संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक दत्ताजी भाले

विवेक मराठी    03-Jan-2023
Total Views |
  
बी.एस्सी.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण करून दत्ताजी भाले यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा परिचय दिलेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले की, त्यांनी नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी. असे वाटण्यात काहीच चुकीचे नव्हते. पण दत्ताजी मात्र समाजाला देव मानत होते, म्हणून समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील १९५० ते १९७६ या २६ वर्षांत त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात नि:स्वार्थीपणे काम करणारे अनेक तरुण निर्माण केले. 
 
aticle on Dattaji Bhale
 
जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती अमर होण्यासाठी जन्माला येत नाही. पण काही व्यकी त्यांच्या श्रेष्ठ कार्यामुळे मृत्यूनंतरही अनेक लोकांच्या मनामध्ये जिवंत राहतात आणि या जगामध्ये अनंत काळासाठी अमर होतात. आपल्या मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात टाकळी नावाच्या एका छोट्याशा गावात मिती भाद्रपद वद्य १२ शके १८४९ रोजी असेच एक महान व्यक्तिमत्त्व जन्माला आले होते, ज्यांचा आणीबाणीच्या जाचक काळाने ३ जानेवारी १९७७ या दिवशी घात केला. त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांच्या अद्वितीय अशा सामाजिक कार्यामुळे ते मराठवाड्यातील लाखो लोकांच्या मनात, कार्यात, विचारात आणि प्रेरणेत आजही जिवंत आहेत. असे थोर सामाजिक कार्यकर्ते आणि संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणजे दत्ताजी भाले होय.
 
 
 
"समाजकार्याला पूर्णपणे वाहून घेण्याचा आपला निर्णय हा अंतिम स्वरूपाचा असून त्यात किंचितमात्रही बदल होणार नाही. एक भाऊ देवाघरी गेला ना? तसा हाही समजा." ऐन विशी-बाविशीतल्या सुदृढ प्रकृतीच्या तरुणाने आपल्या कुटुंबीयांना उद्देशून काढलेले हे उद्गार होते. उस्मानिया विद्यापीठातून बी.एस्सी.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण करून त्यांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा परिचय दिलेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले की, त्यांनी नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी. असे वाटण्यात काहीच चुकीचे नव्हते. पण दत्ताजी मात्र समाजाला देव मानत होते, म्हणून समाजासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील १९५० ते १९७६ या २६ वर्षांत त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात नि:स्वार्थीपणे काम करणारे अनेक तरुण निर्माण केले. त्या काळात 'समाज कधीच सुधारणार नाही' असे म्हणणारे अनेक होते, पण "आपले सद्गुण समाजाला समर्पित करून त्याला मोठे करणे आवश्यक आहे" असे दत्ताजी म्हणायचे. आणीबाणीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अनेक संघकार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी दत्ताजींनी स्वीकारली. संसारापासून दूर असलेल्या या योगी व्यक्तीला प्रत्येक स्वयंसेवकाच्या संसाराची काळजी होती. गावोगाव हिंडणे, तरुण कार्यकर्ता उभा करणे, कमीत कमी झोप, जास्तीत जास्त प्रवास. प्रत्येकाच्या सुखदुःखाशी एवढे समरस की, स्वतःच्या शरीरालासुद्धा पूर्णपणे विसरायचे. मिताहार घ्यायचे, तोही मिळाला न मिळाला, पण अशा परिस्थितीतही कधीच थांबण्याचा विचार केला नाही. संघावर बंदी व दिवसभर पोलिसांचा ससेमिरा असायचा. बसमध्ये पकडले गेलो, तर काम थांबेल म्हणून, रात्रीच्या अंधारात अनेक मैलाचा प्रवास पायीच करायचे. खेडोपाडी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी संपर्क करून, बंदीकाळातसुद्धा संघकाम चालू ठेवले. तहानभूक, ऊनवारा, कोणत्याच गोष्टीची तमा नव्हती. स्नान थंड पाण्याने, गादीवर झोपण वर्ज्य, रात्री उशिरा झोपायचे, सकाळी लवकर उठून ठरलेल्या कार्यक्रमासाठी इतरांना उठवायचे, ठरलेले कार्यक्रम संपल्यावर वाचन करायचे असे नित्यनियमाचे कर्तव्यकठोर त्यांचे आयुष्य होते. यात किंचितही तडजोड नसायची. कधीकधी वाटायचे, किती यंत्रासारखे काम करतात दत्ताजी, पण दत्ताजी नावाच्या या अद्भुत यंत्रातून हजारो माणसे निर्माण झाली. त्यातला प्रत्येक जण म्हणतो, "दत्ताजींचे माझ्यावर फार प्रेम होते." हो, हो, समाजाच्या प्रत्येक घटकावर दत्ताजींचे अपार प्रेम होते.
 
 
 
आणीबाणीत भूमिगत अवस्थेत दत्ताजी कोणत्या ठिकाणी आहेत कोणाला कळत नसे. अशा वातावरणात नेहमी त्यांचे पायाचे दुखणे आणि त्यांना नेहमी उलटीचा त्रास असल्यामुळे परतूर तालुक्यामध्ये साकळगावी श्री. सुधाकरराव देशमुख यांच्या घरी मुक्कामाला असताना श्री. दत्ताजींची प्राणज्योत मालवली. वार्‍यासारखी बातमी पसरली, पण सरकारदरबारी थांगपत्ता न लागता सर्व ठिकाणी कळविली गेली. जेलपर्यंतही कळली. कोण गेले कोणाला माहीत नाही. स्वयंसेवकांना फक्त नाव माहीत, पण बोलण्याची बंदी होती. याच बंदीमुळे मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांना आपले दुःखसुद्धा जाहीरपणे व्यक्त करता येत नव्हते, म्हणून आजसुद्धा दत्ताजी भाले यांच्याविषयी बोलायला उभा राहणारा प्रत्येक वक्ता बोलता बोलता अश्रुमय होऊन जातो. आज दत्ताजींच्या आठवणीत असे वाटते की, कार्यमग्न होते त्यांचे जीवन, मृत्यूमुळे ते शांत झाले. देव, देश आणि धर्मासाठी बलिदान खूप मोठे केले.
- राहुल राठोड
जनसंपर्क अधिकारी
दत्ताजी भाले रक्त केंद्र
डॉ. हेडगेवार रुग्णालय गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर