भारताची विजयी पताका इस बार सौ पार

विवेक मराठी    18-Oct-2023   
Total Views |
vivek
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हळूहळू भारत आपला ठसा उमटवत आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांचाही ह्या यशात नक्कीच काही प्रमाणात वाटा आहे आणि भविष्यात तो वाढणार आहे. देशात अशा प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळू लागलं, तर भविष्यात भारत खेळात अव्वल ठरेल. आशियाई खेळांमधील 107 पदकं भारताच्या भविष्यातील ऑलिम्पिक यशाची नांदी आहे. ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि भारताचा तिरंगा खेळाच्या मैदानात सतत फडकत राहो, ही सदिच्छा!
गेल्या आठवड्यात आपण काही विशेष उल्लेखनीय पदकांबद्दल आणि पदकविजेत्यांबद्दल जाणून घेतलं होतं. आजच्या ह्या लेखाच्या सुरुवातीला उर्वरित पदकांबद्दलची माहिती अगदी थोडक्यात देत आहे.
 
 
गोल्फ - अदिती अशोक हे नाव आता भारतात बर्‍यापैकी लोकांना माहीत झालंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकापासून अगदी थोड्या फरकाने दूर राहिलेली ही खेळाडू इथे रौप्यपदकाची मानकरी ठरली. ह्या वेळी खरं तर सुवर्णपदकाची अपेक्षा होती, कारण पहिल्या तीन फेर्‍यांनंतर अदितीने आघाडी घेतली होती. शेवटच्या दिवशी अपेक्षित खेळ करू न शकल्यामुळे ती दुसर्‍या स्थानी राहिली. हे यशही कमी नाही, कारण भारतात अजूनही ह्या खेळाला फारशी लोकप्रियता नाही. अदितीकडून आता पॅरिसमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
 
 
कबड्डी - महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी आपापल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात विजय संपादन करून 2 सुवर्णपदके भारताच्या खात्यात जमा केली. महिला संघ चायनीज तैपेईविरुद्ध एका गुणाने जिंकला, तर पुरुष संघाला इराणशी लढावं लागलं. 2018मध्ये इराणने भारताला पराभूत केलं होतं. शेवटच्या जेमतेम सव्वा मिनिटाचा खेळ शिल्लक असताना हा सामना थांबवावा लागला होता. गुण देताना पंचांकडून चूक झाली होती. खेळाच्या नियमांबद्दल स्वत: पंचच गोंधळलेले दिसत होते, शिवाय त्यानंतर खेळाडू आणि संघ प्रशिक्षक अशा सर्वच बाजूंनी वादावादीला सुरुवात झाली. अखेर गोंधळ संपला, सामना सुरू झाला आणि भारत जिंकला.
 
 
क्रिकेट - महिलांप्रमाणे पुरुषांनीही सुवर्णपदक मिळवलं.
 
बॅडमिंटन - प्रणॉय एच.एस.ने पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवून बर्‍याच वर्षांचा पदक दुष्काळ संपवला, तर भारताची पुरुष दुहेरीची हुकमी जोडी चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रांकिरेड्डी ह्यांनी सोनेरी कामगिरी केली. पुरुष सांघिक रौप्यपदकानंतर एकेरीत ही दोन पदकं मिळवण्यात भारताच्या खेळाडूंना यश मिळालं.
 
बुद्धिबळ - एकेरीत भारतीय खेळाडू अपयशी ठरले, मात्र सांघिक विभागात ती कसर काही प्रमाणात भरून निघाली. भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांना रौप्यपदक मिळालं.
 
तिरंदाजी - भारतासाठी तिरंदाजी हा सर्वात यशस्वी खेळ ठरला, कारण कंपाउंड तिरंदाजीत भारताने सर्वच सुवर्णपदकं आपल्या नावावर केली. महिला एकेरीत ज्योती वेण्णामने सुवर्ण, तर अदिती स्वामीने कांस्यपदक पटकावलं. पुरुष एकेरीत ओजस देवताळे आणि अभिषेक वर्मा ह्यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरलं, मिश्र दुहेरीत ज्योती आणि ओजस जोडीने सुवर्णपदक प्राप्त केलं. अशा प्रकारे ज्योती आणि ओजस तीन-तीन सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
 
रिकर्व्ह प्रकारातही पुरुष आणि महिला संघांनी कांस्यपदक मिळवलं.
 
