पर्यावरणपूरक ‘रवींद्र मिश्रण’

विवेक मराठी    16-Oct-2023
Total Views |
@अभिजित धोंडफळे
‘रवींद्र मिश्रण’ हे श्रीगणेशाच्या आणि अन्य मूर्तींसाठी खास संशोधन करून तयार करण्यात आलेले मातीचे मिश्रण. वजनाने शाडूच्या मातीपेक्षा हलके असणारे हे मिश्रण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. शाडूची माती, गाळाची माती, भाताचे मऊसूत तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा हे या मिश्रणाचे घटक आहेत. त्यापासून अधिक सुबक मूर्ती तयार होते आणि त्या मूर्तीवर रेखीव रंगकाम करता येते. शिवाय ही मूर्ती शाडूच्या मूर्तीपेक्षाही पाण्यात लवकर विरघळते. असे वैशिष्ट्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक मिश्रण तयार केले आहे पुण्यातील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी. या मिश्रणासाठी त्यांना पेटंट मिळाले आहे. सुमारे 22-23 वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक गणपतींच्या चळवळीच्या या प्रवासाला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांच्या नावासकट त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची दखल घेतली. या मिश्रणामागचे संशोधन आणि त्याचे पेटंट मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न अभिजित धोंडफळे यांच्या शब्दांत..

vivek
 
आमच्या घरात शिल्पकलेची परंपरा आहे. आमच्या आजोबांनी ‘धोंडफळे कलानिकेतन’ हा स्टुडिओ उभारला, त्याला 75 वर्षे झाली. या क्षेत्रात काम करणारी माझी तिसरी पिढी. शिल्पकलेतल्या प्रयोगशीलतेचीही आमच्याकडे परंपरा आहे. 1955 साली पुण्यातील पांगुळआळी गणेशोत्सवासाठी माझ्या आजोबांनी पेपर पल्पचा गणपती बनवला, जो अजूनही सुस्थितीत आहे. इथूनच धोंडफळे कलानिकेतनमधल्या प्रयोगांना सुरुवात झाली, असे म्हणता येईल. त्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच पेपर पल्पमध्ये अनेक मिश्रणे करून पाहिली. त्यात वेगवेगळ्या गोष्टी मिसळून आणखी कशी सुधारणा करता येईल, हे ते बघायचे. याचेे एक उदाहरण म्हणजे कसब्यातील विजय अरुण मंडळासाठी बनवलेली गणपतीची 6 फुटाची पेपर पल्पमधली आगळीवेगळी मूर्ती. या मूर्तीबरोबरच त्यांनी बर्‍याच ठिकाणी पेपर पल्पच्या मूर्ती केल्या, ज्या अजूनही चांगल्या स्थितीत आहेत.
 


vivek 
 
माझे वडील सदर्न कमांडमध्ये अकाउंट्स विभागात नोकरीला होते. तरी तिथल्या शास्त्रज्ञांशी त्यांचा चांगला संवाद होता. रूम टेम्परेचरला टिकेल अशी मूर्ती तयार करण्यासाठी माध्यम सुचवायला त्यांना वडिलांनी सांगितले, तेव्हा त्यांना एपॉक्सी रेझिनची माहिती मिळाली. याचा उपयोग करत त्यांनी जवळपास 100 गणपती केले.
 
 
साधारण 1980-81 साली पर्यावरणपूरक गणपती चळवळीचे बीज रोवले गेले, असे वाटते. त्याच दरम्यान आम्ही इकोफ्रेंडली गणपतीची चळवळ सुरू केली. तेव्हा मी सातवी-आठवीत होतो. लहानपणी वडील मला सायकलवरून डबल सीट शाळेत सोडायचे. जाताना आम्हाला संगम पूल ओलांडून जावे लागायचे. त्या वेळी गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. विसर्जनानंतर 2 दिवसांनी शाळा सुरू व्हायची. तेव्हा पुलावरून जाताना बाबा सायकल थांबवून मला नदीपात्रावर दिसणारे पूर्णपणे विसर्जित न झालेले गणपती दाखवायचे. त्यांचे तुटलेले हात, तुटलेली डोकी असे सगळे त्या किनार्‍यावर पडलेले असायचे. या मूर्तींमुळे भविष्यात खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे, असे बाबा मला सांगत. आणि खरेच तसे झाले.
 
 
vivek
 
त्यातूनच बाबांनी असे ठरवले की, की जिला वर्षानुवर्षे काहीच होणार नाही अशी मूर्ती बनवायची. त्यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. मग माझे वडील, मी आणि माझा धाकटा भाऊ अरविंद अशा आम्ही तिघांनी मिळून एपॉक्सी रेझीन आणि फायबर ग्लास या माध्यमांमध्ये अनेक मूर्ती आणि पुतळे केले. आज पुण्यातील अनेक मंडळांमध्ये एपॉक्सी रेझीन आणि फायबर ग्लासमध्ये बनवलेले हे गणपती विद्यमान आहेत.
 
