नित्यवर्धिष्णू भविष्यवेधी - शतायुषी संस्था

विवेक मराठी    11-Nov-2023   
Total Views |
@अश्विनी मयेकर  9594961865
 
vivek 
 
सव्वाशे वर्षांहून अधिक काळ एखादी सामाजिक संस्था टिकून राहते, तेव्हा ती दखलपात्र होण्याचा तो एक निकष असू शकतो, एकमेव नव्हे. ती लक्षवेधी ठरते, जेव्हा संस्थापकांच्या मूळ उद्दिष्टांचे सुस्पष्ट भान ठेवत आजच्या पिढीचे कार्यकर्ते त्या कामाला कालसुसंगत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशा नवनवीन आयामांची जोड देतात, तेव्हा. 127 वर्षांपूर्वी अनाथ बालिकाश्रमाच्या माध्यमातून भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे उपाख्य अण्णा कर्वे यांनी सुरू केलेलं स्त्रीशिक्षणाचं कार्य हे याचं चपखल उदाहरण ठरेल. कोणतंही ज्ञान वा शिक्षण स्त्री-पुरुष वा मुलगा-मुलगी असा भेद करत नाही. समाज मात्र हा भेद जाणीवपूर्वक करत आला आहे. जोवर हा भेद समूळ नष्ट होत नाही आणि मुलींना शिकण्याची संधी मिळत नाही, तोवर माणूस म्हणून मुलींच्या विकासाला आणि पर्यायाने समाजाच्या सर्वांगीण विकासाला मर्यादा येतात, हे शिक्षकी पेशा जीवनधर्म असलेल्या आणि समाजचिंतन ही अंगभूत वृत्ती असलेल्या अण्णांनी जाणलं होतं. ”एक वेळ मुलांचे शिक्षण मागे पडले तरी चालेल, परंतु मुलींच्या शिक्षणाची योजना शक्य तितकी लवकर अंमलात येणे जरूर आहे. एक वेळ मुलगा अशिक्षित राहिला तरी चालेल, परंतु मुलांचे शीलसंवर्धन होण्याकरिता मातेने सुशिक्षित होणे इष्ट आहे. आपणां सर्वांस माझी अशी विनंती आहे, की मुलांना व मुलींना शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करावेतच, परंतु द्रव्याच्या अभावी दोन्ही गोष्टी शक्य नसतील, तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मागे टाका, परंतु स्त्रियांना सुशिक्षित करा.“ अण्णांचा हा विचार म्हणजे त्यांच्या द्रष्टेपणाचं आणि वैचारिक सुस्पष्टतेचं उदाहरण आहे. इथे शीलसंवर्धन म्हणताना त्यांना अन्य आवश्यक संस्कारांइतकाच स्त्री-पुरुष समानतेचा, परस्परपूरकतेचा संस्कारही अभिप्रेत होता, हे अण्णांचं जीवनचरित्र वाचल्यावर समजतं. समाजाच्या उत्कर्षासाठी स्त्री शिक्षणाची गरज जाणलेल्या अण्णांनी मुलींच्या शिक्षणाला अग्रक्रम दिला.
 
अनाथ बालिकाश्रमाच्या माध्यमातून कार्याची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेच्या शतकाच्या वाटचालीत बदलत्या सामाजिक परिस्थितीबरोबर हे काम अनेक वाटांनी विस्तारलं. त्याला नवनवे आयाम जोडले गेले. आज 72 शाखांमधून 30 हजारहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. मूळ उद्दिष्टाशी बांधिलकी जपत झालेल्या या कार्यविस्तारामुळे संस्था नित्यवर्धिष्णू राहिली आणि नित्यनूतनही. स्त्री शिक्षण हा विषय सव्वाशे वर्षांपूर्वीइतका चिंताजनक राहिला नसला, तरी आजही त्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे, हेही संस्थेच्या चाललेल्या कामातून अधोरेखित होतं.
 
या शतायुषी कार्याच्या इथवरच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि वर्तमानाचा विवेकच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतलेला वेध...
 
हर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वर्तमान कार्याविषयी लिहिण्याआधी इथवरच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे समोर ठेवणं गरजेचं आहे. शिक्षणातून स्त्रीचा स्वयंविकास, स्वावलंबन या सशक्त विचारबीजातून सदाहरित वटवृक्ष उभा राहणं, हा एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही. त्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचं शिंपण केलं आहे. त्यातून काळाच्या ओघात या कामाला वटवृक्षाचं स्वरूप आलं.
 
 
मुळारंभ.. भविष्यातील शुभंकराची नांदी
 
अण्णा हे निवडलेल्या वाटेवरून शांतपणे मार्गक्रमणा करणारे कर्ते समाजसुधारक होते. विचारांना कृतीची जोड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य. गणिताचे शिक्षक असलेले अण्णा विचारी मनाचे, अतिशय संवेदनशील वृत्तीचे समाजचिंतक होते. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर जेव्हा त्यांना पुनर्विवाहासाठी आग्रह होऊ लागला, तेव्हा अण्णांनी बालविधवेशी विवाह करण्याचं ठरवलं आणि तो निश्चय तडीस नेला. विशेष नोंदवण्याजोगी बाब म्हणजे, या पुनर्विवाहाला त्यांच्या मातोश्रींची आणि ज्येष्ठ बंधूंची, तसंच द्वितीय पत्नीच्या मातापित्यांची परवानगी होती. ही गोष्ट आहे 130 वर्षांपूर्वीची, 1893 सालातली.
 
 
प्रथम पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर, पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनातील पहिली विद्यार्थिनी असलेल्या बालविधवा गोदूबाई जोशी यांच्याशी अण्णांनी द्वितीय विवाह केला. त्याच दरम्यान विधवांचे पुनर्विवाह ही चळवळ व्हावी या हेतूने, अण्णांनी या कार्यासाठी समविचारी लोकांची संस्था स्थापन करून समाजजागृतीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी अनेक व्याख्यानं दिली, मेळावे घेतले. या कामातूनच त्यांना पुढच्या कामाची - जे त्यांचं जीवित कार्य झालं, त्या स्त्री शिक्षणाची वाट गवसली. पुनर्विवाहाच्याही आधी मुलीला शिक्षण मिळालं तर तिच्यासाठी स्वावलंबनाच्या अनेक शक्यता खुल्या होतील, हे अण्णांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विधवा विवाहाच्या कार्याकडे असलेला विचारांचा प्रवाह विधवा शिक्षणाच्या दिशेने वळवला आणि पुण्यात 14 जून 1896 रोजी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. या कामात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर समर्थ साथ दिली ती, त्यांच्या द्वितीय पत्नी आनंदीबाई (बाया) कर्वे यांनी. उभयतांचं सहजीवन हे परस्परपूरकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं. दोघांनीही एकत्रितपणे विधवांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. सुरुवातीच्या काळात अण्णांना बाया कर्वे आणि काही मोजके समविचारी सहकारी वगळता, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मात्र, दृढनिश्चयी अण्णा कशानेही न डगमगता विचारपूर्वक निवडलेल्या वाटेवरून चालत राहिले. शांतपणे, ठामपणे.
 
 
vivek
 
तो काळ स्वातंत्र्य आंदोलनांनी भारलेला काळ होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक आयुष्याचा होम करून इंग्रज सरकारशी लढत होते. अण्णा जे करत होते, तेही एक प्रकारे क्रांतिकार्यच होतं, पण त्या कामाला क्रांतीचं वलय नव्हतं. अर्थात अण्णांना त्याचं वैषम्य नव्हतं. स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍यांचं मोल ते जसं जाणत होते, तसं आपल्या कामाचं अनन्यसाधारण महत्त्वही.
 
 
अनाथ बालिकाश्रमाच्या माध्यमातून पुण्यात सुरू झालेलं विधवा शिक्षणाचं काम काही वर्षांतच, त्या काळी पुण्याबाहेरचा भाग असलेल्या हिंगण्याच्या माळरानावर नेण्यात आलं. याला निमित्त ठरलं ते पुण्यातलं प्लेगच्या साथीचं थैमान. अण्णांच्या कार्याचे चाहते असलेल्या रावबहादुर गोखले यांनी आपली सहा एकरची जमीन दिली आणि तिथे झोपडी उभारण्यासाठी पैसेही.
 
