संघ स्वयंसेवक व मराठी उद्योजक अतुल बेडेकर यांचे निधन

विवेक मराठी    04-Nov-2023
Total Views |

rss
 
मुंबई : मराठी उद्योग जगतात मसाले उत्पादन व विक्रीच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या 'व्ही. पी. बेडेकर अँड सन्स' समूहाचे संचालक अतुल वसंतराव बेडेकर (५६) यांचे शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अतुल बेडेकर हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, गिरगाव नगर संघचालक म्हणून त्यांच्याकडे सध्या जबाबदारी होती.
 
गिरगावात १९१० साली व्ही. पी. बेडेकर यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. १९४३ मध्ये बेडेकर मसाले व्यवसायाचे प्राइव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले. आज बेडेकर ब्रँड व ब्रँडची उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील घराघरांत पोहोचली असून परदेशांतूनही या उत्पादनांना मोठी मागणी आहे.
 
तरूण उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
 
'व्ही पी. बेडेकर अँड सन्स'चे संचालक अतुल बेडेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील तरूण मराठी उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, फडणवीसांनी आपल्या संदेशात म्हणाले, बेडेकर हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस दुर्मिळ, त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाला कार्पोरट करतानाच त्यातील चव मात्र अस्सल मराठी ठेवली होती.