राऊतांचे कॅसिनो राजकारण

विवेक मराठी    24-Nov-2023   
Total Views |

vivek
 
या भूमंडळावर काही घटना होऊ द्या, मग युद्ध असो वा, पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा असो. कुठल्या राजकीय नेत्याचा सहकुटुंब परदेश दौरा असो किंवा राजकीय दौरा असू द्या, त्यावर मुंबईतील एका व्यक्तीची प्रतिक्रिया तयार असते. त्यासाठी त्यांना कोणतेही पुरावे लागत नाहीत आणि आरोप करताना त्यांच्याकडे पुरावे मागितले जात नाहीत. रोज माध्यमांच्या प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी ते सकाळी उठून रोज कोणत्यातरी राजकीय नेत्यावर बिनबुडाचे आरोप करतात. माध्यमेसुद्धा दिवसभर त्या बातमीचा एवढा ऊहापोह करीत असतात की, जणू सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलाय. असे आरोप करणारे दुसरे कोणी नाहीत तर शिवसेनेचे खा. संजय राऊत आहेत. त्यांच्या आरोपातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त होते ते मनोरंजन.. सध्या संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कॅसिनो खेळताना करोडो रुपये उडवल्याचा आरोप केला आहे. बावनकुळे हे आपल्या परिवारासह मकाऊमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. मकाऊ हा प्रांत पर्यटनाबरोबरच कॅसिनोसाठीही प्रसिद्ध आहे. आता हे संजय राऊत यांना माहीत असल्याने लागलीच आरोप केला. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगितले. आता राऊत बोले आणि मीडिया चाले! असे असल्याने यावर माध्यमांनी दिवसभर दळण दळले. पण राऊतांचे हे आरोप नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आहेत. नाहीतर त्यांनी आतापर्यंत पुरावे सादर केले असते. एका राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यावर सहज आरोप केले आणि मीडियानेही कोणतीही शहानिशा न करता त्याला प्रसिद्धी दिली, हा राऊतांवर असलेला अंधविश्वास म्हणावाच लागेल. राऊतांही माध्यमांची नस चांगली माहीत असल्याने त्यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीतच आरोप केले. याअगोदरही त्यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे साडेतीन शहाणे तुरुंगात जातील अशी हवा करून भलीमोठी पत्रकार परिषद घेतली. संपूर्ण महाराष्ट्र ती पत्रकार परिषद लाइव्ह पाहत होता. पण त्यातून साडेतीन काय, अर्ध्या शहाण्यावरही ते आरोप करू शकले नाहीत. माध्यम क्षेत्रात हयात घालवलेल्या राऊतांना माध्यमांचा वापर कसा करावा आणि प्रसिद्धी कशी मिळवावी, याची चांगली सिद्धी प्राप्त आहे. त्यामुळेच ते माध्यमांना आपल्याभोवती चांगलेच गुंतवत असतात.
 
 
बावनकुळे यांच्यावर आरोप करून त्यांनी भाजपाच्या आयटी सेलला चांगलेच अंगावर घेतले. लागलीच आयटी सेलनेसुद्धा आदित्य ठाकरे यांचे फोटो व्हायरल केले. त्यामुळे आता यापुढे आयटी सेलने उबाठाला वेळोवेळी अशा प्रकारचे उत्तर दिल्यास नवल वाटायला नको. कारण सुरुवातच राऊतांनी केली. मग भाजपा का गप्प बसेल?
 
 
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात फोटो मॉर्फिंग करणे किती सोपे आहे, असाच प्रयोग राऊत यांनी केला असू शकतो. कारण त्यातील त्यांना बरीच माहिती आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी मागील वेळी मॉर्फ करून उबाठांच्या मोर्चाचे म्हणून वापरले होते.
 
 
आज प्रत्येक राजकीय नेत्याचे एक खासगी आयुष्य असते. त्यावर टीकाटिप्पणी करणे चुकीचे आहे. बावनकुळे हे आपल्या व्यग्र दिनचार्येतून आपल्या परिवाराला वेळ देत असतील, तर सर्वच राजकीय पक्षांसाठी, कार्यकर्त्यांसाठी ते अनुकरणीय आहे. पण राऊतांसारखे राजकारणी हा आदर्श न घेता त्यांतून चुकीचे शोधून लोकांसमोर आणत आहेत. यामध्ये तथ्य असते, तर दखलपात्र झाले असते. पण माध्यमातून मिथ्या आरोपांची राळ उडवून ते एखाद्याच्या खासगी आयुष्याची दैना करीत आहेत. अशा आरोपांतून राऊतांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील असे दिसते. पण माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा संवादात जर आरोपांचे पुरावे नसतील तर त्याला प्रसिद्धी देऊ नये, तरच अशा प्रकारच्या वाचाळवीरांना आवर घालता येईल.