आडवाटेवरची कोकणातील विष्णुरूपे

विवेक मराठी    11-Feb-2023
Total Views |
@चिन्मय भावे। 9930840074
तीर्थक्षेत्र म्हटले की, तुडुंब भरलेला भक्तांचा जनसागर. हे जरी सुखावणारे असले, तरी अशा ठिकाणी आत्मानुभूती येत नाही. ही आत्मानुभूती कोकणातल्या शुद्ध आणि अंतर्मुख करणार्‍या देवळांमध्ये सहज आपल्याला प्रसाद म्हणून गवसते. काही ठिकाणे अगदी जवळच असतात, पण तरीही दुर्लक्षित, नजरेआड गेलेली असतात. मग हळूहळू त्यांना दुर्गमता प्राप्त होते आणि परिसरात राहणारे लोकही त्याबद्दल अनभिज्ञ होतात. पण भटक्यांना अशीच आडवाटेवरील ठिकाणे खुणावतात.
 
vivek
 
 
जसा कोकणातला माणूस साधा, तशीच त्याची घरेही साधी आणि इथल्या देवाचेही फार काही वेगळे नाही. ’जागृत देवस्थानाच्या कोलाहलात’ नवस मागायला फेडायला आलेल्या भक्तांच्या गोंगाटात आणि भाऊगर्दीत देव रमत असेल असे मला वाटत नाही.. किंवा तिथे त्याचे कर्तव्य पार पाडून इथे शांत निष्काम भक्ती अनुभवायला येत असेल. खरे म्हणजे मी अज्ञेयवादी आहे. देव आहे अशी काही माझी श्रद्धा नाही. तो नाहीये हे मी सिद्धही केलेले नाही. पण अशा ठिकाणी निसर्गाच्या कृपेने पवित्र मांगल्यपूर्ण शुद्ध ठिकाणी भारलेले वातावरण असते, हे मात्र नक्की. आपल्या रोजच्या जीवनात जे शुद्ध अनुभव आपल्याला मिळत नाहीत, ते शुद्ध आणि अंतर्मुख करणारे अनुभव कोकणातल्या देवळांमध्ये सहज आपल्याला प्रसाद म्हणून गवसतात, असे मला वाटते. काही ठिकाणे अगदी जवळच असतात, पण तरीही दुर्लक्षित, नजरेआड गेलेली असतात. मग हळूहळू त्यांना दुर्गमता प्राप्त होते आणि परिसरात राहणारे लोकही त्याबद्दल अनभिज्ञ होतात. पण अशीच आडवाटेवरील ठिकाणे हाडाच्या भटक्यांना खुणावत असतात. सडवे, शेडवई, बिवली, शीर, धामणी, कोळिसरे, दिवेआगर अशा अनेक ठिकाणी शिलाहारकालीन विष्णुशिल्पे आहेत. सुमारे 900 ते 1000 वर्षे जुनी ही शिल्पे कोकणातील पुरातत्त्व रत्ने आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. तुरवडे येथील केशवाची मूर्ती त्याच श्रेणीची आणि अतिशय सुंदर कोरीव काम असलेली आहे. पण केवळ इथले शिल्पवैभव हे एकमेव आकर्षण नाही. निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि काळाच्या चक्रावर न धावता काहीसे निवांतपणे मागे रेंगाळलेले हे ठिकाण पर्यटक म्हणून पाहण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे, असे मी कोकणातला भटक्या म्हणून अगदी खात्रीने सांगू शकतो.
 
 
सडवेची विष्णुमूर्ती
 
 
दापोली शहरापासून जेमतेम 15-16 किलोमीटर अंतरावर असलेले सडवे विष्णुमंदिर असेच एक ठिकाण. बहुसंख्य
दापोलीकरांना या ठिकाणाबद्दल कल्पना नाही. दापोलीतून सडवलीच्या दिशेने गेले की सडवे गाव लागते. काही घरे आणि एखादी शाळा आपल्याला दिसते. तिथून उतार असलेल्या कच्च्या रस्त्याने ओढ्याजवळ गेले की कोकणच्या इतिहासातील एक रत्न आपल्याला सापडते. आपण नकळत 700-800 वर्षे मागे जातो. ओढ्याजवळ झाडीच्या गर्द हिरवळीत एक नवीन मंदिर आपल्याला दिसते. तिथे असलेली जांभा दगडाची दीपमाळ या ठिकाणच्या प्राचीनतेची साक्ष देते. मंदिरात गेल्यावर आपल्याला दिसते अप्रतिम कोरीवकाम केलेली विष्णुमूर्ती. स्थानिक या मंदिराला लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात, परंतु मूर्तीच्या हातातील आयुधांचा क्रम पाहून ही मूर्ती केशवाची आहे, हे ओळखता येते. हे कसे ओळखायचे? तर मूर्तीचा खालचा उजवा हात, वरचा उजवा हात, डावा वरचा हात आणि डावा खालचा हात क्रमाने पाहायचे. त्यातील आयुधांची अद्याक्षरे घ्यायची. इथे पद्म (कमळ), शंख, चक्र आणि गदा असा क्रम दिसतो. म्हणजे पशंचग क्रम. यावरून ही केशवरूपाची मूर्ती आहे, हे सांगता येते. (संदर्भ - प्राध्यापक देगलूरकर) मूर्तीच्या मागे असलेल्या प्रभावळीवरही अतिशय सुंदर कोरीवकाम आहे, असे दिसते. या ठिकाणी दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे दागिने, गळ्यातील माळा, पायातील वाळे हे सर्व बारकावे नीट पाहायला हवेत. चार फूट उंच या काळ्या दगडाच्या मूर्तीच्या बाजूलाच एक फूट उंचीही गरुडमूर्तीसुद्धा आहे. त्याची मुद्रा, आभूषणे, उभे राहण्यातील आदरभाव सगळेच जिवंत वाटावे इतके बोलके शिल्पकाम येथे केले आहे. या मूर्तीच्या पायाशी असलेल्या दगडी पट्टीवर देवनागरीत लिहिलेला संस्कृत शिलालेख आहे, त्याचा अर्थ असा - विष्णूची मूर्ती सुवर्णकार कामदेवाने केली. उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवुगीनायक याने शके 1127, सोमवार रोहिणी नक्षत्र या दिवशी मूर्तीची स्थापना केली (इसवीसन 1205 साली मूर्तीची स्थापना झाली) म्हणजे आपल्याला 815 वर्षे जुना पुरातत्त्व वारसा पाहायला मिळाला तर!
 

vivek 
 
शेडवईचा श्री केशरनाथ
 
दापोली ते मंडणगड रस्त्यावर दहागाव रस्त्याने शेडवईकडे जाणारा रस्ता येतो. उतार-चढाव आणि वळणे असलेल्या या रस्त्याने आपण एका फाट्यापाशी पोहोचतो, जिथे आपल्याला उजवीकडे 200 मीटरवर उताराच्या कच्च्या रस्त्याने जाता येईल असे दर्शवणारी श्री केशरनाथ मंदिराची पाटी दिसते. या उतारावरून एका पाराजवळ आपण पोहोचतो, तिथे खळाळणारा ओढा आणि त्याच्या बाजूला असलेले लहानसे कौलारू मंदिर आपल्याला दिसते. मंदिरातील मूर्ती श्री केशरनाथाची म्हणजे विष्णूची असून पद्म, शंख, चक्र, गदा म्हणजेच पशंचग हा क्रम पाहता केशवाचे हे रूप असल्याचे लक्षात येते. मूर्तीच्या डाव्या बाजूला लक्ष्मी, तर उजव्या बाजूला गरुडाचे शिल्प आहे. पाषाणात कोरलेल्या या मूर्तीत मस्तकाजवळ डावीकडे महेश, तर उजवीकडे ब्रह्मा आहे, असे लक्षात येते. प्रभावळीवर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम असे दशावतार कोरलेले दिसतात. केशवाचे वस्त्र आणि अलंकार अतिशय नाजूक कोरीवकामाने घडवलेले दिसतात. या पाषाणाला असलेल्या काळ्या-हिरव्या चमकदार पृष्ठभागामुळे ही मूर्ती आणखीनच खुलून दिसते.
 
 
बिवलीचा लक्ष्मीकेशव
 
चिपळूण हे कोकणातील एक महत्त्वाचे शहर, रेल्वे स्टेशन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण. गुहागर या माझ्या अतिशय आवडत्या ठिकाणी जायला चिपळूण सोयीचे पडते. सध्या या रस्त्यावर पुलाचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे, पण लवकरच हा मार्ग आणखी उत्तम होईल अशी आशा. पण या हमरस्त्याला सोडून थोडी भ्रमंती करण्याची तयारी जर असेल, तर काही नितांतसुंदर ठिकाणे पाहता येतात. असेच एक ठिकाण म्हणजे बिवली. चिपळूणहून वसिष्ठी नदीच्या पात्राला समांतर 25-30 कि.मी. पश्चिमेकडे गेले की मालदोली नावाचे ठिकाण लागते. तिथे हल्ली नदीतून बॅकवॉटर सफारी करण्याची सोय झाली आहे. मालदोलीकडे जात असताना केतकी या नावाचे गाव लागते. नदीचे पात्र उजवीकडे ठेवत 20 कि.मी. अंतरावर श्रीराम मंदिर आहे, तिथून सरळ डाव्या बाजूला बिवलीकडे जाणारा रस्ता लागतो. शेवटचा काही भाग थोडा कच्चा आहे, पण गाडी व्यवस्थित गावापर्यंत जाते. गूगल मॅपमध्ये शेवटचे 200 मी. अंतर पायी जावे लागते असे दर्शवले असले, तरीही कच्च्या मार्गावरून गाडी मंदिरासमोर पोहोचते. पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर बिवली गावातील नीळकंठशास्त्री थत्ते यांची नेमणूक झाली. इथली लक्ष्मीकेशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. सन 1830मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. (संदर्भ - आशुतोष बापट.) हे देवस्थान थत्तेमंडळींचे कुलदैवत मानले जाते. पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशवरूप मानली जाते. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या विष्णुमूर्ती पाहता येतात. 11-12व्या शतकात कोकणावर शिलाहार राजांचे शासन होते, तेव्हा यापैकी बहुतांश मूर्ती कोरल्या गेल्या. लेखाच्या शेवटी दिलेली लिंकही नक्की पाहा. त्याही नक्की पाहा. मूर्तीच्या गळ्यातील माळेत आंबा कोरला आहे, म्हणजे मूर्तिकार स्थानिकच असावा का? मूर्तीच्या पायाशी श्रीदेवी आणि नमस्कार मुद्रेतील गरुड दिसतो आणि सोबत सेविका आहेत. मूर्तीच्या हातातील कमळ एका बाजूने स्त्रीरूपाचा आभास निर्माण करते, यालाच लक्ष्मी मानले जाते. अतिशय सुंदर मुकुट, कोरीवकाम असलेली प्रभावळ आणि अगदी खरी वाटावीत अशी आभूषणे असे नाजूक कोरीवकामाने नटलेले हे शिल्प आहे. गाभार्‍यासमोर गरुडशिल्प आहे, ते नवीन असावे. जसे शिवमंदिरात नंदी असतो, तसाच इथे गरुड आहे.
 

