निसर्गसंवर्धनाला हातभार लावणारे - श्रीराम रामदासी

विवेक मराठी    23-Dec-2023
Total Views |
@अमित लिमये
 
सोलापूर येथील श्रीराम रामदासी आपल्या छंदातून पर्यावरण रक्षणाचं काम करीत आहेत. पाण्याची प्लास्टिकची बाटली, कुल्फीच्या लाकडी काड्या, अल्युमिनियमची ताटली आणि साखळी या वस्तूंपासून त्यांनी बनवलेल्या फीडरवर शिंजीर (सनबर्ड्स) पक्षी येणार नाहीत असं होत नाही. सोलापुरात अनेकांच्या अंगणात, बाल्कनीमध्ये येणारे पक्षी त्यांच्या चिकाटीची साक्ष देतात. श्रीराम हे आपलं ज्ञान आपल्यापुरतं सीमित न ठेवता ते अनेकांना ज्ञानदान करीत असतात - फीडर बनवायला शिकवतात, त्यासाठी लागणारी इकोसिस्टिम तयार करायला शिकवतात. त्यामुळे निसर्गसंवर्धनाला हातभार लावणारे अनेक हात तयार होताहेत. अशा या श्रीराम रामदासी यांच्या स्तुत्य उपक्रमाचा आढावा घेणारा लेख...
 
sun
 
सोलापुरी चादर, सुकं मटण, भाकरी, शेंगा चटणी याबरोबरच सोलापूर शहर आणखी एका गोष्टीबद्दल प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथला करपवणारा उन्हाळा आणि पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष. इथली वनराई म्हणजे बाभळी, खुरटं, अर्धं करपलेलं गवत, कोरफड, क्वचित दिसणारी निलगिरीची आणि बदामाची झाडं. इथले पक्षी म्हणजे बहुतांशी कावळे आणि चिमण्या. घनदाट, डेरेदार वृक्ष नाहीत आणि त्यामुळे किलबिलाटसुद्धा नाही. असं असताना जेव्हा आशुतोषने - माझ्या मोठ्या भावाने त्याच्या घरी डझनावारी संख्येने रोज येणार्‍या शिंजीर (सनबर्ड्स), ठिपकेवाली मनोली (स्पॉटेड मुनिया) पक्ष्यांबद्दल सांगितलं, तेव्हा माझा विश्वास बसला नाही. जुलैमध्ये गेलो तेव्हा प्रत्यक्ष पाहिलं. इतके पक्षी कसे काय येतात? त्यासाठी अख्खी इकोसिस्टिम उभी केली आहे तिथे. बाल्कनीमध्ये तीन अ‍ॅक्वा फीडर, एक ग्रेन फीडर. शिंजीर अतिशय चोखंदळ असतात. रोज बदललेलं ताजं उकळून गार केलेलं, हलकं गोडसर पाणी. रोज स्वच्छ धुतलेले फीडर. फीडरसुद्धा शिंजीरकरता कस्टम डिझाइन्ड होते. मी हे सगळं अनुभवून चाट पडलो. कोणी आशुतोषला हे सगळं शिकवलं? कोण बनवतं हे फीडर?
 
 
दुपारी जेवण झाल्यावर मी आणि आशुतोष श्रीरामला भेटायला गेलो. श्रीराम रामदासी - ह्या सगळ्या पसार्‍याचा कर्ताधर्ता! आमच्या जुन्या घराजवळ दक्षिण कसब्यात लहानाचा मोठा झालेला. बीएससी करून, वडिलांनी लावून दिली म्हणून आयुष्यभर एसटीमध्ये कंडक्टरची नोकरी करून सेवानिवृत्त झालेला. इतर कोट्यवधी नागरिकांप्रमाणे कुठलीही खळबळ न माजवता शांतपणे आपलं काम करून आपलं घर चालवणारा एक भारतीय नागरिक. फरक फक्त इतकाच की पुलंनी लिहिल्याप्रमाणे सरधोपट जगताना बालपणापासून त्याने एक छंद जोपासला होता. पक्ष्यांत, झाडं-जंगलात, निसर्गात रमण्याचा छंद. सोलापूर तसं रखरखीत असलं, तरी काही मरुद्यानं होतीच. त्यात महत्त्वाची म्हणजे इथल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात असलेली हुतात्मा बाग, किल्ल्याच्या एका बाजूला असलेला सिद्धेश्वर तलाव आणि तलावातल्या छोट्या बेटावर असलेलं सिद्धेश्वर मंदिर. सुदैवाने श्रीरामचा शाळेत जायचा रस्ता एक तर तलावाकाठून जायचा, नाहीतर बागेशेजारून. रोज साधारण दोन किलोमीटर चालत ये-जा करताना श्रीराम रमतगमत, झाडं-पक्षी बघत जायचा. राहत्या घरी, पंडित वाड्यातसुद्धा जांभूळ, बोर, बदाम, शेवगा अशी झाडं होती. जणू एक छोटेखानी मरुद्यानच. घरी आलं की तो तिथे रमायचा. सुट्टीला आजोळी गेला की शिवारांत रमायचा. कुंडीत रोपं लावायला, त्यांची निगा राखायला तो तिथेच शिकला. सर्जक हाताचा झाला. आपण पाहिलेल्या नवीन काही पक्ष्यांविषयी, झाडांविषयी इतर मोठ्या लोकांकडून हवी ती माहिती मिळेना, तसं त्याने वाचनाचा सपाटा लावला.
 
