विदर्भातील वैभवसंपन्न धार्मिक स्थळे

विवेक मराठी    11-Feb-2023
Total Views |
विदर्भातील अभयारण्यातील जीवविविधता पाहण्यासाठी अनेक पर्यटक पसंती दर्शवितात. तसेच या ठिकाणी धार्मिक स्थळेदेखील पाहण्यासारखी आहेत. या धार्मिक स्थळांना ऐतिहासिक वारशाचे कोंदण लाभले आहे.

vivek
 
विदर्भ हा प्रदेश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी जीवविविधता, खाणींचा खजिना, नदी, खोरी आहेत आणि त्याबरोबर अभयारण्याने येथील पर्यटनात आणखीनच भर घातली आहे. या ठिकाणी धार्मिक स्थळेदेखील पाहण्यासारखी आहेत. मग, या धार्मिक स्थळांबरोबर विदर्भातील काही वारसा स्थळांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
 
 
एकमेवाद्वितीय मार्कांडा - गडचिरोली
 
काही स्थानांवर गेल्यावर तेथील विलक्षण कलाकृती प्रेमातच पाडते, असेच एकमेवाद्वितीय मार्कंडा आहे. आपल्यापैकी बरेच जण या स्थानी गेले असतील. अतिशय सुंदर, रम्य, शांत ठिकाण म्हणून आपण नागपूरहून एका दिवसात जाऊन येऊ शकतो. नागपूरपासून 190 कि.मी. दूर असलेले एक गाव आहे. ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेऊन उत्तरवाहिनी होते आणि यासाठी याचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे.
 
 
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे. म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण ’तीर्थक्षेत्र’ म्हणतो. नदी, त्यातही उत्तरवाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात. मार्कंडा हे असेच एक तीर्थक्षेत्र आहे. मार्कंडेय ऋषींची तपोभूमी म्हणून आज मार्कंडा ओळखले जाते. येथील सर्व लहान-मोठी मंदिरे एकाच नागर शैलीतील आहेत.
  
 
साधारणपणे इ.स. 1873-75पर्यंतच्या काळात सर कनिंगहॅम यांनी सर्वप्रथम या मंदिरांकडे जगाचे लक्ष वेधले. आज मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे बघताक्षणीच मनाला भुरळ घालणारी आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्माचे आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटांचे आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारताना चेहर्‍यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. आवर्जून प्रत्यक्ष बघावे असेच हे स्थान आहे.
 
 
vivek

केवल नृसिंह - रामटेक
 
वाकाटक म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे होते. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या - एक नंदिवर्धन (नगरधन, नागपूर) आणि दुसरी शाखा वत्सगुल्म (वाशीम). पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ होती. सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे होते.
 
 
नागपूरपासून जवळपास 40 कि.मी. अंतरावर असणार्‍या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या रामटेक शहरातील वाकाटकांच्या खुणा असलेल्या पुरातन केवल नृसिंह मंदिर आहे.
 
 
रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर ही महाराष्ट्रातील आद्य-वैष्णवांची ठळक उदाहरणे म्हणून पाहिली जातात. आपण नरसिंहाची अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील, पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मीळ शिल्प आहे. आवर्जून बघावे असेच हे मंदिर आहे.
 
 

vivek
 
कापूर बावडी - रामटेक
 
विदर्भात अनेक प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहेत. काही जतन करून ठेवल्या आहेत, काही पडायला आलेल्या आहेत. अशीच एक वास्तू बघण्याचा योग आला, तिचे नाव आहे ‘कापूर बावडी’. रामेटकपासून साधारणपणे 5-6 कि.मी. अंतरावर असलेले निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ठिकाण ‘कापूर बावडी’. प्रसिद्ध जैन मंदिराजवळच असलेले हे ठिकाण प्रत्येकाला आवडेल असेच आहे. रामटेक तसे प्राचीन स्थान आहे. आता मनसरच्या जागतिक उत्खननाने या रामटेकची आणखी एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
 
आता बावडी म्हणजे बाहुली अर्थात विहीर. गडावरदेखील अशीच एक बाहुली आहे. तीसुद्धा अशीच भव्य आहे. गडावरील बाहुलीचे नाव आहे ‘लोपामुद्रा बाहुली’. लोपामुद्रा म्हणजे अगस्त्य ऋषींची पत्नी. साधारणपणे 4000 वर्षांपूर्वी दक्षिण भारतात आर्यांची संस्कृती सरकली. त्याचा पहिला टप्पा म्हणजे रामटेक. विदर्भात ‘कलचुरी’ नावाचे राजे होऊन गेले. त्यांनी ही बाहुली बांधली, म्हणून त्याचा अपभ्रंश होत होत त्याचे नाव कापूर बावडी असे पडले.
 
