काळोखात धडपडणारी नर्गिस (महम्मदी)

विवेक मराठी    16-Oct-2023   
Total Views |

Narges Mohammadi
नर्गिस महम्मदी हा दबलेल्या, पिचलेल्या, काळोखात उजेडाचा शोध घेणार्‍या कोट्यवधी महिलांचा आवाज आहे. तिला या वर्षीचे शांतताविषयक नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. ती इराणमधल्या महिलांच्या हक्कांविषयी आवाज उठवत असते. ती महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जाणीव देत असते आणि हिजाबच्या सक्तीविरुद्ध ती बोलतही असते. ती ‘डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर’ची उपाध्यक्ष आहे.
हजारों साल नर्गिस अपनी बे-नुरी पें रोती है

बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा

- अल्लामा इक्बाल
 
 
हा शेर महमद इक्बालचा आहे. तो आता माझ्या डोळ्यासमोर आला. नर्गिस हे फूल आहे आणि सुंदर डोळ्यांना (अर्थातच स्त्रीच्या) ही उपमा दिली जाते. हजारो वर्षांपासून नर्गिस आपल्यातल्या अंधकारावर रडत असते, कुढत असते आणि तिला आशा असते की कोणीतरी या आंधळेपणातून बाहेर काढू शकणारा (चमन म्हणजे बाग) रत्नपारखी येईल. हा झाला सरधोपट अर्थ. थोडक्यात, त्या कमनशिबी नर्गिसला त्या गर्तेतून बाहेर काढू शकणारा हात त्या नोबेल पारितोषिकाच्या निमित्ताने पुढे आला. आता ही बिचारी नर्गिस म्हणजे नर्गिस महम्मदी. तिला या वर्षीचे शांतताविषयक नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नर्गिस महम्मदी ही इराणच्या तुरुंगात खितपत पडली असून तिचा गुन्हा काय? तर ती इराणमधल्या महिलांच्या हक्कांविषयी आवाज उठवत असते. ती महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जाणीव देत असते आणि हिजाबच्या सक्तीविरुद्ध ती बोलतही असते. ती ‘डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर’ची उपाध्यक्ष आहे. महिलांनी हिजाब घालणे इराणमध्ये सक्तीचे आहे आणि त्याविरोधात तिने आपले आंदोलन चालू ठेवले, म्हणून तिला मे 2016मध्ये 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 2020मध्ये तिला काही काळासाठी तुरुंगातून मुक्त करण्यात आले. 2021मध्ये तिला परत एकदा तुरुंगात पाठवण्यात आले. या खेपेला तिला एकांतवासात पाठवण्यात आले. तिला इराणच्या रेव्होल्यूशनरी कोर्टासमोर (इथे ते कोणत्याही अर्थाने क्रांतिकारक नाही) हजर राहायला सांगून तिच्या मानवाधिकार संघटनेच्या सदस्यत्वाबद्दल तिला प्रश्न करण्यात आले. तिने त्यावर आपण या संघटनेचे केवळ सदस्य नाही, तर उपाध्यक्षही आहोत आणि कोणत्याही व्यक्तीचा संघटनेत राहण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. त्यावर तिला जामिनावर सोडण्यात येऊन पुन्हा तिला तुरुंगात टाकण्यात आले. तुम्हाला मोकळा श्वासही दीर्घकाळ घेता येणार नाही, हे इराण सरकारने तिला आपल्या कृतीतून बजावले. तिच्यावर असलेल्या अनेक आरोपांमध्ये ती राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करत असल्याचाही एक आरोप आहे.
 
 
नर्गिस हा दबलेल्या, पिचलेल्या, काळोखात उजेडाचा शोध घेणार्‍या कोट्यवधी महिलांचा आवाज आहे. ती तुरुंगाच्या कणखर अशा सळयांमधूनही बोलत राहते. आपण या आयुष्यात तरी बाहेर पडू याची तिला आशा वाटत नाही. निराशेने तिला घेरलेले आहे. पण तरीही तिचा संघर्ष चालू आहे. तिला आणखी 154 फटके खायचे आहेत. तिचे आरोग्य धोक्यात आहे. तिची हाडे पिचलेली आहेत. तिचे हाड अन् हाड बोलते आहे. त्यावर कदाचित मृत्यू हेच औषध असू शकते, कायमचे. नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर नर्गिस महम्मदी यांनी तुरुंगातूनच एक निवेदन काढून ‘आपण लोकशाही स्वातंत्र्य आणि समता यासाठी आपले आंदोलन चालूच ठेवू’ असे त्यात जाहीर केले. नर्गिस यांना हे पत्रक प्रसिद्ध करता आले, हेच विशेष असे म्हणावे लागते. इराणच्या तुरुंगातून वारंवार जावे लागल्याने म्हणा किंवा आधीपासून त्यांना तुरुंगातल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असल्याने म्हणा, इराणमधल्या तुरुंगांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचीही त्यांची एक मागणी आहे. त्या सुधारणा काय व्हाव्यात याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही त्यांना या तुरुंगातून त्या तुरुंगात अशा वार्‍या घडवत आहोत, असे सांगायला हे इराणी सरकार कमी करणार नाही. तेहरानचा एव्हिन तुरुंग म्हणजे छळकोठडी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिटलरने अशा कोठड्यांमध्ये काय केले, तेच इराणचे सरकार तिच्या बाबतीत करते आहे. तरीही नर्गिस यांनी तुरुंगातल्या महिला कैद्यांच्या मुलाखतींवर आधारित एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव ‘व्हाइट टॉर्चर’. ते इराणमध्ये मिळत नाही, पण अन्यत्र ते उपलब्ध झाल्याने इराण सरकारचा पारा चढला आहे. 2003मध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिले होते, त्याचे नाव ‘द रिफॉर्म्स, द स्ट्रॅटेजी अँड द टॅक्टिक्स’ असे आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संघटनेच्या नेत्या शिरीन इबादी यांना 2003मध्ये सर्वप्रथम नोबेल पारितोषिकाचा मान मिळाला होता. नर्गिस यांना याआधी आंद्रे साखारोव पारितोषिकही मिळाले आहे. इराण सरकारला बदनाम करण्याच्या कटात नर्गिस आणि शिरीन या दोघी महिला कशा आहेत, हेही त्या सरकारच्या वतीने वारंवार सांगितले जात असते. नर्गिस या एक्कावन वर्षांच्या आहेत, तर शिरीन या 76 वर्षांच्या आहेत. नैतिकतेच्या नावाने चालणार्‍या पोलिसी अत्याचारांना या दोघींचा विरोध आहे. धर्मांधतेच्या नावाने चालणारा अनैतिक कारभार त्यांनी चव्हाट्यावर आणला आणि जगाचे लक्ष त्याकडे वेधले, म्हणून इराण सरकार संतापले आहे.
 
 
Narges Mohammadi
 
 इराणमधील ‘तेहरान टाइम्स’ या वृत्तपत्राने नोबेल पारितोषिकावर जहरी टीका केली
इराणध्ये ‘नैतिक पोलिसिंग’ नावाचा एक प्रकार आहे. तो रस्त्यारस्त्यांवर महिलांवर नजर ठेवून असतो. एखादी महिला जर बुरख्यात नसेल किंवा इराण सरकारने आखून दिलेल्या शिस्तीत तिचा बुरखा नसेल, तर ते तिला धरतात आणि जबर मारहाण करून तिला तुरुंगात टाकतात. बुरखा जराही घसरून चालत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी इराणच्या कसरा हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलेली महसा उर्फ जिना अमिनी. ती इराणच्या एका महामार्गाने मोटारीतून भावासमवेत चाललेली असताना तिला या नैतिक पोलिसांनी हिजाब व्यवस्थित नसल्याबद्दल हटकले आणि तिला पकडून नेले. तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली. सर्वसाधारणपणे सुशिक्षित आणि कायदेशीरपणे चालणार्‍या देशात महिलांची चौकशी करणार्‍या किंवा त्यांचा जाबजबाब घेणार्‍या महिला पोलीस असतात, पण इराणमध्ये हा अधिकारही महिला पोलिसांचा नसून पुरुष पोलिसांचा असल्याचे सरकारचे मत आहे. त्यामुळे महिलांना मारहाण करणारे पुरुष पोलीस देत असलेले तडाखेही किती पाशवीच असतील, हे सांगायची आवश्यकता नाही. महसाला तशाच पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि तिला त्यातच मृत्यूला सामोरे जावे लागले. ती अवघ्या तेविसाव्या वर्षी गेली. तिच्या या मृत्यूबद्दल ना चौकशी, ना सरकारला खेद. उलट तिच्यावर सरकारी रुग्णालयात चांगले उपचार झाले, पण ती कोणत्यातरी विकाराने गेली, असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. तिच्या भावाने आणि वडिलांनी तिच्या अंगांगावर मारहाणीच्या जखमा असल्याचे सांगितले, पण इराण सरकारवर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. हे इतके संतापजनक होते की, त्याबद्दल मानवाधिकार केंद्राला आंदोलन करणे भाग पडले. अर्थात इराण सरकार कोणताही खुलासा न करता तिच्यावरच दोषारोप करत राहिले.
 
 
इराणमध्ये शाहविरोधी उठावातून 7 मार्च 1979 रोजी आयतुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांचे पहिले पुराणमतवादी सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर आलेल्या अली खामेनी यांच्या सरकारनेही सत्तेची त्यांचीच बुरसटलेली परंपरा चालू ठेवली. त्यांनी तर कोणत्याही स्त्रीने हिजाब म्हणजे अंग पूर्ण झाकून ठेवणारा पोशाख घातला नाही, तर तिला ‘नग्न’ समजून शिक्षा द्यावी, असे जाहीर केले.
 


Narges Mohammadi 
 
नैतिकतेच्या नावाने महिलांना राजरोस जेरीस आणणार्‍या या सरकारी हुकूमशाहीमुळे तिथली वृत्तपत्रेही या घृणास्पद प्रकारांविषयी काहीही भाष्य करायला धजावत नाहीत. वास्तविक नर्गिस काय किंवा त्यांचे पती काय, दोघेही कायद्याचे उत्तम अभ्यासक आहेत. नर्गिस या पदार्थविज्ञानाच्या विद्याार्थिनी होत्या. त्यांनी इंजीनिअरिंगचा व्यावसायिक अभ्यासक्रमही पूर्ण करून आपले पती तागी रहमानी यांच्यासमवेत सुधारणावादी पत्रकारिताही केली आहे. पण रहमानी यांना त्यांच्या दोन मुलांसमवेत इराण सोडून फ्रान्समध्ये आश्रय घ्यावा लागला. नर्गिस यांना पत्रकारिताही सोडून द्यावी लागली. आपल्या मुलांना त्या भेटू शकलेल्या नाहीत. इराणमधल्या सध्याच्या पत्रकारितेचा दर्जाच पाहायचा असेल, तर ज्या दिवशी नर्गिस यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले, त्याच दिवशीचा ‘तेहरान टाइम्स’ पाहिल्यास त्यांनी नोबेलची बातमी कशी दिली आहे हे पाहण्यासारखे आहे. तेहरान टाइम्सच्या पहिल्या पानावर ‘ऑन द पोलिटिसाइज्ड प्राइझ’ ही सचित्र बातमीची सुरुवात आहे. तर आतील पानावर ‘नोबेल पारितोषिक समितीमार्फत पाश्चिमात्य कशा तर्‍हेने आपली राजकीय कार्यक्रमपत्रिका राबवत असतात’ ते सांगितले आहे. त्यात नर्गिस महम्मदी या आपल्या ‘क्रांतिकारक’ इराणी सरकारच्या कायमच्याच विरोधक राहिल्या आहेत, अशी टीका आहे. त्या नोबेल पारितोषिक समितीला ‘स्वातंत्र्यसैनिक’ कशा वाटतात तेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. नोबेलच्या निवड समितीला ‘शांतता’ या शब्दाचाच अर्थ समजलेला नाही, असेही या टीकास्पद लेखात म्हटलेले आहे. नोबेल पारितोषिक हेही अमेरिकेच्या ‘सीआयए’ या गुप्तचर संस्थेने वेगवेगळ्या देशांमधल्या कारवायांना बळ देणार्‍या लिखाणांना पुढे आणले आणि त्याचाच एक भाग म्हणून तेव्हाच्या सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात लिहिल्या गेलेल्या ‘डॉक्टर झिवॅगो’ या बोरिस पास्तरनाकच्या कादंबरीलादेखील हे पारितोषिक देण्यात आले होते, याची आठवणही याच लेखात करून देण्यात आली आहे.
महात्मा गांधींना 1946, 1947 आणि 1948 या वर्षांत सलग तीनदा नामांकन करण्यात येऊनही शांततेचे नोबेल परितोषिक कसे देण्यात आले नाही, याचाही याच बातमीत उल्लेख करण्यात आला आहे. शंभर उंदरांना फस्त करून हज़ला चाललेल्या मांजराचे उदाहरणसुद्धा त्यांच्या बाबतीत अपुरे आहे. गांधीजींचा उल्लेख आठवणीने करणार्‍या या बातमीत अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष बराक ओबामा यांना हे पारितोषिक कोणत्या कारणांनी दिले, त्याचा उल्लेख केलेला नाही. तो करायला ते बहुधा विसरले असावेत. सांगायचा मुद्दा हा की, आपल्या जिवावर बेतले की मांजरसुद्धा कसे एखाद्याच्या अंगावर धावून जाते, तसे तेहरान टाइम्सचे हे चवताळणे असावे, असा निष्कर्ष त्यावरून काढता येतो. 2007मध्ये हवामान बदलाच्या संदर्भात काम करणार्‍यांना, 2013मध्ये रासायनिक अस्त्रांच्या विरोधात काम करणार्‍या संघटनेला, 2017मध्ये अण्वस्त्रबंदीसाठी काम करणार्‍या संघटनेला दिलेल्या नोबेल शांतता पारितोषिकांची दखल घ्यायची मात्र तेहरान टाइम्स विसरला.

विशेष म्हणजे इराणइतकाच परंपरेत विषारी किंवा दुष्ट असलेल्या सौदी अरेबियाने महिलांच्या बाबतीत आता काहीशी मवाळ भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, हे म्हणायला जागा आहे. माझ्याकडे 7 ऑक्टोबरचा सौदी गॅझेटचा अंक आहे. त्यात पहिल्याच पानावर जी जाहिरात आहे, तीत डोक्यावर कोणतेही जिहादी वस्त्र नसलेली म्हणजेच हिजाब नसलेली महिला दिसते आहे. हा बदल स्वागतार्ह म्हणायला हवा. इतकेच नाही, तर सौदी अरेबियाच्या राजपुत्रांनी महिलांनी हिजाब घेण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. त्यालाही आता एक वर्ष होऊन गेले. याच सौदी अरेबियात महिलांना मोटार चालवायला बंदी होती. महिलांनी त्याविरोधात आवाज अधिक तीव्र करताच त्यातही सौदीने सवलत दिली आणि आता महिला रस्त्यावर मोटार चालवताना दिसू लागल्या आहेत. असे असता इराणच अजूनही बुरसटलेल्या विचारांमागे धावताना दिसत आहे. चीनने सौदी अरेबियाबरोबर इराणचे राजनैतिक संबंध घडवून आणले, तेव्हा त्या देशाकडूनही इराणने अशा काही चांगल्या गोष्टी घ्यायला हरकत नव्हती. किमानपक्षी नर्गिस महम्मदी यांच्यासारख्या महिला कार्यकर्तीच्या विरोधात त्या देशाकडून केला जात असलेला सूडबुद्धीचा आक्रस्ताळेपणा तरी त्यांनी थांबवायला हवा.

 
आणखी एक उल्लेख करायलाच हवा असा आहे. नर्गिस महम्मदी यांना हे पारितोषिक जाहीर झाले दि. 6 ऑक्टोबर रोजी. दि. 7 रोजी काय झाले, तेही सांगितले गेलेच पाहिजे. दि. 7 ऑक्टोबर रोजी इराणच्या पाठिंब्याने चालणार्‍या ‘हमास’ या गाझा पट्टीतल्या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला करून तिथल्या अनेक नागरिकांना ठार केले आणि अनेक स्त्री-पुरुषांना बंदुकांचा धाक दाखवून जीपमध्ये कोंबून गाझा पट्टीत नेले. वाटेत अनेकांना त्यांनी ठार केले. किती जणांना त्यांनी मारले, किती जणांवर अत्याचार केले आणि इस्रायलच्या सर्व यंत्रणांना त्यांनी मोडकळीस आणले हे एकाच दिवसात स्पष्ट झाले. इस्रायलची मोसाद ही जगातली सर्वश्रेष्ठ गुप्तचर संघटना मानली जाते, पण तिचाही कणा आपण मोडू शकतो हे हमासने दाखवून दिले. ते चांगले नक्की नाही, पण इस्रायलच्या विरोधात आपण हे करू शकतो हे हमासने सांगितले आहे. त्याचे सर्वप्रथम जर कोणी स्वागत केले असेल तर ते इराणने. हा योगायोग नक्की नाही. आपली अब्रू गेलेली असताना दुसर्‍यांचे उघडेपण पाहून त्यास वाकुल्या दाखवायचा हा प्रकार आहे. असो, दाट काळोखाने व्यापलेल्या रात्री चाचपडणार्‍या अशा कोट्यवधी महिलांचा आवाज दडपला जाऊ नये, एवढीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करणे आपल्या हाती आहे.