@ॠजुता लुकतुके
पेले बुद्धिवंत फुटबॉलपटू होता. तो डोक्याने वेगवान विचार करायचा. त्याप्रमाणे मैदानात चाली रचायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखण्याची त्याची हातोटी होती. याच्या जोडीला होती ड्रिबलिंगची वादातीत कला, तसंच सर्व ताकदीनिशी दोन्ही पायांनी बॉल गोलजाळ्यात भिरकावण्याचं कौशल्य. पेलेंनी केलेल्या हजारो देखण्या गोलबरोबरच गोलसाठी त्यांनी दिलेले पासेसही लोकांच्या लक्षात राहतील असेच होते. म्हणूनच त्याला लोकांनी जादूगार नाही, तर ‘खेळाचा शिल्पकार’ हे नाव दिलं.
क्रीडासंस्कृतीची सुरुवात ठळकपणे 1896मध्ये ग्रीसच्या अथेन्स शहरात झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकनंतर झाली, असं मानलं जातं. इथून क्रीडासंस्कृती रुजायला सुरुवात झाली. पण खेळ अजून सर्वांपर्यंत पोहोचला नव्हता - म्हणजे खेळ अजूनही ‘गोर्या लोकांचा’ होता. ही चौकट भेदायला 1940-50चं दशक उजाडावं लागलं आणि चौकट जागतिक स्तरावर प्रत्यक्ष भेदली ती मुष्टियुद्धात महम्मद अली यांनी, तर फुटबॉलमध्ये पेले यांनी. अली यांना खासकरून अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता लाभली आणि पेलेंना फुटबॉलचे अँबेसिडर म्हणजे दूत म्हटलं गेलं. कारण, ते फक्त त्यांच्या पिढीचे फुटबॉलपटू नव्हते, तर फुटबॉलला ‘द ब्युटिफुल गेम’ बनवणारे या खेळाचे शिल्पकार होते. खरंच असं म्हणतात की, त्यांच्यामुळेच फुटबॉल खेळाला ‘द ब्युटिफुल गेम’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली.
अचाट पदलालित्य, समोरच्या खेळाडूच्या मनात काय चाललंय हे जोखणारी तल्लख बुद्धी, ताकद आणि अचूकतेने गोलजाळ्याच्या दिशेने शेवटच्या क्षणी मारलेले शॉट्स हे त्यांच्या मैदानी खेळाचं वैशिष्ट्य, तर मैदानाबाहेर आपली मतं प्रामाणिकपणे आणि नेमकेपणाने मांडणारं, फुटबॉलसाठी तळमळ असलेलं आणि मानवतावादी दृष्टीकोन असलेलं हुशार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि अंगभूत हुशारीमुळे संघर्षावर मात करण्याची तयार झालेली क्षमता यातून जन्म झाला ‘किंग ऑफ फुटबॉल’ किंवा ‘द एम्परर पेले’ यांचा.
तसं त्यांचं पाळण्यातलं नाव होत एडसन अरांतोस दो नासिमेंटो. आई-वडिलांनी विजेच्या दिव्याचा शोध लावणारा शास्त्रज्ञ थॉमस एल्वा एडिसन यांच्या नावावरून मुलाचं नाव एडसन ठेवलं होतं. 23 ऑक्टोबरला ब्राझिलच्या साओ पाओलो जिल्ह्यात बाओरू इथे त्यांचा जन्म झाला. वडील डोंडिन्हो हे स्वत: फुटबॉलपटू. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी बालपणीच फुटबॉलचे प्राथमिक धडे दिले. आपल्याला आता फुटबॉल हा श्रीमंतांचा खेळ वाटतो. पण खरं तर जगभरात झोपडपट्टीतल्या मुलांमध्येच या खेळाची क्रेझ अधिक. साधे-सोपे नियम, एक बॉल सोडला तर इतर साधनांची गरज नाही. शिवाय धावताना अंगातली रग निघते ती वेगळीच. त्यामुळे फुटबॉल तरुणांमध्ये खासा लोकप्रिय. छोट्या एडसनच्या आजूबाजूलाही असाच फुटबॉल खेळला जात होता. पण सगळेच गरीब होते. स्वत: एडसन घरी मदत व्हावी म्हणून चहाच्या स्टॉलवर काम करायचा.