 
हिंगणे माळरानावरील कार्यारंभाची साक्ष म्हणून ही झोपडी आजही तिच्या सर्व जुन्या खुणांसह जतन केली आहे. तिला ‘झोपडी’ संबोधलं जात असलं, तरी सर्वांच्या मनातलं तिचं स्थान देवालयाच्या उंचीचं आहे. कर्वे दांपत्याच्या त्यागमय आयुष्याचं प्रतीक असलेली ही झोपडी आजच्या विद्यार्थिनींसाठी आणि संस्थेत काम करणार्‍या प्रत्येकासाठी चैतन्याचं अक्षय कोठार आहे. खरं तर हा संपूर्ण परिसरच सकारात्मक ऊर्जेने भारलेला आहे. पण या झोपडीत आणि त्या उभयतांच्या समाधिस्थळी जाणवणारी ऊर्जादायक स्पंदनं शब्दांपलीकडची आहेत.
 
 
विस्ताराच्या पाऊलखुणा
 
आश्रमाच्या आरंभापासून मोजक्याच का असेनात, पण या कामाचं महत्त्व जाणणार्‍या सेविका लाभल्या, हा या कार्याचा भाग्ययोग. या सेविकांमध्ये अग्रपूजेचा मान बाया कर्वे यांची बहिण पार्वतीबाई आठवले यांचा. अण्णा-बायांच्या समाधीशेजारी पार्वतीबाईंची असलेली समाधी त्यांच्या भरीव योगदानाचं प्रतीक आहे. त्यांच्याबरोबरच काशीबाई देवधर, वेणूताई नामजोशी, बनूबाई देशपांडे, दुर्गाबाई किर्लोस्कर, आनंदीबाई मराठे यांनीही आरंभीच्या दिवसापासून या कामासाठी वाहून घेतलं.
 
 
vivek
 
अभ्यासाबरोबरच आश्रमातली सर्व कामं आळीपाळीने मुलीच करत. पुस्तकी शिक्षणाबरोबरच गृहपरिचर्या, शिवण, पाकशास्त्र याचाही आश्रमाच्या अभ्यासक्रमात समावेश होता. शिवणकामाचं, पाकशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण मुलींना आर्थिक स्वावलंबन मिळवून देईल, हा विचार त्यामागे होता. मुलींच्या मनात ध्येयभावना जागृत व्हावी, सेवावृत्तीही विकसित व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात. संस्थापकांच्या मनात असलेला स्त्री शिक्षणामागचा उद्देश आणि त्याबरहुकूम चाललेलं काम, यामुळे कामाचा प्रभाव निर्माण होऊ लागला. महाराष्ट्राबाहेरचेही बालविधवांचे पालक आपल्या दुर्दैवी मुलीचं भाग्य पालटण्यासाठी त्यांना आश्रमात दाखल करू लागले. परप्रांतातून सीताबाई आण्णेगिरी, रुक्मिणीअम्मा, मथुबाई उचगावकर अशा विद्यार्थिनी आल्या. आश्रमातील मुलींकडून अण्णांच्या अपेक्षा उच्च होत्या. एका पत्रकात त्यांनी म्हटलं आहे - ‘आश्रमातील विद्यार्थिनींनी विद्या संपादन करून नीतीने चरितार्थ चालवावा एवढाच या आश्रमाचा हेतू नाही, तर त्यांनी तसे करून आपल्या देश-भगिनींच्या उपयोगी पडावे व त्यांच्या उन्नतीला साहाय्य करावे.’
 
 
आश्रमाचं जसं नाव होऊ लागलं, तशा ब्रिटिश सरकारमधील उच्च अधिकारी, समाजसेवक, विचारवंत यांच्या आश्रमाला भेटी सुरू झाल्या. अण्णांच्या मातोश्रींनी आणि ज्येष्ठ बंधूंनी आश्रमाला भेट देऊन त्यांच्या लोकविलक्षण कामाचं भरभरून कौतुक केलं.
 
 
कामाच्या वाढत्या व्यापाबरोबर आणि कीर्तीबरोबर समाजाकडून मदतीचा ओघही वाढू लागला. आश्रमाच्या प्रारंभापासूनच जमाखर्चाचा हिशेब चोख ठेवण्याला अण्णांनी विशेष महत्त्व दिलं होतं. वाढत्या आर्थिक मदतीनंतरही हिशेबाची शिस्त कधी मोडली गेली नाही. या संदर्भातले अण्णांचे विचार त्यांच्यातल्या शुद्ध बुद्धीच्या समाजसुधारकाचं दर्शन घडवतात. या संस्थेच्या दीर्घायुष्याचं मूळ या विचारात आणि आजतागायत झालेल्या त्याच्या आचरणात आहे. हिशेब ठेवण्यासंदर्भात अण्णांनी म्हटलं आहे - ‘आपल्या लोकांच्या अनेक संस्था अल्पायुषी होण्याला जी कारणे आहेत, त्यापैकी जमाखर्चाची अव्यवस्था व पैशाची अफरातफर हे एक आहे. आमच्या संस्थेचा अंत होणे झाल्यास तो या कारणांनी तरी होऊ द्यायचा नाही, असा तिच्या चालकांचा बेत आहे. मंडळींच्या (अनाथ बालिकाश्रमाची मंडळी असं या संस्थेचं पूर्ण नाव होतं, मंडळी हे त्याचं लघुरूप) पैशांचा जमाखर्च शिस्तवार ठेवलेला आहे व तो मंडळींच्या ऑफिसात येऊन मागितल्यास कोणाही सभासदाला कोणत्याही वेळी तो दाखविण्यात येईल.’ अण्णानंतरच्या सर्वच विश्वस्तांनी या विचाराचं काटेकारपणे पालन केलं आहे. आर्थिक व्यवहारातली पारदर्शकता आणि सचोटी हे या संस्थेच्या डी.एन.ए.मध्ये आहे. आजच्या सर्व कार्यकर्ते-कर्मचार्‍यांमध्येही त्याचा आविष्कार झालेला दिसतो.
 
 
vivek
 
याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, ज्यामुळे संस्थेचं मूळ उद्दिष्ट अधिक व्यापक व्हायला सुरुवात झाली. आश्रमात मिळत असलेलं जीवनोपयोगी शिक्षण आणि तिथलं सुरक्षित, वात्सल्याचा स्पर्श असलेलं वातावरण यामुळे काही पालक आपल्या विधवा मुलीबरोबर तिच्या धाकट्या बहिणीलाही ठेवून घ्यायचा आग्रह करू लागले. यातून विधवा शिक्षणासाठी असलेला आश्रम ही मर्यादा ओलांडायला आपोआपच चालना मिळाली. आश्रमातील राहणी, अभ्यासक्रम, अंगी बाणणारी शिस्त, येणारं व्यवहारिक शहाणपण याचा अनुभव येत गेल्याने विधवा मुलींबरोबरच कुमारिकांना व विवाहितांनाही आश्रमात येण्याची ओढ वाटायला लागली होती आणि त्यांचे जन्मदाते, सहचरही त्यासाठी अनुकूल होत होते. आश्रमात राहून मुलींनी शिकावं हा विचार समाजात रुजायला लागल्याचं ते द्योतक होतं. त्यातूनच 1906मध्ये महिला विद्यालयाची स्थापना झाली. सुरुवातीला विधवांसाठी बालिकाश्रम आणि कुमारिकांसाठी-विवाहितांसाठी महिला विद्यालय अशा दोन स्वतंत्र व्यवस्था होत्या. आपलं काम समाजात राहून, समाजासाठी आहे. कोणताही नवीन बदल स्वीकारण्याचा समाजाचा वेग संथ असतो, हे अण्णा जाणून होते. समाजाच्या या स्वभाववैशिष्ट्याशी जुळवून घेत आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने एकेक पाऊल टाकण्याची त्यांची कार्यपद्धती होती. त्याचं प्रतिबिंब असं अनेक ठिकाणी पडलेलं दिसतं. महिला विद्यालयाला आणि अनाथ बालिकाश्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणि समाजाचा बदलत चाललेला दृष्टीकोन लक्षात घेऊन पुढे 1915 साली, या सर्व स्त्रियांना एकत्र शिक्षण देण्याचा निर्णय झाला आणि बालिकाश्रम व महिला विद्यालय यांच्या एकीकरणाचं प्रतीक म्हणून ‘महिलाश्रम’ असं नाव शाळेला देण्यात आलं. समाजाच्या बदलाचीही ती खूण होती.
 
