सातार्‍याची बीजमाता

विवेक मराठी    21-Oct-2023   
Total Views |
सातारा जिल्ह्यातील शिवडे येथील उच्चशिक्षित भारती नागेश स्वामी या 1998पासून स्वावलंबी शेती करतात. याखेरीज देशी बियाणांचे जतन व संवर्धन करतात. आज त्यांच्याकडे सहाशे प्रकारच्या बियाणांची बँक आहे. त्या सापळा पद्धतीने विविध प्रकारची पिके घेतात. साडेतीन एकर शेतीमध्ये त्यांनी असे वेगवेगळे प्रयोग राबविले आहेत.

Seed Mother of Satara
 
भारती नागेश स्वामी या बी.कॉम.पर्यंत शिकलेल्या आहेत. पती नागेश हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण आहेत. तेही नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या पत्नीला मदत करतात. या कार्यात ते प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक श्रीपाद दाभोलकर यांना गुरू मानतात. दाभोलकर यांच्याकडून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे घेतले आहेत. देशी बियाणांचे संकलन, संवर्धन, गुणन, प्रचार-प्रसार करणे हे स्वामी दांपत्याच्या जीवनाचे ध्येय आहे.
 
 
सहाशे प्रकारच्या देशी बियाणांची बँक
 
स्वामी यांनी जेव्हा शेतीला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक गोष्टीत स्वावलंबन होणे महत्त्वाचे आहे. उदा., खत स्वावलंबन, मशागत स्वावलंबन, बीज स्वावलंबन. प्रत्येक वेळेला बाजारात जाऊन हायब्रीड बियाणे आणायचे व ते शेतात पेरायचे. यातून शेतीचा उत्पादन खर्च वाढला, परिणामी हायब्रीड अन्न आहारात येऊ लागले. यातून सुटका होण्यासाठी स्वावलंबन होणे फारच महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटू लागले. यानंतर त्यांचा देशी बियाणांचा शोध सुरू झाला. पहिल्यांदा त्यांनी दोन-तीन प्रकारच्या बियाणांपासून सुरुवात केली. तद्नंतर हळूहळू बियाणांचे संकलन सुरू केले. प्रत्येक वेळेला आपल्या गरजा भागवून बियाणे संकलनाला सुरुवात केली. स्वामी यांच्याकडे सध्या 600 प्रकारच्या गावरान (देशी) बियाणांची बँक आहे. पिकांच्या नैसर्गिक वेळा ठरवून - म्हणजे खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम पिकांची यादी तयार करून त्यानुसार शेतकर्‍यांना त्या हंगामानुसार 90 ते 100 प्रकारची बियाणे उपलब्ध करून देतात.
 
 
Seed Mother of Satara
 
याखेरीज त्यांच्याकडे देशी आंब्याची 38 वाणे आहेत. त्यामध्ये साखरदोडी, राघू, शेपवा, चिंट्या, रायवळ, सफरचंद्या, केळ आंबा इ. जाती आहेत. तसेच 25 प्रकारचे वेगवेगळे कंदाचे वाण आहेत. यामध्ये केवकंद, डागकंद, वरा कोचई कंद इत्यादी. त्यांच्या घरात एकूण पाच माणसे आहेत. त्यांनी 500 प्रकारची आयुर्वेदिक व दुर्मीळ झाडे लावली आहेत. यामध्ये खोकल्यासाठी अडुळसा, गवती चहा, तुळस, कोरफड, आले, गुळवेल (लिंबावरचा), हळद, ओव्याची पाने आदींची लागवड केली आहे.
 