दैत्यसूदन मंदिर - लोणार
 
 
जगप्रसिद्ध लोणार सरोवरासोबतच लोणारमध्ये एक अपरिचित, प्राचीन पण तितकीच सुंदर वास्तू उभी आहे, ती म्हणजे दैत्यसूदन मंदिर. आज जगात असलेल्या तीन उल्कापाती सरोवरांतील एक विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात लोणार या गावी आहे. असे म्हणतात की, अमेरिकेत अ‍ॅरिझोना, आफ्रिकेत बोत्सवाना व रशियात सैबेरिया येथे अशी सरोवरे आहेत. भारतात ते विदर्भात आहे. या उल्कापाती सरोवरामुळे लोणार हे गाव आणि लोणार सरोवर जगन्मान्य झाले आहे आणि त्याच्याच जवळ हे दैत्यसूदन मंदिर आहे.
 
 
लोणार सरोवराच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. दैत्यसूदन मंदिर हे त्यातले सर्वात उत्कृष्ट आणि विलक्षण सुंदर आहे. नागपूरहून 400 कि.मी. इतक्या लांबचा प्रवास करून इथे यायचे म्हणजे एक साहसच होते. पण मंदिर पाहिल्यावर मिळणार्‍या समाधानात इथे येण्याचे सार्थक होते. आपल्या पूर्वजांनी केलेल्या शिल्पांचे नक्षीकाम बघून अभिमान वाटतो आणि नकळत हात जोडले जातात. इतिहासाची साक्ष देणारे हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. विलक्षण अद्भुत स्थापत्यरचना, नाजूक कोरीवकाम, उत्कृष्ट शिल्पकला, शिल्पांचे वैविध्य, त्यावरील भाव हे आपल्या प्रगत प्राचीन भारतीय कलेचा परिचय देत दैत्यसूदन मंदिर आज उभे आहे. हे सगळे पाहत असताना आणि पुढे कितीही वेळा पाहिले, तरी मन भरत नाही. आवर्जून बघावे असेच मंदिर म्हणजे दैत्यसूदन मंदिर.
 
 
जगदीश्वर महादेव मंदिर - अंभोरा
 
 
नागपूर-भंडारा रस्त्यातील हे अत्यंत रमणीय ठिकाण अंबानगरी अर्थात अंभोरा आहे. अंभोरे गावात अतिउंच कडा असून याच पार्श्वभूमीवर त्यास कोलासुरानचे पहाड म्हणतात. आकाशात झेप घेणारे पक्षी हमखास सरळ चैतन्येश्वराच्या प्राचीन मंदिराच्या छतावर येऊन स्थिरावतात. अंभोरा हे देवस्थान वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, त्यामुळे निसर्गसौंदर्याच्या आणि सांस्कृतिक दृष्टीने हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. भरगच्च पसरलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि या निसर्गसौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दु:ख विसरायला लावणारे आहे. कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्येश्वर आहे. कारण चैतन्य इथल्या कणाकणात ठासून भरल्याचे बघताक्षणीच जाणवते.
 
 
 
अंभोरा येथे पाच नद्यांचा संगम, मुकुंदराजाची समाधी, चैतन्येश्वरांचे पितळी कळस, धर्मशाळा, भूगर्भाचा तुटलेला कडा, नद्यांचे पाणी आणि घनदाट अरण्य असे निसर्गाचे अद्भुत दर्शन होते. या अंभोरा नगरीचे प्राचीन नाव अंबनगरी, त्याची झाली अंबानगरी व आता आपण तिचे आधुनिक नाव ठेवले श्रीक्षेत्र अंभोरा आहे. आपल्या मायमराठीचे आद्य ग्रंथ समजतात ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी. पण या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या 100 वर्षे आधी आपल्या विदर्भातील एका विद्वानाने ‘विवेकसिंधू’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्या विद्वानाचे नाव आहे मुकुंदराज. ते एका अर्थाने मराठीचे आद्य ग्रंथकार ठरतात. श्री क्षेत्र अंभोरा ही त्यांची भूमी आहे. अंभोर्‍यात अनेक पुरातन अवशेष आहेत. पूर्व दिशेच्या उंच कड्यावर असलेल्या श्रीचैतन्येश्वरांचे देऊळ त्या सर्व पुरावशेषात सर्वोत्तम असेच आहे. अंभोरा हे एका अर्थाने पाच नद्यांच्या संगामावरील बेट असून त्याच्या मध्यभागी पूर्व दिशेस उंच जाणार्‍या पायर्‍यांनी वर चढत गेलो की, आपण त्या प्राचीन मंदिरात पोहोचतो. वरच्या माथ्यावरून जो निसर्गसौंदर्याचा देखावा दिसतो, तो शब्दांच्या पलीकडचा आहे.
 