ठिपकेवाली मनोली (स्पॉटेड मुनिया)
sun 
हल्ली आहे तसा इंटरनेट, सोशल मीडिया, यूट्यूब आणि गूगलचा सुळसुळाट नसल्याने मनात आलं की सर्च करून हवं ते वाचलं, पाहिलं इतका सोपा प्रकार नव्हता. आपल्याला जी माहिती हवी आहे, ती कुठल्या पुस्तकात, मासिकात, जर्नलमध्ये मिळेल ते आधी माहीत करून घ्यायचं आणि मग ते कुठे मिळेल हे शोधायचं. बरं, पाहिजे ते पुस्तक विकत घ्यायची चैन परवडणारी नसल्याने वाचनालय, रद्दीची दुकानं पालथी घालून श्रीराम पुस्तकं वाचायचा, नोंदी काढायचा. पुढे इतर शहरात नोकरीनिमित्त फिरताना तिथे असलेल्या नर्सरीत, वाचनालयात एकतरी फेरफटका ठरलेला असायचा. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली त्यांच्या पुस्तकातून त्याचे गुरू झाले. वाचनातून आणि निरीक्षणातून आसपासच्या पक्षिजगताबद्दल प्रचंड आवड निर्माण झाली आणि त्याने सोलापूर म्हणजे फक्त कावळे आणि चिमण्या ही समजूत खोडून काढायचा ध्यास घेतला. निवृत्त झाल्यावर त्याने ह्यावर झोकून देऊन काम केलं.
 
sun
 
एकदा कोरफडीच्या जराशा उंच, नाजूक दांडीवर लागलेल्या फुलातून शिंजिरांना मधुरस पिताना बघून श्रीरामाला आपण चितमपल्लींच्या पुस्तकात बर्ड फीडरबद्दल वाचलेलं आठवलं आणि आपणसुद्धा फीडर लावायला पाहिजे हे त्याच्या मनाने घेतलं. श्रीराम सांगतो, “शिंजिरांकरता कस्टम डिझाइन्ड फीडर बनवायचं कारण म्हणजे शिंजिरसाठी फीडर बाजारात नाहीयेत. अगदी अ‍ॅमेझॉनवरसुद्धा हमिंगबर्डसाठीचे मिळतात. पण ते लावले तर शिंजीर येत नाहीत.” त्याने ज्याला डिझायनिंगमध्ये आपण आयटरेशन्स म्हणतो, तशी अनेक आयटरेशन्स करून आताचं एकदम कार्यक्षम म्हणता येईल असं फीडर डिझाइन बनवलं आहे. शिंजिरची उंची, वजन, ठेवण, पायांचे नाजूक तळवे ह्याचा विचार करून, आणि आपण फुलातून मधसदृश पाणी ओढून घेतो आहे असा त्यांना होणारा आभास हे सगळं व्यवस्थित नसेल तर शिंजीर येत नाहीत, हे ओळखून त्याने कस्टम फीडरमध्ये बदल केले. हा फीडर म्हणजे टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेचं अप्रतिम उदाहरण आहे. केचपची रिकामी बाटली, च्यवनप्राशच्या डब्याचं झाकण, सायकलच्या ट्यूबचा तुकडा, मार्कर आणि प्लॅस्टिकची दोन फुलं. दॅट्स इट! श्रीरामने आशुतोषसारख्या अनेकांना हे फीडर बनवून दिले आहेत. ते बसवायला मदत केली आहे, पक्षी येण्यासाठी काय करायचं हे सगळं सांगून त्यांना शिकवलं आहे. आमच्या भाषेत सांगायचं तर डिझाइन, प्रॉडक्शन, कमिशनिंग, कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग.. सबकुछ श्रीराम रामदासी!
 

