उत्सव विजयादशमीचा - प्रेरणाजागृतीचा, दिशादर्शनाचा

विवेक मराठी    21-Oct-2023
Total Views |
@उदय शेवडे 9421163670
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रभावशाली संघटनेची स्थापना प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरला विजयादशमीच्या दिवशी 1925 साली केली. त्यांच्या मते देशाला पुनःपरमवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर मनुष्यघडणीचे काम करावे लागेल. संघशाखेत चालणारे उपक्रम आणि विजयादशमी यासारख्या उत्सवांतून शाखेवर जे शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रम होतात, त्यातून माणूस आणि कार्यकर्ता घडतो. असा कार्यकर्ता पुढे समाजात सक्रिय होतो, विविध समस्यांचा अभ्यास करतो आणि त्यावर कोणालाही दोष न देता समाजाला बरोबर घेऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
rss
 
देवीमहिमा, रामायण, महाभारत याचा संदर्भ देत असुरी शक्तींवर दैवी शक्तीचा विजय या दृष्टीने विजयादशमीचे - दसर्‍याचे पारंपरिक महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ अशी म्हणही प्रचलित आहे. अतिशय शुभ दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणूनही त्याचे व्यावहारिक महत्त्व आहे. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात या दिवशी झालेली आहे, अनेक जण अजूनही करतात, त्यामुळे हिंदूंच्या दृष्टीने या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वात प्रभावशाली संघटनेची स्थापनाही नागपूरला याच दिवशी झाली. संस्थापक होते पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार! अखिल भारतीय राष्ट्रीय सभेसह (काँग्रेस) नागपूर आणि परिसरातील अनेक विविध संस्थांशी जन्मजात देशभक्त असलेल्या डॉ. हेडगेवार यांचा क्रियाशील सदस्य म्हणून सबंध होता.

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे

संघमंत्र – २०० /- रु.
केशवार्पण – १५० /- रु.

३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
आपला संच आजच नोंदवा…

https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/

 
 
देशाची अवस्था, पारतंत्र्य आणि हिंदूंचा असंघटिपणा अशी स्थिती बघून, देश जर परमवैभवाला न्यायचा असेल आणि जगात ताठ मानेने उभा करायचा असेल, तर मनुष्य घडविण्याचे काम करावे लागेल, माणूस घडला की समाजासमोरच्या आणि देशासमोरच्या समस्या दूर होतील, हा विश्वास त्यांच्या अनेक वर्षांच्या चिंतनातून दृढ झाला. म्हणून त्यांनी 1925 साली विजयदशमीच्या (इंग्रजी दिनांक 27 सप्टेंबर) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेची स्थापना केली. अर्थात त्या दिवशी संघाचे नावही ठरले नव्हते. “आज आपण संघ सुरू करत आहोत” अशी डॉक्टरांनी घोषणा केली, त्यामुळे या संघाच्याही दृष्टीने दिवसाचे महत्त्व आहे.
 
 
विजयादशमीच्या दिवशी नागपूरला जो मुख्य उत्सव होतो, त्यात संघाचे पू. सरसंघचालक काय बोलतात याकडे तमाम देश आशेने बघत असतो. सर्वसाधारणपणे देशकालपरिस्थितीचे आकलन करून देशासंबंधात काय विचार करावा, कार्याची दिशा काय हवी यासंबंधी मूलभूत चिंतन या भाषणात असते.
 
rss 
एका अर्थाने हे भाषण दिशादर्शक असते. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ या उक्तीनुसार संघ नेहमी विचाराला कृतीची जोड देत असतो. भाषणातील जनतेसाठी मुद्दे कोणते व स्वयंसेवकांसाठी कोणते, त्याची विभागणी करून वैयक्तिक पातळीवर आणि शाखा ते प्रांत स्तरावर त्याचे क्रियान्वयन कसे करता येईल, याची चर्चा होते, त्याची योजना आखली जाते. पाठपुरावा म्हणून विविध स्तरांवरचे कार्यकर्ते प्रवास करतात.
 