 
 
रवींद्र हे माझ्या वडिलांचे नाव. त्यांच्या प्रयोगशील स्वभावाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. वेगवेगळ्या मटेरियलमध्ये प्रयोग करून पाहण्याचे संस्कार माझ्यावर झाले. त्यांचे कृतज्ञ स्मरण म्हणून मी विकसित केलेल्या मिश्रणाला ‘रवींद्र मिश्रण’ असे नाव दिले.
 
 

vivek
 
अनेक घरांमध्ये केवळ मुलांच्या हट्टामुळे गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते. गणेशोत्सव साजरा होतो. तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे निर्माण होत असलेली पर्यावरणाची समस्या, त्याचे गांभीर्य मुलांना समजावून सांगितले, तर काही चांगले बदल घडतील असे मला वाटले, म्हणून मी मुलांसाठी शाळा-कॉलेजमध्ये कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या कार्यशाळांच्या माध्यमातून मला अनेकांपर्यंत पोहोचता आले. पर्यावरणविषयक सातत्यपूर्ण लेखन करणारे पत्रकार अभिजित घोरपडे यांनी माझ्या उपक्रमाविषयी त्यांच्या दैनिकातून लिहिले. यातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागले. माझ्या कामाची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली आणि त्याचा परिणाम म्हणून 28 ऑगस्ट 2016 या दिवशी पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात माझ्या कामाचा माझ्या नावासकट उल्लेख केला. यामुळे माझ्या कामाला चालना मिळाली, ते एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमध्ये, चर्चांमध्ये मला बोलावले जाऊ लागले आणि त्यातून पर्यावरण रक्षणाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायला जास्त मदत झाली.
 
 
2016 साली झालेल्या एका चर्चेमध्ये शाडू मातीच्या विरघळण्याच्या क्षमतेवर आक्षेप घेण्यात आला, जो काही अंशी खरा होता. शाडूची माती पूर्णपणे विरघळत नाही आणि ती पाण्याच्या तळाशी जाऊन बसते. तेव्हा त्यावर काम करायचे मी ठरवले. शाडू मातीबरोबर वेगवेगळ्या मातींची मिश्रणे करून प्रयोग सुरू केले. अनेक प्रयोगांनंतर माझ्या लक्षात आले की गाळाच्या मातीचे आणि शाडू मातीचे मिश्रण केले, तर त्याच्यापासून पर्यावरणस्नेही मूर्ती बनू शकतात. 60 टक्के गाळाची लाल माती आणि 25 ते 30 टक्के शाडू माती हे मिश्रण अगदी पर्फेक्ट असल्याचे रिझल्ट्स मिळाले. त्यामुळे मूर्ती अधिक काळ टिकते आणि तिला फिनिशिंगही चांगले येते, हे लक्षात आले. पण या मिश्रणाची स्ट्रेंग्थ कमी होती, ती वाढण्यासाठी दोन्ही मातींच्या मिश्रणात राइस ब्रॅन - म्हणजे भाताची मऊसूत तुसे मिसळून बघण्याचे ठरवले. ती मिसळल्यावर मिश्रणाला प्लास्टर ऑफ पॅरिसइतकी मजबुती येते आणि ते पाण्यात विरघळतेही लवकर, हे समजले. या मिश्रणापासून बनलेली मूर्ती पाऊण ते एक तासात पूर्णपणे विरघळू लागली. वरचे पाणी काढून टाकल्यानंतर खाली उरणार्‍या गाळात कोकोपिट मिक्स केले की ते झाडे लावण्यायोग्य होते. त्यामुळे विसर्जनानंतर पाण्याच्या स्रोतांमध्ये ते मिसळले तरी ते जिथे कुठे सेटल होईल तिथली जमीन सुपीक बनेल, हे लक्षात आले. शिवाय राइस ब्रॅनमध्ये कमी प्रमाणात तेल आहे, ज्यामुळे मूर्तीला छान फिनिशिंग येऊन मूर्ती जास्त ओजस्वी दिसते. तर असे हे रवींद्र मिश्रण, ज्यात 60 टक्के गाळाची माती, 25-30 टक्के शाडू माती आणि 10-15 टक्के राइस ब्रॅन असते. हे सगळे प्रयोग करताना मला माझ्या विज्ञान शाखेचे पदवीचे ज्ञान उपयोगी पडले. मिळवलेले ज्ञान कधीही वाया जात नाही, हेच खरे!
 