sun 
 
सुरुवातीला म्हणावे तितके पक्षी येईनात, तेव्हा श्रीरामच्या लक्षात आलं की आजूबाजूला झाडंच नाहीयेत, पक्षी कसे येणार? त्याने मग तोही विषय आपल्या हातात घेतला. त्याने घराजवळच्या परिसरात ताम्हण, कदंब, पळस, सुरंगी, आपटा, वरुण, करमळ, काळी निरगुडी, सीता अशोक अशी विविध झाडं लावली. काही महिन्यांत सगळीकडे हिरवाई दिसायला लागली आणि पाठोपाठ पक्षीही आले. त्याच्या कन्सल्टिंगचा हाही एक महत्त्वाचा भाग आहे. कुणी फीडर मागायला आलं की तो आधी झाडं किती आहेत, कोणती आहेत ते विचारतो, तो विषय आधी निकाली काढतो आणि मग फीडर बनवून देतो. आणि हे सगळं तो कुठलीही फी न आकारता करतो. झाडं लावायला प्रसंगी पदरचे पैसे खर्च करतो. वेळ तर तो देतोच आहे. लौकिकार्थाने काय मिळतं त्याला हे करून? व्यावहारिक चश्म्यातून पाहिलं, तर तो हे जे करतो आहे, त्याला मूर्खपणा म्हणता येईल की! श्रीराम सुरुवातीला हे करायचा, तेव्हा लोकांनी त्याला मूर्खात काढलेलं आहेच. तो कुदळ, फावडं, खुरपं घेऊन झाडं लावण्यात रमलेला असायचा आणि आजूबाजूचे लोक त्याची चेष्टा करण्यात. जनमानसात, समाजात वावरण्याचे घट्ट, ठाशीव साचे बनत जातात आणि त्या साच्यात न बसणारं कुणी काही करू पाहत असेल की त्याची हुर्यो, निंदा करणं ही लोकांची पहिली प्रतिक्रिया असते. श्रीराम हे सांगत असताना भारतात होऊन गेलेले अनेक इतिहासपुरुष आणि त्यांच्या आयुष्याचे संदर्भ माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. राजहंसाचं एक प्रसिद्ध गाणंही आठवलं. चांगली एकच गोष्ट झाली की इतकी चेष्टा होत असतानासुद्धा, सुरुवातीला यश मिळत नसतानासुद्धा श्रीरामने प्रयत्न सोडले नाहीत.
 

ramdasi 
 श्रीराम रामदासी - संपर्क - 8888127769
 
तो आता वॉटर फीडरबरोबर ग्रेन फीडरसुद्धा बनवतो. पाण्याची प्लास्टिकची बाटली, कुल्फीच्या लाकडी काड्या, अल्युमिनियमची ताटली आणि साखळी. झाला ग्रेन फिडर. आता श्रीरामने फीडर लावला आहे आणि शिंजीर येत नाहीत असं होत नाही. पक्षी येतातच. आणि भरपूर येतात. सोलापुरात अनेकांच्या अंगणात, बाल्कनीमध्ये येणारे पक्षी त्याच्या चिकाटीची साक्ष देतात. श्रीराम दहा-बारा जणांना आपलं अनुभवातून आलेलं ज्ञान वाटतो आहे. त्यांना फीडर बनवायला, इकोसिस्टिम तयार करायला शिकवतो आहे. आपल्या कामातून निसर्गसंवर्धनाला हातभार लावणारे अनेक हात तयार होताहेत, ह्याचाच त्याला आनंद आहे. तो आनंद वाटून आनंद मिळवतो आहे. आनंदाची बार्टर सिस्टिम जणू! ह्या सिस्टिममध्ये निसर्गाचा फायदा होतो आहे, ते एक विशेष.
 
 
माझ्या इथल्या काही गोर्‍या दोस्तांना प्रश्न पडतो की सव्वा अब्ज लोक, सोयीसुविधा आणि त्या उपभोगणारे लोक ह्यांचं व्यस्त प्रमाण, दोन दिशांना अस्वस्थ सीमारेषा, एकजिनसी नसलेला, बारा भांडणं असलेला समाज, दीडशे वर्षांच्या गुलामीमुळे काही शतकं मागे राहिलेला देश इतकी प्रगती कशी करतोय आणि बर्‍यापैकी शांत स्थिर कसा राहतोय? श्रीरामसारख्या लोकांना भेटलं की मला त्याचं उत्तर मिळतं. असे असंख्य श्रीराम अनेक क्षेत्रांत स्वयंप्रेरणेने समाजाला सतत काही देत राहतात, सरकारवरचा, यंत्रणेवरचा भार हलका करतात.. आणि भारत नावाचं गारूड पुढं वाटचाल करत राहतं!