एकूण 107 पदकं मिळवत भारताने आपल्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आशियाई खेळांची सांगता केली. ह्या 107मध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्यपदकांचा समावेश आहे.
 
भविष्यातील वाटचाल
 
100ची अपेक्षा असताना आपण 107 पदकं जिंकलो, ही आनंदाची गोष्ट नक्कीच आहे, पण ह्यावर समाधान मानायचं का? अग्रस्थानी असलेल्या चीनची एकूण पदकं आहेत 383, त्यात 201 सुवर्णपदकांचा समावेश आहे. दुसर्‍या क्रमांकावर जपान आहे, त्यांनी 52 सुवर्णपदकांसह 188 पदकं मिळवली आहेत, तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या कोरियाने 42 सुवर्णपदकांसह 190 पदकं मिळवली. चीन, जपान हे देश ऑलिम्पिकमध्येही अग्रेसर दिसतात, आपण मात्र त्या पातळीवर खूप मागे पडतो. ह्या एशियाडमध्ये भारताकडून राष्ट्रीय/जागतिक विक्रम जरूर नोंदवले गेले आहेत, पण त्यांची संख्या फार कमी आहे. मिळालेल्या यशातून प्रेरणा घेऊन आशियाई किंवा राष्ट्रकुल पातळीपुरते मर्यादित न राहता ऑलिम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांचा विचार करण्याची गरज आहे.
 
 
पूर्वी खेळाडूंसमोर असंख्य अडचणी आ वासून उभ्या असायच्या, आजही आहेत, पण आता सरकारी आणि खाजगी संघटनांकडून मिळणार्‍या मदतीतही वाढ झाली आहे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) खेळाडूंना सर्वतोपरी साहाय्य करण्यास तत्पर आहे. टॉप्सचे (TOPS - Target Olympic Podium Schemeचे) लाभार्थीही अनेक आहेत. अविनाश साबळे गेले अनेक महिने अमेरिकेत तिथल्या लष्कराबरोबर सराव करत होता, नीरज चोप्राही बराच काळ सराव आणि प्रशिक्षणासाठी परदेशातच राहतो, बर्‍याच खेळांसाठी विशेष शिबिरं’ आयोजित केली जातात, तज्ज्ञ परदेशी प्रशिक्षकही भारताकडे आहेत, काही खेळाडूंच्या वैयक्तिक प्रशिक्षकांचाही खर्च त्या त्या क्रीडा संघटनेकडून उचलला गेल्याचं पाहायला मिळेल. वर उल्लेख केलेली दोन नावं केवळ प्रातिनिधिक आहेत, असे बरेच खेळाडू बर्‍याच प्रकारच्या सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हळूहळू आपला ठसा उमटवत आहेत. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांचाही ह्या यशात नक्कीच काही प्रमाणात वाटा आहे आणि भविष्यात तो वाढणार आहे. भारतीय तिरंदाजी असोसिएशन ‘हर घर आर्चरी’ कार्यक्रम राबवत आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ह्याअंतर्गत शाळा-महाविद्यालयांकडूनही ह्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं नुकतंच वाचनात आलं होतं. दुहेरी विश्वविजेती आणि एशियाडमध्ये कांस्यपदक मिळवणारी अदिती स्वामी आणि तीन सुवर्णपदकांचा मानकरी ओजस देवताळे हे सातार्‍यातच तिरंदाजीचे धडे गिरवत आहेत. देशात अशा प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळू लागलं, तर भारत नक्कीच आणखी प्रगती करेल. आजचा हा शंभरचा आकडा भविष्यात दुप्पट होईल.
 
मोठ्या स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंना मोठ्या रकमेची बक्षिसंही मिळत आहेत, शिवाय नोकरी आणि नोकरीतील बढती असा दुहेरी फायदा खेळाडूंना मिळत आहे. आता काही खेळाडू ह्या सुविधांपासून वंचित राहिले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, पण तरीही सरकार सर्वतोपरी मदत करतंय असंच म्हणावं लागेल. खेळाडूंनीही ह्याची जाणीव ठेवावी आणि मैदानात उतरल्यावर आपल्या सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन कसं होईल, ह्यासाठी प्रयत्नशील राहावं.
 