आपल्या पूर्वजांनी शिल्पकलेच्या क्षेत्रात खूप काम करून ठेवले आहे. मला नेहमी वाटते की आपल्याकडचे शिल्पकार जगातल्या अन्य शिल्पकारांपेक्षा कितीतरी पावले पुढे गेलेले आहेत. आपले शिल्पकार ह्यूमन सायकॉलॉजी जाणत होते, म्हणून शिल्पांमध्ये त्यांनी भाव ओतले आणि ती शिल्पे जिवंत केली. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा आपली चित्तवृत्ती शांत होते.
 
हे मिश्रण 2019 साली मी देशाला समर्पित करत लाँच करणार होतो. तेव्हा माझ्या काही मित्रांनी त्याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा सल्ला दिला. पेटंट मिळवणे हे खूप खर्चीक काम आहे आणि त्याची प्रक्रियाही खूप मोठी, वेळखाऊ असते. पण सगळ्यांच्या आग्रहामुळे मी पेटंटसाठी अर्ज करायचे ठरवले. त्यासाठी बुद्धिसंपदा अधिकारातील तज्ज्ञ - आयपीआर अ‍ॅटर्नी अ‍ॅड. गौरी भावे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनानुसार 2019 साली मी पेटंटसाठी अर्ज केला. या पेटंटसाठी गरज होती ती प्रयोगशाळेतल्या चाचणीची. पहिली चाचणी होती ती मातीच्या मिश्रणाच्या स्ट्रेंग्थची. ती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा जास्त असणे आवश्यक होते. आणि दुसरी चाचणी होती मिश्रण पाण्यात विरघळण्यासाठी लागणार्‍या वेळेची. तो कालावधी शाडू माती आणि पीओपीपेेक्षा कमी असायला हवा होता. या प्रयोगशाळेतील टेस्टिंगच्या कामात माझे अत्यंत जवळचे सुहृद उजएझचे विभाग प्रमुख डॉ. सतीश साठे यांनी मदत केली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे अभियांत्रिकी चाचणी क्षेेत्रातील तज्ज्ञ डॉ. रवी रानडे यांंच्या लॅबमध्ये रवींद्र मिश्रणाचे टेस्टिंग पार पडले. शाडू माती, रवींद्र मिश्रण आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस या तीन गोष्टींच्या अनेक चाचण्या घेतल्या गेल्या. स्ट्रेंग्थ टेस्टमध्ये रवींद्र मिश्रणाची स्ट्रेंग्थ पीओपीइतकीच आढळून आली आणि पाण्यात विरघळण्यासाठी लागणारा वेळ शाडू मातीपेक्षा कमी लागला. सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, यंदाच्या वर्षी 6 जूनला या मिश्रणाचे पेटंट मला मिळाले. चार वर्षांचे श्रम सार्थकी लागल्याची भावना होती. पेटंट मिळाल्यामुळे एक प्रकारची डिग्निटी येते. जेव्हा एखादी गोष्ट कसोटीवर सिद्ध होते तेव्हा लोक त्याला मान्यता देतात, विश्वासार्हता वाढते. हे पेटंट मी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे कोणाला या मिश्रणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे असेल, तर आवश्यक तो सल्ला देण्याची माझी तयारी आहे.
 
 
पेटंट मिळाल्याचा मुख्य फायदा म्हणजे मिश्रण उत्तम असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले. त्यामुळे हे मिश्रण चांगले आहे या माझ्या म्हणण्याला बळ मिळाले. पारंपरिक ज्ञानाला अशी विज्ञानाची जोड मिळाली, तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपले सण साजरे करता येतील, हा विश्वास वाढीला लागला.
 
 
आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना पेटंट मिळाली पाहिजेत. पूर्वी आपल्याकडे पर्यावरणपूरक रंग असायचे. आता ते ज्ञान कुठेतरी लुप्त झाले आहे. त्याचे पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे. पेटंट हे इनोव्हेशनला मिळते, म्हणून आपल्या पारंपरिक गोष्टींमध्ये कालसुसंगत इनोव्हेशन होणे गरजेचे आहे.
 
शब्दांकन - गौरी पेठकर