 
यानंतर अगदी थोडक्या कालावधीत, 5 जुलै 1916ला महिला विद्यापीठ सुरू झालं. शिक्षणाने वाढलेल्या मुलींच्या महत्त्वाकांक्षेला नवं अवकाश मिळालं. समाजातल्या अनेक दानशूर व्यक्तींनी महिला विद्यापीठाच्या या प्रयोगाला आर्थिक मदत केली आणि परदेशी उच्च शिक्षण घेऊन आलेले अनेक जण प्राध्यापक म्हणून रुजू झाले. बालिकाश्रम असो, महिला विद्यालय असो, महिलाश्रम असो की महिला विद्यापीठ.. या सगळ्याच शैक्षणिक कार्यासाठी उत्तम शिक्षक कायम लाभत आले. आजन्म सेवक म्हणून निरलस वृत्तीने संस्थेसाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांचाही समूह तयार झाला. निरपेक्ष वृत्तीने, अखंड चालू असलेल्या अण्णा-बायांच्या कार्याचं हे यश म्हणायला हवं. आजही अशी आजन्म सेवकांची मांदियाळी आणि ज्ञानदानाकडे वसा म्हणून पाहणारे शिक्षक ही संस्थेची संपत्ती आहे. ही अविनाशी संपदा हे संस्थेचं बलस्थान आहे.
 
 
महिला विद्यापीठापासून पुढे संस्थेच्या कामाचा पसारा पुण्याची वेस ओलांडून वाढायला लागला. समाज जागा होत होता. शिक्षणाचं महत्त्व, त्यातही मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व लक्षात येऊ लागलं होतं. मुलींच्या आकांक्षा विस्तारायला लागल्या होत्या, स्वप्नं बदलत होती. या सर्वांचा परिणाम म्हणून संस्थाही अनेक दिशांनी वाढायला लागली होती.
 

vivek 
 
कार्यविस्तार आणि सीमोल्लंघन
 
आपण रुजवलेल्या विचारबीजाचा अनेकांगांनी झालेला विस्तार पाहण्याचं भाग्य शतायुषी अण्णांना लाभलं. संस्थेच्या या सगळ्या प्रवासात खाचखळगे, आव्हानं, मतभेद वा कुरबुरी नव्हत्याच असं अजिबात नाही. चार माणसं एकत्र आल्यावर मतभेद होणं, संघर्ष होणं हे स्वाभाविक आहे, त्याला ही संस्थाही अपवाद नव्हती. मात्र मतभेद वा संघर्षापेक्षाही सर्वांमध्ये वसत होती ती उद्दिष्टावरची निष्ठा, कामाशी असलेली बांधिलकी, हेतूच्या प्रामाणिकपणाविषयी असलेली खात्री. त्यामुळेच मतभेदांमधूनही पुढे जायचा मार्ग शोधता आला. आव्हानांना भिडता आलं.
 
 
1920मध्ये महिला विद्यापीठाला ठाकरसी कुटुंबीयांकडून मिळालेल्या भरघोस देणगीमुळे त्याचं मूळ नाव बदलून ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ असं झालं. मुंबईतही या विद्यापीठाचं काम सुरू झालं. विद्यापीठाला प्रतिसाद वाढला. मात्र विश्वस्तांशी झालेल्या तीव्र मतभेदानंतर महिला विद्यापीठाची मालकी ठाकरसी कुटुंबाकडे देण्याचा निर्णय झाला. दरम्यानच्या काळात सातारा इथे सुरू झालेली मुलींची शाळा आणि पुण्यातलं अध्यापक महाविद्यालय यांचा शुभारंभ झाला होता.
 
 
बाहेरगावाहून शिकण्यासाठी येणार्‍या मुलींसाठी वसतिगृहं बांधली होती. मूळचं 6 एकरावरचं काम 26 एकरापर्यंत विस्तारलं. हिंगण्याचं माळरान चैतन्याने फुलून गेलं. कालांतराने शाळा, वसतिगृहं याच्या बरोबरीने मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘संपदा बेकरी’ चालू झाली तीही याच परिसरात. संस्थेत होत असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळालेल्या भरीव देणगीतून इचलकरंजी सभागृह बांधण्यात आलं. एका माजी विद्यार्थिनीने दिलेल्या देणगीतून मुलींना पोहण्यासाठी कृष्ण तलाव हा तरणतलाव उभा राहिला. (ही घटना 1938 सालची. त्या वेळी 80 वर्षांच्या असलेल्या अण्णांनी स्वत: पोहून या तलावाचं उद्घाटन केलं. त्याची ध्वनिचित्रफीत उपलब्ध आहे.) विविध कामांनी, त्यासाठी उभारण्यात आलेल्या विविध वास्तूंनी परिसर गजबजून जायला सुरुवात झाली. याशिवाय पुण्याच्या अन्य भागातही संस्थेच्या कामाचा पसारा वाढू लागला. अण्णांचे धाकटे चिरंजीव भास्करराव कर्वे यांच्या पुढाकाराने शिशुविहार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, तसंच आणखी एक अध्यापक विद्यालय सुरू झालं. सातार्‍याला शाळा सुरू झालीच होती. वाईतही शाळा सुरू झाली. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबर संस्थेचं नावही बदलून ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’असं झालं.
 

vivek 
 
स्थापनेपासूनच संस्था नित्यवर्धिष्णू राहिली आहे. मात्र 1990नंतर तिचा झालेला विस्तार, वाढलेला व्याप, अगदी तळागाळातल्या मुलींना शिक्षणाच्या उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी हा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. एखादी संस्था भूमिती श्रेणीने वाढते म्हणजे काय याचं उदाहरण द्यायचं असेल, तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा नव्वदनंतरचा प्रवास सांगता येईल. मात्र या वाढत्या व्यापातही मूळ उद्दिष्टाशी तीच बांधिलकी आहे. शिक्षणातून आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भरता. शिकण्यासाठी संस्थेपर्यंत पोहोचलेली कोणतीही मुलगी पैशाअभावी मागे फिरू नये, यासाठी भाऊबीज योजनेसारखी शतायुषी योजना खूप मोठा आधारस्तंभ आहे. समाजातील उदार देणगीदार, भाऊबीज योजना आणि मोठमोठ्या कंपन्यांचे सीएसआर फंड यातून संस्थेच्या वाढत्या डोलार्‍याचं आर्थिक गणित सांभाळलं जात आहे.
 
 
विस्तारलेली कार्यक्षितिजं
 
 
1990च्या दशकात संस्था नव्वदी ओलांडत असताना तिच्या विस्ताराला, वाढीला जी नवी गती प्राप्त झाली, ती थक्क करणारी होती. काळाची गरज ओळखून त्या दशकभरात मुलींसाठी विविध अभ्यासक्रमाची महाविद्यालयं सुरू झाली. औपचारिक शिक्षणाबरोबरच व्यवहारोपयोगी प्रशिक्षणाचे अनेक पर्याय सुरू करण्यात आले. आजच्या घडीला पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर आणि कामशेत इथे 9 बालवाड्या, 21 शाळा, 18 महाविद्यालयं, 12 वसतिगृहं, 3 वर्किंग वूमन हॉस्टेल्स, लँग्वेज सेंटर, एआयटी सेंटर, मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, संपदा बेकरी, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर या व अशा विविध कामाच्या 72 शाखांमधून समाजाच्या सर्व स्तरांतल्या 32 हजार विद्यार्थिनी संस्थेत शिकत आहेत. यात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतच्या विविध शाखांमधील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एकूण 10 केंद्रांमधून व्यावसायिक व तंत्रशिक्षणाची सोय असल्याने मुलींना प्रात्यक्षिक शिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. काही अभ्यास शाखांचा व त्यांच्या वैशिष्ट्याचा थोडक्यात परिचय -
 

vivek 
 
दर्जेदार शालेय शिक्षण
 
संस्थेच्या एकूण 9 बालवाड्या आणि 21 शाळा आहेत. या शाळांमध्ये 3 इंग्लिश मीडियमच्या, तर 18 मराठी माध्यमाच्या आहेत. अन्यत्र मराठी शाळा बंद होत असताना, या संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आवर्जून प्रवेश घेणार्‍यांची संख्या आजही लक्षणीय आहे. अन्य शैक्षणिक संस्थांपेक्षा वाजवी शुल्कात आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक संधी इथे मिळतील, हा पालकांना विश्वास वाटतो. संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जी परंपरा राखली आहे, त्यातून हा विश्वास निर्माण झाला आहे. इथे जशा मध्यमवर्गीय घरातल्या मुली आहेत, तशा कष्टकरी घरातल्या मुलीही आहेत. इंग्लिश माध्यमाच्या 3 शाळा विनाअनुदानित आहेत, तर बाकी सगळ्या अनुदानित शाळा आहेत. मात्र केवळ सरकारी अनुदानावर शाळा चालवता येत नाहीत आणि शाळेला अनुदान असो वा नसो, ज्या शैक्षणिक सुविधा गरजेच्या आहेत, त्या पुरवताना संस्था हात आखडता घेत नाही. संस्थेच्या सगळ्या शाळांमध्ये असलेले स्मार्टबोर्ड्स हे त्याचं उदाहरण. अनुदानित शाळांमध्ये शिक्षण मोफत असलं, तरी शाळेच्या अत्यावश्यक खर्चाची तजवीज करण्यासाठी पालकांकडून दर वर्षी 3 हजार रुपये घेतले जातात. ज्या पालकांना तेवढेही पैसे देणं जमत नाही, अशांच्या घरी भेट देऊन, त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तोडगा काढला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक उपक्रम, विविध स्पर्धा यांनी प्रत्येक शाळेचं शैक्षणिक वर्ष गजबजलेलं असतं. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
 vivek
 
