राष्ट्र सेविका समितिने दिली जिजाऊंना मानवंदना

शिवाआधी दंडवत जिजामातेस असावा

विवेक मराठी    02-Dec-2023
Total Views |

rss
 
“कणखर, स्वधर्माभिमानी, स्वराष्ट्राभिमानी अशा जिजाऊंच्या कर्तृत्वाचे स्मरण करणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे खर्‍या अर्थाने त्यांची पुण्यतिथी साजरी करणे” असे उद्गार राष्ट्र सेविका समितीतर्फे जिजाऊसाहेबांच्या 350व्या पुण्यस्मरणाप्रीत्यर्थ आयोजित पाचाड येथील कार्यक्रमात सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनीताई मयेकर यांनी काढले. त्या या कार्यक्रमास मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. जिजामाता पुण्यतिथी व शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त राष्ट्र सेविका समिती, राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे व जिजामाता स्मारक समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीक्षेत्र पाचाड येथे 1100 सेविका व ग्रामस्थ महिलांचा सहभाग असलेला अत्यंत आखीव-रेखीव, देखणा व प्रेरणादायक कार्यक्रम झाला. महाराष्ट्राच्या पश्चिम क्षेत्रातील व गोव्यामधील सेविका, अधिकारी, कार्यकर्त्या यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
  
 
सकाळी श्रीक्षेत्र रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील स्मारकासमोर - म्हणजेच मेघडंबरीसमोर काही प्रशिक्षित सेविकांनी घोषासह मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या वेळी ’घोष आज घोष आज, जय जिजा करे‘ हा जयघोष करून स्वा. सावरकरांनी शिवाजी महाराजांची जी आरती लिहिली आहे, ती घोषपथकाने सादर केली. तसेच यष्टी प्रात्यक्षिकही करण्यात आले. त्यानंतर पाचाडमध्ये जिजाऊंच्या समाधिस्थळापर्यंत शोभायात्रा निघाली. पारंपरिक वेशामध्ये, तसेच जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची वेषभूषा करून जोशपूर्ण अशी शोभायात्रा वाजतगाजत समाधिस्थळापर्यंत आल्यानंतर तिथेही प्रशिक्षित सेविकांनी गणवेशामध्ये घोष व यष्टी ही प्रात्यक्षिके सादर करून जिजाऊंना मानवंदना दिली.
 
  
rss
 
जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. समितीच्या अखिल भारतीय सह कार्यवाहिका मा. चित्राताई जोशी यांच्यासह मा. सुनंदाताई जोशी, मा. सुनंदाताई देवस्थळी, सरपंच सीमाताई बेंदुगडे व मुख्य वक्त्या मा. अश्विनीताई मयेकर या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ”जिजाऊंना मानवंदना देणे हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून नवी ऊर्जा, नवी गती व प्रेरणा घेऊन आपण जाणार आहोत” असे मा. शैलजा देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यानंतर पद्मजा अभ्यंकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच उपस्थित केंद्र व प्रांत कार्यकारिणीतील अधिकार्‍यांचेही स्वागत करण्यात आले.
 
 

rss
 
या वेळी सुनंदाताई खानापूरकर लिखित ‘राजमाता जिजाबाई’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन अश्विनी मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतिहास अभ्यासक सुधीरजी थोरात, संघ पदाधिकारी, पाचाडमधील मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत करणार्‍या पाचाडमधील भगिनींचाही या वेळी प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. यामध्ये पाचाडच्या सध्याच्या सरपंच सीमा बेंदुगडे यांच्यासह माची सरपंच वंदना खातू, सैनिकाची माता असलेल्या विमल परब, अंगणवाडी सेविका गीता बेंदुगडे व बबीताई निकम, दलित चळवळीतील कार्यकर्त्या मीना गायकवाड, सीमा देशमुख यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
‘स्त्री जन्माला येते घेऊन प्रेम आणि माया। स्त्रियांनो, तुमचा जन्म गेला नाही वाया।’ अशा शब्दात सरपंच सीमाताई बेंदुगुडे यांनी आपल्या मनोगतात स्त्रीशक्तीचा गौरव केला व राष्ट्र सेविका समितीच्या महिलांनी एवढा भव्य कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल आश्चर्य व कौतुक व्यक्त करत पाचाडच्या ग्रामस्थांतर्फे राष्ट्र सेविका समितीचा सत्कार करण्यात आला.
 
