कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर

विवेक मराठी    03-Nov-2023
Total Views |
 @प्रा.डॉ. भगवान साखळे
 राज्याच्या विविध भागात पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीआधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. देशातील दहा अन्न प्रक्रिया कंपन्यांपैकी प्रमुख चार कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे. शिवाय शेतमाल प्रक्रिया उद्योगांतील नवनिर्मितीमुळे देशात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कृषी प्रक्रिया उद्योगविश्वाची ओळख करून देणारी ही विशेष पुरवणी.

vivek
 
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. भारतीय हवामानात विविध प्रकारची फळे, भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये यांचे उत्पादन घेतले जाते. अनेक उद्योगांना कच्चा माल पुरविण्याचे काम कृषी क्षेत्र करीत असते. त्यामुळे देशात विकासाचा प्रमुख घटक शेती आणि शेतीशी निगडित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कृषी उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने हरितक्रांती (तृणधान्य उत्पादन), धवलक्रांती (दुग्ध उत्पादन), नीलक्रांती (मत्स्यउत्पादन), पीतक्रांती (तेलबिया उत्पादन) आणि सध्या येऊ घातलेली सुवर्णक्रांती (फळे व भाजीपाला उत्पादन) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या सर्व क्रांतीमुळे कृषी मालाच्या उत्पादनात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला लागणारा काही विशिष्ट कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. या कामगिरीमुळे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा अन्न-उत्पादक देश बनला आहे.
 
 
देशात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून कृषी प्रक्रिया उद्योग गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत 41 मेगा फूड पार्क, 376 कोल्ड चेन प्रकल्प, 79 कृषी प्रक्रिया क्लस्टर्स, 489 अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमतांची निर्मिती/विस्तार प्रस्ताव, 61 बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज प्रकल्पांची निर्मिती, 52 ऑपरेशन ग्रीन प्रकल्प, 183 अन्नचाचणी प्रयोगशाळा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशात पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीआधारित प्रक्रिया उद्योगाला चालना दिल्यामुळे येथील शेती आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.
 
 
भारतात - विशेषत: महाराष्ट्रात शेतमाल प्रक्रिया उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र हे महत्त्वाचे शेतीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये विविध प्रकारच्या शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. गुड गव्हर्नन्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे दुसर्‍या क्रमाकांचे राज्य आहे. राज्यात 30 मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. द्राक्ष, कांदा, डाळिंब, काजू, हळद, ज्वारी व मांस उत्पादनात राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर डाळीमध्ये दुसर्‍या क्रमाकांचे उत्पादित राज्य आहे. ऊस उत्पादनातही अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत असतो. पण काढणीपश्चात तंत्रज्ञानाअभावी शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. याला कृषिमाल प्रक्रिया उद्योगाची साथ मिळणे आवश्यक आहे. तसे पाहिले, तर शेती प्रक्रिया उद्योग हा नवीन नसून आधीच्या काळात शेतकरी घरी पिकांवर प्रक्रिया करून विक्री करायचा, वेगवेगळ्या डाळी घरी करायचा, दुधावर प्रक्रिया करून खवा, लोणी, ताक यांची विक्री करायचा. त्या काळात ह्या प्रक्रिया उद्योगाचे स्वरूप पारंपरिक होते, मात्र आज हे स्वरूप बदलून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.
 
 
 
आज ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या युगात पारंपरिक शेती करणे व शेतमालाची विक्री करून हा व्यवसाय चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे शेती उत्पादनाची व्याप्ती वाढविणे व उत्पादनावर प्रक्रिया करून मालविक्रीतून नफा मिळविणे आवश्यक झाले आहे. यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन उद्योग, मत्स्य व मास प्रक्रिया उद्योग, दूध प्रक्रिया उद्योग, फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, फूल उद्योग, पेय उद्योग, ज्वारीपासून व द्राक्षापासून अल्कोहोल प्रक्रिया उद्योग, साखर उद्योग, हातमाग व यंत्रमाग उद्योग ह्यासारख्या शेती प्रक्रिया उद्योगांवर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात ह्या प्रक्रिया उद्योगांना आधुनिक काळात मोठी संधी निर्माण होत आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत इथल्या शेतमालाचे मूल्यवर्धन होत आहे.
 
 
 
कृषी प्रक्रिया उद्योग हब
 
महाराष्ट्र हे कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. प्रक्रिया उद्योगांअंतर्गत राज्यात सुमारेे 15.8 कोटी डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे. यामुळे महाराष्ट्र हे देशातील अन्न प्रक्रिया व्यवसायांसाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा सुमारे 13 टक्के वाटा आहे, शिवाय एकूण वाढीचा दरही बारा टक्के आहे. देशात कार्यरत असलेल्या प्रमुख दहा अन्न प्रक्रिया कंपन्यांपैकी चार कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, मोंडेलेज इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (कॅडबरी), पार्ले अ‍ॅग्रो आणि वेंकीज इंडिया लि. यांचा समावेश आहे. राज्यातील इतर भागांमध्ये एमटीआर, ब्रिटानिया, मॅककेन, पेप्सिको, गोदरेज, मदर डेअरी, मॅप्रो, हल्दीराम आणि नेस्ले या नामवंत प्रक्रिया केंद्राचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे.
 
 
महाराष्ट्राची बलस्थाने
 
 
महाराष्ट्र हा ज्वारी, भात, सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, भाजीपाला, आंबा, डाळिंब, काजू, हळद, दूध व मांस उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इत्यादी 36हून अधिक ठिकाणी सहकारी दुग्धयोजना राबविली जात आहे. राज्यामध्ये 114हून अधिक दुग्धकेंद्रे आहेत, स्पेन आणि सीरिया या देशांनादेखील दुधाची पावडर निर्यात होत असते. गोकुळ, वारणा, चितळे, राजहंस, शिवामृत यासारख्या दूध संस्था प्रक्रिया उद्योगात उतरून महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला भक्कम करत आहेत.
 
महाबळेश्वर ठिकाणी मॅप्रोसारखी नामांकित कंपनी स्ट्रॉबेरीचे मूल्यवर्धन करताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये 1885मध्ये कोल्हापूर येथे गुळाची पहिली बाजारपेठ निर्माण करण्यात आली. कोल्हापूरला महाराष्ट्रातील ‘गुळाचे कोठार’देखील म्हटले जाते. राज्यातील सर्वाधिक गूळ उत्पादन एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते. गूळ उद्योगांमधून रोजगाराच्या गोष्टींवर शेतकर्‍याच्या कौशल्याला संधी देण्याच्या दृष्टीने हा उद्योग राज्यामध्ये महत्त्वाचा उद्योगदेखील मानला जातो.
 
 
कोकणात काजू, आंबा, फणस, भाताचे सर्वाधिक उत्पन्न होत असले, तरी या ठिकाणी प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयवंत विचारे यांनी रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रिया सहकारी संस्थेच्या माध्यमातून, तर रायगड जिल्ह्यात ‘फूड अ‍ॅग्री अँड इको-टूरिझम’ नावाने शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करून शेतकर्‍याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. कोकणाची भिस्त मत्स्यव्यवसायावर आहे. त्यामुळे मत्स्यप्रक्रियेला चालना मिळणे गरजेचे आहे.
 
 
vivek
 
नाशिक जिल्ह्यात 60,000 हेक्टर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. त्यामुळे हा जिल्हा वाइननिर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनला आहे. या जिल्ह्यात आज देशी आणि आंतरराष्ट्रीय वाइन कंपन्या आहेत. याशिवाय टमाटा, डाळिंब, करवंद, जांभूळ व आंबा या फळपिकांवर प्रक्रिया केली जाते. कृषी उद्योजक व सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणपट्ट्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या काजूला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या परिसरात प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. हा राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प समजला जातो.
 
