काँग्रेसला संजीवनी देण्याचाा केविलवाणा प्रयत्न

विवेक मराठी    07-Jan-2023   
Total Views |
@अभय पालवणकर 
Congress
 
 
मुंबईत काँग्रेसचा स्थापना दिवस संपन्न झाला. यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे खास उपस्थित होते. मरगळलेल्या काँग्रेसला संजीवनी देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणता येईल. काही महिन्यांतच मुंबईत महानगरपालिका निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे स्थापना दिवसाचे औचित्य साधून काँग्रेसने सोमय्या मैदानावर मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भाई जगताप, नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुंबईतील काँग्रेसचे संघटन एवढे कमकुवत झाले त्यात बळच उरलेले नाही.
 
मुंबई काँग्रेसच्या वतीने बुधवारी काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा जशी माध्यमे फारशी गंभीर्‍याने घेत नाही. तशी अवस्था या मेळाव्याची झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्गे पहिल्यांदाच मुंबईत आले होते. त्यानिमित्त काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करायचा प्रयत्न केला. पण काँग्रेसची 2014पूर्वीची ताकद मात्र दिसून आली नाही. मुंबईत एकेकाळी काँग्रेसची मोठी ताकद होती. अगदी 2017पर्यंत मुंबईतून काँग्रेसचे 80पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येत होते. मुंबईतून काँग्रेसचे पाच खासदार, 20पेक्षा जास्त आमदार निवडून जायचे. मोठे संघटन, कार्यकर्त्यांची फळी होती. पण 2014नंतर काँग्रेसची अवस्था एवढी बिकट होत चालली आहे की, आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते शोधून सापडत नाहीत. कार्यालय ओस पडत आहेत. कार्यकर्त्यांची वर्दळ असलेल्या काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात आज आपण सहज फेरफटका मारला, तर ते ओस पडलेले दिसते, तर इतर वॉर्ड कार्यालयांची अवस्था न सांगितलेली बरी. एवढी अवस्था असूनही काँग्रेसची गटबाजी मात्र किचिंतही दूर होत नाही. काँग्रेसचे कै. गुरुदास कामत गट, मिलिंद देवरा गट आणि आता संजय निरुपम गट, जगताप गट अशा गटातटात काँग्रेस विभागली गेली आहे. सोमय्या मैदानावरील जाहीर सभेतसुद्धा त्याचा प्रत्यय आला. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी कार्यक्रमालाच पाठ फिरवली. यावरून काँग्रेस खरेच भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना आव्हान देईल का? असा प्रश्न निर्माण होतो. मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढवू शकेल एवढी ताकद मुंबई काँग्रेसमध्ये सद्य:स्थितीला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
 
 
 
या सभेत काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष खर्गे यांनी “भाजपा आणि संघ देशाचे संविधान संपवत आहेत” अशी टीका केली. खरे तर खर्गे यांनी अशी टीका करण्याअगोदर पक्षातील लोकशाहीवर अभ्यास करायला हवा होता. काँग्रेस पक्षांतर्गत झालेली अध्यक्षपदाची निवडणूक किती पारदर्शक होती? महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे मुंबईतील चंद्रकात हांडोरे का पराभूत झाले? याचा आढावा घ्यायला हवा होता. देशाच्या संविधानाचा प्रश्न निर्माण करण्याअगोदर पक्षातील दलित उमेदवार का पराभूत होतो, त्याला पक्षातील आमदार का मतदान करीत नाहीत, त्यानंतर याविरोधात पक्षांतर्गत चौकशी समिती नेमली, तिचा अहवाल ? यावर कार्यकर्त्यांची कानउघडणी करणे अपेक्षित होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला अनुसरूनच देश चालवत आहेत का, असे प्रश्न विचारत आहेत. याउलट संघपरिवार किंवा भाजपा हे संविधानाचा जागर करीत आहेत. देशात संविधान रुजावे व प्रत्येक व्यक्तीला ते समजावे यासाठी परिश्रम घेत आहेत. काँग्रेस पक्ष यासाठी काय काम करतो, याचे बोलण्याअगोदर आत्मचिंतन करायला हवे होते.
 
 
भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा
 
 
अनेक वर्षांनंतर मुंबई काँग्रेसला मराठी अ‍ॅक्टिव्ह अध्यक्ष मिळाला आहे. काही काळ जनार्दन चांदोरकर होते, पण त्यांचा कार्यकाळ अगदीच सुमार होता. आता भाई जगताप यांच्या रूपाने काँग्रेसला लढवय्या कार्यकर्ता मिळाला आहे. ते तेवढेच संयमी व्यक्तिमत्त्वसुद्धा आहे. भाईंचे पहिल्यापासून शिवसेनेशी विळ्याभोपळ्याचे नाते. त्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यापासून भाईंनी पालिका जिंकण्यासाठी स्वबळाचा नारा दिला आहे. पण महाविकास आघाडी असल्यामुळे भाईंची मोठी अडचण होत आहे. तरीही नाना पटोले आणि भाई दोघेही शिवसेनेला अधूनमधून आव्हान देत असतात. भाईंनी तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाई महाविकास आघाडीत सामील होतात की स्वबळावर निवडणुका लढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची भाजपाला साथ
 
 
2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवनंतर असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपाला साथ दिली आहे. कृपाशंकर सिंह, आ. राजनाथ सिंह, चित्रसेन सिंह, आ. कॅप्टन तामिळ सेल्वन अशी मोठी यादी आहे, ज्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये तर काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असलेल्या वॉर्डांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान होऊन भाजपाचे 83 नगरसेवक निवडून आले. या वेळी महाविकास आघाडी झाल्यास काँग्रेसला किती जागा मिळतात, यावरून होणार्‍या वादविवादामुळे भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.