली, प्रदर्शनं, घरात होणार्या चर्चा ह्या सगळ्यात त्याची जाणीवपूर्वक जोपासना केली गेली. ही गोष्ट वरकरणी साधी वाटली, तरी फार मोलाची आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, मुलांना आपापला कल ओळखता यावा यासाठी निकोप पार्श्वभूमी ह्यातून निर्माण होते. डॉ. प्राजक्तांच्या बाबतीत हे घडलं. त्यामुळे रूढार्थाने कोरड्या, गंभीर वाटणार्या विषयात संशोधन करत असूनही त्या इतिहास, पुरातन मंदिरांचं स्थापत्यशास्त्र अशा विषयात मनापासून रमतात. अगदी देशाबाहेर पडल्यावर तिथली ऐतिहासिक ठिकाणं पाहणं, सांस्कृतिक जीवनाची ओळख करून घेणं ह्याला त्या आवर्जून प्राधान्य देतात.
बारावीनंतर सीईटी देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तेव्हा पैशाचं पाठबळ असूनही खाजगी महाविद्यालयाचा पर्याय त्यांनी निग्रहाने नाकारला. स्वत:च्या मेरिटवर, कुवतीवर जिथे जाता येईल तिथेच जायचं, हे ठरलेलं होतं. ठरवल्याप्रमाणे त्यांनी फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र अभ्याक्रमाला प्रवेश घेतला. सगळे डॉक्टर असलेल्या कुटुंबानेही खुल्या दिलाने, कोणताही दबाव न आणता त्यांचा हा निर्णय स्वीकारला. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि इंजीनिअरचा मुलगा इंजीनिअरच व्हायला हवा, अशी मानसिकता असलेल्या आपल्या देशात अशी उदाहरणं स्वागतार्ह आहेत आणि आश्वासकही!
चारही वर्षं प्रथम क्रमांक आणि उत्तम रेकॉर्ड असूनही वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुर्घटनेमुळे त्यांना अमेरिकेत एमएससाठीचा व्हिसा नाकारला गेला. हातात अॅडमिशन असूनही जाता आलं नाही. वयाच्या विसाव्या वर्षी हा धक्का फार मोठा असतो. आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही असं वाटून सगळ्या जगाचा राग येऊ शकतो. पण परिस्थितीची अपरिहार्यता लक्षात घेऊन आपल्या हातात काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं अशा वेळी आवश्यक असतं. त्यांनी नेमकं तेच केलं.
पुढच्या वर्षभरात इथल्या लॅब्स, रिसर्च कल्चर ह्याचा अनुभव घेतला आणि भारतात आणि अमेरिकेत दोन्हीकडे प्रवेशपरीक्षा दिल्या. तेव्हा त्या काम करत असलेली लॅब, वातावरण आणि वंदना पत्रावळे ह्यांची कामाची पद्धत आवडल्याने भारतातच आयसीटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी पूर्ण करायचा निर्णय घेतला. त्यासाठी हातात असलेल्या एमएसच्या अॅडमिशनवर पाणी सोडलं. इथल्या संशोधनासाठी हव्या त्या गाइड मिळाव्यात, म्हणून अभ्यासाचा विषय बदलण्याइतकी लवचीकताही दाखवली. एवढंच नाही, तर ड्रग डिलिव्हरीमधून बायोप्रोसेस टेक्नॉलॉजी विषय घेतल्यावर नवा विषय आत्मसात करण्यासाठी झोकून देऊन काम केलं.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्राजक्ता दांडेकर-जैन
ह्यादरम्यान त्यांचे मित्र आणि सहाध्यायी रत्नेश जैन ह्यांच्याशी त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न करून दोघेही पुढच्या अभ्यासासाठी जर्मनीला गेले. प्रेमात पडूनही कुठेही फोकस ढळला नाही. उलट एकत्र असणं त्यांच्या कामाला आणि पुढच्या व्यावसायिक वाटचालीला अत्यंत पूरक ठरलं. आताच्या टीनएज आणि विशी-बाविशीतल्या मुलांनी हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्याही पुढच्या वयात असताना पीएचडी आणि लग्न एकत्र मॅनेज होणार नाही, म्हणून पाऊल मागे घेणारे कितीतरी विद्यार्थी आहेत. अशा सगळ्यांसाठी डॉ. प्राजक्ता आणि डॉ. रत्नेश ह्यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे.
पुढे भारतात स्थायिक होण्याची इच्छा असल्याने त्या पोस्टडॉकनंतर इथे परत आल्या. परत येण्याचं कारण विचारलं, तेव्हा “माझी माणसं इथे आहेत” असं उत्तर क्षणार्धात मिळालं. भारत आणि परदेश ह्यात असलेला फरक संशोधनात्मक पातळीवर असण्यापेक्षा ब्युरोक्रसीमुळे आहे, ती हाताळण्याची क्षमता अंगी बाणवली की तो फरक जाणवत नाही, हेही त्यांनी आवर्जून नमूद केलं. ऐकताना हे सोपं वाटलं, तरी प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण आहे, हे शैक्षणिक संशोधन क्षेत्रातलं कालचं पोरही सांगू शकेल. ही ब्युरोक्रसी, राजकारण नको म्हणून, क्वालिटी ऑफ लाइफ, रिसर्च कल्चरचे दाखले देऊन परदेशात कायमसाठी स्थायिक होणार्या समवयस्कांच्या तुलनेत डॉ. प्राजक्ता इथे नि:संशय उजव्या ठरतात.
हा प्रवास पाहताना त्यांचं एकाच वेळी लवचीक आणि तरीही घेतलेल्या निर्णयावर ठाम असणं जाणवत राहतं. काय सोडायचं आणि काय धरून ठेवायचं ही निवड फार महत्त्वाची असते. ती करणं आणि नंतर ती निभावणं, तडीला नेणं हा त्यांच्या यशाचा गाभा आहे.
