धर्मांतर, दहशतवाद व इतर बाबींच्या संदर्भात आपल्याकडे इस्लामचा धोका वरचेवर दाखवला जात असला, तरी हळूहळू परंतु अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून भारताला ख्रिस्ती धर्मांतराच्या व त्यातून येणार्या फुटीरतावादाच्या ज्वालामुखीवर बसवले जात आहे, हे लक्षात येईल. आगामी राज्य निवडणूक आणि सार्वत्रिक निवडणूक पाहता ही मंडळी अन्य देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून आपले धर्माचे व धर्मोपदेशकाचे मुखवटे फेकून देत देशाचा निव्वळ राजकीय आखाडा करतील, यात शंका नाही.
@राजेश कुलकर्णी
भारतीय संस्कृतीवरील आक्रमणांच्या बाबतीत सहसा इस्लामी शासकांची व इस्लामच्या स्वरूपाची चर्चा होते. जगभराप्रमाणे इस्लामच्या भारतासमोरील आव्हानाबद्दल बोलले जाते. इस्लामचा प्रसार हा सहसा आक्रमक मार्गांनी होत असल्याचे दिसते. त्या मानाने ख्रिस्ती धर्माचे भारतीय संस्कृतीवरील आक्रमण व ख्रिस्ती मिशनर्यांचे धर्मांतरे घडवण्याचे मार्ग यांची फारशी चर्चा घडताना दिसत नाही. वास्तव हे आहे की जगभरात इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांची आपल्या धर्मीयांची लोकसंख्या वाढवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा चाललेली दिसते. भारतात मात्र हे दोघे मिळून हिंदू धर्माचे लचके तोडण्यात गर्क असतात. यात हेदेखील स्पष्ट करायला हवे की धर्म या शब्दाची व्याप्ती पाहता आणि एकेश्वरवादाचे रूपांतर हेकेखोरेश्वरवादात झाल्याचे पाहता इस्लाम वा ख्रिस्ती यांना धर्म म्हणणे हे त्या शब्दाचे अवमूल्यन ठरते. यांना संप्रदाय म्हणणे अधिक उचित ठरते.
अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर आणि धार्मिक आक्रमणांनंतरही भारतामध्ये हिंदू (सनातन धर्मीय) व हिंदू संस्कृती टिकून राहिली, याचा आपल्याला यथार्थ अभिमान असतो. वास्तवात मात्र ते केवळ अर्धसत्य असते. पारतंत्र्यातच नव्हे, तर येथून ब्रिटिश गेल्यानंतरही भारतीय पराभूतांच्या मानसिकतेतच राहतील, अशी व्यवस्था हेतुपुरस्सर बनवली गेली. या मानसिक गुलामगिरीमुळे विविध विषयांबाबतच्या भारतीयांच्या समजुतींमध्ये गंभीर स्वरूपाचे घोटाळे निर्माण झाले. इस्लाम व ख्रिस्ती हे धर्म निरंकुशपणे हिंदू धर्माचे लचके तोडत असताना ‘सर्व धर्म समान’ आहेत, हा प्रस्थापित करण्यात आलेला विमर्श (नॅरेटिव्ह) हिंदूंसाठी आणि पर्यायाने भारतासाठी धोक्याचा ठरतो.
क्रूरकर्म्याबाबतचे हिंदूंचे अज्ञान आणि इतिहासाचे विकृतीकरण
पोर्तुगीजांकडून गोव्यात घडवल्या गेलेल्या धार्मिक अत्याचारांबाबत हिंदूंमध्ये आजही संपूर्ण अज्ञान आहे. सहलीसाठी गोव्यात गेल्यावर सेंट झेवियर चर्चच्या भव्यतेचे मनोमन कौतुक केले जाते. तेथे सेंट झेवियरचे अवशेष आजही ठेवलेले आहेत. त्याने हिंदूंचे धर्मांतर घडवण्यासाठी अत्याचारांची एक प्रकारची रूपरेखा बनवून ठेवली होती आणि नंतर ती प्रत्यक्षात आणली गेली, हे जर हिंदू पर्यटकांना माहीत झाले, तर त्या चर्चच्या भव्यतेचे कौतुक होण्याऐवजी त्यांचे मन दु:खाने व वेदनेने भरून जाईल. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’ या विषयाबाबत वाचावे. हिंदूंच्या नाकावर टिच्चून भारतामध्ये याला सेंट म्हणण्याचे धाडस केले जाते, ते तर आणखी वेगळे. औरंगजेबाच्या थडग्याला भेट देण्याचा निषेध केला जातो आणि या चर्चला भेट देताना मात्र जणू काहीच घडले नव्हते, असा सजग हिंदूंच्या मानसिकतेतला विरोधाभास दिसतो.
