एका ज्ञानोपासक संशोधकाची कर्मोपासना

विवेक मराठी    01-Feb-2023
Total Views |
@गौरी सुमंत-डोखळे
डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसंस्कृती या विषयासाठी, उपेक्षित वर्गातील ‘लोकांना’ जाणण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. याहून निराळे ऋषी ते काय असतील? गुरुवर्य डॉ. प्रभाकर भानुदास मांडे म्हणजेच ‘लोकां’चे भाऊ. त्यांना भारतातील अत्यंत मानाचा असा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला. भाऊंच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

mande
 
25 जानेवारी 2023. दुपारी माझ्या मोठ्या बहिणीचा, वृषालीताईचा फोन आला - “भाऊंना पद्मश्री जाहीर झालंय गं!” पद्मश्री.. केवढा मोठा सन्मान. मन अगदी आनंदाने गहिवरून गेले. भाऊंचे अभिनंदन केले आणि त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला, “पुस्तकाचं कुठवर आलंय? काम चालू आहे ना? थांबू द्यायचं नाही काम.” तत्क्षणी जाणवले या ‘पद्मश्री’मागील गमक. निरंतर कर्मयोगी, व्रतस्थ ज्ञानोपासक, संवेदनशील शोधयात्री, लोकसाहित्य व लोकपरंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमधून काही ना काही चांगले हेरणारे व त्यास ते जपायला प्रवृत्त करणारे हाडाचे शिक्षक, गुरुवर्य डॉ. प्रभाकर भानुदास मांडे म्हणजेच ‘लोकां’चे भाऊ. त्यांना भारतातील अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला.
 
 
पद्म पुरस्कारासारख्या सन्माननीय गौरवामागे थोडेथोडके कष्ट नाहीत, तर त्या व्यक्तीने वर्षानुवर्षे आपल्या कार्यासाठी केलेले समर्पण, साधना, कार्याप्रती असलेली तिची निष्ठा, अनेक क्षणिक व वैयक्तिक सुखांचा केलेला त्याग, आपल्या कार्यप्रवासात आलेल्या अडचणींचा सामना करून अपयशाने खचून न जाता केलेले पुन:प्रयत्न, नि:स्वार्थी वृत्तीने केलेली कर्मोपासना आणि तपश्चर्या असते. लोककलांचा, लोकसंस्कृतीचा व लोकपरंपरांचा अभ्यास करताना, त्यांना जतन करताना, भटक्या विमुक्त जनजातीतील ‘लोकां’च्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना आणि अभिजन परंपरा व लोकपरंपरा यांची नाळ एकमेकांशी जुळून राहण्यासाठी झटत असताना डॉ. प्रभाकर मांडे सर वर उल्लेखलेले प्रत्येक शब्द अक्षरश: जगले आहेत. एक ना दोन.. जवळपास गेली 70 वर्षे त्यांनी लोकांसाठी केलेल्या कार्याचा, अभ्यासाचा व संशोधनाचा हा यथोचित गौरव म्हणावा लागेल.
 
 
 
डॉ. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कार्याची सुरुवात
 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात सावखेड या लहानशा खेड्यात 16 डिसेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी मराठी, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. पूर्ण केले. त्यांना जुन्या पोथ्यांचा धांडोळा घेण्याची आवड होती. त्या वेळी त्यांचे वडील बंधू औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदूरवाद्या येथे शिक्षक होते. तेथील भाऊदेव जोशी या सद्गृहस्थांकडे जुनी हस्तलिखिते असल्याचे त्यांना कळले. या हस्तलिखितांचा धांडोळा घेत असताना तेथीलच किसन कुलकर्णी यांनी, नारायण नावाच्या एका कवीने मध्वमुनीश्वरांचे ओवीबद्ध लिहिलेले चरित्र मांडे सरांना दाखविले. संशोधक वृत्ती मुळातच असल्यामुळे त्यांनी या हस्तलिखितावर आधारित एक विस्तृत शोधनिबंध लिहिला. त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांना त्यांनी हा शोधनिबंध दाखविला. त्यांनाही या अभ्यासपूर्ण लेखाचे कौतुक वाटले आणि हा लेख महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात छापावा असे त्यांना वाटले. मात्र लेख मोठा होता. अंक केवळ 40 पानी असायचा. याबाबत आर्थिक तरतूद व्हावी व परवानगी मिळावी, म्हणून प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातच राहत असत. प्राचार्य चिटणीस या अवघ्या 18-19 वर्षांच्या तरुण प्रभाकरला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. “मुलांनी असा अभ्यास करावा यासाठीच हे अंक व उपक्रम असतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पृष्ठसंख्या, आर्थिक नियोजन असे मुद्दे आड येता कामा नयेत. अंकाला खास परिशिष्ट जोडून लेख छापा” असे बाबासाहेबांनी सांगितले. बाबासाहेबांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, लेखाचे कौतुक केले आणि असेच लिहीत जा, अभ्यास करत राहा असे सांगितले. बस्, तेव्हापासून मांडे सरांनी जी संशोधनाची कास धरली, ती कायमची. “खुद्द बाबासाहेबांच्या आशीर्वादाने माझ्या कार्याची सुरुवात व्हावी, यासारखे अहोभाग्य नाही” असे सांगताना आजही मांडे सरांचा कंठ दाटून येतो.
 

mande 
 
 
लोकसंस्कृतीचा शोधयात्री
 
 
पदवी मिळाल्यानंतर नोकरीची गरज असल्याने त्यांनी कन्नड तालुक्यातील पिशोर येथे माध्यमिक शाळेतील शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. पिशोर हे आडवळणावर डोंगराळ भागात असलेले लहानसे खेडे. तेथे मांडे सरांनी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये फिरून जात्यावरच्या ओव्यांचे संकलन केले. यातूनच त्यांची लोकसंस्कृतीतील व लोकसाहित्यातील गोडी वाढली आणि पुढे त्यांनी याचाच ध्यास घेतला. नंतर मांडे सरांनी मराठी विषयामध्ये एम.ए. केले. पिशोर येथे संकलित केलेल्या लोकगीतांच्या संकलनामुळे प्राचार्यांबरोबर चर्चा करून त्यांनी संशोधन अध्ययन क्षेत्र म्हणून हाच विषय निश्चित केला. लोकसाहित्याचे संकलन आणि त्याचे आकलन हे दोन्ही नेहमीच त्यांच्या आस्थेचे विषय राहिले आहेत. यातूनच चालू झाली त्यांची शोधयात्रा. प्रत्यक्ष भ्रमंती करून माहिती आणि तथ्ये गोळा करून मग अन्य विचारवंतांचे व ग्रंथांचे संदर्भ अभ्यासून आपला स्वत:चा विचार निश्चित करून संशोधन करणे हे त्यांच्या अभ्यासाचे खास वैशिष्ट्य. पायाला भिंगरी लावल्यासारखे ते खेडोपाडी, गावोगावी, पालांवर, पाडांमध्ये, तांड्यांमध्ये फिरले. लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास केला. त्यांचे जीवन जवळून अनुभवले. भटक्या विमुक्त लोकांमध्ये जाऊन त्यांच्यातलेच एक होऊन राहिले. त्यांच्या सांकेतिक गुप्त भाषा शिकले. पदयात्रा केल्या. आजवर उपेक्षित राहिलेल्या लोकसाहित्याचा हा अनमोल ठेवा या शोधयात्रीने एकत्रित केला, जतन केला आणि त्यास मुख्य प्रवाहात मान्यता मिळवून दिली. या संकलन-संशोधनातून जी अतुलनीय साहित्यसंपदा निर्माण झाली, त्याचे महत्त्व मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, लोकसाहित्य आणि अभिजन साहित्य या सर्वांना एकत्रित बांधणारा दुवा म्हणून पुढील कित्येक वर्षे राहील.
 
