सौ पार

विवेक मराठी    07-Oct-2023
Total Views |
100 medals
2018 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताने एकूण 70 पदके मिळवली होती. स्पर्धेच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती. 2023 हांगझाऊ आशियाई खेळांमध्ये भारताने हा आकडा स्पर्धेच्या 11 व्या दिवशीच पार केला. पदकतालिकेत भारताने चौथा क्रमांकही टिकवून ठेवला आहे. एकूण पदकांचा आकडा कुठपर्यंत पोहोचतो हे लवकरच कळेल. खेळाडूंची दमदार कामगिरी पाहता... यावर्षी आपण शंभर पदके मिळवली आहेत.....
चीनमध्ये सुरू असलेले आशियाई खेळ ज्या वाहिनीवर प्रक्षेपित केले जात आहेत; त्यांचं ‘इस बार सौ पार’ हे ब्रीदवाक्य आहे आणि आपल्या भारतीय खेळाडूंनी हे फारच मनावर घेतल्याचंही दिसत आहे. ह्याआधी 2018 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताने एकूण 70 पदके मिळवली होती. स्पर्धेच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती. 2023 हांगझाऊ आशियाई खेळांमध्ये भारताने हा आकडा स्पर्धेच्या 11 व्या दिवशीच पार केला. पदकतालिकेत भारताने चौथा क्रमांकही टिकवून ठेवला आहे. एकूण पदकांचा आकडा कुठपर्यंत पोहोचतो हे लवकरच कळेल. ह्या स्पर्धेतील काही विशेष उल्लेखनीय पदकांचा आढावा आपण ह्या लेखात घेणार आहोत.
 
 
अश्वारोहण :
 
अश्वारोहण स्पर्धेत मिळालेल्या सुवर्ण पदकाबद्दल तुम्ही गेल्या आठवड्यात वाचलं असेलच, त्याच खेळात एकेरीतही भारताला एक कांस्य पदक मिळालं. अनुष अग्रवालने भारताला हे पदक मिळवून दिलं होतं.
 
 
क्रिकेट :
 
भारतातला सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. भारताच्या महिलांनी आशियातलं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सुवर्ण पदक पटकावलं. ह्याआधी 2010 आणि 2014 मध्ये क्रिकेटचा समावेश आशियाई खेळांमध्ये करण्यात आला होता, पण इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं कारण पुढे करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (इउउख) संघ पाठवला नव्हता. ह्यावेळीही सुरुवातीला मंडळ संघ पाठवण्यास अनुत्सुक होतं, मात्र त्यांनंतर निर्णय बदलण्यात आला. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत भारताला आशियाई खेळांमधील पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं.
 
 
नेमबाजी :
  
इशा सिंग आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर हे भारताचे सर्वात यशस्वी नेमबाज ठरले. दोघांनाही प्रत्येकी चार पदके मिळवली. ह्या खेळातील एकूण पदकसंख्या होती 22. 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्य पदके प्राप्त करत भारताने आत्तापर्यंतच्या आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. ह्यात काही विश्वविक्रमही प्रस्थापित झाले, तर काही वेळा पोडीयमवर 2 भारतीय खेळाडू दिसले. बहुतांश खेळाडू हे 17-22 वयोगटातील असल्यामुळे भारताला भविष्यात त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवता येईल.
 
 
बॉक्सिंग :
 
ह्या खेळात भारताच्या चार खेळाडूंनी देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. सलग 2 वेळची जगज्जेती असलेल्या निखत झरीनकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, मात्र उपांत्य फेरीत तिला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना रौप्य पदकाची मानकरी ठरली.
 
बॅडमिंटन :
 
आशियाई देश बॅडमिंटन खेळात अग्रेसर असल्यामुळे हा खेळ नेहमीच चुरशीचा होतो. ह्यावर्षी भारतीय पुरूष संघाने रौप्य पदक पटकावत बर्‍याच वर्षांचा पदक दुष्काळ संपवला. ह्याआधी 1982 आणि 1986 मध्ये भारताला कांस्य पदक मिळालं होतं.
 