आश्रमशाळा - वंचितांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न
 
 
आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्ह्यातील कामशेत या आदिवासीबहुल भागात संस्थेने 2008 साली आश्रमशाळा उभारली. साधारण 400 विद्यार्थिसंख्या असलेली ही निवासी शाळा सातवीपर्यंत मुलं-मुली दोघांसाठी आहे. आदिवासी मुलींना दर्जेदार शिक्षण देतानाच त्यांच्या सुरक्षेची हमी घेणारी आश्रमशाळा असल्याने इथे मुलींची संख्या लक्षणीय आहे. सर्व विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. सरकारकडून मिळणार्‍या नाममात्र अनुदानाव्यतिरिक्त समाजातील दानशूर मंडळींच्या आर्थिक सहकार्यावर हे काम चालू आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासेतर उपक्रम, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम या माध्यमातून आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
 
कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय - गुणवत्ता हीच ओळख
  
फक्त मुलींसाठी असलेलं कमिन्स महाविद्यालय हे भारतातलं पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेने 1991 साली सुरू केलं. या महाविद्यालयासाठी कमिन्सबरोबर असलेली इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशिप ही केवळ नावापुरती वा केवळ आर्थिक पाठबळापुरती नाही, तर त्यांच्यामुळे इंडस्ट्रीतले अनेक तज्ज्ञ संस्थेशी जोडले गेले आहेत. त्यातले काही फॅकल्टी म्हणून शिकवायला येतात, त्यांच्या फील्डवरच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे शिकवतानाचा दृष्टीकोनही वेगळा असतो. विद्यार्थिनींना त्याचा फायदा होतो. त्यातून चौकटीबाहेरचा विचार करण्याची सवय लागते. दृष्टीकोन विकसित होतो. कमिन्समधले काही अधिकारी अभ्यासक्रमासंदर्भातील चर्चेतही महत्त्वपूर्ण योगदान देतात. या सगळ्यामुळे गुणवत्तेचा दर्जा राखला जातो, हे या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य. आता पुण्याबरोबरच नागपूरमध्येही कमिन्सच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालं आहे. दोन्हीकडचे निकाल सातत्याने उत्तम लागत असल्याने मुलींना नोकरीच्या अनेक चांगल्या संधी तर मिळतातच, त्याचबरोबर महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त होत असलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्वही विकसित होतं. बाहेरच्या स्पर्धेच्या जगात वावरायला इथल्या मुली पूर्ण तयारीनिशी सहभागी होतात आणि अनेक स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरची अनेक पारितोषिकं पटकावतात.
 

 
काळाच्या पुढे दहा पावलं.. दृष्टीही आणि कामही
 
 
1994 साली सुरू झालेल्या आणि आशियातलं सर्वोत्तम आर्किटेक्चरल कॉलेज म्हणून ओळखलं जाणार्‍या डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महिला महाविद्यालयाची गणना देशातल्या पहिल्या पाच वास्तुशास्त्र महाविद्यालयांमध्ये होते. ही प्रतिष्ठा मिळण्यामागे आहे ती प्राचार्यांसहित सर्व अध्यापक घेत असलेली मेहनत आणि चौकट भेदून नवा विचार देण्याची वृत्ती. संयुक्त राष्ट्रसंघाशी पार्टनरशिप असलेलं हे देशातलं एकमेव महाविद्यालय आहे. आतापर्यंत नायजेरिया, टांझानिया, झांबिया, केनिया, जमैका आदी 14 देशांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रोजेक्ट्स करायची संधी या महाविद्यालयाला मिळाली आहे. महाविद्यालयाच्या लौकिकामुळे जी-20मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. हे महाविद्यालय भारत सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाचंही पार्टनर आहे. ‘भारतीय मंदिरं आणि भारतीयत्व’ यावर प्रोजेक्ट करून ते देशोदेशी दाखवायची संधी या महाविद्यालयातल्या मुलींना मिळते आहे. बी.आर्च, एम.आर्च., पीएच.डी.पर्यंत शिक्षणाची संधी इथे उपलब्ध आहे.
 
 
संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिकत असलेल्या मुलींची भरारी आणि आपल्या कामातून गुणवत्तेचा त्या उमटवत असलेला ठसा पाहून केवळ मुलींचं महाविद्यालय ही संकल्पना कालबाह्य नसून, उलट विशेष फलदायक ठरते आहे का, यावर अभ्यास व्हायला हवा असं प्रकर्षाने मनात आलं.
 

vivek 
 
 
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र - शताब्दी वर्षातला शुभारंभ
 
 
संस्थेच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधत पदवी शिक्षणाला व्यवसायाभिमुख शिक्षणाची जोड देता यावी, या उद्देशाने ‘श्री मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सुरू करण्यात आली. 3 तासाच्या छोट्या कोर्सपासून ते 3 वर्षाचा कोर्स इतके वैविध्यपूर्ण 114 कोर्स इथे उपलब्ध आहेत. बाजारात आज ज्या शिक्षणाला रोजगाराची संधी आहे, त्याचं प्रशिक्षण देणारे कोर्सेस आणि ज्यातून रोजगार निर्माण होऊ शकेल निर्माण होऊ शकतो अशा विषयांशी संबंधित कोर्सेस आहेत. या सगळ्या कोर्सेसना कायम मागणी असते, त्यासाठी प्रवेश घेणार्‍या मुली असतात हे विशेष. यामुळे ज्या अल्पशिक्षित मुलींना लगेच पायावर उभं राहण्याची गरज आहे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याबरोबरच बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून थेट वस्ती पातळीवर व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी या सर्व शहरांमध्ये या माध्यमातून असं व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येतं.
 
 
ज्यांना ड्रायव्हिंग शिकून अर्थार्जन करण्याची इच्छा आहे, अशा मुलींना एका ड्रायव्हिंग स्कूलच्या मदतीने स्कूल बस म्हणून वापरल्या जाणार्‍या व्हॅन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. सध्या 20 महिला हे प्रशिक्षण घेत आहेत. आणि आता, संस्थेला मदत करणार्‍या के.पी. अँड टी. या कंपनीने परदेशात पाठवायला 20 लेडी ड्रायव्हर्स पाहिजे आहेत असा प्रस्ताव ठेवला आहे. ही कंपनी युरोपातले ट्रक्स डिझाइन करते. ते ट्रक्स चालवण्यासाठी त्यांना ड्रायव्हिंग शिकलेल्या भारतीय मुली हव्या आहेत.
स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट)
 


vivek 
  
- बदलत्या काळाचा वेध
 
 
1999 साली नॅशनल स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने जेव्हा संस्थेने हा अभ्यासक्रम चालू केला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र, हे क्षेत्र सध्याचं अतिशय ’हॅपनिंग’ क्षेत्र असल्याने रोजगाराच्या अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत; मुलींना त्यातून भरीव रोजगार मिळणार असेल तर त्यांना या विषयातलं प्रशिक्षण ही बदलत्या काळाची गरज आहे, हे ओळखून संस्थेने हे काम हाती घेतलं. पुण्यातल्या शाखेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर नागपूर इथेही स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चालू झालं. 3 वर्षांच्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्समध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला फॅशन शो करणं कंपल्सरी असतं. त्यासाठीच्या मॉडेल्स संस्थेतल्याच मुली असतात. या मॉडेल्सचा मेकअप करण्याची संधी मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये ब्युटी पार्लरचं शिक्षण घेणार्‍या मुलींना मिळते. या सगळ्या विद्याशाखा एका आवारात असल्याचा फायदा असा की, वेगवेगळ्या विषयातलं शिक्षण घेणार्‍या मुलींना एकमेकांच्या कामात सहभागी होऊन अनुभव घेण्याची संधी मिळते. फॅशन डिझाइनचा हा कोर्स केल्यानंतर 95% मुलींना अर्थार्जनाची चांगली संधी मिळते. तसंच माजी विद्यार्थ्यांचं चांगलं संघटन असल्याने आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असल्याने परस्पर सहकार्यातून चांगली कामं मिळत जातात. एकाच आवारात होत असलेलं शिक्षण आणि बहुतेक जणी तिथेच वसतिगृहात राहत असल्याने, एकाच वेळी अनेक गोष्टी शिकू शकतात. उदाहरणार्थ, सिद्धिविनायक कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तिला मिळणार्‍या मोकळ्या वेळेत मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तिच्या आवडीचे कोर्स करून अर्थार्जनाला सुरुवातही करू शकते.
 

vivek 
 
रुग्णसेवेतला ब्रँड
श्रीमती बकुळ तांबट नर्सिंग एज्युकेशन सेंटर
 
 
2000 साली सुरू झालेलं श्रीमती बकुळ तांबट नर्सिंग एज्युकेशन सेंटर हे परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय ओळखलं जातं ते तिथे मिळत असलेल्या प्रात्यक्षिकाच्या मुबलक संधीमुळे. सहा महिने थिअरी आणि बाकी सगळा वेळ प्रॅक्टिकल अशी इथल्या अभ्यासक्रमाची रचना असते. 2 वर्षांचा ए.एन.एम. कोर्स, 3 वर्षांचा जी.एन.एम. डिप्लोमा कोर्स, नर्सिंगमधल्या बी.एस्सी., एमएस्सी. पदवी आणि नर्सिंगमधलं पीएच.डी.पर्यंतचं शिक्षण इथे उपलब्ध आहे. 20 विद्यार्थिनींना घेऊन सुरू झालेल्या महाविद्यालयाचा खाजगी महाविद्यालयात पहिला क्रमांक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पॅरेंट हॉस्पिटल असून त्याव्यतिरिक्त कमला नेहरू सरकारी रुग्णालय, येरवडा मेंटल हॉस्पिटल इथेही शिकाऊ नर्सेसना अनुभव घ्यायची संधी मिळते. या पार्श्वभूमीमुळे इथून शिकून बाहेर पडणार्‍या मुलींना भारतात आणि परदेशातही रुग्णसेवेच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध असतात. पुण्याबरोबरच नागपूरलाही परिचारिका प्रशिक्षण केंद्र चालू झालं असून तिथे एम.एस्सी. ऑन्कोलॉजी सुरू केलं आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झाल्याने या हॉस्पिटलला असलेली गरज ओळखून हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
 
 
रत्नागिरी परिसरात असलेली परिचारिकांची कमतरता लक्षात घेऊन ए.एन.एम. आणि जी.एन.एम. हे नर्सिंगचे अभ्यासक्रम नजीकच्या काळात शिरगाव इथे सुरू करण्यात येतील.
 
 
बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र - आधारभूत काम
 
 
या सगळ्या शैक्षणिक कामाला आधारभूत ठरेल असं एक मूलभूत काम बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्राच्या माध्यमातून चालू आहे. 2003मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राचं काम तीन पातळ्यांवर चालतं. महिलांच्या वैचारिक व मानसिक सक्षमीकरणाद्वारे सामाजिक आरोग्याची जपणूक व संवर्धन हे या केंद्राचं उद्दिष्ट. महिलांच्या विषयातले अभ्यास तसंच संशोधन प्रकल्प, विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, सीएसआर प्रकल्प, घरगुती हिंसाचाराचा सामना करणार्‍या बायकांसाठी ‘विसावा’ प्रकल्प, तसंच ‘दिलासा’ हे समुपदेशन केंद्र चालवलं जातं.
 
 
ज्या महिला गृहिणी असतात, त्यांच्यासाठी इथे एक कोर्स आहे. तो करून त्यांनी आपल्या घरातल्या मुलांचं योग्य प्रकारे समुपदेशन करावं, त्यातून त्यांचा मुलांकडे बघायचा दृष्टीकोन बदलावा हा त्यामागे हेतू आहे. त्याशिवाय डॉक्टर, इंजीनियर, वकील असलेल्या महिलांनाही त्यांच्या क्षेत्रात काम करताना काउन्सेलिंगची गरज असते. अशा प्रोफेशनल महिलाही इथे काउन्सेलिंगचे कोर्सेस करतात.
 
 
स्किल डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य विकास केंद्र
 
 
2016मध्ये सरकारने नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलं. त्यानंतर 2 वर्षांतच संस्थेने या कामाला सुरुवात केली. रोजगारक्षम होण्यासाठी कौशल्यांचा विकास होण्याची गरज असते. जी कौशल्यं सॉफ्ट स्किल्स म्हणून ओळखली जातात, अशा कौशल्यांचं प्रशिक्षण या केंद्रात दिलं जातं. संवादकौशल्य, नेतृत्वकौशल्यापासून ते ई मेल शिष्टाचार, स्टॉक मार्केटमधल्या व्यवहाराचा परिचय करून देणारा कोर्स आदी कोर्सेस इथे आहेत. आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून 13 हजार मुलींचं प्रशिक्षण झालं आहे. केवळ कौशल्य प्रशिक्षण इतकाच हेतू नाही, तर त्याआधारे ती मुलगी रोजगार कसा निर्माण करेल, याकडेही जातीने लक्ष पुरवलं जातं.
 
 
vivek
 
वसतिगृहांचं आदर्श व्यवस्थापन
 
 
संस्थेची एकूण 12 हॉस्टेल्स आणि 3 वर्किंग वूमन हॉस्टेल्स आहेत. पैकी 4 वसतिगृहं तर हिंगणे येथील मुख्य परिसरात आहेत. या चार हॉस्टेलमध्ये मिळून 3500 मुली राहतात. त्यामध्ये मध्यमवर्गीय घरातल्या आहेत, तशा गरीब कुटुंबातल्याही आहेत. काही शासकीय अधिकार्‍यांच्याही आहेत आणि आदिवासी पाड्यावरच्याही आहेत. शालेय शिक्षण घेणार्‍या मुलींचं वेगळं, महाविद्यालयीन वा व्यवसाय प्रशिक्षण घेणार्‍या मुलींचं वेगळं, अर्थार्जन करणार्‍या मुलींसाठी वेगळं आणि कोर्ट कमिटेड मुलींसाठीचं (यामध्ये प्रामुख्याने अनाथ मुली वा एकल पालक असलेल्या वा ज्या पालकांचे संबंध ताणलेले आहेत अशा पालकांच्या वा पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या मुली असतात.) वसतिगृह कोणतंही असो.. सर्वांना सारखे नियम, सारखाच आहार व सुविधा, परिसर स्वच्छतेचा आग्रह सारखाच आणि सर्वांवर सारखीच मायेची पाखर ही या वसतिगृहांची खासियत. शालेय शिक्षण घेणार्‍या 1300 मुली एका वसतिगृहात राहतात. इयत्तांप्रमाणे एकेका मजल्यावर त्यांची निवासाची व्यवस्था केलेली असते. यापैकी कोणालाही भ्रमणध्वनी अर्थात मोबाइल जवळ बाळगायला परवानगी नाही. प्रत्येक मजल्यावरच्या मेट्रनकडे एक मोबाइल असतो, त्यावरून त्यांचा आणि पालकांचा संपर्क होत असतो. शाळा तिथेच असते आणि शाळेव्यतिरिक्त अवांतर मार्गदर्शनाची गरज असेल, तर त्याची व्यवस्थाही वसतिगृहातच केली जाते. घड्याळाच्या काट्यावर या सगळ्यांचा दिवस चालू असतो आणि त्यामुळेच दिवसभरातल्या कामांमध्ये सुसूत्रता असते. भलंमोठं, हवेशीर आणि अतिशय स्वच्छ स्वयंपाकघर हे प्रत्येक वसतिगृहांचं वैशिष्ट्य. अतिशय साध्या पण चविष्ट आणि स्मरणात राहील अशा स्वयंपाकासाठी त्यांची ख्याती आहे. मुलींच्या वाढीचं वय लक्षात घेऊन विचारपूर्वक चौरस आहाराची योजना असते. स्वयंपाकघरातल्या काळ्याभोर फळ्यावर अतिशय देखण्या अक्षरात रोजचा मेनू, सुविचार व दिनविशेषासह लिहिलेला असतो. येणार्‍या प्रत्येकाचं तो लक्ष वेधून घेतो. वसतिगृहात सर्व सणही अतिशय उत्साहात साजरे केले जातात. त्यासाठी वसतिगृह सजवण्यात येतं. वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराशी रांगोळी, फुलांचं सुशोभन केलं जातं. मुलींच्या गावाकडे सणावाराला जे उत्सवी वातावरण असतं, तसं वातावरण वसतिगृहात असतं. सणाप्रमाणे गोडधोड आवर्जून केलं जातं आणि ते पोटभर असतं. दररोज संध्याकाळी बहुतेक मुली संस्थेच्या भव्य आणि उत्तम पद्धतीने राखल्या गेलेल्या पटांगणावर मनमुराद खेळतात. राष्ट्र सेविका समितीची शाखाही आवारात लागते. त्याव्यतिरिक्त संस्कार वर्ग, विविध छंदवर्ग, क्रीडा प्रशिक्षण, पुस्तक वाचन यातून मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खास प्रयत्न केले जातात. मुलींशी होणार्‍या आत्मीय व्यवहारामुळे त्यांच्या मनात वसतिगृह म्हणजे एक भलंथोरलं कुटुंब अशी भावना रुजते, विकसित होते. ती त्यांना संस्थेशी कायमस्वरूपी बांधून ठेवते. म्हणूनच मोठ्या सुट्ट्यांमध्ये आपापल्या कुटुंबाच्या भेटीला गेलेल्या मुली सुट्टी संपल्यावर पुन्हा आनंदाने या गोकुळात परततात; इतकंच नव्हे, तर संस्थेचा कायमस्वरूपी निरोप घेऊन आपापल्या विश्वात रममाण झाल्यानंतरही त्यांचा संस्थेशी संपर्क असतो, काही जणी तर आवर्जून माहेरपणाला येतात.
 
 
कोरोना काळात जपलेली सामाजिक जाणीव
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळातही संस्थेतील 2 हजार कर्मचार्‍यांची पगाराची 1 तारीख चुकवली नाही, हे विशेष. इतकंच नाही, तर त्या काळात 50 कोटींची कामं केली. 10 लाख लीटरची टाकी बांधली. 2 लाख लीटरचा रीसायकलिंग प्लँट उभा केला. सोलर पॅनल्स बसवले. महामारीच्या काळात बाया कर्वे हॉस्टेल मोकळं होतं. तिथे रा.स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारलं. सुमारे 2200 पेशंट, एकही न दगावता बरे होऊन घरी गेले. सेंटरमध्ये दाखल होताना त्यातल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक होती, तेही बरे होऊन घरी परतले. रोज 15 हजार जेवणाचे डबे वितरित होत होते. त्या वेळी संस्थेच्या परिसरात वृद्धाश्रमातल्या 35 आज्या, 100 कोर्ट कमिटेड मुली राहत होत्या. असे सगळे मिळून 500 जण त्या वेळीही परिसरात राहत होते. पण मुलींना आणि वृद्धाश्रमातल्या आज्यांनाही कोरोना होऊ न देण्याची काळजी घेतली.
 
संस्थेच्या डेक्कन जिमखान्यावर असलेल्या वसतिगृहात रास्तापेठ परिसरातल्या पेशंटसाठी कोविड सेंटर सुरू केलं. ज्यांना घरं लहान असल्याने पेशंटची काळजी घेणं शक्य नाही, अशा घरातल्या लोकांची तिथे शुश्रुषा केली. कॉर्पोरेशनने वैद्यकीय साहाय्य देण्याची जबाबदारी घेतली होती, सह्याद्री हॉस्पिटलचे 6 डॉक्टर्स होते. संस्थेत शिकत असलेल्या नर्सेस इथे मदतीसाठी होत्या. त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणासाठी जायच्या आणि बाकी वेळात या सेंटरवरही काम करायच्या. कोरोनातून बाहेर आल्यानंतर संस्थेने 5500 लोकांचं लसीकरण केलं. या कामासाठी कॉर्पोरेशनचा पुरस्कारही मिळाला. अशा प्रकारे कोरोना काळात संस्थेने समाजाप्रती असलेलं आपलं दायित्व निभावलं.
 
 
 
कोर्ट कमिटेड मुलींचं वसतिगृह स्वतंत्र, तरी शालेय वसतिगृहाला लागूनच आहे. या मुली सुट्टीच्या दिवसातही संस्थेतच असतात. या मुलींची विशेष काळजी घेतली जाते, कारण या संस्थेच्या मुली म्हणून ओळखल्या जातात. या मुलीही मिळत असलेल्या अकृत्रिम मायेचं मोल जाणतात. अगदी अलीकडेच यातल्या काही जणींनी सामान्य ज्ञानाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं 25 हजाराचं पारितोषिक पटकावलं. बाहेरच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला या मुलींना प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यासाठी कसून तयारी करण्याची सवय लावली जाते. त्यातून मुलींचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि ‘हम किसीसे कम नही’ याची खात्री पटते. सरकारी नियमानुसार वयाची 18 वर्षं पूर्ण होईपर्यंत मुलींना या वसतिगृहात राहता येतं. त्यानंतर ज्यांना पुढील शिक्षणाची इच्छा आहे, अशा मुलींची व्यवस्था संस्थेच्या दुसर्‍या वसतिगृहात केली जाते. त्यांच्या राहण्या-जेवणाचा, तसंच शिक्षणाचा खर्च भाऊबीज योजनेतून भागवला जातो.
 

vivek 
 
तेजस्विनी हेल्थ क्लब
 
 
संस्थेच्या आवारात मुद्दाम राखल्या गेलेल्या भल्यामोठ्या पटांगणात वेगवेगळे खेळ खेळायला मुलींना प्रोत्साहन दिलं जातं. नव्या युगाची नवी आव्हानं पेलण्यासाठी मुली शारीरिकदृष्ट्या सक्षम, कार्यक्षम होणं ही काळाची गरज आहे, म्हणूनच अगदी अण्णांच्या काळापासून मुलींना शरीरसंवर्धनासाठी भरपूर प्रोत्साहन दिलं जातं. 1938 साली बांधून घेतलेला कृष्ण तरण तलाव हे त्याचंच एक उदाहरण. 2003 साली सुरू झालेला तेजस्विनी हेल्थ क्लब हे त्या दिशेने पडलेलं पुढचं पाऊल म्हणता येईल. अत्यल्प फी, अत्याधुनिक साधनं, जाणकारांचं मार्गदर्शन आणि प्रसन्न वातावरण ही या क्लबची वैशिष्ट्यं आहेत. अनेक जणी या क्लबचं सदस्यत्व घेतात. मिळणार्‍या प्रतिसादामुळे आगामी काळात तेजस्विनी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी हे सर्वसमावेशक क्रीडासंकुल उभारण्याची संस्थेची योजना आहे. महिला खेळाडूंना उच्च स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण देणं हा त्यामागचा हेतू आहे.
 
 
vivek
 
संपदा बेकरी - ‘कमवा आणि शिका’ मूल्य रुजवणारा उपक्रम
 
 
1979 साली संस्थेतल्या चार मुलींपासून संपदा बेकरीची सुरुवात झाली. या चौघींना फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये बेकरीचं प्रशिक्षण देण्यात आलं. या बेकरीत काम करणार्‍या मुलींना रोजगार दिला जातो. बेकरीत दररोज चार तास काम करून त्यातून होणारी कमाई वसतिगृहाचं शुल्क भरण्यासाठी वापरावी, असा पर्याय संस्थेने काही जणींना उपलब्ध करून दिला आहे. अनेक मोठ्या मुली त्याचा लाभ घेतात. त्या केवळ तिथे कामच करत नाहीत, तर त्यातून बेकिंगचं कौशल्य आत्मसात करून आपापल्या घरी परतल्यावर तिथे बेकरी उत्पादनं करू लागतात. कमवा आणि शिका ही योजना असं अप्रत्यक्ष व्यवसाय प्रशिक्षणही देते.
 
 
विद्यार्थिदशेतल्या मुलींना अर्थार्जनाची संधी देणं हा संपदा बेकरी सुरू करण्यामागे संस्थेचा मुख्य उद्देश असला, तरी या बेकरीतल्या दर्जेदार उत्पादनांनी स्वत:चं मार्केट तयार केलं आहे. इथे बनणारी व्हेज पॅटिस पुणे परिसरातल्या मोठ्या कंपन्यांच्या कँटीनला दररोज हजारोंच्या संख्येत पुरवली जातात. आज पुणे परिसरात संपदा बेकरीच्या विविध उत्पादनांचे 12 आउटलेट्स आहेत. आज संपदा बेकरी ही संस्थेसाठी नियमित उत्पन्न देणारा उपक्रम ठरली आहे.
 
 
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
 
दिवाळी अंकासाठीच्या लेखाच्या निमित्ताने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत दोन दिवस होते. दुसर्‍या भेटीत वृद्धाश्रमातल्या सदस्यांना भेटायचं ठरवलं होतं. एरव्ही वृद्धाश्रमात जायला माझं मन राजी नसतं. तिथली उदासी, खिन्नता खोलवर परिणाम करते. पण या संस्थेच्या वृद्धाश्रमातले सदस्य भाऊबीज योजनेसाठी आपल्या संपर्कातून लाखो रुपये गोळा करतात, खूप मोठं योगदान देतात असं ऐकायला मिळालं. या वृद्धाश्रमाच्या शेजारीच असलेलं पाळणाघर आणि परिसरात असलेला मुलींचा उत्साही वावर यामुळे इथल्या वृद्धांच्या जगण्यावर एकाकीपणाची काजळी धरत नाही. त्यातले काही जण परिसरातल्या मुलींना गाणी-गोष्टी सांगतात. आपल्याजवळचा खजिना या मुलींवर आनंदाने उधळतात.
 
इथे सर्वांना स्वतंत्र खोल्या आहेत. (कोरोनानंतर या वृद्धाश्रमात नवीन अ‍ॅडमिशन नाही, सध्या वृद्धांची संख्या 35 आहे.) त्यांना पुरेल असं छोटेखानी स्वयंपाकघरही प्रत्येक खोलीच्या एका कोपर्‍यात मांडलेलं आहे. काही आज्या तिथे स्वत:पुरता चहा करतात, दूध गरम करतात, क्वचित कधी थोडंसं खायलाही करतात. मी गेले ती वेळ भर दुपारची साडेतीनची - विश्रांतीची होती. पहिल्या खोलीतल्या आजी त्यांच्या खोलीतल्या इवल्याशा देव्हार्‍यासमोर बसून जप करण्यात तल्लीन झाल्या होत्या. दुसर्‍या खोलीतल्या आजी बाहेरगावी गेल्याने कुलूप होतं. तिसर्‍या खोलीतल्या आजी - कमलताई भट आपल्या पलंगावर बसून त्यांना झेपेलसा व्यायाम करत होत्या. ’ही यांची व्यायामाची वेळ असते. त्या बसून जमेल तशी योगासनं करतात, व्यायाम करतात..’ बरोबरच्या कार्यकर्तीने सांगितलं. त्यांना व्यत्यय नको, म्हणून आम्ही पुढे जाणार इतक्यात आतून आवाज आला, ‘’कोण आहे?”
 
‘’आम्ही आहोत आजी. या ताई आपली संस्था बघायला आल्या आहेत.. चालू दे तुमचा व्यायाम” असं सांगून आम्ही पुढे जाऊ लागलो, तोच ‘’अगंबाई हो का.. मग या की आत..” असं म्हणत आजी धडपडत पलंगावरून खाली उतरून आमच्या स्वागताला दाराशी आल्या. बोळकं पसरून दिलखुलास हसल्या. म्हणाल्या, ‘’प्रत्यक्ष महर्षींनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आहे.” 60-62 वर्षांपूर्वीची ही आठवण आम्हांला सांगतानाही जाड भिंगाच्या चश्म्याआडचे त्यांचे डोळे आनंदाने लुकलुकत होते.
 
त्या वेळी संस्थेच्या अध्यापक महाविद्यालयातून डी.एड. झाल्यावर त्यांच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थिनींना घेऊन अण्णांकडे गेल्या होत्या. या सगळ्यांनी अण्णांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा आणि अण्णांनी त्यांना आशीर्वाद द्यावा, ही त्यांची इच्छा.
 
त्या वेळी वयाची शंभरी ओलांडलेल्या अण्णांचं आधीच कृश असलेलं शरीर अधिकच कृश झालं होतं. सुरकुत्यांचं घनदाट जाळं सगळ्या शरीरभर पसरलं होतं. पायांना दोन्ही हातांची मिठी घालून झोपडीत बसलेल्या अण्णांना मुख्याध्यापिका म्हणाल्या, ‘’अण्णा, नातींना घेऊन आले आहे तुमच्या.. आशीर्वाद द्या त्यांना.”
 
‘’आणि तुम्हांला सांगते, पायावर डोकं टेकल्यावर त्यांचा सुरकुतलेला हात त्यांनी डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला.. तो त्यांचा मायाळू स्पर्श आजही माझ्या मनात ताजा आहे.” कमलआजी सांगत होत्या. ’‘माझ्यासारखी डोळ्याने अधू असलेली मुलगी शिकून आपल्या पायांवर उभी राहिली ती या संस्थेमुळे. अण्णांचे आणि या संस्थेचं ऋण कधीही न फिटणारं आहे.
 
मी नोकरी या संस्थेत केली नाही तरी म्हातारपणी विसाव्याला या संस्थेच्या छायेत आले. आणि माझ्या आयुष्याची संध्याकाळ सोनेरी झाली. जोवर ताकद होती, तोवर रोज संध्याकाळी बाया-अण्णांच्या समाधीसमोर असलेल्या अंगणात इथल्या मुलींना गाणी-गोष्टी सांगितल्या. मुली तर खूश व्हायच्याच, मलाही खूप आनंद व्हायचा. कारण हे सगळं बाया-अण्णाही ऐकताहेत अशी माझी श्रद्धा होती. खरं तर विश्वासच होता. आजही आहे. बाया-अण्णा आहेतच इथे. ते इथे येणार्‍या प्रत्येकीला आजही आशीर्वाद देत आहेत.”
 
हे सांगताना आजींच्या चेहर्‍यावर सुंदर भावनांचं मिश्रण होतं.अण्णांवरची अपार श्रद्धा, त्यांच्या असण्याची खात्री, संस्थेबद्दलची कृतज्ञता आणि आयुष्याविषयीची कृतार्थता. त्यांच्यासमोर नमस्काराला वाकले. त्यांचे सायमाखले प्रेमळ हात हातात घेतले आणि म्हटलं, ‘’आजी, साक्षात अण्णांनी तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या.”
पुन्हा एकदा सुरकुतलेल्या चेहर्‍यावर आनंदाचे दिवे लुकलुकले. बोळकं पसरत हसत त्यांनी तोंडभर आशीर्वाद दिला. अण्णांच्या आशीर्वादाचा अंश आजींकडून माझ्यापर्यंत पोहोचल्याच्या जाणिवेने डोळ्यात पाणी जमा झालं.
 
 
समाजाचा दानरूपी सहभाग
  
समाजहिताचं एखादं मोठं कार्य घडतं, तेव्हा त्याला असंख्यांचा हातभार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपात लागलेला असतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कार्य सव्वाशे वर्षांनंतरही चालू आहे, याला मुख्य कारणं दोन - पहिलं म्हणजे स्त्रीशिक्षण या विषयात आजही काम करण्याची असलेली नितांत गरज आणि त्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेली माणसं; दुसरं म्हणजे, या कामाची आजही असलेली गरज ओळखून त्यासाठी समाजातल्या लाखो लोकांनी केलेली अविरत मदत. कामाचं महत्त्व समजल्याने आणि संस्थेच्या सचोटीवर असलेल्या निस्सीम विश्वासापोटी समाजातल्या विविध गटांकडून सातत्याने मदत मिळत राहिली. दर पिढीतल्या विश्वस्तांबद्दल विश्वास वाटला, हे कौतुकास्पद! या आर्थिक मदतीचे अनेक प्रवाह आहेत. पैकी पहिला शतायुषी भाऊबीज योजना.
 

vivek 
 
भाऊबीज योजना
 
शतायुषी ठरलेली भाऊबीज योजना म्हणजे संस्थेचं एक असाधारण वैशिष्ट्य आहे. 1919 साली संस्थेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी ही अभिनव संकल्पना सुचली ती आजन्म सेवक म्हणून काम करणार्‍या गो.म. उर्फ बापूसाहेब चिपळूणकर यांना. संस्थेत राहणार्‍या मुलींना हक्काने समाजाकडून भाऊबीज मिळावी व संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी त्याचा विनियोग व्हावा, अशी ती कल्पना. या योजनेच्या अतिशय नियोजनबद्ध आखणीमुळे त्यातून संस्थेसाठी फक्त अर्थ उभारणीच झाली नाही, तर ती संस्थेच्या कार्याच्या प्रचाराचं मुख्य माध्यम बनली. ज्या काळात अन्य प्रसारमाध्यमं अस्तित्वातही नव्हती, अशा काळात भाऊबीज योजनेने संस्थेचं काम घराघरांत पोहोचायला मदत झाली. त्यासाठी संस्थेच्या शाळांमधले विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळांमधले शिक्षक यांनी आणि गावोगावच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाऊबीज योजनेच्या माध्यमातून भरीव निधी उभा केला. अनेकांनी निरपेक्षपणे हे काम वर्षानुवर्षं केलं.. आजही करताहेत. अगदी कोरोनाच्या काळात जेव्हा थेट भेट शक्य नव्हती, तेव्हाही हे काम थांबलं नाही. एकेका कार्यकर्त्यांनी मोबाइलच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत अक्षरश: लाखोंचा निधी उभारला. आज संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिकणार्‍या 750 मुली संस्थेवर आर्थिकदृष्ट्या पूर्णत: वा अंशत: अवलंबून आहेत. त्यांची ही आर्थिक गरज भाऊबीज योजनेतून भागवली जाते.
 