 
ज्ञानसाधनेसह कर्मोपासना
 
 
लोकसाहित्य हाच त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. या विषयात त्यांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. ‘लोकसाहित्य अंत:प्रवाह’, ‘गावगाड्याबाहेर’, ‘सांकेतिक गुप्त भाषा’, ‘भाकिते’, ‘मौखिक वाङ्मय - स्वरूप आणि परंपरा’, ‘लोकमानस - रंग आणि ढंग’, ‘मांग आणि त्याचे मागते’, ‘हिंदुत्व’ अशी कितीतरी अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरली आहेत. ‘गावगाड्याबाहेर’ आणि ‘सांकेतिक भाषा’ या दोन्ही ग्रंथांची गुणवत्ता आणि संशोधनमूल्य लक्षात घेऊन 1991मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ. मांडे यांना डी.लिट. प्रदान करून सन्मानित केले. त्यांनी पीएचडीसाठी जेव्हा लोकसंस्कृती हा विषय ठरविला, तेव्हा संपूर्ण भारतात केवळ चार विद्यापीठांमध्ये हा विषय होता. मांडे सरांनी जेथे हा अभ्यासक्रम होता तेथून माहिती मिळविली, अभ्यासक्रम तयार केला, वरिष्ठांकडून मान्यता मिळविली आणि तेव्हापासून मराठवाडा विद्यापीठात लोकसाहित्य या विषयाचा अभ्यासक्रम चालू झाला. आज लोकसाहित्य हा स्वतंत्र विषय घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यावर एक प्रकारे मांडे सरांचे हे उपकारच आहेत.
 
 
समाजात नेहमीच श्रमनिष्ठ व ज्ञाननिष्ठ - म्हणजेच जन आणि अभिजन असे दोन वर्ग चालत आले आहेत. हळूहळू ज्ञाननिष्ठ वरचढ झाले. ते स्वत:ला श्रेष्ठ समजू लागले. दोन्ही वर्गांच्या स्वतंत्र परंपरा निर्माण झाल्या. अनुभवातून शिकणारे, निसर्गाशी जोडलेले ते जन, तर शब्दातून, ग्रंथातून शिकणारे ते अभिजन. भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आपल्याला हे पाहायला मिळेल. वरवर वेगळे दिसणारे हे वर्ग मुळात मात्र एका धाग्याने जोडलेले होते. पूर्वी त्यांच्यात तुटकपणा नव्हता. हिंदुस्तानातील ब्रिटिशांचे राज्य, औद्योगिक क्रांती आणि इंग्रजी शिक्षणपद्धती यामुळे मात्र अलीकडे ही नाळ तुटायला लागली. मुळांपासून उखडले जाणे हे समाजाच्या अधोगतीचे मुख्य कारण असते, हे डॉ. मांडे निश्चित जाणत होते. त्यांच्या या द्रष्टेपणामुळेच त्यांनी लोकसंस्कृतीला अभिजन संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या विषयात संशोधन आणि अध्ययन करणार्‍यांसाठी एक व्यासपीठ मिळावे आणि एक चळवळ उभी राहावी, या हेतूने त्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठ अभ्यासक दुर्गा भागवत, चिंतक व लेखक डॉ. रा.चिं. ढेरे, नरहर कुरुंदकर यांसारख्या दिग्गजांच्या आशीर्वादाने 1978 साली औरंगाबाद येथे ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या मंडळाला एक मुखपत्र असावे, यासाठी एक त्रैमासिक चालू केले. औरंगाबाद येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तेथे व्यक्त केलेले त्यांचे विचार अत्यंत चिंतनीय आणि मौलिक होते. भटकंती करून, लोकांमध्ये राहून, त्यांचे जीवन प्रत्यक्ष अनुभवून जाणलेल्या माहितीला आपल्या वैचारिक बैठकीची जोड देऊन संशोधन करणारा हा ज्ञानोपासक चर्चासत्रे, संस्था, व्यासपीठ, नियतकालिके, लेख, पुस्तके या सर्व माध्यमांतून लोकसाहित्य आणि अभिजन साहित्य यांच्यातील दुवा बनून राहिला.
 

mande 
 
 
शिक्षकाच्या भूमिकेतून
 
 
महाविद्यालयीन शिक्षण संपवून मांडे सरांनी ग्रामीण भागात शिक्षकी पेशाचे व्रत घेतले. त्यांची संपूर्ण कारकिर्द शिक्षण क्षेत्राशीच जोडलेली आहे. पिशोरला माध्यमिक शिक्षक, बीड, परभणी येथे अध्यापक, मराठवाडा विद्यापीठात प्रपाठक आणि नंतर प्राध्यापक. प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे त्यांना सातत्याने वाटायचे. यासाठी मुलांना संस्कारयुक्त शिक्षण मिळावे, म्हणून त्यांनी परभणी येथे बाल विद्या मंदिर सुरू केले. संस्थेचा पायाच त्यांनी इतका भक्कम केला की, आज पन्नास वर्षांनंतरही ही संस्था आपल्या मूळ तत्त्वांना जतन करून कार्यरत आहे.
 
 
‘लोकां’चे भाऊ - लोकमहर्षी
 
 
या ऋषितुल्य अभ्यासकाची आणखी एक वेगळी ओळख आहे - लोकांच्या गोतावळ्यात रमणारे, माणसे जपणारे सर्वांचे भाऊ. डीलिट मिळविलेल्या अभ्यासकांसाठी, डॉ. मांडे यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते ‘भाऊ’ कधी होतात, हे कळतही नाही. भाऊंच्या बोलण्यात समोरच्या माणसाला आपलेसे करण्याची हतोटी आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाचा कोणता ना कोणता गुण हेरायचा आणि त्या व्यक्तीस त्या संदर्भात कार्यरत करायचे, हा तर त्यांचा खास गुण विशेष. अनेक विद्यार्थी, मित्रमंडळी, लेखक, संशोधक, आप्तस्वकीय, शेजारीपाजारी, नातेवाईक.. एवढेच नाही, तर मुलांच्या मित्रमंडळींनादेखील त्यांनी आपलेसे करून घेतले आहे. त्यांच्या सुप्त गुणांना शोधून त्यांना वाव दिला.
 
 
त्यांच्या घरात माणसांचा सतत राबता. त्यांचा एक शिरस्ता आहे - घरी कोणीही आले, तरी ते जेवून जाणार. आलेल्या पाहुण्यांनी घरातून जाताना पोटभर जेवून तृप्त होऊनच जायचे. यामुळेच अनेक जनजातीतील भटके विमुक्त लोक, जे आजही मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, ते भाऊंपाशी येऊन आपले मन मोकळे करतात. भाऊंचा जनसंपर्क अत्यंत दांडगा आणि माणसे टिकवून ठेवण्याची कला तर काही औरच.
 
 
सतत कामात रमणार्‍या भाऊंची अनेक रूपे आहेत. एकीकडे शिस्तप्रिय व व्रतस्थ मांडे सर, दुसरीकडे कुटुंबवत्सल भाऊसुद्धा आहेत. त्यांच्या पत्नी मंगला प्रभाकर मांडे या अखेरची बरीच वर्षे अंथरुणाला खिळून होत्या, तेव्हा थोडीथोडकी नाही, तर तब्बल 13 वर्षे त्यांनी आपल्या पत्नीची न कंटाळता मनापासून केलेली सेवा त्यांच्या मनातील हा हळवा कोपराच दाखविते. या वेळेसही त्यांच्या अभ्यासात, वाचनात, लिखाणात, कार्यात त्यांनी तसूभरही खंड पडू दिला नाही, हे आणखी विशेष.
 
 
त्यांचे जवळचे नातेवाईक एक अनुभव आवर्जून सांगतात. भाऊंच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम जवळच्या काही मंडळींनी योजला होता. या कार्यक्रमात भाऊंनी प्रेमाने जमविलेली, जोडलेली माणसे न सांगता विनाआमंत्रण केवळ भाऊंना पाहायला, त्यांना शुभेच्छा द्यायला आली. वेगवेगळ्या जातीचे, भटके विमुक्त, लोककलावंत यांनी सभागृह गच्च भरून गेले. स्वत: भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले. या लोकमहर्षीसाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे साजरा केलेला हा अनोखा लोकोत्सव होता.
 
 
ऋषितुल्य
 
 
ऋषी म्हणजे नेमके कोण? असे व्यक्तिमत्त्व, जे निरंतर संशोधनात, अभ्यासात व चिंतनात मग्न असते, आपल्या ध्यासासाठी स्वत:ला वाहून घेते आणि ‘स्व’ला विसरून संपूर्ण समाजाच्या उत्कर्षासाठी झटत राहते. डॉ. प्रभाकर मांडे यांनी लोकसंस्कृती या विषयासाठी, उपेक्षित वर्गातील ‘लोकांना’ जाणण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. याहून निराळे ऋषी ते काय असतील? भाऊंच्या कार्याचा हा आढावा घेताना आता तुकोबांच्या ओळी सारख्या माझ्या मनात येत आहेत -
 
 
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा॥