फुटबॉल घ्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे मग मोठाल्या सॉक्समध्ये किंवा गोणपाटात रद्दीचे कागद भरून त्यावर द्राक्षाची वेल बांधायची आणि फुटबॉल तयार करायचा, ही कला पेलेनेच साध्य केली. पायात बूट नसायचेच. पण भोवतालचे सगळे असलेच. त्यामुळे एडसनलाही लहानपणी हे कधी जाणवलं नाही. त्यांनी आपल्या आत्मचरित्रातच तसा उल्लेख केलाय. आवतीभोवती फुटबॉलचे क्लब होते, पण या मुलांना त्यात प्रवेश नव्हता. कारण, हातात पैसा नव्हता.
पण एडसन हाच या झोपडपट्टीतल्या मुलांचा म्होरक्या होता. त्याने अकरा मुलांची एक फुटबॉल टीम तयार केली. तिचं नावच दिलं ‘शूलेस इलेव्हन’ म्हणजे अनवाणी पायाने खेळणारे अकरा खेळाडू! दहा-बारा वर्षांची साओ पाओलोची ही मुलं आपली खेळाची भूक बिनदिक्कत भागवत होती. यात एडसनचं कौशल्य तेव्हाही वादातीत होतं. दिवसभर कितीही मेहनतीची कामं करावी लागली, तरी फुटबॉल चुकत नव्हता. कारण, त्याचं नकळत या खेळावर प्रेम बसलं होतं.
वडिलांकडे साधनं नव्हती, पण मुलाचं खेळाविषयीचं प्रेम त्यांना जाणवत होतं. चौदाव्या वर्षी पेलेचा स्थानिक खेळ बघायला आजूबाजूच्या भागातून मुलं येत होती. आपल्या मुलाचा खेळ निदान एखाद्या व्यावसायिक क्लबमधल्या प्रशिक्षकांनी पाहावा, अशी इच्छा वडिलांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्यासाठी हेही कठीणच होतं. एका मजुराचं बोलणं कोण ऐकून घेणार होतं? पण त्यांची प्रबळ इच्छा होती आणि एडसनचं कौशल्यही लपून राहण्यासारखं नव्हतं. त्यामुळे बाओरो अँटलेटिको क्लबच्या डि ब्रेटो या ज्युनिअर प्रशिक्षकांनी एकदा त्याचा खेळ पाहिला आणि एडसनच्या व्यावसायिक फुटबॉलला अशा रितीने सुरुवात झाली. तोपर्यंत संधी मिळेल तितक्या छोट्या छोट्या हौशी फुटबॉल टीमकडून एडसन खेळलेला होता. आपण जसा विराट कोहली किंवा रोहित शर्मा खेळत असताना टीव्ही लावतो आणि तो आउट झाल्यावर कधीकधी बंद करतो, तसं एडसनच्या बाबतीत होतं. तो खेळत असेल तर स्थानिक सामन्यांनाही गर्दी व्हायची आणि एडसनच्या या जुन्या चाहत्यांनीच त्याला ‘पेले’ हे जगप्रसिद्ध नाव दिलं. झालं असं की, एडसनचा खेळ बघून प्रतिस्पर्धी टीमची छाती दडपायची आणि मैदानावर विरोधात असला स्ट्रायकर नको, म्हणून ते एडसनला मुद्दाम गोलकीपर व्हायला लावायचे. एडसनच्या वडिलांच्या टीममधला एक गोली होता बेली नावाचा. तो स्थानिक वर्तुळात प्रसिद्ध होता, म्हणून मग एडसनलाही बेली म्हणून हाक मारायचे. याच बेलीचा अपभ्रंश होऊन एडसनचं नाव पडलं पेली आणि पुढे पेले. पेले यांचे काका आणि स्वत: पेले यांनी आपल्या आत्मचरित्रात पेले नावाची ही कहाणी सांगितली आहे.