याचप्रमाणे ईशान्य भारतासह भारताच्या विविध भागांमधील आदिवासींच्या घाऊक धर्मांतरांबाबतही हिंदू बव्हंशी अनभिज्ञ असल्याचे दिसते. इतिहासाचे विकृतीकरण हा विषय आपल्याकडे सहसा आपल्या खर्या नायक-नायिकांचा इतिहास लपवून ठेवल्यामुळे झाले. केरळमध्ये चर्चने नवाच इतिहास करण्याचे उद्योग आरंभले आहेत. देशातील ख्रिस्ती धर्म फार जुना आहे, हा खोटा विमर्श प्रस्थापित करण्यासाठी अगदी इसवीसन 50 या वर्षात थॉमस हा केरळमध्ये दाखल झाल्याचे प्रसवले जात आहे. रामसेतू हे नाव या देशात फार पूर्वीपासून असूनही त्याला ‘अॅडॅम्स ब्रिज’ म्हणण्याचा खोडसाळपणाही तसाच.
येशू वचनातील येशूची तलवारधारी प्रतिमा हिंदूंनी लक्षात ठेवावी
धर्मांतरामागचा ख्रिस्ती सिद्धान्त
ख्रिस्ती संप्रदायाकडून भारतासह जगभरात घडवल्या जात असलेल्या धर्मांतरांमागे सैद्धान्तिक पातळीवर काय आहे? ‘मी येथे शांतता घेऊन आलेलो आहे असे मला वाटत नाही. मी शांतता नव्हे, हातात तलवार घेऊन आलो आहे’ असे स्वत: येशूचे वचन आहे (मॅथ्यु 10.34). ‘जे माझ्यापूर्वी आले ते सारे चोर व डाकू होते’ हे येशूचे सांगणे आहे (जॉन 10.8). ‘मला पृथ्वीवरचे व स्वर्गाचे सारे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे जगातल्या सर्व देशांमध्ये जा आणि त्यांना धर्मांतरित (बॅप्टाइज) करा’ (मॅथ्यू 28:18). ही व अशी विधाने पाहिली की खरे तर ख्रिस्ती संप्रदाय शांततेचा संदेश पसरवतो हा समज खोटा ठरतो. कारण त्यात इस्लामप्रमाणेच सर्वश्रेष्ठत्वाची भावना आहे आणि ते त्याप्रमाणे शक्य त्या पद्धतींनी हिंदूंना बाटवण्याचे काम करत राहतात आणि म्हटले तसे हिंदूच ‘सर्व धर्म सारखेच’ अशा बावळट कल्पनेत रमतात व बेसावध राहतात. त्यामुळे येशूची प्रेमळ व करुणेने ओतप्रोत भरल्याचे भासणारी प्रतिमा डोळ्यासमोर येत असली, तरी त्याच्याच वचनाप्रमाणे त्याची तलवारधारी प्रतिमा हिंदूंनी मनात ठसवून घ्यायला हवी.