टेनिस :
 
रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक मिळवलं तर पुरुष दुहेरीत साकेत मायनानी आणि रामकुमार रामनाथनने रौप्य पदक पटकावलं.
 
टेबल टेनिस :
 
ह्या खेळाने पुन्हा एकदा भारतीय क्रीडाप्रेमींना आनंद दिला. सुतीर्था आणि ऐहिका मुखर्जी ह्या जोडीने महिला दुहेरीत कांस्य पदक पटकावत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने चीनच्या जगज्जेत्या आणि जागतिक मानांकन यादीत दुसर्‍या स्थानी असणार्‍या जोडीचा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उपांत्य फेरीतही चांगली सुरूवात झाली होती, मात्र सामना जिंकता आला नाही. हे कांस्य पदक अनेक उदयोन्मुख टेबल टेनिसपटूंसाठी प्रेरणादायी ठरेल ह्याची खात्री वाटते. चीनची मक्तेदारी असलेल्या खेळात चीनमध्येच जाऊन तिथल्या खेळाडूंना हरवणे हे नक्कीच आव्हानात्मक काम होते.
 
अ‍ॅथलेटिक्स :
 
अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीयांनी एकूण 23 पदके मिळवली. त्यात 4 सुवर्ण, 10 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश होता.
 
भालाफेक :
 
नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, पण त्याचबरोबर भालाफेक खेळातील भारताच्या उदयोन्मुख खेळाडू किशोरकुमार जेनाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवली. नीरज आणि किशोर अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले. ह्या स्पर्धेत नीरजची पहिलीच फेक 85 मीटरच्या पुढे गेली होती, मात्र तांत्रिक कारण देत नीरजला पुन्हा सुरूवात करण्यास भाग पाडण्यात आलं. किशोरच्या बाबतीतही चिनी लाईन जजने मोठी चूक केली होती, जी नंतर दुरुस्त करण्यात आली. ह्या सगळ्या गोंधळानंतरही आपल्या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
 
4 400 मीटर रिले :
 
ह्या सांघिक खेळात महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अनुक्रमे रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवलं. काही दिवसांपूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई विक्रम प्रस्थापित करत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणार्‍या पुरूष संघाकडून ह्याच कामगिरीची अपेक्षा होती.
 
 
रेस वॉक :
 
 
आशियाई खेळांमध्ये पहिल्यांदाच 35 किमी रेस वॉकचा समावेश करण्यात आला होता. राम बाबू आणि मंजू राणी ह्या दोघांच्या कामगिरीने मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळालं. रामबाबूचा पदकापर्यंतचा प्रवास खूप अवघड होता. 2018 मध्ये त्याने मॅरेथॉन धावक म्हणून खेळाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला दुखापतीने ग्रासलं. कोविड लॉकडाउन दरम्यान त्याने सरकारच्या योजनेअंतर्गत मजुरीची कामेही केली. काही काळ वेटरचं कामही त्याने केलं. आज मागे वळून बघताना येणार्‍या ह्याच आठवणी रामबाबूला खूप पुढे घेऊन जातील.
 
 
काही खेळाडूंबद्दल थोडक्यात :
 
 
अविनाश साबळे - महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे पुन्हा एकदा सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरला. सैन्यात कार्यरत असलेला हा खेळाडू बरेच महिने अमेरिकेत सराव करत होता. 3000 मीटर अडथळ्यांची शर्यत त्याने सुवर्ण पदक आणि स्पर्धा विक्रमासह पूर्ण केली, तर 5000 मीटरच्या शर्यतीत त्याला रौप्य पदक मिळालं. ह्या शर्यतीत 1982 नंतर भारताला पहिल्यांदाच पदक मिळालं आहे.
 
ज्योती याराजी :
 
100 मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहे. ह्या स्पर्धेत सुरुवातीलाच ‘ऋरश्रीश डींरीीं’ मध्ये तिला गोवण्यात आलं. एक चिनी खेळाडू स्पर्धा सुरू करण्यासाठी केल्या जाणार्‍या बंदुकीच्या आवाजाआधीच पळू लागली. नियमाप्रमाणे तिला बाद करण्याची गरज होती, पण इथे त्या खेळाडूने वेगळंच चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःच्या चुकीसाठी ज्योतीला दोषी ठरवलं. कॅमेर्‍यात ज्योती निर्दोष आहे हे स्पष्ट दिसत असतानाही पंचांनी तिलाही रेड कार्ड दाखवलं. ज्योती शांत बसली नाही, तिने प्रतिवाद केलाच. अखेर निर्णय राखून ठेवत स्पर्धा सगळ्याच खेळाडूंसह पार पडली. ती चिनी खेळाडू दुसर्‍या स्थानी तर ज्योती तिसर्‍या स्थानी राहिली. शर्यत संपल्यावर सामनाधिकार्‍यानी निर्णय दिला. चिनी खेळाडू नियमभंग केल्यामुळे बाद झाली आणि ज्योतीला रौप्य पदक मिळालं. ह्या प्रसंगात ज्योतीने तिच्या मानसिक क्षमतेचा परिचय जगाला करून दिला. विनाकारण झालेल्या आरोपानंतरही ती शांत राहिली, अन्यायाविरुद्ध दाद मागितली, शर्यतीत धावली आणि जिंकलीही.
 
 
हरमिलन बेन्स :
 
 
दुखापतीतून सावरलेली ही खेळाडू 2 दिवसांत 2 रौप्य पदकांची मानकरी ठरली. 1500 आणि 800 मीटर ह्या त्या दोन शर्यती. हरमिलनबद्दल एक अभिमानाची गोष्ट म्हणजे 2002 मध्ये तिच्या आईने म्हणजेच माधुरी सिंगने ह्याच स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत रौप्य पदक मिळवलं होतं.
 
 
पारूल चौधरी :
 
गेल्या वर्षभरात प्रत्येक स्पर्धेत पारूलने तिच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ह्यावर्षी सलग दोन दिवसात अनुक्रमे 3000 मीटर स्टीपलचेस आणि 5000 मीटरच्या शर्यतीत तिने रौप्य आणि सुवर्ण पदक मिळवण्याची कामगिरी केली. पारूलने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता ह्याआधीच मिळवली आहे.
 
अन्नू राणी :
 
महिलांच्या भालाफेक स्पर्धेत अन्नू राणीने भारताला स्पर्धेच्या इतिहासातलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं.
 
तेजस्विन शंकर :
 
डिकॅथलॉन खेळात रौप्य पदक मिळवताना त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला आहे. डिकॅथलॉनमध्ये खेळाडूला वेगवेगळे 10 खेळ खेळावे लागतात. दोन दिवस चालणार्‍या ह्या स्पर्धेत खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटीच लागते. तेजस्विन हा मूळचा उंच उडीपटू आहे. 2022 राष्ट्रकुलमध्ये त्याने भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर त्याने वेगळ्या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. जेमतेम दीड दोन वर्षांच्या सरावाने तेजस्विन ह्या पदकापर्यंत पोहोचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत खेळल्यानंतर कायमस्वरूपी डिकॅथलॉन खेळण्याचा त्याचा विचार आहे.
 
अँसी सोजन :
 
स्वतःच्या वैयक्तिक विक्रमाची नोंद करत अँसीने लांब उडीत रौप्य पदक प्राप्त केलं.
 
अन्य काही खेळ आणि पदके :
 
रोईंगमध्ये 5, सेलिंगमध्ये 3 आणि कनुईंगमध्ये भारताला 1 पदक मिळालं. रोशिबिना देवी वूशू खेळात पदक मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरली.