ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू - भारत आणि बुद्धिबळ

विवेक मराठी    09-Dec-2023   
Total Views |

vivek
भारतीय बुद्धिबळ विश्व गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे बदलल्याचं जाणवतंय आणि ह्याला कारणीभूत आहेत आपले नव्या दमाचे तरुण खेळाडू. भारताकडे अगदी आत्तापर्यंत 83 ग्रँडमास्टर होते, त्यात आता एकने भर पडली आहे. हे 84वं नाव अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे, कारण तब्बल एका तपानंतर भारताला एक महिला ग्रँडमास्टर मिळाली आहे आणि ग्रँडमास्टर मानांकन मिळवणारी तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. वैशालीला मिळालेले ग्रँडमास्टर हे मानांकन तिला आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करेल हे नक्की.
विश्वनाथन आनंद ह्या एकाच नावाभोवती फिरणारं आपलं भारतीय बुद्धिबळ विश्व गेल्या 2 वर्षांत पूर्णपणे बदलल्याचं जाणवतंय आणि ह्याला कारणीभूत आहेत आपले नव्या दमाचे तरुण खेळाडू. अर्जुन एरिगसी, गुकेश, विदित गुजराती, प्रज्ञानंद, निहाल अशी एक फौजच तयार झाली आहे. मधल्या काळात खेळाडू नव्हते असं नाही, पण जे नाव आनंदने कमावलं, ते इतरांना नाही जमलं. भारताकडे अगदी आत्तापर्यंत 83 ग्रँडमास्टर होते, त्यात आता एकने भर पडली आहे. हे 84वं नाव अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे, कारण तब्बल बारा वर्षांनी भारताला एक महिला ग्रँडमास्टर मिळाली आहे. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावली ह्या दोघींनंतर आता ग्रँडमास्टर मानांकन मिळवणारी तिसरी खेळाडू ठरली आहे वैशाली रमेशबाबू.
 
 
ग्रँडमास्टर मानांकनाबद्दल थोडक्यात
 
बुद्धिबळ खेळात एकूण गुणांच्या आधारे वेगवेगळे नॉर्म्स मिळतात. फिडे मास्टर, इंटरनॅशनल मास्टर (IM), फक्त महिलांसाठी असलेला महिला ग्रँडमास्टर (WGM) आणि शेवटचा टप्पा म्हणजे ग्रँडमास्टर. तिथपर्यंत पोहोचणं हा ह्या खेळातील एक महत्त्वाचा टप्पा. 3 ग्रँडमास्टर नॉर्म्स आणि 2500 रेटिंग पॉइंट्स पूर्ण झाल्यावर खेळाडू ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जातो. सातत्यपूर्ण खेळ, जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात येणार्‍या स्पर्धांमध्ये सहभाग, आपल्याहून वरच्या स्थानी असलेल्या खेळाडूंना पराभूत करून जास्तीत जास्त गुण पदरात पाडण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टी ह्या ग्रँडमास्टर बनण्याच्या प्रयत्नात खेळाडूंना पार पाडाव्या लागतात.
 
 
वैशाली रमेशबाबू - भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर
 
गेल्या वर्ष-दीड वर्षात प्रज्ञानंदचं नाव सातत्याने समाजमाध्यमातून ऐकायला मिळतंय. मॅग्नस कार्लसनला हरवणं असो किंवा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणं, प्राग वर्षभर चर्चेत राहिला. वैशाली ही प्रागची मोठी बहीण. अगदी लहानपणी आपली मुलगी टीव्हीपासून दूर राहावी, ह्या एकमेव उद्देशाने तिच्या आईवडिलांनी - रमेशबाबू आणि नागालक्ष्मी ह्यांनी तिला बुद्धिबळाच्या आणि चित्रकलेच्या वर्गांना पाठवलं. बुद्धिबळात तिला रुची निर्माण झाली आणि कुशाग्र बुद्धीच्या वैशालीने लवकरच हा खेळ आत्मसात केला. अगदी सुरुवातीपासून वैशाली दररोज सात-आठ तास सराव करत होती.
 
 
तिने 2012 आणि 2015मध्ये अनुक्रमे 12 आणि 14 वर्षांखालील वयोगटासाठी असलेली जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. अनेकांना माहीतही नसेल, पण वैशालीने 12व्या वर्षी मॅग्नस कार्लसनला हरवण्याचा पराक्रम केला होता. मॅग्नस त्या वेळी विश्वनाथन आनंदविरुद्ध जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा सामना खेळण्यासाठी चेन्नईमध्ये आला होता. एका वेळी 20 खेळाडूंविरुद्ध तो एक सामना खेळला होता. त्या 20 खेळाडूंमध्ये वैशाली ही एकमेव खेळाडू होती, जिने मॅग्नसवर मात केली होती.
 

vivek 
 
2016मध्ये तिने थेारप Woman International Master म्हणजेच ‘थखच’ टायटल मिळवलं. त्यानंतर 2018मध्ये ती ‘महिला ग्रँडमास्टर’ ("WIM') ठरली. महिला ग्रँडमास्टर आणि ग्रँडमास्टर ह्यात खूप फरक आहे, ग्रँडमास्टर हे सर्वांसाठी खुलं असलेलं मानांकन आहे आणि त्यासाठी आधी उल्लेख केलेल्या सर्व बाबींची पूर्तता व्हावी लागते.
 
 
काही दिवसांपूर्वी वैशालीने फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकली आणि ती ह्या मानांकनाच्या अगदी जवळ येऊन ठेपली. अखेर ह्या महिन्याच्या पहिल्या दिवशी - 1 डिसेंबरला प्रतीक्षा संपली आणि स्पेनमध्ये सुरू असलेल्या एका स्पर्धेत आपला सलग दुसरा विजय नोंदवत वैशालीने तो 2500 एलो पॉइंट्सचा जादुई आकडा ओलांडला. ह्याबरोबरच वैशाली आणि प्रज्ञानंद हे ग्रँडमास्टर मानांकन प्राप्त करणारे जगातले पहिलेच बहीणभाऊ ठरले.
 
 
ग्रँडमास्टर पदापर्यंत पोहोचणं हे प्रत्येक बुद्धिबळ खेळाडूसाठी एक स्वप्न असते, आणि अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
 
 
2020मध्ये भारतीय महिला संघ ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकला होता, 2022मध्ये पहिल्यांदाच भारतात चेन्नई येथे ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या वेळी महिला संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पियाड पदक जिंकलं. ह्या दोन्ही संघांमध्ये वैशाली खेळली होती, शिवाय चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये तिने वैयक्तिक कास्यपदकदेखील पटकावलं होतं. आशियाई क्रीडास्पर्धा 2022मध्ये महिला संघाने रौप्यपदकाची कमाई केली आणि वैशाली त्या संघाचाही भाग होती. अशी दखल घेण्याजोगी कामगिरी तिने आतापर्यंत अनेकदा केली आहे. महिला ग्रँडमास्टर ते ग्रँडमास्टर हा तिचा प्रवास काहीसा संथ गतीनेच झाला, पण इथून पुढे ती नक्कीच मोठी भरारी घेईल आणि आई-वडील, गुरू यांच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल. हे ग्रँडमास्टर मानांकन तिला आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करेल ह्याची खात्री वाटते.
 
कँडिडेट्स स्पर्धा
 
नोव्हेंबरमध्ये स्विस ओपन स्पर्धा जिंकताना वैशालीने आणखी एक पराक्रम केला - ती 2024च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली. प्रज्ञानंदने विश्वचषकाच्या वेळी अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं, त्या वेळीच त्याचंही कँडिडेट्स स्पर्धेतलं स्थान नक्की झालं होतं. अशा प्रकारे वैशाली-प्राग हे कँडिडेट्ससाठी पात्र ठरणारे पहिलेच बहीण-भाऊ ठरले. भविष्यात कधीतरी अशीही वेळ येऊ शकते, जेव्हा हीच जोडी आपापल्या गटातली जगज्जेती असेल.
 
कँडिडेट्स स्पर्धेच्या विजेत्याला विद्यमान विश्वविजेत्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळते, म्हणजेच विश्वविजेतेपदाचा मार्ग ह्याच स्पर्धेतून जातो. ह्याआधी विश्वनाथन आनंद हा एकमेव भारतीय खेळाडू होता, ज्याने ही संधी मिळवली होती आणि तो विश्वविजेताही झाला होता. ह्या वर्षी आपल्याकडे खुल्या गटात प्रज्ञानंद आणि विदित गुजराती, तर महिला गटात वैशाली असे एकूण तीन खेळाडू ह्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळणार आहेत. देशासाठी हा निश्चितच अभिमानाचा क्षण आहे.
वैशालीचा संघर्ष
 
संघर्ष हा तर खेळाडूंच्या जीवनाचा एक भागच असतो. सर्वोत्तम कामगिरीसाठी केला जाणारा संघर्ष एकीकडे आणि मानसिक अस्वस्थता दुसरीकडे. आपल्या बरोबरीच्या खेळाडूंना यश मिळत असताना आपण जर आपल्या क्षमतांपेक्षा खराब खेळत असू किंवा प्रयत्न करूनही जर यश पदरी पडत नसेल, तर येणारी निराशा एखाद्या खेळाडूची कारकिर्दच संपवू शकते. प्राग वैशालीचा लहान भाऊ, तिच्याकडे बघूनच तोही ह्या खेळाकडे ओढला गेला होता. पण दैवी देणगीमुळे म्हणा किंवा आणखी काही, अगदी कमी वयातच यशाचे मोठे मोठे टप्पे तो पार करू लागला. वैशालीनेही वेगवेगळ्या वयोगटांतील अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या, पण प्रज्ञानंद मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची छाप सोडू लागला होता. आणि एक वेळ अशी आली की सगळ्यांचं लक्ष प्रागकडे वेधलं गेलं, वैशाली काही प्रमाणात दुर्लक्षित राहिली. वैशालीने स्वत:च एका मुलाखतीत हे मान्य केलं होतं, की ह्या सगळ्याचा तिला मानसिक त्रास होत होता. ह्यात एक अत्यंत सकारात्मक गोष्ट म्हणजे, इतरांकडून केला जाणारा हा भेदभाव घरी मात्र अजिबातच नव्हता. प्राग पुढे गेला म्हणून वैशालीला कमी लेखण्याची चूक त्यांच्या आईवडिलांनी कधीच केली नाही.
वाढत्या वयाबरोबर वैशालीचा समजूतदारपणाही वाढत गेला. प्रज्ञानंद पुढे जातोय, कारण तो मेहनतही खूप करतोय हे समजून घेण्याइतपत तिची कुवत नक्कीच होती.
सद्य:स्थितीत ही दोन्ही भावंडं कायम एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. स्विस ओपन स्पर्धेत प्राग चांगली कामगिरी करू शकला नाही, पण स्पर्धेत सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या वैशालीच्या सामन्यांकडे मात्र त्याचं लक्ष होतं. आक्रमक सुरुवात असेल किंवा नंतरच्या चाली, वैशालीला छोट्या भावाचा सल्ला घेण्यात कुठेही कमीपणा वाटला नाही. ह्या दोघांवर झालेले आईवडिलांचे आणि गुरूंचे संस्कार वेळोवेळी दिसून येतात.
बुद्धिबळ खेळाची सुरुवात त्यागराजन सरांकडे झाली, मात्र त्यानंतर बी. आर. रमेश ह्या स्वत: ग्रँडमास्टर असलेल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही भावंडं घडली आहेत. खेळ आणि वागण्यातील शिस्त ह्या दोन्हींचे धडे त्यांनी रमेश सरांच्या गुरुकुलात गिरवले आहेत. हे गुरुकुल म्हणजे अक्षरश: उत्तमोत्तम बुद्धिबळ खेळाडूंची खाण आहे.
बुद्धिबळ आणि भारतीय महिला खेळाडू
पूर्वीपासून भारतीय समाजात मुलींच्या पालकांच्या मनामध्ये कायम एक चिंता असे की शारीरिक कष्ट असणार्‍या खेळात जर आपली मुलगी सहभागी झाली, तर पुढे जाऊन तिचं लग्न होईल की नाही वगैरे.. बुद्धिबळ हा तर बैठा क्रीडाप्रकार आहे, पण तरीही ह्यात भाग घेणार्‍या मुलींची संख्या खूप कमी दिसते. असं का होत असेल? स्वत:चं बुद्धिबळ गुरुकुल चालवणारे ग्रँडमास्टर बी. आर. रमेश त्यांचा अनुभव कथन करताना म्हणाले, की त्यांच्याकडे अगदी पूर्वीही बुद्धिबळ शिकायला खूप मुली येत असत, पण एक वेळ अशी येते की ह्या सगळ्या मुली खेळ सोडून अभ्यासाकडे वळतात. एक काळ असा होता, की ह्या खेळाडूंकडे कुणी प्रायोजकच नसे. नोकरीचीही शाश्वती नव्हती, मग अशा वेळी शिक्षण पूर्ण करणं हा एकमेव मार्ग ह्या मुलींकडे होता. व्यावसायिक प्रशिक्षण, स्पर्धेसाठी परदेशात जाणं, तिथली राहण्याखाण्याची व्यवस्था ह्या सर्वच गोष्टी मध्यमवर्गीय पालकांच्या आवाक्याबाहेर होत्या. त्यामुळे साहजिकच पालकांचा दृष्टीकोनही उदासीन असे. आता ही परिस्थिती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे.
 
 
 
प्राग-वैशालीबद्दल बोलायचं झालं तरी तेच म्हणावं लागेल. अगदी सुरुवातीपासून चेन्नईतील रामको सिमेंट कंपनी ग्रूपने ह्या दोघांचं प्रायोजकत्व स्वीकारलं. त्यांच्याशिवाय हे दोन ग्रँडमास्टर्स भारताला मिळणं अवघड झालं असतं.
 
 
2002मध्ये वयाच्या 15व्या वर्षी ग्रँडमास्टर मानांकन मिळवून कोनेरू हम्पीने अशी कामगिरी करणारी तत्कालीन सर्वात कमी वयाची खेळाडू होण्याचा मान पटकावला होता, त्यानंतर हरिका द्रोणावली भारताची दुसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आणि आता पुन्हा एकदा एक तपाच्या प्रतीक्षेनंतर तिसरी महिला ग्रँडमास्टर भारताला मिळाली आहे. वैशालीसाठी ही फक्त सुरुवात ठरावी आणि तिने उत्तरोत्तर प्रगती करावी, ह्याच तिला शुभेच्छा.