नॅनोमेडिसिन लॅबमध्ये होणार्या संशोधनाबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातली चमक जाणवल्याशिवाय राहत नाही. एका विद्यार्थ्यांच्या सेमिनार टॉपिकमधून उदयाला आलेली ‘ऑर्गन ऑन चिप’ ही संकल्पना आता सेल कल्चरवरून पुढे जात प्रायोगिक तत्त्वावर थ्री डी बायो प्रिंटिंगपर्यंत जाऊन पोहोचली आहे. औषधांच्या टेस्टिंगसाठी लागणारा प्राण्यांचा वापर ह्या संशोधनाद्वारे कमी करता येईल, इतकं हे संशोधन क्रांतिकारक आहे.
अर्थात हा प्रवास दोन अधिक दोन बरोबर चार इतका सोपा नव्हता. अडथळ्यांची शर्यत होती. पण ती शर्यतच निगेटिव्ह रिझल्ट्सकडे कसं पाहावं, ह्याची दृष्टी विकसित करते.
शर्थीचे प्रयत्न करूनही जर अपयश आलं, तर ते रिपोर्ट करून निगेटिव्ह थिसीस सबमिट कर असं स्वत:च्या विद्यार्थ्यांना सांगू शकणारे गाइड्स मिळणं फार फार कठीण आहे. डॉ. प्राजक्ता ह्या अशांपैकी एक आहेत. ही प्रोसेस शारीरिक-मानसिकदृष्ट्या किती थकवणारी असू शकते, ह्याचा अनुभव मी संशोधनाची विद्यार्थिनी म्हणून घेतला आहे.
निगेटिव्ह रिझल्ट्सना योग्य ती प्रतिष्ठा मिळणं वैज्ञानिक क्षेत्राच्या निकोप वाढीसाठी, प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक वेळी सगळंच मिळत नाही, पण काय मिळवायचं आणि त्यासाठी काय सोडायचं हे ठरवता येणं महत्त्वाचं आहे, हे तत्त्व डॉ. प्राजक्ता केवळ व्यावसायिकच नव्हे, तर व्यक्तिगत आयुष्यातही आचरणात आणतात.
एक स्त्री म्हणून करिअर आणि घर सांभाळताना होणारी कसरत त्यांनीही अनुभवली आहे आणि त्यांच्या परीने त्यावर मार्गही काढला आहे. लेकीसाठी, घरासाठी वेळ देणं आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना त्यांच्या आईवडिलांची भक्कम साथ लाभली आहे. मुलगी झाल्यानंतर स्वभावात नसलेलं वेळेचं व्यवस्थापन आपोआप अंगीकारलं गेलं, असं त्या सांगतात. एक जबाबदारी वाढल्यावर कामासाठी दिला जाणारा वेळ मर्यादित झाला, पण त्याच वेळात होणार्या कामाची एफिशिअन्सी मात्र वाढली. कारण वेळ मर्यादित आहे ह्याची जाणीव आणि दोन्हीही आघाड्यांवर कार्यरत असण्याची मनापासून असलेली इच्छा.
“वेळ पडल्यास कामासाठी घरातल्या गोष्टी काही काळासाठी थोड्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि घरची गरज मोठी असेल, तेव्हा कामातली महत्त्वाकांक्षा मर्यादित ठेवून घराला प्राधान्य द्यावं लागतं..” त्यांनी नमूद केलं. आई घरात नाही म्हणून हिरमुसणार्या मुलांना आईचं काम, त्याचं महत्त्व, त्यामुळे पडत असलेला फरक ह्याची जाणीव हळूहळू टप्प्याटप्प्याने करून दिली की मुलांना आई बाहेर का असते हे उमजत जातं. तिच्या कामाचा, आई असण्याव्यतिरिक्त एक स्वतंत्र व्यक्ती असण्याचा समंजस स्वीकार त्यांच्याकडून होतो, हे सांगणार्या डॉ. प्राजक्तांमध्ये मला एक सशक्त, सुरक्षित आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची स्त्री आणि एक आई ह्यांचा सुरेख मिलाफ दिसला. ही जाणीव पुढच्या पिढीत रुजत जाईल, तेव्हा स्त्रीमुक्तीच्या घोषणांची गरज उरणार नाही. आपल्या समाजाला विद्रोही स्त्रीवादाच्या आणि समानतेच्या नावाखाली मुलींनी दारू-सिगरेट ओढण्याचं समर्थन करण्यापेक्षा अशा कृतीतून दिसणार्या कन्स्ट्रक्टिव्ह फेमिनिझमची गरज आहे. अशा आयांची संख्या वाढत गेली, तर काही वर्षांनी स्त्री संशोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्याची गरज आपोआपच कमी होत जाईल.
‘आमच्यासारख्या कित्येक मुली ही आव्हानं पेलतो आहोत, पेलणार आहोत. त्यातल्या कसोटीच्या क्षणी हे शब्द निश्चित आठवतील आणि प्रेरणा देतील.’ हे सांगत डॉक्टर प्राजक्ता ह्यांचा निरोप घेताना खूप शिकायला मिळालं. मनातल्या निर्णयांना बळ मिळालं.
ज्यांच्याकडे पाहून व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही आघाड्यांवर बळ मिळावं, अशी व्यक्ती आपल्या क्षेत्रात नव्हे, रोजच्या पाहण्यात असावी ही संशोधनातली बाराखडी गिरवणार्या माझ्यासारख्या मुलींसाठी खरंच नशिबाची गोष्ट आहे. हे वाचणार्या प्रत्येकालाही ते बळ मिळो, हेच या लेखनाचे प्रयोजन.