 
समाजातील संघ हितचिंतक व्यक्ती, संस्था, प्रभावशाली व्यक्ती यांना पुस्तिका स्वरूपात या भाषणाचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त विविध व्यक्तींशी (Opinion Makersशी) संघाचे केंद्रीय, क्षेत्रीय कार्यकर्ते छोट्या समूहात या भाषणावर चर्चा करतात. हा उपक्रम मोठ्या शहरात आयोजित केला जातो.
 
नागपूरच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने (आणि संघ शिक्षा वर्गाचा तृतीय वर्षाचा समारोपप्रसंगी) सरसंघचालक/सरकार्यवाह वर्षभरात ज्या निवडक विशेष, प्रभावशाली व्यक्तींना भेटतात, त्यांना दोन दिवस रेशीमबागेत सहकुटुंब बोलावले जाते. संघाचे जवळून दर्शन आणि कर्मभूमी बघण्याची संधी या विशेष व्यक्तींना या निमित्ताने मिळते.
rss 
 
या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून संघाच्या विविध उपक्रमांत, समाजात अनेक व्यक्ती, संस्था अनेक समाजोपयोगी कामे करत असतात अशा सज्जनशक्ती सहभागी होतात किंवा अशा व्यक्तींच्या/संस्थांच्या कार्यात संघ मदत करतो.
 
संघाची ही स्थिती आपोआप आलेली नाही. सर्व सरसंघचालक, अनेक गृहस्थी कार्यकर्ते, असंख्य प्रचारक यांच्या अविश्रांत मेहनतीचा हा परिणाम आहे.
 
 
नागपूरबरोबर सर्व देशभर शाखा, नगर/तालुका, जिल्हा स्तरावर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन किंवा त्याचे स्वरूप असते. संघाचे स्वयंसेवक या उत्सवाला पूर्ण गणवेशात उपस्थित राहतात.
 
 
या उत्सवात शाखेवर ज्या शारीरिक आणि जे बौद्धिक कार्यक्रम होतात, त्यातून माणूस आणि कार्यकर्ता घडतो असा संघाचा विश्वास आहे. असा कार्यकर्ता पुढे समाजात सक्रिय होतो, विविध समस्यांचा अभ्यास करतो आणि त्यावर कोणालाही दोष न देता समाजाला बरोबर घेऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवात स्वयंसेवकाच्या पालकांना, परिसरातील नागरिकांना, विशेष मान्यवर व्यक्ती यांना तर बोलाविण्यात येतेच, तसेच जनमानसात प्रभाव असलेल्या व्यक्तींना अतिथी म्हणून पाचारण करण्याची संघाची पद्धत आहे. संघावर रचनात्मक, टीका, किंवा संघाला विधायक सूचना करणार्‍यांनाही आवर्जून बोलाविले जाते. त्यांना बोलण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित संघाचा ज्येष्ठ अधिकारी उपस्थितांना संघाचे विचार उपस्थित स्वयंसेवकांसमोर प्रतिपादन करतात.
 
rss 
 
शाखेवर शारीरिक कार्यक्रमाअंतर्गत प्रामुख्याने योगासन, सूर्यनमस्कार, नियुद्ध, दंड, दंडयुद्ध, खेळ, समता, सामूहिक समता असे विविध विषय शिकविले जातात आणि अशा विविध शारीरिक प्रकारांची आकर्षक अशी प्रात्यक्षिके स्वयंसेवक सादर करतात. वर्षभर आपण काय शिकतो त्याचे प्रकटीकरण हा स्वयंसेवकांच्या दृष्टीने एक कौतुकाचा विषय असतो.
 
 
शारीरिक कार्यक्रमांबरोबर बौद्धिक कार्यक्रमाचे प्रकटीकरण होते. संघात भावजागृती, सिद्धान्त, ध्येयचिंतन, त्याचे स्मरण म्हणून काही सांघिक आणि वैयक्तिक गीत, सुविचार - ज्याला शाखेत अमृतवचन असे म्हणतात - शिवाय सुभाषित असे शिकविले जाते, त्याचेही सादरीकरण या उत्सवात होते.
 
