दापोलीची कृषिकन्या

विवेक मराठी    28-Jan-2023
Total Views |
दापोली तालुक्यातील देरदे या छोट्याशा गावातील युवा कृषी पदवीधर वीणा गजानन खोत आपल्या कुटुंबासमवेत फळपिकांचा व्याप सांभाळत आहेत. विशेष म्हणजे फळपिकांबरोबर शेत शिवारातील जीवविविधता जपण्याचाही आटोकाट प्रयत्न करत आहेत. दापोलीच्या या कृषिकन्येकडूनच जाणून घेऊ या तिची कहाणी.
 
 
vivek
 
निसर्गसंपन्न कोकणातील दापोली तालुक्यातील देरदे गावात आमची 25 एकर वडिलोपार्जित बागायती शेती आहे. 2018 साली दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेऊन मी या फळबागायतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मला निसर्गाची आवड होती, शिवाय शिक्षणही कृषिशास्त्राचे घेतलेले असल्यामुळे यातच काहीतरी करायचे, हा विचार पक्का होता. मुख्य म्हणजे लहानपणापासूनच शेती-बागायतीची कामे बघत असल्यामुळे यात रुळायला फारसे कठीण गेले नाही.
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
 
 
कृषी पदवी पूर्ण झाल्यावर बागेतील यांत्रिकीकरण, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस यांचे, तसेच काही मसाला पिकांचेही उत्पादन घेतले. 100 हापूस कलमांच्या बागेत 10 ते 15 रायवळ आणि इतर जातींची लागवड केली आहे. यामुळे आंब्यामधील परपरागीभवनासाठी उपयोग होतो आहे. पीक उत्पादनासाठी खत व्यवस्थापन व कीड/रोगनियंत्रण पद्धतींचा अवलंब केला. बागेतून चार टनांपर्यंत उत्पादन मिळते. डोंगरउतारावर 550 गावठी काजूची लागवड केली आहे.
 
 
krushi vivek
 
सुपारीचे उत्पादन
 
 
सुपारीचीदेखील तीन एकरावर बागायत आहे. यात 100 वर्षांपासून जपलेल्या स्थानिक जातीची लागवड आहे. या बागेतून दोन हजार किलो सुक्या सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. स्थानिक जातींच्या लागवडीचा एक फायदा असाही आहे की या जाती इथल्या वातावरणाशी जुळलेल्या असल्याने कीड/रोगांचा प्रादुर्भाव कमी आढळतो. या जातीच्या रोठ्याचा आकार मोठा असून चवीला तुरट-गोड आहे. तसेच सफेद गराचे प्रमाण जास्त आहे. चांगले उत्पादन देणार्‍या मातृवृक्षांपासून रोपांची निर्मिती करून त्यांची लागवडदेखील दर वर्षी केली जाते.
 
 


krushi vivek 
 
फळबागेचे योग्य व्यवस्थापन
 
 
फळबागेच्या पाणी व्यवस्थापनासाठी पूर्वापार चालत आलेली आणि कोकणात प्रचलित असलेली पाटाच्या पाण्याची व्यवस्था, तसेच स्वतंत्र विहीरदेखील आहे. गावातील डोंगरावर वाहणार्‍या झर्‍यावर बंधारा घालून ते पाणी पाइपलाइनने बागेपर्यंत आणले आहे. सुपारी बागेसाठी तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे. डोंगरावरून येणारे पाणी उताराने वाहत येत असल्याने मोटर पंपाची आवश्यकता लागत नाही. बागेतील तुषार सिंचनदेखील पाण्याच्या वेगावरच फिरतात. दर वर्षी या बंधार्‍याची स्वच्छता व दुरुस्ती केली जाते. सुपारी बागेसाठीदेखील सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. तसेच पावसाळ्यापूर्वी संपूर्ण बागेला पालापाचोळ्याचे आच्छादन केल्यामुळे तण नियंत्रित राहण्यास मदत होते. जुलै-ऑगस्टमध्ये बागेत गिरिपुष्पाचे आच्छादन केले जाते. पावसाळ्यात पालापाचोळा व गिरिपुष्पाची पाने कुजल्यामुळे तण नष्ट होण्यास मदत होते. तसेच यामुळे जमिनीतील गांडुळांची संख्यादेखील वाढली आहे. माती भुसभुशीत होऊन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होत आहे. ओली सुपारी 250 ते 300 रुपये शेकडा, सुकी सुपारी 260 ते 270 रुपये किलो, तर रोठा 600 रुपये प्रती किलो दराने विक्री केला जातो.
 
 
krushi vivek
 
लाल केळीच्या जातीचे संवर्धन
 
 
बागेत आंतरपीक म्हणून केळी, काळीमिरी, लवंग, जायफळ, दालचिनी, अननस इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. केळीच्या जातींमध्ये वेलची आणि लाल केळींच्या जातीची लागवड आहे. येथे 1970पासून या लाल केळीच्या जातीचे संवर्धन केले आहे. या केळीच्या खोडाचा रंगही लालसर असल्याने रोपे सहज ओळखता येतात. याची उंची 6 मीटरपर्यंत वाढते. एका घडात साधारण 5 ते 6 डझन केळी असतात. लाल रंगाच्या सालीमुळे याची किंमतही जास्त आहे.
 
 
krushi vivek
 
 
जीवविविधता जपण्याचा प्रयत्न
 
 
निसर्गाची आणि पर्यावरणाची आवड असल्याने आम्ही येथील जीवविविधतादेखील जपण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, विविधरंगी फूलपाखरे, वेगवेगळ्या प्रकारची फूलझाडे इथली जीवविविधता आणखीनच समृद्ध करतात.
धनेश, नवरंग, परीट, हळद्या, तांबट, भारद्वाज, घार, कोतवाल, बुलबुल, दयाळ, स्वर्गीय नर्तक, सनबर्ड यांसारखे असंख्य पक्षी, त्याचबरोबर ब्लू मॉरमॉन, रेड पियरो, कॉमन ग्रास यलो अशी 10 ते 15 जातींची फूलपाखरे आणि 30 प्रकारच्या वाइल्ड मश्रूम प्रजातींची नोंद आणि या बाबतीत संशोधनही चालू आहे. याबरोबरच येथे 100 वर्षे जुनी काही वृक्षसंपदाही जोपासली आहे. येथील वनवृक्ष आणि औषधी वनस्पतींमध्ये सीताअशोक, सप्तपर्णी, काळा कुडा, हरडा, बेहडा, आवळा, रिठा, समुद्रफळ, सांद्रुक, नोनी, सुरंगी, नागचाफा, बकुळ, सर्पगंधा, अडुळसा, गुळवेल, चित्रक, पिंपळी अशा जवळजवळ 50हून अधिक वनस्पतींचा समावेश आहे. जीवविविधता विपुल प्रमाणात असल्याने बागेतील मधमाश्यांची संख्यादेखील वाढली आहे.
 
 
krushi vivek
 
कृषी आधारित व्यवसायिक संधी आणि अपेक्षा
 
 
720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या समृद्ध कोकणभूमीला जीवविविधतेचा वारसाच मिळाला आहे. फक्त समुद्रकिनाराच नाही, तर कोकणातील प्रत्येक गावागावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. घनदाट जंगल, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी-प्राणी, आंबा-नारळ-सुपारीच्या बागा, हिरवीगार वनराई, नद्या या सगळ्यामुळेच कोकण पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे ठरले आहे.
 
 
 
एकीकडे कोकण समृद्ध असले, तरी आज पर्यटन आणि कृषी या क्षेत्रांत असंख्य समस्या भेडसावत आहेत. कोकणातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने गावागावांमधील तरुण पिढीचे शहरांकडे होणारे स्थलांतर, हवामान बदल, मजूर टंचाई, वन्यप्राण्यांचा शेतीला होणारा त्रास अशा अनेक समस्यांवर उपाययोजना कराव्या लागत आहेत. बदलत्या काळानुसार यातही बदल करण्याची गरज आहे. पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे वळत असताना कृषी क्षेत्राला एक ’ग्लॅमर’ मिळवून देण्याची जबाबदारी आजच्या युवावर्गावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुयोग्य पीक व्यवस्थापन, जलसंधारणाच्या विविध पद्धती, शेतीपूरक व्यवसाय, शासकीय योजना या सगळ्यामुळे शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र यासाठी जास्तीत जास्त तरुण पिढीने, मुख्यत्वेकरून मुलींनी शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
 
 
संपर्क
वीणा गजानन खोत । 7798840712