कार्यकर्त्यांची‘मोहन’माळ

विवेक मराठी    21-Oct-2023
Total Views |
@नंदकुमार जोशी

rss
एक वडीलधारे - पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहनरावांनी अनेक कार्यकर्त्यांना अडचणीच्या वेळेला, दु:खद समयी धीर दिला, मार्गदर्शन केले. वैद्यकीय मदत असो.. वा इतर काही मोहनराव हे उत्तर असे. संघ समर्पित व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहनराव ढवळीकरांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
 
मोहनराव गेले. कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मोहनमाळेतील पदक निसटले. अनेक कार्यकर्त्यांना आपला मृदू स्वभावाने एकत्र जोडणारे मोहनरावांचे व्यक्तिमत्त्व होते. ते चेंबूरमध्ये काम करत असतानाच माझा त्यांच्याशी परिचय झाला.
 
 
मोहनराव वाशीत राहायला आले व स्कूटरने जाऊन चेंबूरचे काम बघायचे. वाशीत त्यांना भेटणे खूप कठीण असे, कारण अधिकाधिक वेळ ते आपल्या कार्यक्षेत्रातच असत. त्यांना स्कूटर चालविण्यामुळे शारीरिक अडचणी यायला लागल्या, तरीसुद्धा दुर्लक्ष करून व बसने प्रवास करून मोहनराव आपले दायित्व पार पाडत असत. खरे म्हणजे हा त्यांचा स्वभाव होता व हेच मोहनराव होते. शेवटपर्यंत शरीराच्या स्वास्थ्याचा विचार न करता सतत कार्यरत राहणे हाच त्यांचा स्वभाव.
 
 
बर्‍याच प्रवासाअंती एकदा मोहनराव नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात दायित्व घेऊन कामात आले. ठाणे जिल्हा कार्यवाह अशा जबाबदारीत मोहनरावांचा प्रवास व कार्यकर्ते जोडणे असे सुरू झाले. माझा संपर्क अधिक जवळून तेव्हापासून आला व आम्ही कधी घट्ट मित्र झालो, हे कळलेच नाही. ‘मैत्र जिवांचे’ म्हणजे काय, हे मला आज कळतेय.
 
 
स्वत:चे वाहन नसताना ते बस, रिक्षा, ट्रेन असा प्रवास करत असत - मग ते वसई जिल्हा असो वा ठाणे शहर असो वा भाईंदर. बैठकीशिवाय ठरवून अनेकांच्या घरचा प्रवास करत. त्याने अनेक कार्यकर्ते जोडले गेले. नवी मुंबई जिल्हा स्तरावर सहजपणे त्यांच्यामुळे मी नवी मुंबई जिल्ह्यात व पुढे त्यांच्याबरोबर विभागात एकत्र काम करू लागलो. कार्यकर्त्याच्या घरी जाणे व विचारपूस करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. ‘संघकाम घरच्या चुलीपर्यंत पोहोचले पाहिजे’ म्हणजे काय, हे त्यांच्या कामातून आम्ही शिकत होतो.
 

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे

संघमंत्र – २०० /- रु.
केशवार्पण – १५० /- रु.

३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
आपला संच आजच नोंदवा…

https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/

   
मी, मोहनराव, महेश जोशी, हरिओम्जी यांचे एक छान मैत्र तयार झाले होते. मोहनराव बौद्धिक वगैरे या भानगडीत कधी पडले नाहीत, पण प्रत्येक कार्यक्रम-उत्सवाची तयारी, आखणी, बौद्धिक विषय, वक्त्याची निवड इत्यादींवर त्यांचे बारकाईने लक्ष असे. मोठ्या कार्यक्रमापूर्वी आवर्जून त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मोहनराव वेळ देत असत व पूर्ण कार्यक्रमाकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.
 
 
कार्यक्रमात कार्यकर्त्याची काही गडबड वा चूक झाली, तर नंतर त्याच्या घरी जाऊन त्याला ते सांगत असत. गीत वगैरेच्या भानगडीतही ते कधी पडत नसत. पण गुरुपूजनाला कोणते गीत असावे व इतर कार्यक्रमात योग्य गीत कोणते, याचे अचूक मार्गदर्शन ते करीत, त्याकरिता गीतगायकांची तयारीही ते करून घेत.
 
 
किती बारकाईने त्यांनी कार्यकर्ते घडविले, त्याकरिता हे सांगितले आणि त्यांनी अशी एक मोहनमाळ तयार केली.
 
 
साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. अनेक वेळेला त्यांनी विविध विषयांवर लेखनही केलेले आहे.
 
 
विश्व संवाद केंद्राची जबाबदारी आल्यावर मोहनरावांनी न थकता बसने परळपर्यंत प्रवास व त्या निमित्ताने प्रचार विभागातील अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी केल्या व त्याही कार्यक्षेत्रात स्वत:चे एक स्थान निर्माण केले. चेंबूर हायस्कूलमध्ये काम करताना त्यांचा शैक्षणिक विषयांचा अभ्यास जाणवत असे. सतत चर्चा व गप्पा यातून अनेक गोष्टी ते शिकले व इतरांना शिकविले. कदचित या सार्‍याची परिपूर्णता म्हणून स्वत:च्या उतरत्या वयात त्यांनी journalism course केला व ते करत असताना त्या विषयातील तज्ज्ञ जोडले व नवी मुंबईतील काही जणांना लिहितेही केले.
 
 
नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांच्या संपर्कामुळे अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असे. त्याचा वेगळा ऊहापोह करावा लागेल.
 
 
एक वडीलधारे - पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहनरावांनी अनेक कार्यकर्त्यांना अडचणीच्या वेळेला, दु:खद समयी धीर दिला, मार्गदर्शन केले - मग ते विवाहजुळणी असो वा एकाद्यास वैद्यकीय मदत, हॉस्पिटल संपर्क असो.. मोहनराव हे उत्तर असे. त्याच्या जाण्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचे मला जे फोन आले, त्यात कार्यकर्त्यांनी ह्याचा आवर्जून उल्लेख केला.
 
 
नवी मुंबईबरोबरच त्यांनी रत्नागिरी, गोवा विभागात अनेक मित्र, साहित्यिक रसिक जोडले होते. त्यांच्या गोव्याच्या एका परिचितांनी मला फोन करून सांगितले की ते मोहनरावांना व्यक्तिश: कधी भेटले नव्ह्ते, पण त्यांच्या जाण्याने त्यांना आज पोकळी जाणवते.
शेवटी साहित्य परिषदेची जबाबदारी असताना, त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्वत:ची प्रकृती अस्वस्थ असतानाही प्रवास झेपणार नाही हे लक्षात आल्यावर मोहनरावांनी स्वत:च्या घरी सर्व प्रांत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. साहित्य परिषदेचा अभ्यासवर्ग, नियमित बैठक आणि आता साहित्य संमेलन अशा अनेक योजना त्यांच्या मनात रेंगाळत होत्या.
 
 
असे हे मोहनमाळेतील तबक काळाने आपल्यातून हिरावून नेले. कदाचित त्यांच्या मनांतील अनेक संकल्पनांना मूर्त रूप देण्याकरता वेळ देऊन ते संकल्प पूर्ण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू या.