तीन भावंडांची गोष्ट बंगलोर डेज

विवेक मराठी    06-Nov-2023   
Total Views |


vivek
‘बंगलोर डेज’ या चित्रपटात तीन भावंडांची गोष्ट आहे. लग्नसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अनुभव ह्यातील तिन्ही मुलांसाठी वेगवेगळा आहे, परंतु तरीही आयुष्यभरासाठी साथ देणारा सोबती शोधायची इच्छा तिघांचीही आहे. त्यासाठी स्वत: बदलण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते, हा संदेश हा चित्रपट देतो.
ही वर्षांपूर्वी आमच्या घरात एक मांजरीचे पिल्लू आले. प्राण्याची आवड सगळ्यांनाच असते असे नाही, निदान मला तेव्हा नव्हती. मुलाला चिक्कार आवड म्हणून ते घरीच राहिले. आता घरी ठेवणारच तर लसीकरण करायला हवेच, शिवाय बाकी गोष्टीसुद्धा माहीत करून घ्यायला हव्या, म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेले.
 
केसपेपर बनवताना डॉक्टरांनी नाव विचारले.
 
 
‘’बटन्स.”
 
त्यांनी लिहिले, “बटन्स जगदीप प्रभुदेसाई.”
 
खरे तर लिहितानासुद्धा नवल वाटते आहे, पण त्या क्षणी, एका नावातील बदलाने ते माझे झाले. कुटुंबाचा एक अविभाज्य भाग. कटुंबाचा एक भाग होणे म्हणजे आयुष्यभरासाठी तुमच्यावर प्रेम करणारे आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात, ते लोक तुमच्या आयुष्यात येणे. रक्ताचा भाग असणे ही एक गोष्ट, पण कुटुंब म्हणजे आयुष्यभराची बांधिलकी, प्रेम आणि न सांगताही स्वीकारलेली जबाबदारी.
 
 
अंजली मेनन यांच्या सर्वच चित्रपटांत कुटुंब हे अत्यंत महत्त्वाचे पात्र आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले, तर My family has always been my strength. They are my pillars; my complete foundation comes from them. I wouldn't be who I am today without their continued support.
 
 
वाणिज्य शाखेची पदवी घेऊन अंजलीने मॅनेजमेंटची प्रवेश परीक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण केली होती. अशा वेळी फिल्ममेकिंगसारख्या व्यवसायात जाणे एक धाडसच. घरात विऱोध होणे स्वाभाविक. त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी तिला मिळालेला प्रतिसाद पाहून आईवडिलांचा विरोध संपला. नंतर मिळाले ते प्रोत्साहन, कौतुक आणि मदत.
 
 
‘बंगलोर डेज’ या चित्रपटातसुद्धा एकत्र कुटुंबाचे चित्रण आहे. अगदी त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांसकट. त्या म्हणतात,
""Friends are the family we choose is a theme in the film, in this case they happen to be cousins.''
 

vivek 
 
बंगलोर डेज ही तीन भावंडांची गोष्ट आहे.
 
 
नात्याचा बंध तर असतोच, पण एकाच वयाच्या मुलांत मैत्री होणे स्वाभाविक असते. केरळमधील गावात ही मुले वाढतात. सुट्टी एकत्र घालवतात. एकमेकांना आपल्या अडचणी सांगतात. आपली स्वप्ने, आपली गुपिते शेअर करतात. बालपण संपते, पुढील शिक्षणाच्या निमित्ताने मुले पांगतात. लहान वयापासूनच अर्जुन (दुलकर सलमान), कुट्टन (निवीन पौली) आणि दिव्या (नाजरिया नाजिम) या तिघांना बंगलोर शहराचे आकर्षण असते. आयुष्यात कधीतरी जिवाचे बंगलोर करण्याचे स्वप्न ते बाळगून असतात. कुट्टन संगणक इंजीनिअर होतो. त्याचे पोस्टिंग बंगलोरमध्ये होते. दिव्याचे स्वप्न असते चइअ होऊन स्वत:ची कंपनी उघडणे, पण अचानक एक चांगले स्थळ आल्याने तिचे आईवडील लग्न करून देतात. करिअर करायची इच्छा बाळगणारी दिव्या, गृहिणी बनून तिच्या नवर्‍याबरोबर या शहरात येते. अर्जुन, जो एक ग्राफिटी काढणारा कलाकार आहे, तो बाइक मेकॅनिक म्हणून या शहरात नोकरी मिळवतो.
 
 
काळ तुमच्या मर्जीने जात नाही. जेव्हा आपली स्वप्ने पुरी झाली आहेत आणि आता आयुष्याचा रस्ता सरळ असेल असे वाटते ना, तेव्हाच आयुष्याला एक वळण मिळते. कुट्टनला मागे सोडून आलेले हिरवे केरळ खुणावते. ह्या शहरात त्याचा जीव गुदमरू लागतो. दिव्याच्या संसारात तिच्या नवर्‍याचा काहीही सहभाग नसतो. एकाच घरात राहून दोन ध्रुवावर असल्यासारखे ते दोघे नको असलेल्या बंधनात अडकून असतात, तर अर्जुनच्या प्रगतीत, त्याचा भूतकाळ आड येत असतो. असे असूनही तिघेही एकमेकांच्या सोबतीने का असेना, स्वप्ने पाहायचे मात्र सोडत नाहीत.
 
 
प्रत्येकाची छोटीशी प्रेमकथासुद्धा या चित्रपटात आहे. बंगलोर शहर आधुनिक. केरळमध्ये वाढलेल्या कुट्टनला आधुनिकतेचे आकर्षण आहे. रस्त्यावरच आपल्या मित्राचे चुंबन घेणार्‍या मुलीकडे पाहताना तो संकोचतो, मनातून मोहरतोसुद्धा; पण बायको मात्र इंजीनिअर, कौटुंबिक, परंपरा पाळणारी मिळावी अशी त्याची मनापासून इच्छा आहे.
 
 
त्याच्या आयुष्यात एक हवाई सुंदरी येते. याचे जहाज मस्त हवेत उडायला लागते आणि काही दिवसांतच दाणकन कोसळते. प्रेमाच्या भुलभुलैय्यातून बाहेर आल्यावर कुट्टनच्या शब्दात सांगायचे, तर "I was drunk in the intoxication of cola.''
प्रेम सांताक्लॉजसारखे असते. ते मिळेल या आशेने लोक चिमणी उभारून शेवटपर्यंत डोळे लावून बसतात आणि फसतात.
 
 
कुट्टनचे तेच होते. प्रेम म्हणजे काय? याचे उत्तर मात्र त्याला अनपेक्षितरित्या समजते. एका साधूच्या नादाला लागून आपले वडील घर सोडून निघून गेले, ही बातमी समजल्यावर तो केरळला जातो. एवढ्या वर्षाचा सुखी संसार.. सुखी? खरेच?
 

vivek 
 
एका पत्रात त्याला समजते - आई-वडील दोन ध्रुवाची दोन टोके. आईचा जीव त्या गावात गुदमरतो. वडील इंजीनिअर म्हणून तिने लग्न केलेले असते. लग्न होते खरे, पण त्यांना शेतीची आवड. ते केरळमध्ये स्थायिक होतात, तोपर्यंत मुले झालेली असतात. आई मनाविरुद्ध राहते आणि त्यामुळे वडीलसुद्धा मन मारून संसार करतात. आता मुले मोठी झालेली असतात. कुट्टनची बहीण लग्न करून अमेरिकेला स्थायिक असते, तर कुट्टन बंगलोरला. ते आपला मार्ग धरतात. या प्रसंगाने आई खचेल असे वाटत असतानाच, घराला कुलूप लावून ती बंगलोरला येते. इथे पंजाबी ड्रेस घालायला लागते, लाफ्टर क्लबमध्ये जायला सुरुवात करते, मैत्रिणी बनवते आणि एके दिवशी व्हिसा काढून अमेरिकेला मुलीकडे जाते. घरात तिची एवढी दादागिरी असते की ती गेल्यावर कुट्टनच नि:श्वास टाकतो. आपले वडील सुखाच्या शोधात बाहेर पडले आहेत, याचा अंदाज येऊन त्यांच्यासाठी सुखावतोसुद्धा.
 
