सुनील शिनखेडे
9975265293
भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजे पितृपंधरवडा, मात्र हा काळ अशुभ मानला जातो. वास्तविक पितृपक्ष हा शुभकाळच आहे. वर्ज्य काळ नाही. आपल्या पूर्वजांचे, पितरांचे श्रद्धेने आणि कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा काळ. आपण सदैव सत्कर्म करून पितरांना उत्तम गती लाभण्यासाठी प्रार्थना करण्याचा हा काळ. अशा या उत्तम काळाला विनाकारण वर्ज्य वा अशुभ ठरवण्यामागे शास्त्राबद्दलचे अज्ञान आणि नेमके जाणून घेण्याच्या जिज्ञासेचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत.
अनंत चतुर्दशी झाली की पौर्णिमेनंतर दुसर्या दिवशी भाद्रपद कृष्णपक्ष सुरू होतो. कृष्णपक्षातील हे पंधरा दिवस पितृपंधरवडा, महालय किंवा पितृपक्ष म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागात यालाच म्हाळ असेही म्हटले जाते. पितृपक्षाविषयी शास्त्रात काय सांगितले आहे, याची नेमकी माहिती नसल्यामुळे हल्ली वर्तमानात अनेकांचा गैरसमज होताना दिसतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे हा काळ शुभ नसतो, हा होय. वास्तविक पितृपक्ष हा शुभकाळच आहे. वर्ज्य काळ नाही. तसे असण्याचे काहीच कारण नाही. आपल्या पूर्वजांचे, पितरांचे श्रद्धेने आणि कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा हा काळ. आपण सदैव सत्कर्म करून पितरांना उत्तम गती लाभण्यासाठी प्रार्थना करण्याचा हा काळ. अशा या उत्तम काळाला विनाकारण वर्ज्य वा अशुभ ठरवण्यामागे शास्त्राबद्दलचे अज्ञान आणि नेमके जाणून घेण्याच्या जिज्ञासेचा अभाव हे घटक कारणीभूत असावेत, असे वाटते.
नेमके जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून जे वाचन, श्रवण आणि कृतीचे संस्कार झाले, त्याआधारे जिज्ञासाजागृती करून गैरसमज दूर करावे, इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. ‘श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध’ या उक्तीचा उचित भाव लक्षात घेता श्राद्ध हे श्रद्धावानांसाठीच आहे. पितृपक्ष हा वादाचा किंवा अश्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा तर मुळीच विषय नाही. उलट, जिज्ञासूंनी या परंपरांमागील वैदिक विज्ञान जाणून घेतले, तर अधिक योग्य होईल.
आपले पितर - म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा ज्या तिथीला निवर्तले असतील, त्या तिथीला भाद्रपद कृष्णपक्षात श्राद्ध करण्याचा पूर्वापार प्रघात आहे. पूर्वापार म्हणजे किती? तर वेदकालीसुद्धा पितरपूजा करण्याची पद्धत असावी, असे काही ऋचांवरून सिद्ध होते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात अशी प्रार्थना आहे - पितृभ्य नमो अस्त्वद्य ये पूर्वासो य उपरास इयु: - या प्रार्थनेचा अर्थ असा की जे पूर्वकाली गेले आणि जे अलीकडच्या काळात गेले, त्या पितरांना प्रणाम असो. ऋग्वेद काळानंतरच्या अथर्ववेदकाळात तर पितरांसाठी पिंडोदक किंवा आहुती देण्याकरिता शिजविण्यात येणार्या अन्नाला उद्देशून केलेली प्रार्थना आढळते. श्राद्ध आणि पिंडदान पद्धतीचा विस्तार त्या काळी झाला, याचेच हे द्योतक होय. वेदांना श्राद्ध अपेक्षित होते ते हवनाच्या माध्यमातून. हवन म्हणजेच यज्ञाच्या निमित्ताने जप-तप, दानधर्म या सत्कर्मांची जोड दिली की पितर तृप्त होतात, अशी मान्यता आहे. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मते पितृपक्षातील श्राद्ध हा खरे तर भारतीय संस्कृतीतील सूक्ष्म आणि विस्तृत असा महत्त्वाचा संस्कार आहे.
पितर आपले कधीच वाईट करत नाहीत. ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी कष्ट वेचले, देह झिजवला, कल्याण आणि शुभ चिंतिले, त्या पूर्वजांचे, पितरांचे श्रद्धेने स्मरण नको का करायला? ते जिथे असतील, तिथे त्यांच्या आत्म्यास सुखशांती लाभावी यासाठी पिंडदान, तर्पण करायचे. तेच श्राद्ध. ज्यांना वयोमानामुळे किंवा परिस्थितीमुळे हे विधी शक्य नसतील, त्यांनी पितरांचे स्मरण करून कृतज्ञतापूर्वक त्यांना हात जोडले, तरी भाव पोहोचतो. मुळात महत्त्वाचे काय, तर कृतज्ञता या मूल्याचा विसर पडायला नको. आज एकविसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात वावरताना आपण बघतो की जगाला विलक्षण वेग आलेला आहे. शेजार्यापाजार्यांकडे आणि नात्यातल्या जिवंत माणसांकडेच बघायला लोकांना वेळ नाही. अनेकदा आपल्याच जन्मदात्या किंवा नात्यातल्या व्यक्तींबद्दल प्रेम नसल्याने त्यातून असे घडते. ही एक सामाजिक समस्या आहे. कुटुंबे विभक्त झाली आणि प्रेमाला दुरावली. कर्तव्यभावनेचा र्हास तर त्याआधीच झाला. अशा स्थितीत कृतार्थता, कृतज्ञता ही भावना किंवा त्याबद्दलची जाणीव कशी निर्माण होणार? ती निर्माण होण्यासाठीच श्राद्धाचा आग्रह धरला पाहिजे. आम्ही का करायचे श्राद्ध? असा प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडू शकतो. त्यांच्यासाठी सांगण्यासारखे खरे तर भरपूर आहे.
महाभारत युद्धाच्या वेळी समोर उभ्या ठाकलेल्या स्वकीयांविरुद्ध लढायला अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ असमर्थता व्यक्त केली होती. या वेळी एक कारण त्याने असे दिले होते की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या वंदनीय महात्म्यांविरुद्ध मी कसा लढणार? शिवाय कुलक्षयाने सर्व पितर नरकात जाऊन पडतील. त्यांना पिंड आणि उदक द्यायलाही कुणी उरणार नाही. श्रीकृष्णाने हे ऐकले, परंतु ते स्थितप्रज्ञ राहिले. तत्त्वज्ञान सांगून त्यांनी अर्जुनाला युद्धास तयार केले. युद्धानंतर श्रीकृष्णांनी पांडवांकडून कर्णासह युद्धात मारल्या गेलेल्या सार्यांचा श्राद्धविधी करवून घेतला. प्रभू श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांना पिताश्री दशरथ महाराजांच्या निर्वाणाची माहिती दिली, त्या वेळी श्रीरामांनी वनातच श्राद्धविधी केला तो कंदमुळांचे आणि फळांचे तर्पण करून. श्रीरामांनी पुढे आपल्या वनवासकाळात जटायूचे श्राद्ध केले, असाही उल्लेख आढळतो.
मातापितरांच्या आधीची - म्हणजे आजी-आजोबांची पिढी ही रुद्ररूप मानलेली आहे. ती आपल्याला ऋतूंची आणि संधीची अनुकूलता देते. संकल्प आणि शौर्य यात आपण कमी पडू नये याची काळजी वाहते. त्याआधीची पणजी-पणजोबांची पिढी आदित्यरूप मानली आहे. या पिढीकडून पूर्वानुभवाचे आणि पूर्वी संपादन केलेले ज्ञान परंपरेने आपल्याला मिळते.
आपल्यावर काही ऋण असतात, असे हिंदू धर्म सांगतो. देवऋण, ऋषिऋण, गुरुऋण, पितृऋण इत्यादी. या ऋणांमधून अल्पस्वल्प का होईना, मुक्त व्हायचे असते. पितृपक्ष हा पितृऋणातून मुक्त होण्याचा काळ असतो, असे स.कृ. देवधर यांनी म्हटले आहे. आज वर्तमानात अत्यंत धावपळीच्या युगातही आपण पितरांचे श्राद्ध करण्यासाठी वेळ द्यायला हवा. काळाला अनुसरून हल्ली अनेक जण शैक्षणिक किंवा सामाजिक संस्थांना, विविध सेवा कार्यांना दानस्वरूपात वस्तू किंवा देणग्या देत असतात. आपल्या पितरांच्या स्मृत्यर्थ असे लोककल्याणकारी दान उचितच म्हणता येईल. या संदर्भात एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. बरेचदा आपण महानगरीय व शहरी लोक पितरांचे श्राद्ध करण्याची इच्छा मनी बाळगून असलो, तरी प्रत्यक्षात ते आपल्याकडून पूर्ण होईलच असे नाही. परंतु आजही महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतील ग्रामीण भागात पितृपक्षातील श्राद्ध श्रद्धा आणि प्रेमपूर्वक तसेच कर्तव्यभावनेने करण्याची परंपरा आजची पिढीदेखील सांभाळते आहे आणि पुढे नेते आहे. या परंपरेमागील भाव आणि वैदिक विज्ञान समजून घेत सर्वांनीच कालसुसंगत राहून आपल्या पितरांचे कृतज्ञतापूर्वक, प्रेमाने स्मरण केले आणि हाच संस्कार पुढल्या पिढीत रुजवला, तर कालचक्रातील एका महान संकल्पनेच्या सकारात्मक ऊर्जेने पूर्वजांचा, आपला आणि आपल्या वंशजांचाही कालगतीतील प्रवास सुखकारक होईल, असे नि:संशय म्हणता येईल.