भारतीय नेतृत्वाची लाचारी
भारतातील मानसिक गुलामीमुळे चालू असलेला मिशनर्यांचा उच्छाद पाहण्यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही. ब्रिटिश मिशनरी वेरियर एल्विन याची लैंगिक विकृती आणि त्याचा धर्मांतराचा हेतू जगजाहीर असताना नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी मध्य भारतासह ईशान्य भारत जणू त्याला आंदण दिला होता. ईशान्य भारतात झालेल्या घाऊक धर्मांतराची बीजे नेहरूंनी प्रोत्साहन दिलेल्या या आत्मघातकीपणात आहेत. अलीकडे बिहार-झारखंडमध्ये धर्मांतराला प्रोत्साहन देणारा फादर स्टॅन स्वामी असे फसवे नाव धारण करणार्या अर्बन नक्षली इसमाला मानवाधिकारांचा पुरस्कर्ता म्हणवत त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण करणारे हिंदू होते, हे पाहता हे विष केवढे खोलवर भिनलेले आहे, याची कल्पना येईल.
हिंदूंचे ‘आ बैल मुझे मार’
चर्चने चालवलेल्या शाळांमध्ये हिंदूंना प्रवेश तर दिला जातो, मात्र तेथे हिंदू धर्माच्या कोणत्याही खुणा दिसण्यास प्रतिबंध केला जातो. तेथील ख्रिस्ती संस्कार मनात इतके घट्ट बसवले जातात की तेथे जाणार्या विद्यार्थ्यांच्या मनात हिंदू धर्माबद्दल अनास्था निर्माण होते, प्रसंगी तिटकाराही निर्माण होतो. आजी पूजा करत असताना तो देव ‘तिचा’ आहे, ‘माझा’ नाही, असे म्हणणार्या छोट्या नातीचे उदाहरण सरसंघचालकांनी नुकतेच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना दिल्याचे काही जणांना स्मरत असेल. भारतीय शिक्षण कनिष्ठ दर्जाचे असल्याचे समजत मुलांना शिक्षणासारख्या अतिशय संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाच्या निमित्ताने या धर्मप्रसारकांच्या ताब्यात सोपवणार्या हिंदूंबद्दल काय बोलावे! किती हिंदू मुले या चरकातून बाहेर पडूनही हिंदू धर्माबद्दल आणि संस्कृतीबद्दल सजग राहू शकत असतील!
हिंदूंचा बेसावधपणा
हिंदूंमधील बहुतेक जण ख्रिसमस किंवा नवे वर्ष आले की जणू घरचे कार्य असल्यासारखे सज्ज होत असताना दिसतात. या देशात ख्रिस्तींची संख्या किती आणि तरीही हा उत्साह नक्की कोणाचा असतो, यावरूनही हे कळू शकेल. जगभरात या गुलामी मानसिकतेचे उदाहरण क्वचितच दिसत असेल. अर्थात या गुलामीची मुळात जाणीव असली, तरच हे कळेल. कारण आपल्या शेजारी राहणारा ख्रिस्ती ’गॉड फियरिंग’ असतो. तो या कशातच सहभागी नसतो अशी या हिंदूंची भोळीभाबडी कल्पना असते. जेव्हा हे चर्चमध्ये जातात व तेथे नवधर्मांतरित व्यक्तीचा परिचय करून दिला जातो, तेव्हा याचे धर्मांतरण का केले गेले, हा प्रश्न या गॉड फियरिंग व्यक्तीला पडतो का? मुळातच आपला ‘शांततेचा व प्रेमाचा संदेश देणारा धर्म’ इथल्या लोकांना बाटवण्याचा आग्रह का करतो, हा मूलभूत प्रश्न त्यांना पडतो का? त्यामुळे तेव्हा हिंदूंच्या या बाबतच्या समजुती किती वरवरच्या असतात, हे कळू शकते. गुरुत्व नसलेला गुरू नसतो, तसेच हिंदुत्व नसलेला हिंदूही नसायला हवा. यातले काहीच माहीत नसलेले काही हिंदू मात्र ’मी हिंदू आहे, पण मला हिंदुत्व मान्य नाही’ अशा वैचारिक दिवाळखोरीची उधळण करताना दिसतात.