 
लग्न करताना नक्की कसला विचार करावा? शिक्षण, पैसे, रूप, जात.. की त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एकमेकांच्या स्वभावातली पूरकता?
 
 
Compatibility असावी, हे मेनन एवढ्या सहज सोप्या पद्धतीने आणि आक्रस्ताळेपणा किंवा मेलोड्रामा न करता सांगते.
 
 
अनेक वेळा घटस्फोट किंवा लांब राहणे ही सुखाची सुरुवात असू शकते, हे कुट्टनला समजते आणि लग्नाच्या जोडीदाराचा शोधसुद्धा त्या वळणावर सुखांतात संपतो.
 
 
अर्जुनच्या कुठेही न स्थिरावण्यामागे त्याच्या आईवडिलांचा संसार कारणीभूत आहे. वडील मिलिटरीत, कडक. आई-वडिलांचे सतत खटके. ह्यात अर्जुन भरकटतो, बारावीत शाळा सोडून दुसरे काही करण्याचा निर्णय ऐकून वडील आईला दोष देऊन घर सोडतात. आई दुसरे लग्न करते. मनाने खचलेला पण ते चेहेर्‍यावर न दाखवणारा अर्जुन जे काही करतो, त्यात अपयशी ठरतो. कुणाकडूनही मदत न घेता, आपल्या उदरनिर्वाहासाठी बाइक दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये नोकरी धरतो.
 
 
इथेच एका रेडिओ जॉकीच्या आवाजाच्या प्रेमात पडतो. तिला भेटायला रेडिओ स्टेशनवर गेला असताना लक्षात येते, ती पांगळी आहे. Why me? हा प्रश्न त्याला सतावतो खरा, पण प्रेम यावर मात करते. मुळात कुणासाठी तरी आपण काहीतरी बनले पाहिजे हे त्याच्या लक्षात येते. आयुष्य एका अशा वळणावर येते, जिथे कुणीतरी त्याची वाट पाहत असते. कुणालातरी तो हवा असतो.
 
 
आत्मविश्वास हरवलेला आणि कुणाकडूनच अपेक्षा ठेवण्याची अपेक्षा नसणारा अर्जुन आपल्या हृदयाचा कौल घ्यायला वेळ घेतो खरा, पण जेव्हा तो साराला (पार्वतीला) सांगतो, “तुझा पाठलाग करण्यापेक्षा मला तुझ्याबरोबरीने चालायचे आहे”, तेव्हा लक्षात येते - स्वत:च्या हृदयाचा कौल त्याने स्वीकारला आहे.
 
 
इथे सारा अपंग असली, तरी कुठेही तिची कीव वाटत नाही. ती स्वतंत्र आहे, व्हील चेअरवरून का होईना, शहरात एकटी प्रवास करते. आपल्या कामात हुशार आहे आणि मुळात तिला स्वत:बद्दल विश्वास आहे.
 
 
उलट अर्जुन भावनाशील आहे आणि तिच्या होकाराने त्याचे आयुष्य बदलणार आहे.
 
 
सर्वात महत्त्वाची कथा आहे ती दिव्याची. हुशार आणि सुखवस्तू घरातील मुलगी असल्याने ती जेवढी हुशार आहे, तेवढीच भाबडीसुद्धा. MBA करण्याची तिची इच्छा आहे. घरातून प्रेशर आल्यावर मात्र ती लग्नाला होकार देऊन गृहिणी व्हायचे कबूल करते. तिच्या नवर्‍याचे एका मुलीवर प्रेम असते आणि ते प्रकरण गंभीर असले तरी संपलेले असते, असे दास तिला लग्नाच्या आधीच सांगतो. तरीही मुलगा हुशार, देखणा आणि प्रामाणिक आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ती लग्नाला उभी राहते.
 
बंगलोरमधील घर मोठे, सजवलेले असते. तिच्यावर कसलीही जबाबदारी नसते. दास (फहाद फाझील) हा आपली कामे स्वत: करणारा, कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न करणारा तरुण असतो. थोडासा तुटक, पण आपली स्पेस जपणारा.
 