 
अशा या शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमांमुळे स्वयंसेवकांचा स्वाभाविकपणे अनेक गुणांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सहज विकास होत असतो. या कार्यक्रमाची तयारी साधारण दीडेक महिना आधी केली जाते, त्याचे पूर्व आणि पूर्ण नियोजन केले जाते. यातून व्यवस्थापनाचे धडे नकळत गिरविले जातात आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांना आणि समाजालाही याचा उपयोग होतो. सांघिक भाव, सामूहिकता (Team Work), नेतृत्वविकास, वेळेचे महत्त्व, सरावामुळे येणारा काटेकोरपणा यातून शिस्तीचे प्रदर्शन होते. ही शिस्त केवळ शरीराला नाही, तर मनालाही लागते. शाखेची शक्ती, त्याचा जनमानसावर सकारात्मक परिणाम होत असतो, याचा अनुभव याची देही याची डोळा अशा उत्सवातून समाज घेत असतो.
 

rss 
 
विजयादशमीच्या या कार्यक्रमांबरोबरच या उत्सवाला जोडून ठिकठिकाणी संघाची पथसंचलनेही निघत असतात. शिस्तीत चालणारे स्वयंसेवक बघून 26 जानेवारीला दिल्लीत निघणार्‍या सैन्याच्या, विविध गृहरक्षक दलांच्या परेडची आठवण येते. समाजाचा ऊर भरून येतो. समाजही मोठ्या संख्येने उपस्थित राहतोच, तसेच संघाच्या या कार्याला पाठिंबा किंवा आशीर्वाद देण्यासाठी ठिकठिकाणी, नाक्यानाक्यावर पुष्पवृष्टी करून, रांगोळी घालून या संचलनाचे स्वागत करतो. संघावर एक प्रकारे विश्वास व्यक्त करतो. विजयादशमीव्यतिरिक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, विविध महापुरुषांना संबंधित दिवशी अभिवादन म्हणूनही संघाचे संचलन काढले जाते.
 
 
स्वयंसेवक आपली नित्यकर्मे सांभाळून, संघाच्या आकर्षक अशा उत्सव प्रात्यक्षिके, संचलन आणि घोषाचा सराव यासाठी लागणारी मेहनत करत असतात, हे विशेष.
 
 
पूर्णपणे भारतीय रागदारीवर, सुरावटींवर आधारित विविध रचना वाजविल्या जातात. संघाच्या घोषात पाश्चात्त्य वाद्यांचा समावेश आहे, त्या वाद्यांना समर्पक भारतीय नावेही देण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने शंख (Bugle/बिगुल), वंशी (बासरी, Flute), वेणू, अनक (Side Drum), पणव (Bass Drum), तूर्य (Trumpet), स्वरद (Clarionate), नागांग (Sexophone), महाशंख (Euphonium), झल्लरी (मोठी झांज), त्रिभुज (Triangle) अशा वाद्यांचा समावेश आहे. यासाठी विविध प्रयोग केले जातात. आगामी काळात संघाच्या घोषात आणखीही काही वाद्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
 
 
संघात विजयादशमीच्या सणाचे असे हे वेगळे महत्त्व आहे. संघाचे कार्यकर्ते संघटन उभारणीसाठी जे प्रयत्न करत असतात, त्याची समाजाला या निमित्ताने प्रचिती येत असते.
 
 
RSS ह्या संघाच्या अद्याक्षरांचे वर्णन अनेकदा Ready for Selfless Service असा केला जातो. विविध आपत्तीच्या वेळी, समाजोपयोगी कामासाठी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता स्वयंसेवक सर्वप्रथम धावून जातो तो आत्मविश्वास, शाखेतून होणार्‍या साध्या कार्यक्रमातून आणि अशा उत्सवाच्या तयारीतून मिळतो.