vivek 
 
रुक्मिणी मंदिर - महाल - नागपूर
 
नागपूर शहराचा इतिहास, श्रीमंत राजे भोसले राजवंश व गोंड राजवंश यांच्या भोवतीचा आहे. या उभय राजवंशांनी नागपूरचे वैभव उभे केले होते. त्यातही विशेषत: द्वितीय रघुजी भोसले महाराजांच्या कारकिर्दीत नागपूरचा दर्जा सुशोभित अशा दिल्ली शहरासारखा होता. त्या वेळी बागबगिचे, पेठा, राजवाडे, मंदिर, मठ, स्थापत्य, स्मारक, स्तंभ यांच्या उभारणीची त्यांनी झपाट्याने सुरुवात केली होती. त्यातील त्यांनी बांधलेली मंदिरे आजही या सगळ्या वैभवाची साक्ष देत उभे आहे.
 
श्रीमंत भोसले यांचे मंदिरस्थापत्य हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्यालाही मर्यादा आहे. नागपूर शहरातील भोसल्यांनी बांधलेल्या या मंदिरात भोंडा महादेव, पार्डीचे श्रीकृष्ण मंदिर, सोनेगावचे मधुसूदन मंदिर, सक्करदर्‍याचे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, महालातील असंख्य मंदिरे यांचा समावेश होतो. या सर्व मंदिराच्या स्थापत्याचा मुकुटमणी ठरावे असे महालातील श्रीरुक्मिणी मंदिर आहे. हे मंदिर अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. गांधी गेट ते बॅ. अभ्यंकर पुतळ्याच्या मधोमध ही स्थापत्यकृती आहे, प्रवेशद्वार कमानी असून त्या काळी बाजूच्या ओट्यावर द्वारपाल असत. त्यात हे मंदिर आपल्या पूर्ण वैभवाने ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता आजही दिमाखात उभे आहे.
 
 
नागपूरमधील हे मंदिर म्हणजे स्थापत्यकृती, शिल्पप्रतिमा व सुशोभन यांचा परमोच्च बिंदू आहे. श्रीमंत राजे भोसल्यांनी साधारणपणे काही वर्षांपूर्वी ओरिसा, छत्तीसगड, बिहार व बंगाल जिंकला. साहजिकच तेथील कारागीर, शिल्पकार, मूर्ती कोरणारे स्थापती, तंत्रज्ञ, देवळे बांधणारे त्या वेळी नागपूरला आले आणि स्वाभाविकच नागपूरच्या अनेक मंदिरस्थापत्यावर ओरिसा-छत्तीसगड स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. श्रीरुक्मिणी मंदिर असेच आहे. श्रीमंत राजे भोसले यांच्या राजवाड्यास अगदी लागून असलेले हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या शिल्पपरंपरेपेक्षा वेगळे स्थान असलेल्या श्रीरुक्मिणी मंदिरात संगमरवराचा गरुड मंडप असून त्यावर राजस्थानच्या कारागीरांचा प्रभाव जाणवतो. आवर्जून बघावे असे अप्रतिम मुरलीधर मंदिर आहे.
 
 
श्री मधुसूदन मंदिर - सोनेगाव - नागपूर
 
 
नागपूरातील मधुसूदन मंदिर बरेच दिवस एकांतात असेच होते. सोनेगाव विमानतळ भागात असल्याने कुणी सहसा तेथे जात नसे. पण आता विमानतळावर जाण्यासाठी नवा रस्ता येथून सुरू झाल्यामुळे ही वास्तू सहज नजरेत भरणारी आहे. या वास्तुकलेचे वेगळेपण म्हणजे दगडी बांधणी. अनेक प्रकारच्या जाळीने नक्षीदार व कुठली तरी कल्पना साकारल्यासारखी दिसतात. या मंदिरात मुधुसूदन रूपातील श्रीकृष्णाबरोबर रुक्मिणी आणि सत्यभामा आहेत आणि हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळते.
कमलपुष्पासारखे शिखर असलेला सुरेख व टुमदार राजस्थानी थाटाचा गरुड मंडप पाहतच राहावा असा आहे. त्यात श्री नासिकाग्र मुद्रेचा टोकदार गरुड म्हणजे एक दिव्य अनुभवच आहे. मंडपाचा आकार चौकानी असून सभोवताल सज्जा आहे. त्यावर कमळकलिकांची खास मराठा शैलीतील महिरप असून तीदेखील सुशोभित आहे. उंच उंच होत जाणारी ही मंदिर मालिका म्हणजे श्रीमंत भोसल्यांनी भारतीय शिल्पपरंपरेवर केलेले खूप मोठे स्थापत्य उपकारच ठरतात आणि आजही इतके वर्षे होऊनसुद्धा ती वैभवाने उभी आहेत. वारा, पाऊस आणि वादळ यांचे अनेक तडाखे बसूनसुद्धा ही ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभी आहे. नक्कीच एकदा तरी बघायला हवे असे हे मुधुसूदन मंदिर आहे.