ख्रिस्ती धर्मांतराचे देशव्यापी धोके
तामिळनाडूमध्ये हिंदू संस्कृतीची चिन्हे ठळकपणाने दिसत असतानाही तामिळ लोक हे द्रविड म्हणजे अन्य भारतीयांपेक्षा वेगळ्या वंशाचे असल्याचे ब्रिटिशांनी त्यांच्यावर ठसवले असे सांगितले जात असले, तरी हे काम प्रत्यक्षात ख्रिस्ती मिशनर्यांनी केले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा उदयनिधी सनातन धर्माविरुद्ध गरळ ओकण्याचे आज काम करत असला, तरी या मिशनर्यांच्या प्रभावाखालील पेरियारसारख्यांनी हे विष ब्रिटिश भारत सोडून जाण्याच्या आधीपासून तिकडे पेरलेले होते, हे लक्षात घ्यायला हवे. आज तामिळनाडूमधील द्रमुक सरकार ख्रिस्ती धर्मांतराकडे दुर्लक्ष करते, हे उघड गुपित आहे. तामिळनाडूमध्ये लावण्या या बारावीतील हिंदू मुलीवर धर्मांतरासाठी शाळेकडून सतत दबाव टाकला गेल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना मागच्याच वर्षीची आहे. हे तामिळनाडूमधले झाले. ब्रिटिशांनी शीख व हिंदूंमध्ये दरी निर्माण होईल यासाठीही प्रयत्न केले. आज याचा परिणाम म्हणून कट्टर शीख हिंदूंपासून फटकून वागत असताना दुसरीकडे शिखांचे ख्रिस्ती धर्मांतर केले जाण्याच्या बातम्या आता ऐकू येतात. देशातील ख्रिस्ती धर्मांतरामध्ये शीख ख्रिस्ती बनण्याचा दर सर्वाधिक आहे, असे सांगितले जाते. तेव्हा ब्रिटिशांनी केवळ हिंदू-मुस्लीम फुटीला प्रोत्साहन दिले ही समजूत किती वरवरची आहे आणि त्यामागे ख्रिस्ती धर्माचाही कसा हात होता, हे वास्तव सर्वदूर होण्यास किती काळ जावा लागेल, याची कल्पनाच केलेली बरी.
काँग्रेसी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे 2009मध्ये हेलिकॉप्टर कोसळून निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी ते ख्रिस्ती असल्याचे संपूर्ण देशाला कळले.
आंध्र प्रदेश व तेलंगण एकत्र असतानाचे काँग्रेसी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे 2009मध्ये हेलिकॉप्टर कोसळून निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी ते ख्रिस्ती असल्याचे संपूर्ण देशाला कळले. एरवी कोणत्या नेत्याचा धर्म कोणता, याने फरक पडायला नको. मात्र त्यांचाच आता मुख्यमंत्री असलेला मुलगा वाय.एस. जगन मोहन रेड्डी आताच्या आंध्र प्रदेशमध्ये दलितांच्या ख्रिस्ती धर्मांतराला उघडपणे प्रोत्साहन देत असल्याचे उघड झालेले असल्यामुळे हे घराणे सत्तेत असण्यामागे केवढे मोठे कुटिल कारस्थान आहे हे कळू शकते. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर काँग्रेसी नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा प्रत्यक्षात ‘भारत तोडो’ स्वरूपाची कशी होती, हेदेखील पाहता येईल. यात्रेच्या सुरुवातीच्या टप्प्यात केरळमधील एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाने त्यांच्यासमोर हिंदू देवतांची उघडपणे निंदानालस्ती करत ख्रिस्ती हिंदूंपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत, हे सांगण्याचे धाडस दाखवले. राहुल गांधी यांनी त्याची हिंदुद्वेष्टी समज दुरुस्त करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. पुढे मध्य प्रदेशमधील मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश देणार्या आदिवासी भागात त्यांची सभा झाली. तेथे वनवासी-आदिवासी यावरून दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न त्यांनी जाहीरपणे केलाच, दुसरीकडे या भागात चालू असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराबाबत चकार शब्द काढला नाही.
मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे चर्च
आणखी एका संतापजनक घटनेचा आवर्जून उल्लेख करणे गरजेचे आहे. क्वचितच कोणाला याची माहिती असेल. देश कोविडचा मुकाबला करण्यात गुंतलेला असताना चर्चने अगदी सहजपणे पन्नास हजार खेड्यांमध्ये चर्च पोहोचवले. कोविड काळ चर्चसाठी उपकारक ठरला, अशी टिप्पणी भारतीयांसाठी धोक्याची अखेरची घंटा मानायला हवी की नको? त्यांनी हे ‘यश’ कसे मिळवले? तर या विविध खेड्यांमध्ये जे लोक यांनीच आधी ख्रिस्ती बनवले आहेत, त्यांनी त्यांच्या भागातील बिगरख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करायची. त्या प्रार्थनेचा काही उपयोग झाला का हे पाहण्यासाठी या लोकांशी संपर्क साधायचा. कोविडच्या काळात या प्रत्येकाला भेटून चौकशी करणे शक्य नव्हते, म्हणून फोन करण्याबरोबरच व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्यासारखे आधुनिक उपाय योजले गेले. अशा प्रकारे या लोकांना ख्रिस्ताच्या चरणी आणले गेले. अनेक खेड्यांमध्ये हाउस चर्चेस उभी केली गेली. खेड्यातील सगळे ख्रिस्ताच्या पायाशी गेले की ते खेडेच ख्रिस्ती म्हणून घोषित केले जाते. UnfoldingWord या अमेरिकी एनजीओच्या भारतातील सहयोगी संस्थेने हे सारे काम केले. जगभरातील प्रत्येक भाषेत बायबल उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख काम. त्यांच्या अध्यक्षाने सांगितले की गेल्या पंचवीस वर्षांत आम्हाला जमले नाही, तेवढे काम आम्हाला केवळ कोविड काळात करता आले. जेव्हा देशातील मंदिरे राज्य सरकारांना मदत करण्यात गुंतली होती, त्या कोविड काळात परदेशातून येणार्या चर्चच्या निधीवर कसलेच नियंत्रण नव्हते. चर्चची गिधाडे या काळात आपले असे काळे धंदे आणखी जोमाने करण्यात गुंग होती.
चर्चचा आंतरराष्ट्रीय दबाव
भारताबाहेरची इस्लामची शक्ती सर्वसाधारणपणे परिचित आहे. मात्र चर्चची भारताबाहेरची शक्ती कल्पनेच्या पलीकडची आहे. दिल्ली विधानसभेच्या एका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीयांना याची चुणूक पाहायला मिळाली होती. मतदानाच्या काही दिवस आधी दिल्लीतील दोन-एक चर्चवर किरकोळ दगडफेक करवली गेली. त्याचे पडसाद थेट व्हॅटिकनमधून उमटले. मतदान संपल्यानंतर एकही दगड पडला नाही, हे विशेष. देशाला ज्या ज्या वाळवीने पोखरले आहे, त्यापैकी हिंदूंच्या धर्मांतरांबाबत अवाक्षरही न काढणारी चर्च ही एक जागतिक संस्था आहे. पोपना आजवर यावरून कोणी जाब विचारल्याचे पाहण्यात नाही. तेरेसाबाईंना भारतरत्न देण्यासारखा शिसारी आणणारा प्रकारही याच देशात घडला. अनेक वर्षांनंतर त्यांचे ढोंग दाखवणारा अग्रलेख मराठीतील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या संपादकांना मागे घ्यावा लागला. ही घटना तुलनेने छोटी वाटली, तरी हा दबाव लक्षात येण्यासाठी पुरेशी आहे.
पोपना आजवर यावरून कोणी जाब विचारल्याचे पाहण्यात नाही. तेरेसाबाईंना भारतरत्न देण्यासारखा शिसारी आणणारा प्रकारही याच देशात घडला. अनेक वर्षांनंतर त्यांचे ढोंग दाखवणारा अग्रलेख मराठीतील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या संपादकांना मागे घ्यावा लागला. ही घटना तुलनेने छोटी वाटली, तरी हा दबाव लक्षात येण्यासाठी पुरेशी आहे.
या देशव्यापी प्रकारांबाबत गंभीर चर्चा करण्याऐवजी अगदी सर्वोच्च न्यायालयदेखील एकीकडे फसवून धर्मांतर घडवले जाण्याबाबत चिंता व्यक्त करत सरकारला त्याबाबत पावले उचलायला सांगते, तर दुसरीकडे या धर्मांतरामागची कुटिल कारस्थाने लक्षात न घेता ’प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे’ असे सवंग मत व्यक्त करते, तेव्हा निश्चितपणे काळजी वाटण्यासारखी स्थिती निर्माण होते.
छुपे ख्रिस्ती व चर्चचे राजकारण
‘चर्चचे राजकारण’ ही द्विरुक्ती आहे. कारण चर्च या शब्दामागची संकल्पना एका इमारतीत सर्वांनी मिळून प्रार्थना करण्यापुरती मर्यादित नसून चर्चचा खरा अर्थ ‘नागरिकांची राजनैतिक सभा’ हा आहे हे लक्षात घेतले, तर ही द्विरुक्ती कशी हे कळू शकेल. तेव्हा चर्च राजकारण करते हे गृहीतच धरायला हवे.
इस्लाममध्ये करवून घेतलेले धर्मांतर सहसा लपण्यासारखे नसते. कारण त्यात मशिदीत जाणे, नमाज पढणे, वेशभूषा अशा सामूहिक क्रियांची सक्ती असते. ख्रिस्ती धर्मांतरांबाबत मात्र तसे नाही. चर्चच्या प्रभावाखाली येऊन ख्रिस्ती बनले, तरी ते बाह्यस्वरूपात दाखवण्याची सक्ती नसते. त्यामुळे किती जणांचे धर्मांतर घडवले हे चर्चला नक्की ठाऊक असले, तरी सरकारी यंत्रणांना ते खात्रीपूर्वक कळणे कठीण असते. अशा क्रिप्टोख्रिस्तींची - म्हणजे छुप्या ख्रिस्तींची निश्चित संख्या किती, हे आजमावण्याचे वेगळेच आव्हान त्यातून निर्माण होते. देशातील मुस्लिमांचा अनुनय करत त्यांची एकगठ्ठा मते मिळवत आपले अस्तित्व राखायचे, हा देशातील अनेक राजकीय पक्षांचा अजेंडा असत आला आहे. सुरुवातीला यात असलेली काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढत बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांनी तेच केले. केरळ, गोवा, ईशान्येतील राज्ये, झारखंडमधील आदिवासी पट्टे अशा अनेक भागांमध्ये ख्रिस्ती एकगठ्ठा मतदान होते. गोव्यामधील निवडणुकीपूर्वी तेथील एक धर्मोपदेशक साप्ताहिक मार्गदर्शनाच्या वेळी त्याच्या मतदारसंघात जातीय व धार्मिक आधारावर मतदारांचे बलाबल कसे आहे, हे सांगत असलेला व्हिडिओ मागे प्रसृत झाला होता. इस्लाम असो की ख्रिस्ती, वास्तव बव्हंशी हेच आहे.
