कष्टाला ‘ब्रँड’ची आवश्यकता

विवेक मराठी    03-Nov-2023
Total Views |
@अनिता दिवटे 9920935223
 
vivek
आज शेतमाल विक्री हा अत्यंत महत्त्वाचा व तेवढाच गुंतागुंतीचा विषय झाला आहे. शेतकर्‍यांनी व कृषी उद्योजकांनी आपल्या शेतमालाची विक्री करताना ‘जो दिखता है, वो बिकता है’ असे म्हणून चालणार नाही. त्यासाठी उत्पादनांचे उत्तम ब्रँडिंग आणि पॅकेजिंगदेखील करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ग्राहकांच्या मनात विश्वासास निर्माण होण्यास मोठी मदत होते. याविषयीची प्रक्रिया समजावून सांगणारा हा लेख.
जच्या काळात शेतीपुढे विविध समस्या आहेत. कृषी क्षेत्रात यश मिळण्यासाठी कसदार जमीन करणे जसे महत्त्वाचे असते, तसेच दर्जेदार बियाणे, रोपे तयार करणे आणि योग्य व्यवस्थापनातून उत्पादन वाढविणे हा शेतीतल्या यशाचा एक भाग असतो. यापुढे जाऊन तयार झालेल्या उत्पादनांचे उत्तम प्रकारे पॅकिंगचे तंत्रज्ञान अवगत करून ब्रँड तयार करून शेतमालाची विक्री करणे हा यशप्राप्तीचा श्रेयस्कर मार्ग आहे. त्यासाठी शेतकरी व नव कृषी उद्योजक बांधवांनो, तुम्ही अगोदर आधुनिक व्हा. आधुनिक होणे म्हणजे काय? पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देणे - डिजिटल, स्मार्ट शेतीचे तंत्र अवगत करायला हवे. याबरोबर मार्केटिंगच्या नवनव्या तंंत्रांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
 
 
‘ब्रँडिंग’ हा मार्केटिंग (विपणन)मधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जाहिरात क्षेत्रात ब्रँडिंग व ब्रँड हा शब्द नेहमी वापरला जातो. ‘ब्रँड’ हा विषय तसा गहन आहे. तो समजून घेणे आवश्यक आहे.
 
 
शेतकरी व कृषी उद्योजक बांधवांनो, तुमच्या व्यावसायाचा ब्रँड बनवायचा असेल, तर व्यावसायिक ब्रँड म्हणजे काय असते हे प्रथम सोप्या भाषेत समजून घेऊ या. उदाहरणार्थ, किराणा दुकानात गेल्यानंतर तुम्ही एक ग्राहक म्हणून काय मागाल?
चिवडा? हल्दीरामचा.
 
बाकरवाडी? चितळे बंधू.
बिस्किट? पार्ले जी.
 
दूध? अमूल.
 
थोडा विचार करा. वरील उत्पादनांच्या गुणवत्तेवर तुमचा विश्वास आहे, म्हणून तुम्ही वरील उत्पादनांची मागणी कराल. जरी या ब्रँडची उत्पादने इतर सामान्य उत्पादनांपेक्षा जास्त किमतीची असली, तरी ग्राहक किमतीचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर त्यांची उत्पादने विश्वासाने विकत घेतात. त्याला आपण ब्रँड म्हणू शकतो. ब्रँडची मार्केटमध्ये इतरांपेक्षा खास अशी ओळख असते, ज्याच्याशी लोक सहज संवाद साधू शकतात व ती सतत लोकांच्या नजरेसमोर असतात.
 

vivek 
 
देशात काही वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहेत, ज्यांनी केवळ ग्राहकवर्गाच्या मनावर राज्य केले नाही, तर राष्ट्रउभारणीतही मोलाचे योगदान दिले आहे - उदा., ‘अमूल’, ‘पार्ले जी’, ‘मारुती’, ‘निरमा पावडर’ हे ब्रँड होय. या सर्व कंपन्यांंच्या उत्पादनांचे ब्रँड लोकप्रिय झालेले आहेत, तितक्याच जाहिरातीदेखील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या आहेत. ‘अमूल डेअरी’ हा कृषी उद्योगातला सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. त्यांच्या अमूल ब्रँडनेमअंतर्गत दूध, पनीर, श्रीखंड, दही, ताक, लोणी, तूप इ. दूध आधारित सुमारे दोन हजार उत्पादने तयार केली जातात. ही सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. त्यांच्या यशाचे गमक आहे ते अमूल ब्रँडनेम. ‘किसान टोमॅटो केचप’ हासुद्धा एक कृषी ब्रँड लोकप्रिय आहे.
 
 
साधारणत: शेतीमध्ये ‘सिजेंटो’, ‘बायर’, ‘बोल गार्ड’ हे ब्रँड आवडीचे बनले आहेत. कृषी अवजारे व निविष्ठांचा विचार करताना किर्लोस्करचा नांगर, जैन इरिगेशनचे ठिंबक सिंचन पंप यांना प्राधान्य दिले जाते. आज महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा ‘महाबीज (म्हणजे महान बीज) हा शेतकर्‍यांचा लोकप्रिय ब्रँड आहे. ब्रँडची यासारखी असंख्य उदाहरणे देता येतील. एकूणच ब्रँड हा उत्पादनांचा चेहरा असतो. त्या त्या कंपन्यांच्या मालकांनी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या मेहनतीने आणि गुणवत्तेने उत्पादनांचे ब्रँड विकसित केलेले असतात.
 
 
शेतकर्‍यांनी व नवउद्योजकांनी आपल्या व्यवसायाच्या कल्पना सत्यात उतरविण्यासठी व सध्याच्या डिजिटल स्पर्धेच्या युगात जागतिक बाजारपेठेत स्वत:ची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी उद्योगाचा ब्रँड निर्माण करणे आवश्यक आहे. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे - ब्रँड म्हणजे विक्री नव्हे, तर ती आपल्या उत्पादनाची ओळख आहे. ब्रँड म्हणजे आपले उत्पादन ग्राहकांच्या डोक्यात भिनवणे. थोडक्यात काय, तर एखादी कंपनी ब्रँडच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा तयार करत असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे - 'first impression is the last impression', म्हणूनच तर तुमच्या उत्पादनांची ग्राहकांवर छाप पाडण्यासाठी आकर्षक ब्रँड असावा.
 
 
ब्रँडनेम हे आपल्या उत्पादनांचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे ब्रँडचा उच्चार करणे कठीण नसावे. सर्वांचे लक्ष वेधून घेणारे असावे. ग्राहकांच्या मनात ब्रँडची प्रतिमा निर्माण करणारे असावे. ब्रँडची प्रतिमा विकसित करण्यासाठी ब्रँडचे नाव कायदेशीररित्या नोंदणीकृत करून घेतले पाहिजे. व्यावसायिक ब्रँड म्हणून सर्वत्र प्रचार करण्यासाठी समाजमाध्यमांचा व जाहिरात तंत्राचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. एकूणच शेतकरी बांधवांनी शेतमालाचे उत्पादन तयार करताना उत्कृष्ट ब्रँडिंगचा विचार करून कृषी व आर्थिक उन्नती साधावी.
 
 
लेखिका कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल (ता. डहाणू, जि. पालघर) येथे कृषी अभियांत्रिकी विभागात शास्त्रज्ञ आहेत.