 
“जिने शस्त्र केले तिच्या वेदनेला,
 
जिने अर्पिला पुत्र आपुला धरेला,
 
जिच्या शौर्य-धैर्यास तुलनाच नाही.
 
तुला वंदिते मी शिवाई-जिजाई...’
 
 
350 वर्षांनंतरही जिच्या कर्तृत्वाचे स्मरण केले जाते, त्या जिजाऊंच्या कर्तृत्वाचे अनेक अजोड पैलू आहेत. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवबाच्या मनात रुजवून ते सत्यात आणण्यासाठी सातत्याने सोबत करणार्‍या जिजाऊंनी आपल्या आचरणातून शिवबामध्ये स्वराज्याविषयीचे, स्वधर्माविषयीचे प्रेम रुजवले. आई-वडील अशी दुहेरी पालकत्वाची भूमिका समर्थपणे पार पाडून, उजाड झालेल्या पुणे परगण्याचा कायापालट करून, त्याचे नंदनवन करून या मातेने आपल्या प्रजेला धीर दिला, विश्वास दिला. वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, राष्ट्रमाता ही आभूषणे त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना बहाल केलेली आहेत. ” अशा शब्दांत अश्विनी मयेकर यांनी जिजाऊंची थोरवी सांगितली.
 

rss 
 
रा.से. समितीच्या अ.भा. सह कार्यवाहिका चित्रा जोशी यांनी जिजाऊ या शब्दाची उकल केली.“मुद्राभद्राय राजते!’ - भद्र म्हणजे मंगल असे जीवन निर्माण करणारे शिवाजी महाराज होते आणि त्यांना पूज्य अशा जिजाऊ होत्या. जिजाऊंनी उजाड झालेल्या पुण्यात लोकांना बोलवून आणले. त्यांना शेतीसाठी अवजारे दिली. पहिल्या वर्षी बियाणे राखून ठेवायला, दुसर्‍या वर्षी अवजारे घ्यायला व तिसर्‍या वर्षी पोषक आहार घ्यायला या मातेने आपल्या प्रजेला सांगितले व त्यानंतर करवसुलीला सुरुवात केली. स्वराज्यनिर्मितीसाठी राजाइतकीच प्रजेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते याचे भान त्यांना होते. ते या कृतीतून दिसून येते. शिवाजी महाराजांचे मेव्हणे बजाजी निंबाळकर यांना मुस्लीम करण्यात आले होते. तेव्हा त्यांचे शुद्धीकरण करून स्वधर्मात परत घेण्याचा सल्ला जिजाऊंचा. ही पहिली घरवापसी होती. त्यामागे जिजाऊंची दूरदृष्टी होती. असे केले नाही, तर हिंदूंच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होईल याचे भान जिजाऊंना होते. बजाजी निंबाळकरांना केवळ स्वधर्मात परत घेतले नाही, तर त्यांच्या घरात आपल्या नातीची सोयरीक जुळवून समाजाला संदेश दिला. शिवाजी महाराज कैदेत असताना उत्कृष्ट राज्यकारभार केला व जगाचा निरोप घेताना 25 लक्ष सुवर्ण होन प्रजाहितासाठी शिवरायांना देऊन ही माता गेली. हिंदवी स्वराज्य स्थापन झालेले पाहणारी, शिवराज्याभिषेक पाहणारी ही भाग्यवान माता होती” अशा शब्दांत चित्राताईंनी जिजाऊंच्या चरित्रातील ठळक वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली.
 

rss 
 
या वेळी पनवेलच्या बालसेविकांनी जोशपूर्ण व स्फूर्तिदायक असा पोवाडा या सोहळ्यात सादर करून चैतन्य निर्माण केले. ‘स्वयं झुका है जिसके आगे हर क्षण भाग्यविधाता। धन्य धन्य है धन्य जिजाई जगद्वंद्य माता।’ असे प्रसंगानुरूप बोल असलेले सुश्राव्य व खणखणीत वैयक्तिक गीत धनश्री फाटक यांनी गायले. प्रवीणा दांडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रज्ञाताई जोगळेकर यांनी ऋणनिर्देश केला. ‘संपूर्ण वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली. मुख्य शिक्षिका वैशाली भागवत, मनीषाताई साठे यांच्यासह राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी सातत्याने संपर्क व नियोजन करून जिजाऊंच्या 350व्या पुण्यस्मरणाचा हा चैतन्यदायक सोहळा जिजाऊंच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पवित्र भूमीत साजरा केला. हा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील व त्याच्या स्मृती कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतील.
 
 
- नमिता दामले