भाजपा हा ख्रिस्तीविरोधी पक्ष आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही, अशा स्पष्ट शब्दात आपल्या भावना व्यक्त करत फादर मत्तम यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले. चर्च देशातील विविध राजकारण्यांना हाताशी धरून आपला धर्मांतराचा कावा कसा साधते, याची अनेक उदाहरणे वर दिली आहेत. याखेरीज चर्च आपल्या संप्रदायापुरते मर्यादित न राहता थेट राजकारणात कशी ढवळाढवळ करते, याची अनेक उदाहरणे केरळमध्ये दिसतात. केरळमध्ये चर्चचे विविध अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या जवळ जात आहेत. ‘राष्ट्रीय मुस्लीम मंच’च्या धर्तीवर तेथे ‘भारतीय ख्रिश्चन संगम’ ही संघटना स्थापन केली गेली आहे. कच्च्या रबराच्या खरेदी किमतीत भरीव वाढ केल्यास आपण भाजपाला एक तरी लोकसभेची जागा मिळेल अशी व्यवस्था करू, असा देकार तेल्लीचेरीच्या आर्चबिशपनी दिला आहे. त्रिसूरचे आर्चबिशप रा.स्व. संघाशी जवळीक साधणार्या सिरियन ख्रिश्चनांच्या एका संस्थेला पाणीपुरवठा करतात. सायरो-मलबार चर्चच्या प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत ख्रिस्तींना सुरक्षित वाटत असल्याचे प्रशस्तिपत्र दिले होते. असे विविध प्रवाह माहीत असतानाही निवृत्तीच्या जवळ आलेल्या मानकुवातील एका धर्मोपदेशकाने भाजपाचे सदस्यत्व घेतल्यावरून त्याची पदावनती करत बदली करण्याची घटना मागच्या आठवड्यात घडली. गेल्या काही काळामधील देशातील विविध घटना पाहता भाजपाचे सदस्यत्व घेऊ नये, असे वाटणारे एकही कारण आपल्याला दिसले नाही आणि भाजपा हा ख्रिस्तीविरोधी पक्ष आहे असे आपल्याला अजिबात वाटत नाही, अशा स्पष्ट शब्दात आपल्या भावना व्यक्त करत फादर मत्तम यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले. या घटना पाहता केरळमधील विविध शाखांच्या चर्चमध्ये वैचारिक घुसळण तरी होत आहे, यावर तूर्त समाधान मानता येईल.
वरील घटना अपवादात्मक वाटाव्यात हे चर्च देशभरात वारंवार सरकारविरोधी उघड भूमिका घेते, यावरून दिसून येते. वर उल्लेख केलेल्या ‘भारत तोडो’चे स्वरूप आलेल्या राहुल गांधी यांच्या यात्रेच्या वेळी त्यात सहभागी झालेल्या चर्चच्या अधिकार्यांनी केंद्र सरकारवर कडक टीका केल्याचे दिसले होते. ‘न्यूजक्लिक’ या संस्थळाच्या प्रमुखांना अलीकडेच झालेल्या अटकेवरून चर्चच्या काही अधिकार्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. वास्तविक चर्चचा या घटनेशी काय संबंध्य असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विशेष म्हणजे स्वत:ला धर्मोपदेशक म्हणणारे हे लोक देशातील सर्व जनतेच्या वतीने पुढील निवडणुकीत हे सरकार उखडून टाकू, असा दावा करतात.
धर्मांतराविरुद्ध कारवाई
धर्मांतरविरोधी कायद्याची नितांत गरज असल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी ‘सक्तीचे धर्मांतर’ नक्की कशाला म्हणायचे, यातील संभाव्य अडचणींमुळे असा कायदा बनणे अवघड आहे, असे समजायला जागा आहे. जगभरात धर्मांतर घडवणार्या इस्लाम व ख्रिस्ती धर्मांमधील शक्तींनी याबाबत अनेक पळवाटा प्रस्थापित करून ठेवलेल्या असल्यामुळे हे होत असावे. येशूला हिंदू देवतांच्या स्वरूपात दाखवून भोळ्या हिंदूंना फशी पाडण्याचे प्रकार सररास चालू झाले आहेत. हे कायद्याच्या कचाट्यात बसवायचे, तर हिंदूंवर संकुचितपणाचा आरोप करणारे हिंदूच असतील यात शंका नाही. काहीही असले, तरी अशा कायद्यात वेळोवेळी बदल करावेच लागतील, हे गृहीत धरून असा कायदा लवकरात लवकर आणण्याची गरज आहे. इस्लाम काय किंवा ख्रिस्ती काय, देशातील अस्वस्थतेच्या मुळाशी असलेल्या अनेक घटकांमध्ये ‘हिंदूंचे धर्मांतर’ हा एक प्रमुख घटक आहे, हे लक्षात घेतले तर असा कायदा आणण्यास आणखी उशीर करणे किती जड जाऊ शकते, याचा अंदाजच केलेला बरा.