 
नाशिक हे भगर उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. नाशिक शहरात व जिल्ह्यात सुमारे 35 व 40 भगर मिल्स आहेत. या सर्व मिल्समधून वर्षाकाठी साधारणत: दीड हजार टन भगरीचे उत्पन्न एकट्या नाशिकमध्ये घेतले जाते. जळगाव जिल्ह्यात जैन उद्योग समूहाचा कांदा प्रक्रिया उद्योग हा एक लक्षवेधी उद्योग आहे. हल्दीराम हा विदर्भातील एक सर्वात मोठा प्रक्रिया उद्योग आहे. जगातील सातही खंडांमध्ये हल्दीराम समूहाचा वावर आहे. याखेरीज हा प्रदेश संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे, पण प्रक्रिया उद्योगात मागे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मागील अर्थसंकल्पात नागपूर, कटोल, मोर्शी व वरूड या चार ठिकाणी संत्रा प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ ही खनिज व वनउपज संपत्तीची खाण आहे, पण प्रक्रिया उद्योगांची मात्र वानवा आहे.
कमी पर्जन्यमान, आधुनिक तंत्राचा तुटवडा या कारणांमुळे मराठवाडा हा प्रक्रिया उद्योगात पिछाडीवर आहे. विदर्भ व मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, मोसंबी या पिकांवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची संधी आहे.
 
 
महाराष्ट्रामध्ये ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ज्वारीमध्ये 70 टक्के स्टार्च असल्यामुळे मक्यापासून जे पदार्थ तयार करता येतात, ते ज्वारीपासूनही तयार करता येतात. सोलापूर जिल्हा ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय श्रीधान्य वर्षानिमित्त सोलापुरात ‘श्रीधान्य अन्न उत्कृष्टता केंद्र’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे इथल्या ज्वारीचे मूल्यवर्धन होण्यास मदत होणार आहे. कोकणात व खानदेशात बाजरी व नाचणी यांचे पीक घेतले जाते. श्रीधान्यांतील उच्च पोषणमूल्यांमुळे त्यांचा आहारात वापर होत आहे. या श्रीधान्यांचे मूल्यवर्धन झाल्यास शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास वाव आहे.
 

vivek 
 
मेगा व फूड पार्कची निर्मिती
 
 
महाराष्ट्राच्या अन्न प्रक्रिया प्रणालीला पूरक ठरणारा आणखी एक घटक म्हणजे सुसज्ज एअर कार्गो सुविधा. त्यामुळे अनेक प्रक्रिया उद्योग आकर्षित होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात औद्योगिक विकास समूह अर्थात ट्रायबल इंडस्ट्रियल समूहाच्या वतीने प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे भात, नाचणी, वरई या पिकांच्या विकासाबरोबर स्थानिक जनजाती शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होणार आहे. कोल्हापूर येथे काजू प्रक्रिया, तर सोलापुरात खवा, सांगलीत हळद प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे.
 
 
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व उद्योजक यांच्या समन्वयातून राज्यात तीन ठिकाणी मेगा फूड व सात फूड पार्क उभारणीला मान्यता देण्यात आली असून, यातील काही पार्कच्या कामाला सुरवात झालेली आहे. सातारा, पैठण, वर्धा या तीन ठिकाणी मेगा फूड पार्क, तर लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान छ. संभाजीनगर, हलदीराम कृषी उद्योग नागपूर, माँ उडिया औद्योगिक वसाहत कापसी नागपूर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विंचूर जि. नाशिक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ. पलूस जि. सांगली, अ‍ॅग्री फूड इन्फॉरमॅटिक्स इंडिया, सांगवी जि. सातारा या सात ठिकाणी मेगा फूड पार्कची निर्मिती केली जात आहे. याशिवाय राज्यात मनुका, काजू, आंबा, संत्रे, टमाटा, तांदूळ, दूध, डाळ, सोयाबीन इत्यादी प्रक्रिया उद्योग समूह विकसित केले जात आहेत.
 
 
केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत विकासाकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे कृषी प्रक्रियेमध्ये जगाच्या पाठीवर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण होईल, अशी आशा आहे.
 
 
- लेखक छ. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अन्नतंत्रज्ञान व रसायन तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत.