श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे डोंबिवलीतील अधिष्ठान

विवेक मराठी    28-Jan-2023
Total Views |
@कृष्णात कदम -  9594969635
डोंबिवलीतील श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्र यांच्या वतीने 20 व २१ फेब्रुवारी 202४ रोजी गोंदवलेकर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात श्रींच्या पालखीची मिरवणूक, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, अखंड नामस्मरण, षोडशेेपचार पूजा आदी कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने या केंद्राची माहिती देणारा लेख.

vivek
 
संस्था स्थापना पूर्वपीठिका
 
 
डोंबिवली येथील श्री महाराजांचे निस्सीम भक्त कै. श्री. माधव उर्फ नाना इनामदार यांच्या पुढाकाराने अनेक वर्षे चालू असलेल्या शनिवारच्या भजनी मंडळाने श्रीमहाराजांचा एक भक्तिसंप्रदाय तयार झाला. त्यांचे बंधू कै. भालचंद्र उर्फ बापू इनामदार हे श्रीरंगअवधूत संप्रदायाचे असल्यामुळे त्यांच्या घरी पारमार्थिक वातावरण होते. ते कीर्तन करीत. श्रीरामजन्म, श्रीकृष्णजन्म हे उत्सव नोकरी सांभाळून आपल्या घरी साजरे करत. नंतर कै. श्री. बाबा बेलसरे यांच्या आशीर्वादाने श्रीगुरुपौर्णिमा सुरू झाली. प्रत्येक रविवारी सायं नामजपही सुरू झाला. भक्तमंडळी वाढत गेली. पुण्यतिथी उत्सव गोंदवले व श्रीगुरुपौर्णिमा मालाड येथे सर्व जात. डोंबिवली येथे श्रीमहाराजांचा उत्सव साजरा व्हावा, अशी दोन्ही ठिकाणी उत्सवाला जाऊ न शकणार्‍या भजनातील वृद्ध भक्तांनी इच्छा व्यक्त केली, म्हणून जन्मोत्सव साजरा करावा असे ठरले व श्री. अध्यापक (स्टँप व्हेंडर) यांच्या खाजगी जागेत 1982 साली पहिला जन्मोत्सव साजरा झाला. या उत्सवाला भजनी मंडळ व त्यांच्या कुटुंबीयांपैकी 200-225 भक्तमंडळी सामील होती.
 
 
त्यापुढील दोन वर्षे ब्राह्मण सभेत जन्मोत्सव साजरे झाले. त्यानंतर सुयोग कार्यालयाच्या कै. निमकरमामींनी आमच्या कार्यालयात 13 वर्षे उत्सव साजरे व्हावेत, असा संकल्प कै. नाना इनामदार यांच्यामार्फत सोडला. सुयोगमध्ये २००३ पर्यंत त्यांचा संकल्प पूर्ण झाले त्यानंतर  पुढे उत्सवाला मोठी गर्दी होऊ लागली. कै. नानांचे जन्माचे कीर्तन व दिवसभर भजनी मंडळाचे भजन व्हायचे. श्रीमहाराजांची नित्य उपासना, मोठे उत्सव, वर्षभर चालणारे भजन, त्यातून मिळणारा निधी या सर्वांसाठी संस्था असावी व त्यामार्फत सुसूत्र कार्य चालावे, या विचाराने ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्र डोंबिवली’ या नावे 31 मे 2001 साली संस्था स्थापन झाली व ती ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे रजि. नं. महा/1028,2001 ठाणे नोंदणी करण्यात आली. पुढे संस्थापक विश्वस्त कै. माधव श्रीनिवास इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली ती विश्वस्त संस्था (रजि. नं.एफ. 9931 ठाणे) स्थापन झाली. 
 

vivek 
 
 
यानंतरच्या जन्मोत्सवाला आदित्य कार्यालयाचे मालक कै. अ‍ॅड. वाटवे यांनी श्री. राहतेकर, श्री. देशपांडे यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून आमच्याकडे उत्सव करा, असे सांगितले. शेजारी असल्याने व चिकोडी बंधू श्रीमहाराजांचे साधक असल्यामुळे इतर तिन्ही उत्सव - श्री रामनवमी, गुरुपौर्णिमा व श्रीकृष्णाष्टमी या उत्सवासाठी विनामोबदला कार्यालय उपलब्ध करून देत होते. त्या वेळी फक्त मजुरांच्या मजुरीव्यतिरिक्त काही घेणार नाही, असे सांगितले. संतांकडून काही घ्यायचे नाही. आमच्याआधी श्रीगजानन महाराजांचा उत्सव, तसेच श्रीसमर्थ पादुका हे कार्यक्रम होतच होते. त्या वेळेपासून आजपर्यंत  जन्मोत्सव चालू आहे.
 
श्रीहरि कार्यालय त्यांनी बंद केल्यामुळे आता वरील तिन्ही कार्यक्रम जन्मोत्सवह माधवाश्रम हॉलमध्ये आहेत.  
 
हा उत्सव माघ शु. एकादशी व द्वादशी असा दोन दिवसांचा असतो. एकादशीला पालखी सोहळा व द्वादशीला पहाटे 5.30 ते सायं 7.30 संपूर्ण दिवस कार्यक्रम होतात. सर्वांना महाप्रसाद असतो.
 
संस्था स्थापनेनंतर जागेचा शोध चालू असताना पांडुरंगवाडीतील कै. कान्हेशास्त्री यांचे विठ्ठल मंदिर व सदनिका ते विकणार असल्याचे समजले. अध्यक्ष कै. नाना इनामदार यांनी संपर्क करून ते घेण्याचे ठरविले व दि. 5 ऑगस्ट 2002पासून सायंकाळच्या उपासनेला प्रारंभ केला. परंतु 2003 साली नानांचे निधन झाले व 2005 साली जागेचे रजिस्ट्रेशन करून 2007 साली ताब्यात घेण्यात आली. याच काळात हेब्बळीच्या संत दत्ताण्णांचा संपर्क आला.  पारमार्थिक दर्शन केले. नंतर पूजेसाठी मुंबईहून पादुका आणल्या व गोंदवले येथून मूळ पादुकांवर लाकडी दर्शनासाठी आणल्या. 2008 साली जागेचे नूतनीकरण करण्यात आले. डॉ. उपासनी यांच्या हस्ते गाभार्‍यात मूर्तीची विधिवत पुन:प्रतिष्ठापना करण्यात आली. परंतु स्थिरपादुका असाव्या या विचारातून गोंदवले येथील विश्वस्त कै. बापूसाहेब दामले यांच्या सल्ल्याने कर्नाटकातील मनुगुही या गावच्या शिल्पकाराकडून त्या बनवून गोंदवले येथे नेऊन तेथील महाराजांच्या गाभार्‍यात 24 तास ठेवून व अभिषेक करून विश्वस्तांनी स्वहस्ते आमच्या ताब्यात दिल्या. पादुका डोंबिवली येथे समारंभपूर्वक आणून गोंदवले येथील विश्वस्त मा.श्री. परांजपेकाका यांच्या हस्ते श्रीमहाराजांचा स्पर्श झालेल्या उशीतील कापूस व संध्येची पळी या वस्तूंसह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
 


vivek
 
डोंबिवली शहराच्या मध्यवस्तीत आराधना केंद्रास जागा मिळाल्यामुळे व मूळचेच पांडुरंगाचे स्थान असल्यामुळे या विभागाला ‘पांडुरंगवाडी’ हे नाव आहे. या ठिकाणी त्रिकाळ पूजा, अभिषेक, होमहवनादी प्रसंगानुरूप उपासना होते. शनिवारी भजन, एकादशीला कीर्तन, प्रवचन, ग्रंथवाचन हे कार्यक्रम होतात. रोज सकाळ-सायंकाळ भक्त-साधक मंडळी येऊन जप करून तिथे ठेवलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव व जपसंख्या नोंद करतात. आतापर्यंत संकल्प सोडून चार वेळा 13 कोटीचे संकल्प पूर्ण झाले. इतर दिवसांची जपसंख्या श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी गोंदवल्यास पाठविली जाते. शनिवार व रविवारी सायं 4 ते 6 वाजेपर्यंत आठवड्याचा विशेष जप होतो.
 
 
प्रत्येक पौर्णिमेला काकड आरतीसह जप/पहार्‍याचा 13 तासांचा जप, विष्णुसहस्रनाम, रामहृदय, नामाचा समास, दुपारचा महाप्रसाद हे कार्यक्रम होतात.
 
 
सततच्या अध्यात्मिक/पारमार्थिक कार्यक्रमामुळे व विशेषकरून श्रीमहाराजांना तसेच सर्व संतांना अत्यंत प्रिय नामस्मरणामुळे हे स्थान पवित्र व जागृत झाले आहे, याचा अनुभव रोज येणार्‍या व नवीन येणार्‍यांनासुद्धा येतो व इथे आले की मनाला बरे वाटते, असे बोलून दाखविले जाते. श्रीमहाराजांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘जिथे दहा जण जप करतात तिथे मी असतो, नव्हे मला यावेच लागते.’ ते इथे निश्चितच वास करतात. ‘श्रीमहाराज आपले घरी’ या उपक्रमाचे १०३ कार्यक्रम आतापर्यंत झाले. केंद्रातील पादुका निमंत्रितांच्या घरी नेऊन पूजा, जप व आठवणी, आरती हा कार्यक्रम दुसर्‍या व चौथ्या रविवारी होतो.
 