काही निराशाजनक नोंदी
 
ह्या स्पर्धेत मिळालेली काही पदकं अगदीच अनपेक्षित होती, जी सुखद धक्का देऊन गेली. काही ठिकाणी निराशाही पदरी पडली. ह्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूचं. पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही ती स्पर्धेत उतरली होती. काही दिवसांपूर्वी वेटलिफ्टिंगची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली, त्या वेळी एशियाडची तयारी करणाच्या उद्देशाने तिने वजन न उचलता फक्त सहभाग नोंदवला होता. कारण ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने तो गरजेचा होता. साहजिकच ह्या वेळी क्रीडाप्रेमींची तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण ती अपूर्णच राहिली. इतरही काही खेळाडू आहेत, जे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. खरं तर त्या स्पर्धांमध्ये जास्त चांगला अनुभव मिळतो. आशियाई खेळ महत्त्वाचे नाहीत असा ह्याचा अर्थ नाही, पण जागतिक स्पर्धांमधून मिळणारा अनुभव खेळाडूला फार पुढे घेऊन जाऊ शकतो. स्पर्धांचा प्राधान्यक्रम योग्य असणं गरजेचं आहे. ह्या बाबतीत पुन्हा एकदा नीरज चोप्राचा आदर्श समोर ठेवता येईल. पूर्णपणे तंदुरुस्त असताना तो शक्यतो कुठलीही मोठी स्पर्धा चुकवत नाही. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून नीरज लगेचच डायमंड लीगची अंतिम फेरी खेळला, तिथेही त्याला रौप्यपदक मिळालं, त्यानंतर काही दिवसांतच आशियाई खेळांमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं. तंदुरुस्ती राखणं आणि स्पर्धांचा प्राधान्यक्रम ठरवणं खूप गरजेचं आहे. नीरजसारख्या खेळाडूंची संख्या भविष्यात वाढायला हवी.
 
 
बॉक्सिंगमध्येही काही प्रमाणात निराशाच झाली आणि त्याहून जास्त दुरवस्था दिसली ती कुस्तीमध्ये. एकही खेळाडू सुवर्णपदकापर्यंत पोहोचला नाही. काही महिन्यांपूर्वी काही मोठ्या कुस्ती खेळाडूंनी केलेली आंदोलनं आणि त्याचा खेळावर झालेला परिणाम हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत ह्याच कारणाने खेळाडूंना भारताच्या झेंड्याखाली खेळता आलं नव्हतं. जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेवर बंदी घातल्यामुळे आपल्या खेळाडूंना स्वतंत्रपणे स्पर्धेत उतरावं लागलं होतं. एकूणच ह्या सगळ्या प्रकारात कोण दोषी आहे आणि कुणाची बाजू सत्याची आहे हे कधी ना कधी पुढे येईलच, पण सद्य:स्थितीत कुस्ती खेळ पिछाडीवर जाताना दिसतोय, हे दु:खद आहे. अंतिम पांघलसारखे काही अपवाद आहेतच, जे खेळाला पुन्हा भरभराटीचे दिवस दाखवतील अशी आशा बाळगू या.
 
 
आशियाई खेळांमधील ही 107 पदकं भारताच्या भविष्यातील ऑलिम्पिक यशाची नांदी ठरावी, हीच एक इच्छा आहे. मार्ग अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही. इतर यशस्वी देशांच्या कामगिरीचा, पदकविजेत्या खेळाडूंचा, प्रशिक्षण आणि सराव वगैरे गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्या खेळाडूंना तिथपर्यंत कसं पोहोचता येईल ह्याचा आता विचार व्हायला हवा. आपलेच काही जुने निवृत्त खेळाडू हे काम नक्कीच करू शकतात. पी.टी. उषा आणि अंजू जॉर्ज ह्या बाबतीत सध्या प्रयत्नशील असलेल्या दिसतात. चीनमध्ये जेव्हा एशियाडदरम्यान भारतीय खेळाडूंच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खच्चीकरणाचे प्रयत्न झाल्याचं दिसलं, त्या प्रत्येक वेळी अंजू जॉर्जने ह्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतल्याचं आपण पाहिलंच आहे. खेळाडूंना ह्या मानसिक आधाराचीही खूप गरज असते.
 
 
ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि भारताचा तिरंगा खेळाच्या मैदानात सतत फडकत राहो, ह्या सकारात्मक विचारासह आता आपण वाट बघू या पॅरिस 2024 ऑलिम्पिकची.
 
जय हिंद!