लोखंडी कोकणातील सुगंधी वैभव

विवेक मराठी    30-Dec-2023
Total Views |
प्रा. सुहास द. बारटक्के
9423295329
kokan flowers 
थंडीची चाहूल लागली की कोकणातील जंगलांतून मनमोहक सुगंध देणारी ‘लोखंडी’ आपलं लक्ष वेधून घेतात. मनमोहक सुवासाने भारून टाकणार्‍या लोखंडीचं लाकूड अतिशय टणक असतं. यामुळेच विशिष्ट हत्यारं, अवजारं बनवण्यासाठी लोखंडीच्या झाडाची भरपूर प्रमाणात तोड केली जाते. या तोडीमुळे कोकणातील हे सुगंधी वैभव संपुष्टात येऊ शकतं. वेळीच हे जाणून या सुगंधी वैभवाचं जतन केलं पाहिजे.
कोकणातल्या डोंगरदर्‍यांतून फिरताना सध्या निसर्गप्रेमींना साद घालतंय ते ‘लोखंडी’चे झाड! लोखंडीचा बहरण्याचा हाच तो हंगाम.. थंडीत सुरू होतो आणि उन्हाळ्याची चाहूल लागली की संपतो. लोखंडीची झाडाच्या फांद्या-फाद्यांवर गुच्छागुच्छांनी फुललेली फुलं अवघं रान सुगंधित करून सोडत आहेत. जंगलवाटेवरून चालता चालता आपलं लक्ष वेधून घेत आहेत. लोखंडीच्या मादक सुगंधाने भारावून जाऊन वाटेवरच न थबकलेला वाटसरू हा निव्वळ अरसिकच म्हणावा लागेल. सर्वांगावर फुलांचे गुच्छ धारण केलेलं लोखंडीचं झाड इतकं सुंदर दिसतं की विचारूच नका!
 
 
आणि त्याचा तो उग्र न वाटणारा असा मनमोहक सुगंध तर इतका अप्रतिम की अत्तराच्या कुपीत बंदिस्त करून जवळ बाळगावा असाच.
 
 
सह्याद्रीचं जंगल निळं-निळं करणारी आणि मधमाश्याना आकर्षित करणारी ‘कारवी’ सात वर्षांनी फुलते. पण अवघं रान आपल्या सुवासाने भारून टाकणारी ‘लोखंडी’ मात्र दर वर्षी याच सीझनाला फुलते. आता याला लोखंडी का म्हणतात? तर याचं लाकूड लोखंडाच्या हत्यारांनाही दाद देत नाही इतकं टणक असतं, लोखंडाप्रमाणं मजबूत असतं, म्हणून विशिष्ट हत्यारं, अवजारं बनवण्यासाठी त्याचा वापर करतात. कुर्‍हाडीचा दांडा याच लोखंडीचा बनवतात, तो सहसा मोडत नाही, तर टिकाव, फाळ यासाठीही याचं लाकूड वापरतात.
 
 

kokan flowers
 
कोकणात लोखंडीला खुरी किंवा खुरय असंही म्हणतात. ‘खु’ऐवजी ‘कु’सुद्धा वापरतात काही जण. त्याचं शास्त्रीय नाव मात्र ‘एक्झोरा ब्रॅचिएता’ असं आहे. एक्झोरा म्हणजे फुलांचा नाजूक गुच्छ. असे एक्झोराचे काही प्रकार सह्याद्रीच्या जंगलात पाहायला मिळतात. त्यातील सर्वसाधारपणे मोठं म्हणजे 8-10 फूट उंच वाढणारं झाड म्हणजे खुरी किंवा लोखंडीचं. याची पानं जाड आणि वरच्या बाजूने गुळगुळीत असतात. बकुळीच्या पानांसारखीच, परंतु किंचित जास्त रुंद असतात. झाड वेडंवाकडं वाढतं. फांद्या-फांद्यात विभागलं जातं. परंतु प्रत्येक फांदीच्या टोकावर पांढर्‍या (मोतिया) रंगाच्या फुलांचा गुच्छ दिसून येतो. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी सुवास अधिक येतो व तो आसमंतात पसरतो. त्या वेळी हे झाड लक्ष वेधून घेतं. बहरलेले फुलांचे गुच्छ खूप आकर्षक वाटतात, मात्र फुलं अगदी छोटुकली असतात. एक फूल नसतंच, तर फुलांचा गुच्छच असतो, म्हणूनच त्याला ‘एक्झोरा’ म्हणतात.
 
 
याच झाडाला ‘मंकी पझल’ असंही म्हणतात. माकडांना आकर्षित करतं, मात्र माकडांना खाण्यासारखं झाडाकडे काहीच नसतं. खुरी का म्हणतात, ते मात्र स्पष्ट झालं नाही. जंगलाच्या कडेला, देवरहाटीत अथवा जंगलवाटांवर बाजूलाच या झाडाचा आढळ आहे. मात्र एवढं सुंदर झाड असूनही त्याची लागवड न करता तोड मात्र केली जाते. टणक लाकूड हवं असेल, तर खुरीचा शोध घेऊन त्यावर सुरी (कोयती) चालवली जाते. झाडाची फांदी लावली तर जगत नाही, मात्र मुळी काढून त्यावर उगवलेले कोंब, छोटं रोप, जगतात.
 

kokan flowers 
 
या झाडाचं जतन होणं गरजेचं आहे. जसा रातराणीचा सुगंध दुरूनही मोहित करतो, तसा लोखंडीचा सुगंधही दुरून आकर्षित करतो. मात्र रातराणीचा सुगंध काहीसा उग्रही भासतो. लोखंडीचा मात्र खरंच मनमोहक-मनभावन असतो.
 
 
परवा पौर्णिमेच्या दिवशी कोसवी धनगरवाडीत मुक्कामाला होतो. सायंकाळी अचानक वात्याने लोखंडी फुलल्याची वार्ता आणली. इतरत्र शोध घेताना पायवाटेवर अचानक लोखंडी गवसली आणि तिचा सुगंध श्वासात भरून राहिला.
 
 
कोकणाची ही श्रीमंती टिकली पाहिजे.