 
वैयक्तिक देणगी देणारे लाखो दाते
 
 
’दाता भवति वा न वा’ असं सांगणारी एका संस्कृत सुभाषितातली ओळ आहे. संस्थेला मात्र असा अनुभव नाही. अगदी माजी विद्यार्थिनींपासून ते मोठमोठ्या दात्यापर्यंत अनेक जण संस्थेला वेळोवेळी देणगीरूपात मदत करत असतात. या संस्थेने दिलेल्या शिक्षणाच्या - संस्कारांबद्दलच्या कृतज्ञतेपोटी फूल ना फुलाची पाकळी म्हणून तिची परतफेड करणार्‍या असंख्य माजी विद्यार्थिनी आहेत. त्या देणगीच्या माध्यमातून आजही संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आजही संस्था म्हणजे त्यांचं माहेर आहे. ही भावना त्यांच्या कृतीतून व्यक्त होते.
 
 
त्यांच्याबरोबरच संस्थेच्या कार्याविषयी आस्था-कौतुक असणारे, या कामाची समाजाला असलेली गरज लक्षात घेणारे असंख्य जण काही कारणपरत्वे, तर काही नियमितपणे देणगी देऊन संस्थेच्या पाठीशी उभे राहतात.
 
 
 
विविध कंपन्यांचा हातभार
 
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला देणगी देणं हा काही कंपन्यांच्या संस्थापकांना/संचालकांना समाजऋण फेडण्याचा मार्ग वाटतो. याच भावनेने ते वर्षानुवर्षं आधारस्तंभ बनून संस्थेच्या पाठीशी उभे राहतात, तर काही कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करतात. मार्ग कोणताही असो, सर्वांची त्यामागची भावना आपुलकीची असते. अशा आत्मीय दानाचा ओघ अखंड, अविरत चालू आहेे. संस्थेच्या अनेक योजनांना बळ पुरवतो आहे, गती देतो आहे.
 
 
आजन्म सेवक
 
 
संस्थेच्या स्थापनेच्या वेळेस जेव्हा अण्णा आणि बायांना मदतीची गरज होती आणि समाजातून त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता, त्या काळात काही मोजक्याच व्यक्ती त्यांच्यासोबत खांद्याला खांदा भिडवून उभ्या राहिल्या. त्यांनी केवळ ज्ञानदानाचंच काम केलं नाही, तर कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता अन्य कामांमध्येही योगदान दिलं. अशा सहकार्‍यांना ‘आजन्म सेवक’ म्हटलं जातं. पार्वतीबाई आठवले या त्याच्या अग्रणी. संस्थेचे कर्मचारी म्हणून दिवसभरातले ठरावीक तास झाल्यानंतर उरलेल्या वेळात संस्था सांगेल त्या कामाची जबाबदारी या आजन्म सेवकांनी स्वीकारली आणि यशस्वीरित्या निभावलीही. आजन्म सेवक म्हणजे अष्टौप्रहर काम. यांनी दिलेल्या वेळाचं मोल कशातही होणं अशक्य. आजही आजन्म सेवकांची योजना आहे. ज्यांना नोकरीच्या वेळेव्यतिरिक्तचा उरलेला सर्व वेळ संस्थेच्या विकासासाठी, वाढीसाठी देण्याची इच्छा आहे, अशा इच्छुकांमधून निवड समिती आजन्म सेवकांची निवड करते. सध्या असे 14 आजन्म सेवक कार्यरत आहेत. हे आजन्म सेवक निवृत्तीपर्यंत नोकरी आणि स्वयंसेवी वृत्तीने काम दोन्ही माध्यमांतून योगदान देतात.
 

vivek 
 
 
बाया कर्वे, महर्षी कर्वे आणि पार्वतीबाई आठवले यांचं हे समाधिस्थान हा संस्थेतील प्रत्येकासाठी केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर ते या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. हे स्थळ सर्वांसाठी चैतन्याचा अखंड स्रोत आहे. ’अण्णा - बाया आहेत आणि त्यांचं आपल्या कामाकडे लक्ष आहे’ ही इथल्या प्रत्येकाची भावना आहे. हे समाधिस्थळ या सर्वांमधला सदसद्विवेक जागृत ठेवते. त्यांना कार्यप्रेरणा देते आणि ऊर्जाही. 
 
vivek
 
 
vivek
 
 
कार्यकारिणी
 
संस्थेची एकूण सभासद संख्या 2700हून अधिक आहे. या सभासदांमधून दर पाच वर्षांनी व्यवस्थापक मंडळ निवडलं जातं. यात निवडून आलेले, स्वीकृत आणि निमंत्रित सभासद यांचा समावेश असतो. त्याचबरोबर आजन्म सेवक प्रतिनिधी, शाखाप्रमुखांचे प्रतिनिधी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाखांचे सेवक प्रतिनिधी हेदेखील या कार्यकारिणीचा भाग आहेत. आज संस्थेच्या कामाचा व्याप सक्षमपणे सांभाळत असलेल्या या कार्यकारिणीत बांधकाम व्यावसायिक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, सीए, चित्रपट व्यावसायिक असे विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ समर्पित भावनेने आपल्या अनुभवांचा लाभ संस्थेच्या कार्यासाठी देत आहेत. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा स्मिता घैसास असून कार्याध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र देव यांच्यावर आहे. 13 जणांची ही कार्यकारिणी संस्थेचं नेतृत्व करते आहे. विविध कामांसाठी 85 समित्यांची स्थापना झाली असून त्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे कार्य चालू आहे. अण्णांचे विचार हेच या सर्वांसाठी कार्यप्रेरणा आहेत. व्यवस्थापक मंडळाचे सर्व सदस्य यातील कुठल्या ना कुठल्या समित्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेतच. व्यवस्थापक मंडळ आणि या सर्व समित्यांच्या बैठकांची वारंवारिता निश्चितपणे ठरलेली असून या बैठकांच्या माध्यमातून नवीन कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प याबाबतचे निर्णय होतात व त्यांचं कार्यान्वयनही केलं जातं. या कार्यकारिणीचे प्रतिनिधी म्हणून संस्थेचे सचिव या निर्णयांच्या अंमलबजावणीचे, पर्यायाने दैनंदिन कामांचं दायित्व पूर्ण करतात.
 
 
परिमळ विचारांचा
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाचं भलंमोठं जाळं आहे. समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या मुलींच्या सर्वांगीण उन्नतीचा अण्णांना असलेला ध्यास समजून घेऊन त्यांना मन:पूत साथ देणारी सहचरी आणि त्या उद्दिष्टासाठी काम करणारी टीम प्रत्येक कालखंडात मिळणं हे या कामाचं महद्भाग्य! अण्णांचा विचारवसा पेलू शकेल अशी ही सर्व मंडळी म्हणजे विनोबांच्या भाषेत ‘अण्णांची मानस संतती’ म्हणता येईल. त्यांनी अण्णांचे विचार नुसते समजून घेतले नाहीत, तर आपल्यामध्ये ते पचवून कृतीत परावर्तित केले, म्हणूनच अण्णांच्या काळापासून चालू असलेली कामं आणि नव्याने सुरू झालेली कामं ही परस्परांशी इतकी ’सिंक’ झालेली दिसतात.
 
 
एखाद्या वास्तूत गेल्यावर आपण आपोआपच सकारात्मक ऊर्जेने भारले जातो. मग ते कधी देवालय असतं तर कधी एखादी सामाजिक संस्था. जिथे जिथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं काम उभं राहिलं, मग ते पुण्यात असो वा पुण्याबाहेर.. भले अण्णा त्यांच्या हयातीत तिथे कधी गेले असोत वा नसोत, तरी त्या सर्व वास्तू सकारात्मकतेने, चैतन्याने भारलेल्या असतात. याचं कारण अण्णांच्या चैतन्यदायक, प्रेरक विचारांचा परिमळ तिथे असतो. आजही अण्णा आहेत, ते पाहताहेत ही तिथे वावरत असलेल्या सर्वांची भावना आहे. चैतन्याने भारलेल्या संस्थेला भेट देणार्‍या प्रत्येकाला ही अनुभूती येते. एखाद्या अखंड धुनीप्रमाणे आयुष्यभर समाजचिंतन करणार्‍या महर्षी अण्णांचे चैतन्यदायक विचार या कार्याला बळ पुरवताहेत.
----------------------------------------

अश्विनी मयेकर

https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.