vivek 
 
तुरवडेचा केशवराज
 
केशवराज म्हटले की डोळ्यासमोर येते दापोलीजवळ आसूदजवळ डोंगरावर वसलेले रम्य देऊळ.. एकेकाळी आडवाटेवरील पर्यटन स्थळ असलेले हे मंदिर आता आवर्जून पाहण्याच्या ठिकाणांमध्ये गणले जाते. पण आज मी तुम्हाला दुसर्‍या एका केशवराजाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे. दापोलीपासून हे ठिकाण फार दूर नाही. वेळवी-केळशी रस्त्याने दौली गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता दरीत उतरतो, तिथे अडीच किलोमीटर आतमध्ये हे विलक्षण ठिकाण आहे. वेळवी ते केळशी हा रस्ता तसा छानच असतो. अरुंद, पण बहुतांश ठिकाणी व्यवस्थित डांबरीकरण असलेला पण काहीसा अरुंद. समोरून एसटी फेरारीच्या वेगात आली की कशीबशी गाडी घाईघाईने बाजूला घ्यावी लागते इथे. उत्तरेकडे या रस्त्याने मंडणगड-आंबेत-माणगाव असे मुंबईच्या दिशेने जाता येते. भोमडीनंतर दौली गाव येते. दौली गावाची कमान येण्यापूर्वी काही मीटर आधी डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला तुरवडे गावात घेऊन जातो. रस्ता वरच्या बाजूला तसा रुंद आणि सपाट असला, तरी अनेक ठिकाणी तो अरुंद आणि तीव्र उताराचा आणि नागमोडी वळणांचा आहे. खाली अनेकांच्या आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळे बोलेरोसारख्या गाड्या अगदी खालपर्यंत जातात. मला मात्र हा धोका पत्करायचा नसल्याने मी केळशीचे स्नेही संतोष महाजन यांची होंडा शाइन घेऊन गेलो. सुमारे दीड किलोमीटर अंतर मी बाइकने उतरल्यानंतर अरुंद, घसार्‍याची आणि अतिशय तीव्र उतार असलेली वळणे येऊ लागली. एकदोन ठिकाणी ब्रेक दाबल्यानंतर दुचाकी घसरली, तेव्हा मी ती कडेला लावून पुढे पायी जायचे ठरवले. 100 मीटर चाललो असेन, तेव्हा डावीकडच्या पायवाटेने एक ताई आपल्या गाईंना घेऊन आल्या आणि तुरवडेच्या दिशेने चालत होत्या. मला त्यांनी कुणीकडे चालला असे विचारले. केशवराज मंदिर म्हटले, तेव्हा हसून म्हणाल्या, “गाडी जाते की! सगळे घेऊन जातात. घाबरता कशाला!” मी म्हटले, “आता अर्धा डोंगर उतरलो आहे तर चालतच पुढं जातो.” सकाळचे साडेसात वाजले असतील, त्यामुळे 25-260 से. तापमान होते. दरीत कदाचित 2-30 से. कमीच असतील. सुमारे 120 मीटर उतरून आपण खाली जातो.. म्हणजे साधारणपणे 400 फूट म्हणता येईल. दोन्हीकडे गर्द वनराई आणि पक्ष्यांचा किलबिलाट.. कुठेतरी दूरवर गावात लागलेला रेडिओ.. ओल्या मातीचा गंध, ऊन-सावलीचा खेळ आणि चालता चालता हातांना होणारा पानांचा स्पर्श.. असा सगळ्याच इंद्रियांना मुग्ध करून टाकणारा आसमंत अनुभवत दरीत उतरायचे. नदीचे पात्र अरण्यात लपलेले असल्याने दिसत नाही, मात्र खाली पोहोचत आलो की खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू यायला लागतो. डाव्या बाजूला आता झाडांच्या जाळीमागे नदीचे पात्र दिसायला लागले होते. जांभा दगडाच्या पायर्‍या आल्या, तेव्हा वाट सोडून खाली उतरलो. एक जुने कौलारू घर आणि समोर उभी केलेली बैलगाडी हीच काय ती तिथल्या मानवी अस्तित्वाची खूण. नदीपलीकडे मंदिराचा कळस तर दिसत होता, पण पायवाट काही दिसेना. कुठूनतरी अचानक तिथे एक आजोबा अवतीर्ण झाले. मंदिराचे गुरव असावेत. मला म्हणाले, “या वेळी पावसाळा लांबला, त्यामुळे नदीत दगड टाकून वाट बनवलेली नाही. ही काठी घे आणि हळूहळू चालत पलीकडे जा. पाणी गुडघाभरही नाही, पण शेवाळावरून घसरणार नाही तेवढे पाहा.” सकाळचे साडेआठ वाजायला आले असावेत, पण तरीही इथे दरीत ऊन अजूनही जेमतेम पोहोचले होते. निवळशंख पाणी आणि त्यात सुळकन फिरणार्‍या छोट्या माशांच्या टोळ्या.. पाण्याची बाटली रिकामी झाली होती, ती पटकन पाण्यात बुडवून भरली आणि गोड आणि गार मिनरल वॉटरने तृप्त झालो. इथे खाली किलबिलाट करणारे पक्षीही नव्हते. रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि कुठल्यातरी झाडावर बसलेल्या घुबडाची धीरगंभीर साद ऐकू येत होती. झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या काळतोंड्या लंगूर माकडाने माझ्याकडे पाहिले आणि एक हाळी देऊन ते रानात गडप झाले. जेमतेम 50-60 मीटर रुंद असलेले नदीपात्र ओलांडून मी दुसर्‍या तिरावर आलो. तिथे पात्राला उतार होता आणि खळाळत पाणी वाहत होते. एक छोटेसे सुबक दगडी मंदिर दृष्टीस पडले. नित्सुरे, खांबेटे, वर्तक अशा शांडिल्य गोत्री कुटुंबांचे हे कुलदैवत. असे म्हणतात की तुरवडे गावात 5 घरे आणि 25 लोकसंख्या आणि त्यात नदीच्या दोन्ही बाजूला करमरकर मंडळी राहतात आणि या देवळाची काळजी घेतात. गोकुळाष्टमीला इथे उत्सव असतो. मंदिराच्या जुन्या फोटोत कौलारू सभामंडप दिसतो. मी गेलो, तेव्हा मात्र ते सगळे बांधकाम ढासळून गेलेले दिसले. पण आतली केशवाची विलक्षण कलाकुसर असलेली एक मीटर उंच मूर्ती हे या ठिकाणचे खास वैभव. पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशवरूप मानली जाते. शिस्त नावाच्या दगडात कोरलेली ही मूर्ती असावी असे जाणकार सांगतात. मागच्या प्रभावळीवर ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. शिवही आहे. शंख आणि चक्र हे फॉर्म अप्रतिम कोरले आहेत.. आभूषणे तर अगदी खरी वाटावीत इतकी नाजूक आणि सुबक आहेत. अकराव्या किंवा बाराव्या शतकातील या शिल्पकारांच्या प्रतिभेला दंडवत घालावासा वाटेल इतके अद्वितीय हे कोरीवकाम, पण थोडेसे आडवाटेला असल्याने दुर्लक्षित. मूर्तीच्या पायाशी गरुड आणि लक्ष्मीही कोरलेले आहेत. दशावतारसुद्धा आहेत. एक मूर्ती हलधारी वाटते, त्यामुळे तो बलराम असावा असा माझा कयास आहे. परत निघालो, तेव्हा केशरी नदीच्या पाण्यात चपला काढून पाय बुडवून बसण्याचा मोह आवरला नाही. तिथले अद्भुतरम्य जग सोडून परत जायला पाय निघत नव्हते. एका बाजूला गर्द रान, तर दुसर्‍या बाजूला आंबा, केळी, सुपारी अशी बाग. डोंगराच्या ओंजळीत असलेल्या या दरीत झिरपलेला मोबाइल फोनचा सिग्नल हीच काय ती आपण 2023मध्ये असल्याची खूण.
 

vivek
 
मावळंगेचा योगनरसिंह
 
 
संगमेश्वर तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती यांचे अद्वितीय मिश्रण असलेले एक विलक्षण रसायन. शास्त्री नदीच्या खोर्‍यातील डोंगर-दर्‍या आणि त्यांच्या दरम्यान वसलेली गावे. करजुवेचा त्रिवेणी संगम पाहून तुरळकडे जाणार्‍या रस्त्यावर असेच एक विलक्षण गाव आहे, त्याचे नाव मावळंगे. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष झालेले माननीय दादासाहेब मावळंकर इथलेच. मराठ्यांच्या इतिहासाची सविस्तर मांडणी करणारे रियासतकार सरदेसाईसुद्धा इथलेच. पण मुख्य मार्गापासून गावात जाणारा रस्ता मात्र खडबडीत. चारही बाजूंनी गर्द झाडीने वेढलेल्या एका उतारावरील भागात असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गाडी रस्त्यापासून खाली जांभा दगडाची पाखाडी उतरून जावे लागते आणि अचानक एक टुमदार सभामंडप असलेले देऊळ आपल्यासमोर येते. हेच योगनरसिंहाचे स्थान. भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह किंवा नृसिंह अवतार. दुभंगलेल्या खांबातून बाहेर येऊन हिरण्यकश्यपूचा कोथळा फाडणारे हे दैवी स्वरूप. याला विदरण नरसिंह म्हणतात. उभा असणारा स्थौण नरसिंह, लक्ष्मी सोबत असलेला लक्ष्मी-नृसिंह (कर्णेश्वर देवळाच्या बाजूला एक लक्ष्मी-नृसिंह देवस्थान आहे) अशी अनेकविध रूपे आहेत. मेळुकोटे, कराडजवळचे कोळे नरसीपूर, हळेबिडू अशा अनेक ठिकाणी नृसिंह शिल्पे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो ती मांडी घालून बसलेली पायाला योगपट्ट बांधलेली योग-नरसिंह मूर्ती. भारतविद्या पारंगत आशुतोष बापटांनी त्यांच्या पुस्तकात या मूर्तीचे विलक्षण सुंदर वर्णन केले आहे. उजव्या खालच्या हातात कमंडलू, तर वरच्या उजव्या हातात चक्र आहे. वरच्या डाव्या हाताने शंख धारण केलेला असून खालच्या डाव्या हाताने लक्ष्मीला आलिंगन दिलेले दिसते. लक्ष्मीची आभूषणे मराठी शैलीची आहेत. नथ आणि नऊवारी, दोन वाट्यांचे मंगळसूत्र, केसांचा अंबाडा आणि पुतळ्यांची माळ असा हा विलक्षण साज आहे. मूर्तीच्या शिरावर करंडमुकुट आहे आणि नागाच्या फ़ण्याने त्यावर छत्र धरलेले आपल्याला दिसते. मुकुटावरील कोरीवकाम नाजूक आणि सुबक आहे आणि इतके प्रमाणबद्ध कोरीवकाम पाहून आपण चकित होतो. मूर्तीमागे असलेल्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत, त्यांची रचना उजवीकडून डावीकडे केलेली दिसते. यातील मत्स्य आणि कूर्म अवतार हे मनुष्य रूपात इथे कोरलेले दिसतात, हे इथले वैशिष्ट्य.
 
 
नमः श्री नरसिंहाय मावलङ्ग निवासिने,
नृसिंह भट्ट वन्शस्य दीर्घ उद्धार कारिणे
 
गोदावरी नदीच्या तिरावर राहणारे नरसिंहभक्त नृसिंह भट्ट सत्यवादी हे कौशिक गोत्री ब्राह्मण दहाव्या शतकाच्या अखेरीस देशाटन करत मावळंगे येथे आले आणि नृसिंहाचे हे जागृत ठिकाण पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी इथेच वास्तव्य करण्याचे ठरवले. त्यांचे नातू नृसिंह भट्ट यांनी कोल्हापूरचा शिलाहार राजा विजयार्क (इसवीसन 1142 ते 1154) याच्याकडून संगमेश्वर गाव इनाम मिळवले. त्याचा पुत्र कृष्णाजी याने विजयार्क पुत्र भोजराजा (इसवीसन 1190) याच्या पदरी पराक्रम गाजवला व संगमेश्वर गाव वसवले. त्याला मावळंगे गाव इनाम मिळाले आणि मग तिथे लक्ष्मी-नृसिंह मंदिर बांधले गेले. पुढे त्याच्या वंशातील केशवनायक याने 1637मध्ये इथे घुमट आणि लाकडी सभामंडपाची रचना केली. त्यानंतर सुमारे अडीचशे वर्षांनी झोंबडीकर देसाई मंडळींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंगलोरी कौलांचे छप्पर तेव्हाच उभारले गेले. अतिशय सुबक असे लाकडी कोरीवकाम आपण आजही गर्भगृहाजवळ पाहू शकतो. या भागात पुढे सिंघण राजा यादवांचे शासन आले आणि कृष्णभट्टच्या कर्तबगारीने त्यांना इथले सरदेसाईपण मिळाले आणि या कुटुंबाने तेच नाव धारण केले. काही जण मावळंगे गावावरून मावळंकर नाव लावू लागले. रियासतकार सरदेसाई इथलेच. बडोद्याचे आणि कोल्हापूर येथेही गोविंद सखाराम सरदेसाई, पुणे येथील डॉ. नरहर गोपाळ सरदेसाई आणि अहमदाबाद येथील गणेश वासुदेव मावळंकर यांनी सर्व ऐतिहासिक साधने तपासून आणि संकलित करून या घराण्याचा इतिहास लिहिला व 26 एप्रिल 1926 रोजी नृसिंह जयंतीच्या दिवशी प्रकाशित केला. पुढे ग.वा. मावळंकर यांनी पुढाकार घेऊन रत्नागिरीचे कंत्राटदार नाना सुर्वे यांच्या मदतीने 1938 साली मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. त्यासाठी रुपये 4500 खर्च झाला, असे दगडी फलक नमूद करतो.