 
संस्थास्थापनेपासून आतापर्यंत कै. माधव श्री. इनामदार, श्री. सतीश गोडखिंडी, श्री. श्रीकांत राहतेकर व श्री. उमेश गोडसे हे चार अध्यक्ष व कार्यकारिणी झाल्या. संस्थेच्या जमाखर्चाचे सी.ए.कडून ऑडिट होते. कार्यकारिणींकडून अत्यंत नि:स्वार्थीपणे व चोख व्यवहार पार पाडला जातो. कार्यकारिणी पाच वर्षांनी बदलते. आता संस्थेच्या मूळ 25 विश्वस्तांपैकी 15 विश्वस्त कार्यरत आहेत. 18 आधारस्तंभ व ५२० आजीव सभासद आहेत.
 
 
श्रीमहाराजांच्या कृपेने व इच्छेने डोंबिवली शहरात श्रीमहाराजांच्या सर्व ‘साधक-भक्तांसाठी’ पांडुरंगवाडीत आराधना केंद्र सुरू आहे. पांडुरंगवाडीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रोज पूजा, अभिषेक, नामजप, विष्णुसहस्रनाम, रामहृदय इत्यादी स्तोत्रे, नैवेद्य, त्रिकाल आरती, सायं उपासना चालू आहे. भजन, कीर्तन, पौर्णिमा उत्सव, अन्नदान आणि जयंत्यादी मोठे उत्सव साजरे होतात. मंदिरात या सर्व कार्यक्रमात बरीच मंडळी येऊन लाभ घेतात. आराधना केंद्राचे विश्वस्त, आधारस्तंभ व आजीव सभासद ५३५ आहेत. परंतु मोठे उत्सव सोडले, तर नित्यनैमित्तिक उपासनेत सर्वांनाच सहभाग घेता येत नाही, म्हणून कार्यकारिणीने पुढीलप्रमाणे एक उपक्रम ठरविला आहे. आपल्या सोईनुसार सर्वांना याचा फायदा घेता येईल.
 
 श्रीमहाराज आपल्या घरी
 
आपण मंदिरात किंवा संतांच्या ठिकाणी जाणे आणि संतांनी आपल्याकडे येणे यामध्ये मोठा फरक आहेच. संतांनी किंवा त्यांच्या उपासकांनी त्यांच्या पादुका घेऊन येणे, त्यायोगे आपल्याकडे नामस्मरण होणे, त्यांच्या कथा / आठवणी ऐकायला मिळणे म्हणजे एक पर्वणी किंवा सुयोग घडवुन येणे आहे. या विचारातून सध्या दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी निमंत्रित भक्ताच्या घरी मंदिरातील पादुका घेऊन जाऊन एक तासाचा कार्यक्रम करावा असे ठरविले आहे. श्रीमहाराजांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे "पादुका" स्थुल संकेत आहे व नाम हे सूक्ष्म संकेत आहे. हे दोन्ही संकेत घेऊन आपण भक्ताच्या घरी जावे व कार्यक्रम करावा असे ठरविले आहे. त्यानुसार
 

vivek 
 
 रघुपति राघव राजाराम | पतित पावन सीताराम ||
 
या गजरात सकाळी 10 वाजता पादुका भक्ताच्या घरी येतात. दहा मिनिटात पूजा होते. या पुजे मध्ये पादुकांना अत्तर, फुले, अगरबत्ती, निरांजन, सुका नैवेद्य, करून मनोभावे पूजा केली जाते. पूजा नंतर नामजप सुरूवात होते. अर्धा तास जप झाल्यानंतर श्रीमहाराजांच्या किंवा त्यांच्या भक्तांच्या गोष्टी सांगितल्या जातात. नवीन ठिकाणी केंद्राची व अनेक उपक्रमांची माहिती सांगुन आरती होते. आणि पादुका पुजन कार्यक्रम संपन्न होतो. आराधना केंद्र डोंबिवली यांनी नित्यनैमितिक उपासनेत सर्वांनाच लाभ घेता येत नाही म्हणूनच विश्वस्त मंडळ, कार्यकारणीने हा उपक्रम आज अविरतपणे राबवला जात आहे. या उपक्रमाचा फायदा अनेक भाविक भक्तांनी घ्यावा व आराधना केंद्रास भेट द्यावी असे आवाहन आराधना केंद्र डोंबिवली यांचे वतीने करण्यात आले आहे.
 
 
दर महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या रविवारी निमंत्रित भक्ताच्या घरी मंदिरातील पादुका घेऊन जाऊन एक तासाचा कार्यक्रम केला जातो.