 
त्यांनी तृणधान्ये, कडधान्ये, तेलवर्गीय पिके, कंदवर्गीय, वेलवर्गीय, पालेभाज्या इत्यादीचे बियाणांचे संकलन केले आहे. याशिवाय रानभाज्यांचे 55 प्रकारही त्यांच्याकडे आढळतात. गृहिणींना त्या पालेभाज्यांची रेसिपी शिकवतात. सेंद्रिय शेतीमालावर प्रक्रिया करून स्वत:च्या ब्रँडखाली ‘स्वामी ऑरगॅनिक’ नावाने बाजारात विक्री करतात. त्यांच्याकडे स्वत:चे गुर्‍हाळघर आहे. त्यासाठी सहा माणसे काम करतात. उसापासून पिवळ्या व लाल नैसर्गिक गुळाची निर्मिती केली जाते. भारत सरकारच्या ‘अ‍ॅग्रीकल्चरल इनोव्हेशन इन इंडिया’मध्ये या गुर्‍हाळघराची नोंद झाली आहे.
 
Seed Mother of Satara 
 
याशिवाय वेगवेगळ्या कडधान्यांच्या डाळी जात्यावर तयार केल्या जातात. यामध्ये मूग डाळ, हरभरा डाळ, जवस, बडीशेप, मेतकूट, खपली गहू दलिया, बेसन पीठ, गूळ पावडर, काकवी, आवळ्याचे कोरडे लोणचे इत्यादींचा समावेश आहे.
 
मोकाट कृषी विद्यापीठ
 
एखाद्या शेतकर्‍याचे स्वत:चे विद्यापीठ असावे, असे स्वामी यांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी स्वत:चे विद्यापीठ काढले. यास ‘मोकाट कृषी विद्यापीठ’ असे नाव दिले आहे. मोकाट म्हणजे मुक्त पद्धतीचे विद्यापीठ. कोणीही काहीही शिकावे व शिकवावे, असे या विद्यापीठाचे स्वरूप आहे. निसर्गाच्या चौकटीत राहून, तसेच पशुपक्ष्यांचा विचार करून नैसर्गिक शेती केली जाते. त्याअंतर्गत बियाणांपासून ते विक्रीपर्यंतची सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे. या विद्यापीठाद्वारे त्या बीज संकलन, संवर्धन, गुणन, प्रचार-प्रसार करतात. बचत गटातील महिलांच्या मेळाव्यांतून, विद्यार्थ्यांच्या सहलीतून त्यांना शेतीविषयक धडे शिकविण्यात येतात. प्रत्येक शेतकर्‍याची स्वत:ची अशी छोटी बीज बँक उभी राहावी, यासाठी प्रशिक्षण दिले जाते. मोकाट कृषी विद्यापीठामार्फत गावोगावी बीज बँका उभ्या करण्यात येत आहेत.
 
Seed Mother of Satara 
 
दहा गुंठ्यांतील शेतीचा प्रयोग
 
प्रयोग परिवाराचे श्रीपाद दाभोलकर यांनी दहा गुंठ्यांतील शेती प्रयोगाची संकल्पना मांडली. पाच माणसांच्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला, धान्य, फळांची लागवड करणे अशी ही साधी पद्धत आहे. या तत्त्वावर स्वामी यांनी दहा गुंठ्यांची परसबाग तयार केली आहे. या बागेत एका हंगामात 90 ते 100 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. प्रत्येक शेतकरी कुटुंबाची स्वत:ची परसबाग कशी उभी राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना परसबागेसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते.
 
farmar women's
 
वेगळ्या वाटेने जात नवा आदर्श निर्माण करणार्‍या भारती स्वामी यांना नानाविध संस्थांनी सन्मानित केले आहे. किसान बीजरक्षक पुरस्कार, कृषिकन्या, प्रयोगशील शेतकरी, सेवागिरी शेतीनिष्ठ, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. त्यांचे हे कार्य अनेकींना प्रेरणा देणारे आहे.
 
 
संपर्क
भारती नागेश स्वामी (बीज संकलक)
मु. शिवडे, पो. उंब्रज, ता. कराड
जि. सातारा - 415109
भ्र.: 9423341861/9518501751

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.