तरीही उत्तर प्रदेशमध्ये एका तक्रारीवरून एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात भिवंडीजवळील आदिवासी भागामध्ये ख्रिस्ती धर्मांतराचा प्रयत्न करणार्या टोळीला तेथील एका आजीबाईंनी उद्वेगाने चपलेने मारून पिटाळून लावण्याची घटना घडली. म्हटले तसे वैयक्तिक पातळीवर सजग राहणे आणि धर्मांतरबंदी कायद्याचे संरक्षण असणे यात मोठा फरक आहे आणि त्यामुळे वैयक्तिक प्रयत्नांना मर्यादा पडतात. दुसरीकडे या टोळ्या अन्यत्र जाऊन तेच धंदे करण्यास मोकळ्या राहतात.
चर्च आणि लैंगिक शोषण
चर्चच्या अधिकार्यांकडून होत असलेले मुले, मुली, महिला व पुरुष अशा सर्वांवरच होणारे घाऊक लैंगिक अत्याचार हा प्रकार केवळ भारतापुरता मर्यादित नाही. चर्च आणि लैंगिक शोषण हे प्रकार एकरूप वाटावेत इतका हा जागतिक पातळीवरचा व्यापक व गंभीर प्रकार आहे. अमेरिका, युरोपसह सर्व जगभर हे प्रकार एव्हाना सर्वपरिचित आहेत. हे प्रकार उघड होऊनही चर्चने त्याची वाच्यता होऊ नये याकरता केलेले प्रयत्न व अशा धर्मोपदेशकांना घालवण्याऐवजी त्यांची इतरत्र बदली करणे, हेदेखील असंख्य प्रकरणांमध्ये घडले आहे. हा कोणत्या दृष्टीने धर्माचा भाग म्हणून चालवून घेतला जातो, हे चर्चच जाणे. चर्चला या घृणास्पद प्रकारांना बळी पडलेल्या मुला-मुलींची जाहीर माफी मागावी लागली आहे. भारतात मात्र या प्रकारांबद्दल ब्र काढला जात नाही. पाच वर्षांपूर्वी केरळी ननने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची वाच्यता करण्याचे धाडस केले, तर तिलाच बहिष्कृत केले गेले आणि तिच्यावर अत्याचार करणार्या चर्चच्या अधिकार्याला निर्दोष ठरवले गेले. शाहबानो प्रकरणासारखाच हादेखील अतिशय गंभीर प्रकार असूनही.. किंबहुना त्यामुळेच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्यांनी यावरून कोणतेच आंदोलन केल्याचे दिसले नाही.
आताचे पोप ख्रिस्ती धर्माच्या बंदिस्त स्वरूपात सुधारणा करू पाहत आहेत. त्याचा भाग म्हणून धर्मोपदेशक बनण्याबाबत असलेली पुरुषांची मक्तेदारी संपवत महिलांना धर्मोपदेशक बनण्याची संधी देण्याची दोन वर्षांची प्रायोगिक तत्त्वावरची योजना त्यांनी जाहीर केली आहे. ही योजना ऐच्छिक असली, तरी या योजनेला प्रस्थापितांकडून कडवा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तेव्हा धर्मांतर, दहशतवाद व इतर बाबींच्या संदर्भात आपल्याकडे इस्लामचा धोका वरचेवर दाखवला जात असला, तरी हळूहळू परंतु अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून भारताला ख्रिस्ती धर्मांतराच्या व त्यातून येणार्या फुटीरतावादाच्या ज्वालामुखीवर बसवले जात आहे, हे लक्षात येईल. आगामी राज्य निवडणुकांच्याच वेळी नव्हे, तर पुढच्या वर्षीची सार्वत्रिक निवडणूक पाहता ही मंडळी अन्य देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून आपले धर्माचे व धर्मोपदेशकाचे मुखवटे फेकून देत देशाचा निव्वळ राजकीय आखाडा करतील, यात शंका नाही. म्हटले तसे हे केवळ संप्रदाय असल्यामुळे त्यांना आध्यात्मिकतेचा स्पर्शही नाही आणि अशा निमित्तांनी त्यांचे उघड होत असलेले विद्रुप रूप विसरून देशाची जनता पुन्हा ‘सर्व धर्म सारखेच’ या गुंगीत जाणार नाही, अशी आशा बाळगायला हवी.