या छोट्या पेलेची बॉलवर इतकी हुकमत होती की, त्याच्याजवळ बॉल आला की प्रेक्षकांमधून त्याच्या नावाचा गजर सुरू व्हायचा. आणि त्यातूनच पेले हे नाव रुजलं.
एक गोष्ट अशीही आहे की, ब्राझिलियन पोर्तुगीजमध्ये पे (pe) म्हणजे लाथेने मार. खेळताना पेलेच्या जवळ फुटबॉल आला की, लोक पे म्हणजे मार जोराने असं म्हणायचे. तिथून एडसनला पेले असं नाव मिळालं. पेले ही एक हवाईयन देवताही आहे.
पुढे पेले नावानेच एडसन लोकप्रिय झाला. पण त्याला स्वत:ला हे नाव कधीच आवडलं नाही. एडसन हे नाव एका शास्त्रज्ञाचं असल्यामुळे त्याला तेच आवडायचं. तर असा हा पेले खेळायला लागल्यापासूनच आजूबाजूच्या लोकांमध्ये खेळासाठी ओळखला जात होता. आता राष्ट्रीय स्तरावर त्याचे चमकण्याचे दिवसही आले होते. प्रशिक्षक डि ब्रेटो त्याला सांतोस या ब्राझिलमधल्या लीग फुटबॉलमधल्या अग्रमानांकित क्लबकडे घेऊन गेले. तेव्हा एडसन म्हणजे आताचा पेले 15 वर्षांचा होता. सांतोसने या वयात पेलेला जवळ केलं, ते शेवटपर्यंत सोडलं नाही आणि पेलेनेही कधी क्लब सोडला नाही. पंधराव्या वर्षीच तो सांतोसकडून लीग फुटबॉल खेळायला लागला आणि सोळाव्या वर्षी ब्राझिलच्या राष्ट्रीय संघातही लगेच त्याची वर्णी लागली.
पहिला सामना लॅटिन अमेरिकन प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाबरोबर होता. ब्राझिलने हा सामना गमावला असला, तरी पेलेने पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. सगळ्यात लहान वयात गोल करण्याचा विक्रम पेलेच्या नावावर तेव्हापासून आहे आणि तो आजतागायत मोडलेला नाही. पेलेच्या नशिबाने पुढच्याच वर्षी 1958मध्ये फिफा फुटबॉल वर्ल्ड कप होता. पेलेने पाच गोल करत हा वर्ल्ड कप गाजवला. फ्रान्सविरुद्ध उपान्त्य सामन्यात सतरा वर्षांच्या पेलेने हॅट ट्रिक केली आणि तिथून आंतरराष्ट्रीय स्तरावर पेलेची दखल पहिल्यांदा घेतली गेली.
हा वर्ल्ड कप ब्राझिलने जिंकला. पेले वर्ल्ड कप जिंकणारा वयाने सगळ्यात तरुण खेळाडू ठरला. फक्त हा वर्ल्ड कपच नाही, तर 1977 साली निवृत्त होईपर्यंत पेले ब्राझिलच्या राष्ट्रीय टीमला आणि स्थानिक क्लब सांतोसला चिकटून राहिला. दोघांवर त्याचं निरतिशय प्रेम होतं. ब्राझिलसाठी 92 सामन्यांमध्ये त्याने 77 गोल केले, तर एकंदरीत त्याच्या कारकिर्दीत 1,363 सामन्यांमध्ये 1,279 गोल केले. हा एक गिनिज विक्रम आहे. 1958च्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये त्याला ‘ओ रे’ म्हणजे फुटबॉलचा सम्राट ही उपाधी मिळाली आणि पुढेही फुटबॉलचा राजा किंवा सम्राट हीच त्याची ओळख बनली. 1958, 1962 आणि 1970 असा तीनदा वर्ल्ड कप उंचावणारा तो एकमेव खेळाडू आहे.
मैदानावरचा त्याचा खेळ लोकांना थक्क करायचा. पण त्याला लोकांनी जादूगार नाही, तर ‘खेळाचा शिल्पकार’ हे नाव दिलं. कारण पेले बुद्धिवंत फुटबॉलपटू होता. तो डोक्याने वेगवान विचार करायचा. त्याप्रमाणे मैदानात चाली रचायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखण्याची त्याची हातोटी होती. याच्या जोडीला होती ड्रिबलिंगची वादातीत कला, तसंच सर्व ताकदीनिशी दोन्ही पायांनी बॉल गोलजाळ्यात भिरकावण्याचं कौशल्य. पेलेने केलेल्या हजारो देखण्या गोलबरोबरच गोलसाठी त्याने दिलेले पासेसही लोकांच्या लक्षात राहतील असेच होते. म्हणूनच त्याला हुशार फुटबॉलपटूचा दर्जा मिळाला.
बरं, ज्या परिस्थितीत पेले वाढला होता, त्यातून बाहेर पडण्याची त्याची प्रेरणा इतरांमध्ये वाटण्याचाही त्याचा गुण होता. म्हणजेच पेलेकडे नेतृत्वगुणही होते, ज्याचा उपयोग फुटबॉलच्या मैदानाइतकाच त्याला बाहेरही झाला. फुटबॉल आणि खिलाडूवृत्ती त्याने तळागाळात नेली आणि तो फुटबॉलचा ब्रँड अँबेसिडर म्हणजे राजदूत झाला.
1977पर्यंत तो नितांतसुंदर फुटबॉलचा प्रसार करत होता आणि 1977मध्ये निवृत्त झाल्यावर आपल्या विचारांचा. युनेस्कोचा तो अँबेसिडर होता आणि ब्राझिलबरोबरच जागतिक समस्यांवरही तो मोकळेपणाने आपली मतं मांडायचा. युद्ध त्याला आवडायची नाहीत. त्यामुळे आक्रमक वृत्तीही त्याला झेपायची नाही. पण आक्रमकतेला तो आपल्या पद्धतीने उत्तर द्यायचा. आफ्रिकन देश नायजेरियामध्ये 1967 ते 1970 असं तीन वर्षं नागरी युद्ध सुरू होतं. युद्धाने ग्रासलेल्या या देशाचा पेलेने दौरा केला. 1969च्या फेब्रुवारीत तो तिथे गेला आणि त्याचा खेळ बघता यावा म्हणून सरकारी सैन्याने आणि बंडखोरांनी चक्क दोन दिवस युद्धबंदी पाळली होती. त्यामुळे ‘युद्ध क्षणभर थांबवण्याची ताकद असलेला खेळाडू’ म्हणूनही पेलेला ओळख मिळाली. अगदी अलीकडे जून 2022मध्ये रशियन पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांना पेलेने जाहीर पत्र लिहून युक्रेनबरोबरचं युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं होतं. व्यावसायिक फुटबॉलचा प्रसार झालेला होता. पण त्यात इतकी व्यावसायिकता नव्हती की, फुटबॉलपटूंना वेळच्या वेळी पैसे मिळतील. पेले त्यांच्या काळातले सगळ्यात जास्त कमाई असणारे फुटबॉलपटू होते. पण फुटबॉलमध्येच पैसा नव्हता. त्यामुळे 1977मध्ये पेले निवृत्त झाले, तेव्हा त्यांची एकूण मालमत्ता राहत्या घरासह फक्त साठ लाख रुपये इतकी होती. ही गोष्ट पेलेंना बोचायची. खेळाडूला खेळातून निदान निवृत्तीनंतरचं आयुष्य चांगलं जगता येईल इतके पैसे मिळाले पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
क्रीडा, सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही क्षेत्रांत ते कायम सजग आणि सक्रिय राहिले. त्यांची राजकीय मतं डाव्या विचारसरणीकडे झुकणारी होती. 1995मध्ये फर्नांडो कारडोसो यांच्या सरकारमध्ये ते क्रीडामंत्रीही होते. खेळातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सतत कार्यशील राहण्याच्या त्यांच्या स्वभावाला खीळ बसली ती कर्करोगामुळे आणि शेवटी अवयव निकामी झाल्यामुळे 29 डिसेंबर 2022ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे फुटबॉलमधलं एक युग संपुष्टात आलं आहे. पण त्यांचा फुटबॉल आणि कार्य अजरामरच राहणार आहे.