 
सुरुवातीला आवडणारा हा गुण हळूहळू दोघांच्यात भिंत बनून उभा राहतो. तिचे प्रयत्न चालूच असतात. त्याच्या आवडीचे जेवण करणे, घर सजवणे, एकटे वाटले तरी बिल्डिंगमध्ये लोकांशी मैत्री करणे. लग्नाच्या आधी कुणावर प्रेम करायची संधी दिव्याला मिळत नाहीच. ती अशा माणसावर प्रेम करायचा प्रयत्न करते, जो आपला भूतकाळ विसरू शकत नाही. एक अत्यंत अल्लड मुलगी जी उत्साहाने रसरसली आहे, जिचे जगण्यावर प्रेम आहे, अशा माणसाशी बांधली जाते, ज्याच्यासाठी जगणे हे ओझे आहे. आपल्या भावंडांशी तिचे बोलणे, त्यांच्या सोबतीत तिचे सुखावणे हे एका बाजूला, तर दुसर्‍या बाजूला आपल्याच विश्वात गुंतून पडलेला, तिला त्यात डोकावायलासुद्धा मना करणारा दास, ही घुसमट असहनीय. एका बाजूच्या तडजोडीला मर्यादा असते. असह्य होऊन ती घर सोडून निघून जाते.
 
 
त्यानंतर अर्जुनकडून त्याच्या या स्वभावाचे रहस्य समजते. गाडीसुद्धा अत्यंत कमी वेगाने चालवणारा दास हा आधी बाइक रेसर असतो. अत्यंत बोलका, हसरा दास एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याच्या कौशल्यावर खूश असणारी ती या वेगाचीच शिकार होते. अपघातात मृत्यू झाल्यावर, आधीच या नात्याला विरोध करणारे तिचे आईवडील दासला दोषी ठरवतात आणि तो कोशात जातो.
हे समजल्यावर घरी परत येऊन, दासला या अपराधी भावनेतून बाहेर काढणारी दिव्या पाहिली की अरेच्चा, ही पिढीसुद्धा आपल्यासारखीच नात्याची बांधिलकी जपणारी आहे, फक्त त्यांचे मार्ग वेगळे आहेत हे जाणवून खूप बरे वाटते.
 
 
नाती ही गुंतागुंतीचीच असतात. प्रत्येक नाते टिकवणे कठीण की सोपे, हा अंदाज त्या नात्यात राहिलेल्या माणसांनाच असू शकतो. इथे तुटलेल्या नात्यात राहणारी माणसे आहेत, तुटलेली नाती जोडणारी माणसे आहेत, काही आहे त्या नात्यांत समाधानी आहेत, तर काहींना यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे. लग्नसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अनुभव ह्यातील तिन्ही मुलांसाठी वेगवेगळा असेल, तरीही आयुष्यभरासाठी साथ देणारा सोबती शोधायची इच्छा तिघांचीही आहे. त्यासाठी स्वत: बदलण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. चित्रपट बंगलोरमध्ये चित्रित झाला असला, तरीही ही एका केरळी कुटुंबाची गोष्ट आहे, ह्याचे भान दिग्दर्शिकाने ठेवलेले आहे. ह्यातले केरळ पद्धतीचे लग्न, माणसांची लगबग, केळीची पाने, मोगर्‍याचा गंध, त्यांचे जेवण, जेवणाची पद्धत, नात्यातील संबंध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केरळ फार सुंदर टिपलेय.
 
 
तसेच बंगलोरमध्ये असणारे स्वातंत्र्य, मोकळेपणा, मजा करण्यासाठी असलेली असंख्य साधने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसता स्वत:च्या आयुष्यात रममाण झालेले नागरिक ह्या सार्‍याचेसुद्धा दर्शन ह्या चित्रपटात, अनेक प्रसंगातून मस्त घडवले आहे.
 
 
Patience is a mother of virtue असे म्हणतात. ह्या तिघांच्याही नाते जपण्याच्या पद्धतीत तो दिसतो, म्हणून मला हा चित्रपट फार आवडला. प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते, हा संदेश हा चित्रपट देतो.
(डिस्नी-हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येईल)

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.