अजित वर्तक -8097796070
विक्रमगड तालुक्यातील बोरांडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते किरण लेले हे मातीशी जोडलेले एक कार्यकर्ते आणि शेतकरी आहेत. आपल्या वडिलोपार्जित शेतीतून ते नैसर्गिक पद्धतीची बहुविध शेती करतात. याशिवाय गो-पालन व कृषी पर्यटन केंद्र उभारणी हे त्यांच्या यशस्वी शेतीचे गमक आहे. त्यांचा हा प्रयोग अनेकांना दिशा देणारा आहे.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले किरण लेले मूळचे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील बोरांडा पाडा येथील आहेत. वाणिज्य पदवीधर असल्यामुळे लेले यांनी प्रारंभीच्या काळात बँकेत (वसई जनता सहकारी बँक) नोकरी केली. त्यानंतर ‘फार्मा मशीन मेकिंग’मध्ये आयटी सल्लागार व आर्थिक सल्लागार म्हणून काही वर्षे काम केले. 1998 साली त्यांचा मेघा यांच्याशी विवाह झाला. 2000 साली नोकरी सांभाळत बोरांडा या मूळगावी असलेल्या दहा एकर शेतीमध्ये (जिरायत 7 एकर, बागायती 3 एकर) लक्ष घालायला सुरुवात केली. पुढे किरण लेले यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शेतीचे शिक्षण घेतले. शेतीचे शिक्षण आणि प्रत्यक्ष शेती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो, हे पदोपदी जाणवले. भास्कर सावे यांच्याकडून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे घेतले. यानंतर त्यांनी भातशेतीतून समाधानकारक उत्पन्न घेतले. दिलीप कुलकर्णी यांच्या ‘निसर्गायण’, ‘हरित साधक’, ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ अशा पुस्तकांचा प्रभाव पडला आणि ते जीवविविधतेवर काम करू लागले.
शिक्षण, नोकरी, विवाह यानिमित्त किरण लेले दीर्घकाळ पालघर येथे राहत होते. दोन मुलींचे शिक्षण, रा.स्व. संघाचे काम आणि संसार असा किरण यांचा दिनक्रम होता. मातीची ओढही तितकीच तीव्र होती. संपूर्ण विचारांती शहरातील नोकरी सोडून गावाकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांचा हा ‘बॅक टु व्हिलेज’ प्रवास सोपा नव्हता. या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी संकटावर मात केली.
बहुविध शेती
किरण नैसर्गिक शेतीचा अंगीकार करतात. पाण्याची मुबलकता असावी यासाठी त्यांच्याकडे दोन बोअरवेल व एक विहीर आहे. 2017 साली निसर्गशेतीची चळवळ सुरू करणारे राजेंद्र भट यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यांच्याकडूनच शेती प्रशिक्षण व शेतीचे बाळकडू मिळाले. खरीप हंगामात भात, तूर, नागली, ज्वारी, चवळी, हळद, आंबे हळद, सुरण, कंदवर्गीय पिकांबरोबर ते काकडी, दुधी, कारली, गिलकी, लाल माठ, भेंडी, शेवगा, भाजीची केळी, आंबाडी यांचे उत्पादन घेतात. तर रब्बी हंगामात हरभरा, तीळ, कुळीथ पिकांबरोबर वांगी, टमाटा, मिरची, कोथिंबीर, हिरवा माठ, पालक, शेपू या भाजीपाल्याचे समाधानकारक उत्पन्न घेतात. शेतीत वापरले जाणारे जीवामृत, निंबोळी अर्क घरीच तयार करतात. त्यामुळे शेतातील उत्पादनखर्चात बचत झाली आहे. शिवाय रासायनिक औषधांना पर्याय शोधल्यामुळे शेतीतून वर्षाला 1200 क्विंटल उत्पादन घेतात. किरण यांनी विविध प्रकारची जुनी झाडे जोपासली आहेत, शिवाय दोनशे प्रकारच्या नवीन वनस्पती-वृक्षांची लागवड केली आहे. त्यात आंबा, काजू, जांभूळ, जाम, पेरू, आवळा, वेलची केळी, पपई, चेरी, करवंदे आदी वृक्षांचा समावेश आहे.
पारंपरिक बियाणांचे संवर्धन
किरण लेले गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक बियाणांवर काम करत आहेत. आजपर्यंत त्यांनी सुरती कोलम, कवळा भात, काटेचेमटी, कर्जत 3 व काळभात या भाताच्या पारंपरिक पाच जातींचे जतन व संवर्धन केले आहे. शिवाय भाजीपाल्याच्या स्थानिक जातींच्या जतन व संवर्धनाकडे ते वळले आहेत.
स्थानिक डांगी गायीचे जतन व संवर्धन
किरण लेले आपल्या गावी परतले आणि शेती, गो-पालन, ग्रामविकास, कृषी पर्यटन यासारख्या योजना प्रत्यक्षात उतरवू लागले आहेत. त्यातूनच त्यांनी पालघर जिल्ह्यात ‘डांगी’ या स्थानिक देशी गायीचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य हाती घेतले. सध्या ते गोवंशसुधार, गोवंशवृद्धी, उत्तम नंदी निर्मिती, दूधउत्पादन अशा अनेक विषयांवर काम करत आहेत. त्यांनी गायींसाठी पोषक चार्याची लागवड केली आहे. त्यांच्याकडे डांगी जातीच्या 9 गायी व 4 नंदी (खोंड) आहेत. दोहन तंत्राने (दोन सड वासरांसाठी व दोन आपल्या दुधासाठी) वासरांचे संगोपन केल्यामुळे एक-दीड लीटर दूध देणार्या गायी आता 4 लीटर दूध देतात. गायीसाठी मुक्त गोठा हाही एक नवीन प्रयोग सुरू केला.
रोहिणी कृषी पर्यटन केंद्राची उभारणी
2016 साली त्यांनी ‘रोहिणी कृषी पर्यटन केंद्रा’ची उभारणी केली. यासाठी काही रिसॉर्ट वगैरे न बांधता स्वत:च्या राहत्या घराचाच (जे 1970पासून उभे आहे) सुयोग्य वापर केला. गावातील अफाट निसर्गसौंदर्य, गायींचा सहवास, डोंगर आणि नदी यांचा मिळालेला शेजार यामुळे येथे पर्यटनासाठी येणार्यांची संख्या समाधानकारक आहे. आबालवृद्धांना शेतीबद्दल आस्था निर्माण होईल असे प्रबोधन केले जाते.
अशी एक शेतमालाची विक्री
किरण यांनी शेतमालाची विशेष विक्री व्यवस्था उभी केली आहे. ते 25 प्रकारचा उत्तम व विषमुक्त शेतमाल विकतात. त्यासाठी ग्राहकवर्गांकडून आगाऊ 20 हजार रुपये आकारतात. ग्राहक त्यांना हव्या असणार्या जिन्नसांची ऑर्डर करून शेतमाल मागवून घेतात. शेतमाल तयार होण्याआधीच शेतमालाची विक्री व्यवस्था उभी केल्यामुळे बाजारपेठ, दलाल व व्यापारी यांच्यापासून सुटका करून घेतली आहे. त्यांचा हा आगळावेगळा प्रयोग शेतकर्यांना दिशा देणारा आहे. 2019 साली त्यांचे संघाचे तृतीय वर्ष पूर्ण झाले आहे. सध्या त्यांच्याकडे कोकण प्रांतातील ग्रामविकासअंतर्गत ‘अक्षय कृषी परिवार’ या आयमाचे प्रांत सहसंयोजक म्हणून जबाबदारी मिळाली आहे. शिवाय ‘हिंदू सेवा संघा’चे विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून झालेली निवड ही त्यांच्यातील कार्यकर्तापणाची नोंद घेणारी आहे.
शेतीकामात आणि कृषी पर्यटनात पत्नी मेघा यांचा आणि दोन्ही मुलींचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग असतो. मोठी मुलगी स्वराली ‘फूड प्रोसेसिंग आणि न्युट्रीशन’ या विषयात पुण्यात एम.एस्सी. करत आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्या आणि शेतीतले प्रयोग करणार्या शेतकरी स्वयंसेवकाची ही कहाणी सर्वांना प्रेरणा देणारी आहे, हे मात्र नक्की.
संपर्क : किरण लेले
92840 67120
रा. बोरांडा पाडा, ता. विक्रमगड,
जि. पालघर